स्त्रीचं पुढे जात राहणं आता अपरिहार्य आहे. पण या मार्गावर विकृती, हिंसा, शोषण दबा धरून बसलेले आहेत. त्या सगळ्यातून वाचत, वाचवत आपला मार्ग सुकर करायचा असेल तर प्रत्येक तरुणीने, स्त्रीनेच खंबीर, सजग व्हायला हवं. पोलिसांच्या यंत्रणांचा यथायोग्य वापर करीत स्वत:ला सुसज्ज बनवत तिने स्वत:भोवतीचं असुरक्षेचं चक्र भेदायचं आहे. नव्या वर्षांत हा संकल्प करायलाच हवा. स्वत:साठी आणि स्त्रीवर्गासाठीही..

गेल्या वर्षी जानेवारीच्याच एका पहाटे मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात उतरलेल्या इस्थर अनुह्या या २३ वर्षीय तरुणीवर एका टॅक्सीचालकाने बलात्काराचा प्रयत्न केला आणि नंतर तिची हत्याही केली, महालक्ष्मीच्या शक्ती मिलच्या आवारात छायाचित्र काढण्यासाठी गेलेल्या एका छायाचित्रकार तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला, पवईत रात्री उशिरा घरी परतलेल्या तरुणीवर इमारतीच्याच सुरक्षारक्षकाने बलात्कार केला, प्रभादेवीत पिझ्झा ऑर्डर करणाऱ्या मुलीवर डिलिव्हरी बॉयने घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन तिचा विनयभंग केला, वडाळ्याच्या भक्ती पार्कमध्ये राहणाऱ्या पल्लवी पुरकायस्थ या तरुणीची बलात्काराच्या उद्देशाने घरात घुसलेल्या सुरक्षारक्षकाने हत्या केली, अंधेरी एमआयडीसीमध्ये गॅस डिलिव्हिरी करणाऱ्यांनी घरात एकटय़ा असलेल्या नवविवाहितेवर बलात्कार केला.. एकामागोमाग एक घडलेल्या.. न संपणाऱ्या घटनांचं हे दुष्टचक्र..
आम्ही आमच्याच देशात कधीच सुरक्षित वावरू शकणार नाही का? हा स्त्रियांचा आर्त सवाल या घटनांच्या पाश्र्वभूमीवर घुमतोय. सरकार, पोलीस प्रशासन स्त्रियांना पुरेसं सुरक्षित वातावरण देऊ शकत नाहीत, हे सत्य या घटनांमुळे पुन:पुन्हा अधोरेखित होतंय. बदलत्या काळात स्त्री सक्षम आणि खंबीर झाली आहे. स्वत:ची गुणवत्ता सिद्ध करीत ती घराबाहेर पडतेय. दिवसेंदिवस ती पुढे येत राहणारच आहे. पण या सगळ्यात घरातून बाहेर पडून घरी परतेपर्यंत अनेक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष धोके तिच्या अवतीभोवती वावरत असतात. असंख्य पुरुषी वखवखलेल्या नजरा तिच्यावर खिळलेल्या असतात. त्या संधीची वाट बघत राहतील, एखादी क्षुल्लक चूक तिला अडचणीत आणू शकेल. अवतीभोवती अनेक गुन्हे घडत आहेत,  संक टं येत आहेत.. येत राहतील. पण त्यासाठी हतबल होण्याची किंवा घाबरून जाण्याची गरज नाही. कारण समाजात स्त्रियांभोवती असलेले हे असुरक्षेचं चक्र आता स्त्रियांनाच भेदायचंय आणि ते शक्य आहे, थोडं सावध राहून आणि पोलिसांनी दिलेल्या सुरक्षेच्या मदतीने.
