माधुरी ताम्हणे – madhuri.m.tamhane@gmail.com

मारहाण किंवा अत्याचाराचा सामना करणाऱ्या स्त्रीची मन:स्थिती अत्यंत कठीण असते. त्यात हे अत्याचार जोडीदाराकडून  किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून होत असतील, तर कु टुंबाची  प्रतिष्ठा धोक्यात येऊ नये यासाठी  स्त्रिया दाद मागायलाही  कचरतात. घटना कोणत्याही स्त्रीच्या बाबतीतली असो, स्वयंसेवी संस्था आणि शासनातर्फे  चालवल्या जाणाऱ्या काही हेल्पलाइन्स अशी प्रकरणे यशस्वीपणे हाताळून पीडित स्त्रीला आधार देत आहेत, तिला न्याय मिळावा यासाठी मार्ग दाखवत आहेत. अशा विविध हेल्पलाइन्सविषयी २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबपर्यंतच्या स्त्री हिंसाविरोधी पंधरवडय़ानिमित्ताने..

कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमधील पीडित स्त्रियांना न्याय मिळवून देणे आवश्यक आहे, हे अनुभवाअंती वीस वर्षांपूर्वी सायन रुग्णालयाच्या तत्कालीन अधिष्ठाता डॉ.अर्मिडा फर्नाडिस यांना जाणवलं आणि त्यांनी ‘स्नेहा’ (सोसायटी फॉर न्यूट्रिशन, एज्युकेशन अँड हेल्थ अ‍ॅक्शन) ही संस्था सुरू केली. त्याअंतर्गत नागरी वस्त्यांमध्ये स्त्रिया आणि  मुलांवरील अत्याचारांविरोधात आणि यातील पीडितांना आधार मिळावा यासाठी एक कार्यक्रम आखण्यात आला. ‘प्रीव्हेन्शन ऑफ व्हायोलन्स अगेन्स्ट विमेन अँड चिल्ड्रन’ या कार्यक्रमाअंतर्गत धारावी आणि इतर वस्त्यांमध्ये पीडित स्त्रिया आणि मुलांसाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले. त्याच वेळी आपत्कालीन परिस्थितीसाठी ‘स्नेहा’ची हेल्पलाइन सुरू करण्यात आली.

‘स्नेहा’च्या कार्यक्रम समन्वयक शिरीषा येवतीकर सांगतात, ‘‘डॉ. नायरीन दारूवाला यांच्या मार्गदर्शनातून स्त्रिया आणि मुलांवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्याचे काम सुरू करण्यात आले. आमचे हे काम दुपेडी आहे. एकीकडे वस्ती पातळीवर, तर दुसरीकडे रुग्णालय, पोलीस यांच्याबरोबर आम्ही काम करतो. सर्वप्रथम स्त्रियांवर अत्याचार होऊच नये यास्तव तिला सक्षम करायचे आणि अत्याचार झालाच, तर अन्यायाला वाचा कशी फोडायची हे तिला शिकवायचे, असे आमचे धोरण आहे. शारीरिक, भावनिक आणि मानसिक अत्याचार हे सर्व स्तरांतल्या स्त्रियांवर होत असतात. फक्त पत, पैसा आणि प्रतिष्ठा यामुळे उच्चभ्रू वर्गातील स्त्रिया मूग गिळून गप्प बसतात. म्हणूनच आम्ही हेल्पलाइनच्या माध्यमातून सर्व स्तरांतील स्त्रियांना हे सांगतो, की कोणत्याही प्रकारच्या कौटुंबिक हिंसाचाराला खंबीरपणे विरोध करा, तो सहन करू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.’’