विकृतांचा समाज
एखादी व्यक्ती किती विकृत आहे, ती विकृती कशी, कधी बाहेर पडेल हे त्या त्या व्यक्तीकडे बघून कळतही नाही. संधी मिळेल तेव्हा त्यांच्यातील राक्षस जागा होतो. मुंबईतल्या गेल्या काही महिन्यांतल्या घटना पाहिल्या तर त्याची प्रचीती येते. परळच्या प्रख्यात केईएम रुग्णालयातील तरुण डॉक्टर रात्रपाळीला होती. रात्री साडेबारा वाजता ती पहिल्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टमध्ये चढली. लिफ्टमध्ये एक वॉर्डबॉय आणि अन्य तीन जण होते. ते तिघेही पहिल्या मजल्यावर उतरले. तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी फक्त काही सेकंद लागणार होते. पण त्या वॉर्डबॉयमधल्या विकृतीने संधी साधत त्या डॉक्टरचा लिफ्टमध्येच विनयभंग केला. दादर रेल्वे स्थानकात पहाटे साडेसहाच्या सुमारास क्लासला जाण्यासाठी निघालेली एक तरुणी ट्रेनची वाट पाहत फलाटावर थांबली होती. त्या वेळी एकाने अचानक तिच्या अंगावर झडप घालत तिचा विनयभंग केला. आदल्याच रात्री तो उत्तर प्रदेशातून मुंबईत आला होता. तशीच घटना कुलाब्यात घडली. रात्री ८ च्या सुमारास कुलाब्यात अगदी नौदलाच्या गेटसमोरील बसथांब्याजळ एक तरुणी घरी जाण्यासाठी बसची वाट बघत उभी होती. एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने तिला पाहिले आणि त्याने तिचा विनयभंग केला. दोन्ही प्रकरणांत पादचाऱ्यांनी त्यांना पकडून पोलिसांच्या हाती दिलं. पण या सर्व प्रकरणांत या तरुणी-मुलींची काय चूक होती? त्यांनी काही उत्तान कपडे घातले नव्हते, की त्या एकांतात नव्हत्या आणि एकटय़ाही नव्हत्या. मुंबईतल्या एका नामांकित सरकारी रुग्णालयात शिकाऊ डॉक्टर तरुणी आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली. त्यांच्या शेजारीच पुरुषांचं बाथरूम होतं. त्या वेळी या डॉक्टरला तिचं चोरून मोबाइल चित्रण होत असल्याचं लक्षात आलं. शोध घेतल्यावर लक्षात आलं की, ते चित्रण करणारा तिचाच सहकारी डॉक्टर होता.  ‘एक्स रे’ काढतानाही मोबाइल कॅमेरा लावून चित्रण करण्याचे प्रकार नवीन नाहीत. मुलुंडमध्ये असाच प्रकार एका स्त्रीच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. तेथील तंत्रज्ञाला पोलिसांनी अटक केली. गेल्या दोन वर्षांपासून तो हा प्रकार करीत होता. कितीतरी महिला त्याच्या विकृतीला बळी पडल्या. नोकरदार स्त्रिया लोकल ट्रेनमधून दररोज प्रवास करतात. अगदी सेकंदाचा वेळही महत्त्वाचा असतो. त्या वेळी रेल्वे स्थानकाच्या आवारात गर्दीत हेतुपुरस्सर धक्के मारणारे, चोरटा स्पर्श करणारे कमी नाहीत. स्त्रियांना हे समजतंही, पण थांबायला, तक्रार करायला वेळ नसतो. अगदी लालबागच्या गर्दीतही असा विकृत आनंद घ्यायला जाणाऱ्यांची संख्या कमी नाही.

Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Maha Metro, Nagpur, decrease, Metro fare, 33 percent, March 1 2024,
नागपूरकरांसाठी गुड न्यूज, मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?

अलीकडे स्त्रियांना भेडसावणारा त्रास  सायबरसंबंधातील गुन्ह्य़ांचा असतो.   इंटरनेटवर अश्लील फोटो बनवून टाकणं, अनोळखी मोबाइल क्रमांकातून अश्लील मेसेजेस पाठवणं, असे अनेक प्रकार केले जातात. हे सर्व प्रकार सायबर गुन्ह्य़ात मोडतात. त्यामुळे अशा तक्रारी सायबर पोलिसांकडे कराव्यात. मुंबईत वांद्रे येथील बीकेसीमध्ये स्वतंत्र सायबर सेल पोलीस ठाणे आहे, तर पोलीस आयुक्तांच्या मुख्यालयात (क्रॉफर्ड मार्केट) गुन्हे शाखेची सायबर सेल शाखा आहे. याशिवाय आपण त्या त्या ठिकाणच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर गुन्ह्य़ासंबंधातील तक्रारी नोंदवू शकतोच.

काही महिन्यांपूर्वी एका ‘सीरियल मॉलेस्टर’ने खळबळ उडवून दिली होती. शाळेतून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलींना तो रस्त्यात गाठायचा. तुझ्या वडिलांचा मित्र आहे, अशी बतावणी करीत एका कोपऱ्यात नेऊन त्यांचा विनयभंग करायचा. पोलिसांनी त्याला पकडले तेव्हा किमान वीस ते पंचवीस मुलींवर अशा पद्धतीने त्याने लैंगिक अत्याचार केल्याचं उघड झालं.
चारकोपमध्ये एका विद्यार्थिनीला चांगले गुण मिळावेत यासाठी तिच्या शिक्षकाने योग शिकविण्याच्या निमित्ताने एका खोलीत नेऊन लैंगिक अत्याचार केले. मुली शिकवणीसाठी खाजगी क्लासेसमध्ये जातात. पण तेथे त्यांच्यावर या शिक्षकांकडूनच लैंगिक अत्याचार केले जात असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. या मुली १४-१५ र्वष वयोगटातल्या असतात. त्यांच्या अजाणतेपणाचा फायदा घेत त्यांना चोरटा स्पर्श केला जातो, विनयभंग केला जातो. या सर्व घटनांवरून एकच गोष्ट अधोरेखित होते. आपल्या आसपास विकृत लोकांचा वावर सहज असतो. कधी ते सहकारी असतात, कधी शेजारी, कधी शिक्षक असतात, कधी नोकर, सुरक्षारक्षक, चालक, तर कधी नातेवाईकही. दोष  या विकृत मानसिकचेचा असतो.
आजच्या जागतिकीकरणाच्या काळात प्रत्येक स्त्रीला निर्भयपणे वावरता आलं पाहिजे. तिच्याकडे आत्मसन्मानाने पाहायला हवं, त्यांचा आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करायला हवा, तशी समाजाची मानसिकता हवी. या सगळ्याबद्दल दुमत नाहीत. पण वास्तव फार वेगळं, अनेकदा भीषण आहे.  ही भीषणता, त्यातल्या विकृतांचा सहभाग लक्षात घेऊन आता स्त्रियांनीच पावलं उचलायला हवी आहेत. त्यासाठी पोलीस, कायदा यांनी दिलेल्या सुरक्षारक्षणाचं शस्त्र हाती घ्यायला हवं. थोडी खबरदारी आणि थोडा अधिकाराचा वापर केलाच पाहिजे. त्यामुळे संकटांना र्निबध घालता येणं शक्य आहे. त्यासाठी काही प्राथमिक गोष्टींची माहिती आपल्याला असायलाच हवी.
प्रवासातली सावधानता
 घराबाहेर पडायचं म्हटलं की प्रवास आलाच. मग तो टॅक्सी, रिक्षा, बस किंवा ट्रेनचा असो. तोही आता सुरक्षित राहिलेला नाही. घरी परतण्यासाठी रेडियो टॅक्सी (खाजगी) टॅक्सी बोलावलेल्या तरुणीवर त्या टॅक्सीचालकानेच बलात्कार केल्याची घटना दिल्लीत (उबर टॅक्सी प्रकरण) नुकतीच घडली. तत्पूर्वी जानेवारी २०१४ ला इस्थर अनुह्या या तरुणीची टॅक्सीचालकाने हत्या केल्याच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी अनेक उपाययोजना केल्या आहेत. रिक्षा किंवा टॅक्सीत बसताना त्याचा क्रमांक नोंदवून घ्यायला हवा. ठाण्यात तर प्रत्येक रिक्षात प्रवासी बसतात त्याच्या समोर स्मार्ट ट्रॅफिक कार्ड लावले आहे. त्यात रिक्षा चालकाची संपूर्ण माहिती आणि पोलीस हेल्पलाइनचा क्रमांक असतो. तो स्त्रियांनीच काय, पुरुषांनीही टिपून घ्यायला हवा. जेणेकरून चालकावर वचक राहतो.
एकटय़ाने प्रवास करणाऱ्या स्त्रियांसाठी मुंबई पोलिसांनी ९९६९ ७७७ ८८८ ही एसएमएस सेवा सुरू केली आहे. टॅक्सी, रिक्षात बसल्यावर त्या वाहनाचा क्रमांक या मोबाइल नंबरवर फक्त एसएमएस करायचा. हा मोबाइल जीपीएस प्रणालीवर काम करतो. जेणेकरून तुमच्या प्रवासस्थानाची नियंत्रण कक्षात नोंद राहते.
चालकावरही वचक राहतो. आपला क्रमांक पोलिसांकडे गेलेला आहे याचं त्याला भान असतं. वरिष्ठ स्त्रियांना कदाचित एसएमएस करायला जमणार नाही. त्यांनी टॅक्सी किंवा रिक्षाचा क्रमांक टिपून ठेवायला हवा.