‘स्नेहा’तर्फे धारावी, गोवंडी, मानखुर्द, वडाळा, कुर्ला, मालवणी या सहा ठिकाणी २२ केंद्र समुपदेशक ही हेल्पलाइन चालवतात आणि या मदत केंद्रांतून स्त्रियांना मदत दिली जाते. ही सेवा मुंबईबाहेरील स्त्रियांसाठीसुद्धा उपलब्ध आहे. काही वेळा नवऱ्याने मारहाण करून एखाद्या स्त्रीला घराबाहेर काढलेले असते. अशा वेळी ती थेट या आपत्कालीन मदत केंद्रात येऊ शकते. ती निराधार असेल तर तिची तात्पुरत्या निवासात सोय केली जाते. तिच्यावर शारीरिक वा लैंगिक अत्याचार झालेला असेल तर ‘स्नेहा’चे कार्यकर्ते तिला पोलीस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल करतात. गरज भासल्यास तिला कायदेशीर मदतही दिली जाते. ही सर्व सेवा विनामूल्य आहे. पीडित स्त्रीला भीतीच्या दडपणातून मुक्त केल्यामुळे आणि आधाराच्या पाठबळामुळे त्या स्त्रीचा आत्मविश्वास वाढतो.

काही वेळा स्त्रिया स्वत:हून मदत केंद्रात येत नाहीत. पण हेल्पलाइनवरून माहिती मिळताच ‘स्नेहा’चे कार्यकर्ते स्वत:हून अशा पीडित स्त्रीच्या घरी जातात, तिच्या परिसरातल्या स्त्रियांना एकत्र करतात, त्यांना घटनेची आणि त्यावरच्या उपाययोजनेची नीट माहिती देतात. त्यांच्यातील एकीची गटनेता म्हणून निवड केली जाते आणि तिला ‘संगिनी’ म्हणून संबोधले जाते. त्यांना ‘स्नेहा’द्वारे प्रशिक्षण दिले जाते. वस्तीतल्या एखाद्या स्त्रीवर अत्याचार झाल्यास सर्व स्त्रियांनी एकत्र येऊन पोलीस ठाण्यात वा १०३ या हेल्पलाइनवर फोन करून मदत कशी मिळवायची याचे रीतसर प्रशिक्षण दिले जाते.

‘स्नेहा’च्या समन्वयक संगीता पुणेकर सांगतात, ‘‘टाळेबंदीच्या काळातली आमच्या हेल्पलाइनवर कळलेली ही एक घटना- एका स्त्रीला नवरा खूप मारत असे. तिची बहीण त्याच इमारतीत राहते. पण भीतीपोटी ती गप्प होती. शेवटी आम्ही फोनवरून तिच्या बहिणीशी संपर्क साधला, शेजाऱ्यांना कळवले. त्यांना नजीकच्या पोलीस ठाण्याचे फोन नंबरही दिले. पोलिसांना त्या स्त्रीची हकिगत कळवली. पोलिसांनी तातडीने कारवाई करून तिच्या नवऱ्याला सज्जड दम दिला आणि त्या स्त्रीची बहिणीकडे व्यवस्था केली. आणखी एक प्रकरण तर फारच वेगळे आहे. त्या स्त्रीला प्रतिमहा सुमारे एक लाख रुपये पगार मिळत होता. पण पगार तिच्या खात्यावर जमा होताच पाच मिनिटांत नवरा तो काढून घेई. त्याने घरात ‘सीसीटीव्ही’ कॅ मेरे लावले होते. तिच्या प्रत्येक हालचालीवर तो नजर ठेवी, ती घरात येताच तिला समोर बसवून तिचा फोन ताब्यात घेऊन तिचे दिवसभरातले फोन तपासे. शारीरिक मारहाणीला तर सीमाच नव्हती. त्या स्त्रीने आधी आमच्या हेल्पलाइनवर फोन केला. नंतर एक दिवस जेवणाच्या सुटीत चोरून आम्हाला भेटायला आली आणि खूप रडली. ती आत्महत्या करण्याच्या टोकाच्या निर्णयाला आली होती. पण तिला मदत करणे खूप कठीण होते. कारण नवऱ्याने तिची सगळी मूळ कागदपत्रे ताब्यात घेतली होती. पुढे आम्ही नवऱ्यावर खटला दाखल के ला आणि तिची स्वतंत्र घरात व्यवस्था केली. नवऱ्याला ‘अँगर मॅनेजमेंट’चे उपचार घ्यायला लावले, त्याचे दीर्घकाळ समुपदेशन केले. अखेर दोघांचा समेट झाला आणि आता ते सुखाने संसार करत आहेत.’’