रात्रीच्या वेळी टॅक्सी-रिक्षा पकडताना स्थानकाबाहेरच्या स्टँडवरूनच पकडावी. मुंबईतल्या प्रमुख रेल्वे स्थानकाच्या बाहेर रात्री बारानंतर टॅक्सी, रिक्षात बसणाऱ्या प्रत्येक स्त्रीची नोंद ठेवली जाते.
बहुतांश टॅक्सीचालक हे परप्रांतीय असतात. असे चालक अगदी एका रुपयासाठीही भांडायला उठतात. त्यांच्याशी हुज्जत घालू नये.
टॅक्सीप्रवासादरम्यान कुठलीही तक्रार नोंदवण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांच्या ०२२-२४९३९७१७ या नियंत्रण कक्षातील क्रमांकावर किंवा ८८७९ २२ ११०० या हेल्पलाइनवर संपर्क करावा. जेणेकरून त्यावर भाडे नाकारणे किंवा इतर कारवाई होऊ शकते.
एखादा रिक्षाचालक गुन्हेगार प्रवृत्तीचाही असू शकतो. काही वर्षांपूर्वी कारवाई केली म्हणून एका रिक्षाचालकाने वाहतूक पोलिसाच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून त्यांची हत्या केली होती. यावरून त्याची कल्पना यावी. अशा मुजोर चालकांचीही तुम्ही तक्रार करू शकता.
खबरदारी आधीच घ्या
हैदराबादहून पहाटे पाच वाजता लोकमान्य टर्मिनस स्थानकात इस्थर उतरली. तिच्या मोबाइलमध्ये ‘बॅलन्स’ नव्हता. प्रवासादरम्यान तिने लॅपटॉप सुरू करून ऑनलाइन रिचार्ज करण्याचा प्रयत्न केला. पण तो झाला नाही. सकाळी जेव्हा तो टॅक्सीचालक तिला आपल्या मोटारसायकलीवरून नेण्यासाठी आग्रह करीत होता तेव्हा तिला आपल्या घरी फोन करता आला नाही. मी घरी फोन करतेय हे टॅक्सीचालकाला दाखविण्यासाठी तिने फोन कानाला लावला, पण त्याचा उपयोग झाला नाही. जर तिने आधीच पुरेसा बॅलन्स असण्याची खबरदारी घेतली असती तर? या छोटय़ा, पण महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्याकडे दुर्लक्ष करू नये. शक्यतो आपण कुठून टॅक्सी पकडलीय ते कुटुंबीयांना, जवळच्या व्यक्तीला सांगून ठेवावं. मोबाइल चार्ज केलेला असावा. दूरच्या प्रवासात पोर्टेबल चार्जर जवळ बाळगणं अतिशय उत्तम. खाजगी टॅक्सी करताना पुरुष चालकासोबत जायचं नसेल तर वीरा टॅक्सी सव्‍‌र्हिसचा किंवा प्रियदर्शनी कॅब सव्‍‌र्हिसचा वापर करावा. यात फक्त महिला चालक असून केवळ महिला प्रवाशांसाठीच त्यांची सेवा आहे. वीरा कॅब सव्‍‌र्हिसच्या या चालकांना सुरक्षेचं प्रशिक्षणही देण्यात येतं. वीराकॅब्सचा क्रमांक ०२२- ६१२०६१२०
इंटरनेट विकृती   
आपण हल्ली प्रवासात चालकांपासून असलेल्या धोक्यांबद्दल चर्चा करतोय. पण इतरही धोके असतातच. इंटरनेट हे विकृतीचं जाळं आहे. हल्लीच्या फॅशनप्रमाणे तरुणी लो नेकचे टी-शर्ट, लो वेस्ट जीन्स घालतात. प्रवासात, वाऱ्याने कपडे अस्ताव्यस्त होऊ शकतात. त्याचं चित्रण आंबटशौकीन करतात आणि लगेच इंटरनेटवर टाकतात. स्मार्ट फोनमुळे फोटो वा व्हिडीयो
काढणं आता सोपं झालं आहे. असे फोटो वॉट्सअ‍ॅपवरही लगेच पाठवले जातात. त्यामुळे
आपल्या आजूबाजूला, किंवा ट्रेनमध्येही असं काही चित्रण होत नाही ना, यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. असं कुणी आढळल्यास त्याची तक्रार तुम्ही रेल्वे पोलिसांकडे करू शकता किंवा हेल्पलाइन वर संपर्क साधू शकता.) (GRP -९६६२५००५००  RPF  ९००३१६१७०)
मोबाइल फोन वापरताना
काही वर्षांपूर्वी माध्यमातील एका तरुण पत्रकार स्त्रीच्या अश्लील एमएमएसने खळबळ उडाली होती. तिच्या पतीसमवेतचे काही शृंगारिक क्षण तिने स्वत:च्या मोबाइलमध्ये चित्रित केले होते. मोबाइल दुरुस्तीला गेला आणि तेथून तो एमएमएस ‘लीक’ झाला. प्रत्येकीच्या हातात मोबाइल असतो. २००० सालाच्या सुरुवातीला कॅमेरे असलेले मोबाइल हाती आले. त्या वेळी कॅमेऱ्यातून सहज गंमत म्हणून काढलेले फोटो आयुष्य उद्ध्वस्त करू शकतील, असं कुणालाही वाटलं नव्हतं; परंतु या एमएमएसने अनेक तरुणी, त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले.
 सध्या सेल्फीचा जमाना आलेला आहे. मुली स्वत:ची छायाचित्रं काढतात, अनेकदा ती खाजगी म्हणून अनावृतही असतात, अशा वेळी मोबाइल हरवला, चोरीला गेला तर या छायाचित्रांचा गैरवापर होतो. असे फोटो काढून नंतर ते मेमरी कार्डमधून डिलीट जरी केले तरी त्यातील ९० टक्के डेटा घरबसल्या कुणीही परत मिळवू शकतो. नोव्हेंबर महिन्यात विक्रोळी स्थानकात उतरलेल्या विभा सिंग या तरुणीच्या हातातील मोबाइल एका तरुणाने हिसकावला. तिने त्या तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यात ती जखमी झाली आणि जवळपास आठ दिवस तिला रुग्णालयात काढावे लागले. मोबाइल चोरीला जाण्याने होणाऱ्या नुकसानापेक्षा त्यात असलेल्या खाजगी छायाचित्रांची तिला चिंता होती. त्यामुळेच तिने चोराशी दोन हात करण्याचं धाडस केलं. घटनेनंतर आपल्या छायाचित्रांचा गैरवापर होईल, या भीतीने ती गर्भगळित झाली होती. जर तिने आपलं छायाचित्र ठेवलंच नसतं तर ही वेळ आलीच नसती. तेव्हा अशा फोटोंपायी प्राण जाण्यापर्यंत वेळ का आणावी? त्यामुळे धोका पत्करणं टाळावं. हा मोह आवरावा किंवा आपला मोबाइल कुणाच्या हाती लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. मोबाइल कधीही चोरला जाऊ शकतो, गहाळ होऊ शकतो. मेमरी कार्ड तर अगदी नखाच्या आकाराचं असतं. त्याला किती जपणार? फोटो मोबाइल फोनवर न काढणं हाच उत्तम उपाय.
जवळच्यांना विश्वासात घ्या
प्रत्येक स्त्रीला आर्थिक स्वातंत्र्य आहेच. पण मोठे व्यवहार करताना पतीला किंवा कुटुंबीयांना त्याविषयी माहिती द्यायलाच हवी. अनेक स्त्रिया वर्तमानपत्रातील, इंटरनेटवरील जाहिराती पाहून मोठे आर्थिक व्यवहार करतात. कुणी काय व्यवहार करायचा हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. पण अनेकदा फसगत होण्याची शक्यता असते. गेल्या वर्षी मुंबईतल्या एका स्त्रीने वर्तमानपत्रात मोबाइल टॉवर उभारण्यासाठी जागा पाहिजे, अशी जाहिरात वाचली. पतीशी सल्लामसलत न करता तिने जाहिरातीत दिलेल्या व्यक्तीशी संपर्क साधला आणि नंतर १२ लाख रुपयांना फसवली गेली. मीरा रोडला राहणारी, बँकेत काम करणारी एक तरुणी, बँकेत येणाऱ्या एका व्यक्तीशी तिची ओळख झाली. चित्रपटात काम देतो आणि काही योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक करून चांगला मोबदला मिळवून देतो, असे त्याने तिला सांगितले. पतीला नंतर सांगू असं ठरवणाऱ्या तिची आर्थिक फसवणूक तर झालीच पण शारीरिक शोषणालाही बळी पडावे लागले. दोन्ही महिला स्वयंपूर्ण होत्या आणि स्वत:चे निर्णय घेण्यास सक्षम होत्या. पण त्यातला संभाव्य धोका ओळखण्यात त्या कमी पडल्या.