अमेरिकेतील ‘महाराष्ट्र फाउंडेशन’च्या विश्वस्त सुनीता धुमाळे यांनी तेथील स्त्रियांसाठी ‘मैत्रीण’ ही हेल्पलाइन सतरा वर्षांपूर्वी सुरू केली. त्या आपले अनुभव सांगतात, ‘‘एका गृहिणीला तिचा नवरा खूप मारहाण करत असे. निमित्त अत्यंत सामान्य असत. त्याला संध्याकाळी सात वाजता डिनर तयार लागे. पण कधीतरी मुलीचा नृत्याचा वर्ग वा मुलाची फुटबॉल मॅच असे. त्यामुळे स्वयंपाकाला तिला उशीर होई. अशा वेळी तो तिला पट्टय़ाने मारत असे. मुले घाबरून जात. त्या स्त्रीला याची वाच्यता कुठे करावी हेच कळत नव्हते. ‘मैत्रीण’ हेल्पलाइनवर तिने तक्रार केली आणि तिची या समस्येतून सुटका झाली.’’ अशा  स्त्रिया आता ‘मैत्रीण’ हेल्पलाइनचा विश्वासाने आधार घेतात. काही वर्षांपूर्वी आणखी एक विचित्र केस हेल्पलाइनवर आली. चार स्त्रियांचा हेल्पलाइनवर फोन आला. त्या चौघींना आत्महत्या करायची होती. त्यांच्या बाबतीत ‘वाइफ स्वॅपिंग’चा- पत्नीच्या अदलाबदलीचा प्रकार घडला होता. सुरुवातीला मोहापायी किंवा नवऱ्याला बढती मिळावी या हेतूने त्यांनी नवऱ्यांना संमती दिली. पण नंतर मात्र शारीरिक संबंधांसाठी पुरुषांची अशी अदलाबदली करणे त्यांना नकोसे झाले होते आणि त्यांनी आत्महत्येचा विचार केला. सुनीता यांनी अनेक दिवस त्यांना धीर देत आणि समजावत मानसोपचारतज्ज्ञाकडे जाण्यासाठी तयार केले. पुढे त्यांनी कळवले, की मानसोपचार घेतल्यानंतर त्या वैफल्यातून बाहेर आल्या आणि आता सुखी आहेत.

हल्ली विवाहबाह्य़ संबंधांमुळे पत्नीचा छळ करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. अशा प्रकरणांमध्ये ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोगा’ची हेल्पलाइन खूप उपयोगी ठरत आहे. हेल्पलाइनवर पीडित स्त्रीने फोन केल्यास त्या स्त्रीची पूर्ण माहिती घेतली जाते, तिला नेमकी कशाची गरज आहे ते तपासले जाते आणि त्यानुसार तिला वैद्यकीय मदत, पोलिसांचे साहाय्य आणि समुपदेशन सेवा दिली जाते. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या समन्वयक सुनीता गणगे ‘सुहिता हेल्पलाइन’विषयी माहिती देतात. ‘‘टाळेबंदीच्या काळात बीडमधून एका स्त्रीचा फोन आला. ती विधवा तीन मुलींसह सासरी राहते. पण सासरचे लोक तिच्यावर इतका संशय घेतात, की ती आत्महत्येचा विचार करू लागली होती. समुपदेशकांनी तिला खूप समजावले, धीर दिला. त्याचबरोबर तिच्या सासरच्या मंडळींना कडक समज दिली आणि तिची या परिस्थितीतून सुटका केली. अवघड प्रकरणे आयोगाकडून महिला व बालविकास कार्यालयातील संरक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवल्या जातात. अशा पीडित स्त्रियांना विधी प्राधिकरणाकडून विनामूल्य कायदेविषयक मदतही दिली जाते.’’