काही वेळा असेही आढळून आले आहे की, एखादीचा लग्नापूर्वीचा प्रियकर अचानक लग्नानंतर तिला त्रास द्यायला लागतो. बदनामीपोटी घाबरून ती कुणाला काहीच सांगत नाही. त्याचं धाडस वाढतं आणि अनेकदा तिला नको त्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं, अनेकदा तर तिच्या जिवावरही बेतलं आहे, अशा अनेक घटना पोलिसांकडे उघड झाल्या आहेत.
निर्भयपणे पुढे या
स्त्रियांसाठी मोठय़ा प्रमाणावर कायदे आहेत. अनेक सवलती आहेत. मुळात त्याची माहितीच स्त्रियांना नसते. कुणी त्रास देत असेल, तर त्या निमूट सहन करत राहातात. मुंबईत तर पोलिसांच्या अनेक उपाययोजना आहेत. स्त्रियांना कुठल्याही प्रकारणी तक्रार करायची असल्यास १०० (राज्यात सर्वत्र)आणि १०३ (फक्त मुंबईपुरता)हे दोन हेल्पलाइन क्रमांक आहेत. संकटकाळी या क्रमांकांवर संपर्क केल्यास अवघ्या ५ ते १० मिनिटांत मदत पोहोचू शकते. हे झालं आपत्कालीन परिस्थितीत. पण जर एखाद्या गुन्ह्य़ाची तक्रार करायची असेल तर आता पोलीस ठाण्यातही जायची गरज नाही.
एक फोन  केला तरी महिला पोलीस (साध्या वेषात) घरी येऊन तक्रार नोंदवून घेतात.
जर आपल्या सभोवताली एखादा गैरप्रकार सुरू असेल त्याची माहिती द्यायची असेल आणि आपलं नाव गुप्त ठेवायचं असेल तर ७७३८ १३३ १३३ किंवा ७७३८ १४४ १४४ या क्रमांकांवर फक्त एसएमएस करायचा.
या नंबरवर एसएमएस केल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यात पाठवून कारवाईचे आदेश दिले जातात. काय कारवाई झाली त्याची माहिती संबंधित व्यक्तीला कळवली जाते. या प्रत्येक एसएमएसची नोंद ठेवून पोलीस उपायुक्तांना अहवाल सादर करावा लागतो. घराखाली, नाक्यावर कुणी टवाळकी करत बसलेले मवाली असतील, एखाद्याच्या घरात कुणी लहान मुलाला मारत असतील, कुठे काही गैरप्रकार सुरू असेल अशा कुठल्याही प्रकारच्या तक्रारी आपण कळवू शकतो. तक्रारी कुठल्या स्वरूपाच्या करायच्या त्याला बंधन नाही. परंतु या क्रमांकांवर फक्त एसएमएसच करायचा.
 तेव्हा स्त्रियांनो, कुणी एकतर्फी प्रेम करून त्रास देत असेल, कार्यालयात अश्लील शेरेबाजी करत असेल, तुमच्यावर पाळत ठेवून असेल, तुम्हाला ई-मेल, एसएमएस, वॉट्सअॅप करत असतील तर बिनधास्त पोलीस ठाण्यात जा. तुमच्या प्रत्येक तक्रारी नोंदवून घेतल्या जातातच. त्यासाठी खास महिला अधिकारी आणि कर्मचारी असतात. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष ‘हेल्प डेस्क’ तयार करण्यात आला आहे. त्यामुळे मोकळेपणाने त्यांच्याशी बोलता येणे शक्य आहे. हल्ली प्रत्येकीच्या हातात मोबाइल फोन, स्मार्टफोन असतो. त्यात हजारो क्रमांक असतात. त्यात या सर्व हेल्पलाइन क्रमांकांची नोंद करून ठेवायला हवी. आपण कुठे राहतो त्या विभागाचे पोलीस ठाण्याचे क्रमांक, वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा क्रमांक, पोलीस उपायुक्तांचा क्रमांक, माहिती करून तो मोबाइलमध्ये सुरक्षित ठेवायला हवा. पोलीस ठाण्यातून हे क्रमांक मिळू शकतात. अर्थात प्रत्येक जणी पोलीस ठाण्यात जाऊ शकणार नाही, पण तरी आपल्या सुरक्षेसाठी महिला दक्षता समितीला संपर्क करूनही ते मिळू शकतात. कुणी दाद दिली नाही तर वरिष्ठांकडे तक्रार करता येते. त्यासाठी प्रत्यक्ष कुठे जाण्याची गरजही नाही. मेसेज, व्हॉट्सअॅपमुळे संवादाचे माध्यम सोपे झाले आहे. पोलिसांच्या संकेतस्थळावर यावरून तक्रार करता येते.
काही महिन्यांपूर्वी एका माध्यमातील तरुणीला एका रिक्षाचालकाने भाडे नाकारून उर्मट वर्तन केले. ‘जिसको बुलाना है बुलाव,’ असेही वर आर्विभावात सांगितले. तिने थेट पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना एसएमएस केला. हा प्रसंग ती विसरली. पण दोन दिवसांनी सकाळी तिला खुद्द मारियांचा मेसेज आला. त्या पोलिसांनी रिक्षाचालकाला  शोधून त्याच्यावर कारवाई केली होती. मारिया यांनी त्या एसएमएसची दखल घेत संबंधित यंत्रणेला रिक्षाचालकाला शोधून कारवाई करण्यास सांगितले होते. अर्थात प्रत्येकाला थेट आयुक्तांकडेच तक्रार करायची गरज नाही. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या विभागातील पोलीस अधिकारी, पोलीस उपायुक्त यांचे क्रमांक मिळवून ठेवायला हरकत नाही.
आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्याकडे दाद मागता येते. त्या वेळी तक्रार करणे नाही जमले तर नंतरही पोलिसांच्या संकेतस्थळावर जाऊन तक्रार नोंदविता येते. स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांची संकेतस्थळे अतिशय अद्ययावत आहेत. तेथे सर्व अधिकाऱ्यांचे क्रमांक, ई-मेल, तक्रार बॉक्स, हेल्पलाइन क्रमांक, अधिकाऱ्यांचे क्रमांक दिलेले असतात. थोडी तसदी घेतली तर आपण आपल्या विरोधातील अन्यायाविरोधात दाद मागू शकतो. हा ई-मेल अधिकृत आहे. त्यामुळे त्याचा पाठपुरावा पण आपण घेऊ शकतो.
या त्रुटी प्रशासनाने दूर करायला हव्यात
स्त्रियांनी आपल्या वागण्याने, कृतीने गुन्हेगारांना संधी देऊ नये, हे महत्त्वाचंच. पण सगळ्याच खबरदाऱ्या या स्त्रियांनीच घ्याव्यात का? पोलीस प्रशासन सुरक्षा यंत्रणेचे काहीच कर्तव्य नाही का? तर आहे. स्त्रियांना निर्भयपणे वावरता यावे, सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी पोलिसांनीही प्रयत्न करायला हवे. दिल्लीतील टॅक्सीचालकाने बलात्कार केल्याच्या घटनेनंतर मुंबईतल्या टॅक्सीचालकांची झाडाझडती सुरू झाली आहे. अनेक टॅक्सी, रिक्षा अनधिकृत आढळल्या. तर तपासणी दरम्यान सांताक्रूझ येथे एका टॅक्सीचालकाकडे रिव्हॉल्वर आणि ८ काडतुसं सापडली. पल्लवी पुरकायस्थच्या हत्येनंतर मुंबईतल्या सुरक्षा रक्षक एजन्सीची माहिती घेण्यास सुरुवात झाली. ज्यांना सुरक्षा रक्षक म्हणून काम दिले जात होते त्यांची पुरेशी माहिती एजन्सीकडे नव्हती. मग या गोष्टींसाठी पोलीस प्रशासन जबाबदार नाही का?