मुंबई उच्च न्यायालयातील वकील आणि घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये मध्यस्थ समन्वयक म्हणून काम करणाऱ्या अ‍ॅड. वृषाली राजे आपला अनुभव सांगतात. ‘‘शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्टय़ा कमकुवत स्त्रियांवर सर्व प्रकारचे अत्याचार होत असतात. विकृत मनोवृत्तीचे पुरुष त्यांना मारहाण करतात. मात्र हल्ली कायद्याने स्त्रियांच्या हक्कांचे संरक्षण उत्तमरीत्या केले आहे. मात्र दुर्दैवाने काही घटनांमध्ये याचाच फायदा घेऊन काही स्त्रिया पतीच्या मालमत्तेसाठी त्याच्यावर हिंसाचाराची खोटी प्रकरणे दाखल करत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आम्हाला खूप बारकाईने वस्तुस्थिती जाणून घ्यावी लागते.’’

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे अनेकदा पुरुषांनी फसवून विवाह केलेल्या स्त्रियांची प्रकरणे येतात. एका घटनेत एका गुंडाने अल्पवयीन मुलीशी लग्न केले आणि तिच्यावर अनन्वित लैंगिक अत्याचार केले. दारू पिऊन आणि औषधे खाऊन तो तिच्याशी रानटीपणे शारीरिक संबंध ठेवत असे. आयोगाने वैद्यकीय अहवालाच्या आधारे त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली.  काही प्रकरणांत ‘एचआयव्ही’ग्रस्त पुरुष स्त्रियांना फसवून त्यांच्याशी लग्न करतात असं दिसून आलं. अशा स्त्रियांनी हेल्पलाइनवर तक्रार केल्यास त्यांना सर्वतोपरी मदत दिली जाते. याव्यतिरिक्त काही वेळा विपरीत घटनांच्या तक्रारी येतात. आयोगाच्या संपर्क अधिकारी कपालिनी सिनकर एका प्रकरणाविषयी सांगतात, ‘‘एकदा आमच्या हेल्पलाइनवर एका पुरुषाने फोन करून आपली पत्नी फातिमा हरवली असल्याची तक्रार केली. ती पश्चिम आशियामध्ये कामासाठी गेली होती आणि गेले कित्येक महिने तिच्याशी संपर्क होत नव्हता. त्याला पत्नीच्या पारपत्राची झेरॉक्स आणि तिचा फोटो घेऊन ऑफिसमध्ये बोलवण्यात आले. तातडीने दूतावासाशी संपर्क करण्यात आला. प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्यावर ज्या मध्यस्थाने तिला कामासाठी नेले होते त्याने तिला विमानात बसवून भारतात पाठवून दिले. पुढे कळले की कामाच्या ठिकाणी तिचा खूप छळ करण्यात येत होता, तिला उपाशी ठेवण्यात येत होते. हे प्रकरण यशस्वीरीत्या सोडवल्यानंतर पंजाब-हरियाणातून आयोगाकडे मदतीसाठी अनेक फोन आले.’’

पीडित स्त्री भारतातील असो वा परदेशातील, तिच्या मदतीसाठी शासन, सेवाभावी संस्था, महिला आयोग सर्वजण तत्पर असल्याचेच या हेल्पलाइन्सच्या कामगिरीवरून समोर येत आहे.

स्नेहा हेल्पलाइन- ९८३३०५२६८४, ९१६७५३५७६५

हेल्पलाइन नंबर- १०३

मैत्रीण हेल्पलाइन नंबर- २०३६९५९९५१

महाराष्ट्र राज्य महिला आयोग- सुहिता हेल्पलाइन नंबर- ७४७७७२२४२४