 सुरक्षित प्रवासासाठी स्त्रियांसाठी मार्च महिन्यात एसएमएस हेल्पलाइन सेवा सुरू केली. त्यात अवघे ९ हजार एसएमएस आले. म्हणजे दिवसाला सरासरी केवळ ३०. खुद्द पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. स्त्रियांना या हेल्पलाइनची अजूनही माहिती नाही, ते पोहोचविण्याची जबाबदारी ज्या प्रशासनावर आहे ते याबाबत अपयशी ठरले आहेत. मध्यंतरी राज्य महिला आयोगाने प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला आयोगाचे फोन नंबर असलेले भित्तिपत्रक लावण्याचे ठरवले. भीत्तिपत्रकं तयार झाली. पण चर्नी रोडच्या प्रिंटिंग प्रेसमधून पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात ती पत्रके नेण्यासाठी लागणाऱ्या भाडय़ाच्या गाडीच्या मंजुरीसाठीची फाइल अनेक महिने पडून होती. अवघ्या ३  ते ४ हजार रुपयांसाठी हे काम रखडले होते. यावरूनच याबाबतीतली उदासीनता दिसून येते. माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी ‘आइस’ नावाचे एक सॉफ्टवेअर सुरू केले होते. आइस म्हणजे ‘इन केस ऑफ इमर्जन्सी’. अभिनेते अमिताभ बच्चन यांना बोलावून या योजनेचा गाजावाजा केला होता; परतुं हे सॉफ्टवेअर डाऊनलोड होत नव्हते. स्त्रियांपर्यंत ही माहिती गेलीच नाही आणि प्रयत्न करणाऱ्यांच्या हातीही काही लागले नाही. नंतर तर त्याचे पुढे काय झाले याची खुद्द आयुक्तांनाच माहिती नव्हती. अशा प्रकारचे सॉफ्टवेअर आहे का त्याची माहिती आमच्याकडे नाही, असे पोलिसांनी माहिती अधिकारात सांगितले होते, यावरूनच कल्पना यावी. अर्थात आता महिलांच्या सुरक्षेसाठी खूप चांगल्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. स्त्रिया पुढे जाणारच आहेत, मार्गात येणाऱ्या या असामाजिक तत्त्वाचा नाश करण्यासाठी तिनंच हे सुरक्षा रक्षक खङ्ग हाती घ्यायचं आहे.  प्रशासनाची योग्य साथ मिळाली तर महिला असुरक्षेचं हे दुष्टचक्र निश्चितच भेदू शकतील यात शंका नाही.    

काही वेळा लोकल ट्रेनमध्ये काही वस्तू विसरल्या जातात. त्यासाठी रेल्वेच्या  ९८३३३३ ११११ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क केला तर आपली हरवलेली वस्तू परत मिळण्यास मदत होते. प्रत्येक रेल्वे स्थानकात हेल्पलाइनची स्वतंत्र टेलिफोन सेवा आहे. आपण ज्या गाडीत होतो त्या गाडीची वेळ सांगितली की पुढील स्थानकात गाडीतून ती वस्तू शोधून काढली जाते.

घरबसल्या अशी करावी तक्रार
प्रत्येक शहराच्या पोलिसांच्या स्वतंत्र वेबसाइट्स (संकेतस्थळे) आहेत. त्यावर सर्वाचे ई-मेल्स, फोन नंबर्स असतात, तक्रारीचा अर्ज असतो. पण कोणीही त्या मुद्दाम शोधून काढायच्या भानगडीत सहसा पडत नाही आणि या सुविधेपासून आपण वंचित राहतो. अशी संकेतस्थळे शोधणे कठीण नाही. उदाहरण द्यायचे झाले तर समजा, आपल्याला मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर जायचे आहे, मग ते शोधायचे कसे.. ही पद्धत अतिशय सोपी आहे. गुगल सर्चवर जाऊन मुंबई पोलीस (mumbaipolice ) असे टाइप केले की मुंबई पोलिसांचे अधिकृत संकेतस्थळ समोर येईल. अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या शहराच्या, जिल्ह्य़ातील पोलिसांचे संकेतस्थळ शोधू शकता. या संकेतस्थळावर पोलीस महासंचालकांपासून त्या त्या शहरातील पोलीस आयुक्त, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे क्रमांक आणि ई-मेल दिलेले असतात.
या ई-मेलवर काही पाठवले तर कोण दखल घेणार, कोण वाचणार, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. एक छोटेसे उदाहरण. काही महिन्यांपूर्वी मुंबईतल्या एका तरुणाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने मी जीवनाला कंटाळलोय, आत्महत्या करतोय असा मेल मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पाठवला. घरात बसल्या बसल्या त्याने मुंबई पोलिसांचे संकेतस्थळ उघडले आणि आयुक्तांना मेल केला. मित्रांना कळवलं तर ते मन परावृत्त करायला येतील, अशी त्याला भीती होती. पण हा मेल पोलीस आयुक्तांनी वाचला. त्वरित सायबर सेल विभागाला या तरुणाला शोधून त्याला थांबविण्याचे आदेश दिले. काही तासांतच पोलीस त्याच्या घरात पोहोचले आणि त्याला आत्महत्येपासून रोखले.
सुहास बिऱ्हाडे– suhas.birhade@expressindia.com