मेघना जोशी

अधूनमधून सोशल नेटवर्किंग साइट्सवर प्रश्न विचारला जातो, ‘आतापर्यंत अमुक-अमुक पुरुषांनी हे हे शोध लावले, मग कुठे आहेत रे त्या दहावी-बारावीला ९५ टक्के मिळवणाऱ्या मुली?’ खरं तर हा प्रश्न स्त्री-शिक्षणाची अवहेलना करणारा आहे. पण त्याला ‘लाइक्स’ही तशाच भरभरून मिळतात. आजही बहुसंख्येने मुली शिकत असल्या तरी त्यांच्या उच्च शिक्षणाला आणि पर्यायाने त्यांच्या पुढच्या करिअरला मर्यादा पडतात. टक्के मिळूनही ‘टक्केटोणपे’ खाणं हे तिचं प्राक्तन म्हणावं का?  मग त्यातल्याच कित्येक जणी संसार आणि घर यांच्यात तोल साधत कुठे तरी नोकरी करू लागतात. ‘शिकलेली बाई घरात कशी राहणार?’ हा प्रश्न विचारत कमी पगारावर मनुष्यबळ निर्माण करण्यात या वाढलेल्या टक्क्यांचा मोठा हात आहे. या संदर्भाने शिक्षक, पालक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींशी बोलल्यावर प्रातिनिधिक स्वरूपात मिळालेल्या मतांचा हा गोषवारा.

‘‘शबरीचा इतिहास माहिती आहे का तुम्हाला?’’ आमचे इतिहासाचे ज्येष्ठ शिक्षक मला विचारत होते.

‘‘ ती श्रीरामाला बोरं देणारी भिल्लीण होती.’’ मी चटकन उत्तरले.

‘‘अहो, ती मतंग ऋषींच्या आश्रमात राहून योगविद्या शिकली होती, त्यात पारंगत होती.’’

‘‘मला तर फक्त पुराणातल्या गार्गी, मैत्रेयीच माहिती होत्या. शबरीसुद्धा शिक्षित होती?’’

‘‘हो, शबरीच्या काळातही तिला ठेवून घेताना आणखी कोणी स्त्री माझ्या आश्रमात नाही, असं मतंग ऋषी म्हणाले होते. म्हणजे तेव्हाही स्त्रियांनी शिकण्याची पद्धत नव्हतीच. बहुतेक, शबरी अपवाद असावी.’’ सर म्हणाले.

या झाल्या पौराणिक गोष्टी, परंतु आपल्या देशाचा, राज्याचा  शैक्षणिक इतिहास पहाता तोही स्त्री शिक्षणाला दुय्यम लेखणाराच होता आणि आजही काही प्रमाणात आहेच. पण त्याही पलीकडे जाऊन शिकलेल्या मुली उच्च शिक्षण घेतात का आणि घेतलं तरी अधिकारपदावर जातात का हा खरा प्रश्न आहे.

स्त्रीशिक्षणाचा इतिहास बघता महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री-शिक्षणासाठी खाल्लेले टक्केटोणपे आपणा सर्वाना ज्ञात आहेत. डॉ. आनंदीबाई जोशी असोत वा रमाबाई रानडे, यांनी शिक्षणासाठी केलेले कष्ट सर्वाना माहीत आहेतच. धोंडो केशव कर्वेनी तर आयुष्य वेचलं स्त्री-शिक्षणासाठी. ही सर्व स्वातंत्र्यपूर्व काळातली उदाहरणं आहेत. त्या काळात शाळेत जाणाऱ्या मुलींकडे लोक कोणतं तरी आक्रित पाहावं तसं पाहत, पण नंतर हळूहळू काळ बदलत गेला तरी अगदी नव्वदीच्या दशकापर्यंत मुलींसाठी घरकाम पहिलं आणि मग शिक्षण असाच प्राधान्यक्रम होता.

सध्याच्या ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’च्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांचा जीवनपट पाहिला तरीही आपल्याला असंच दिसेल. त्यांनीही दिवसभरात सर्व घरकामं उरकत, नोकरी सांभाळत, रात्री अवघे चार तास झोप घेत अभ्यास केला आणि या पदापर्यंत पोहोचल्या. मुलींनी शिकणं ही बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत करायची गोष्ट आहे, असंच मानलं जायचं. त्यामुळे शिक्षणातला आणि उत्तीर्ण असण्यातला तसंच गुणवत्तेतला मुलींचा टक्का खूप कमी असायचा, पण आज दहावी-बारावीचा निकाल जाहीर करताना डॉ. काळे यांना नक्कीच खूप आनंद होत असेल कारण मुलींचा शैक्षणिक क्षेत्रातील टक्का चांगलाच वाढला आहे.

आता हा ‘टक्का’ का बरं वाढता आहे, याचा कानोसा घेतला आणि एक एक घटक उलगडायला लागले. मुलींमधली असणारी जबाबदारीची, सातत्याने एकाच पद्धतीने अभ्यास करण्याची आणि कर्तव्यनिष्ठतेची जाणीव हे यामागचं महत्त्वाचं कारण आहे हे अगदी सर्व वयोगटांच्या लोकांनी कोणताही किंतु-परंतु न ठेवता मान्य केलं. कारण याचा धांडोळा घेताना मी गेल्या वर्षीच दहावीची पायरी पार केलेल्या वैभवी वेरलकरपासून शासनामध्ये उच्च पद भूषविलेल्या आणि आता शिक्षक व आजोबा या दोन्ही जबाबदाऱ्या आनंदाने आणि सजगतेने पार पाडणाऱ्या सत्तरीच्या माजी शिक्षण संचालक मेजर विजय देऊस्कर यांच्यापर्यंत जवळजवळ सर्व वयोगटांतल्या लोकांशी संवाद साधला. ‘अक्षर’ म्हणजे ‘चिरंतन टिकणारे’. असे अक्षर मुली-स्त्रियांनी वाचलं तर ‘कुटुंबाचा क्षर’ म्हणजे नाश होतो अशी एकदम टोकाची सामाजिक मानसिकता होण्याचं काय बरं कारण असावं? हा संशोधनाचा विषय नक्कीच आहे.

अर्थात काळाबरोबर मुलींच्या मानसिकतेत सकारात्मक परिणाम झालेला नक्कीच दिसतो आहे. आपल्या आई-आजीने शिक्षणासाठी आणि आर्थिकदृष्टय़ा स्वयंनिर्भर होण्यासाठी केलेले कष्ट त्यांनी पाहिलेले किंवा ऐकलेले असतात आणि कळत-नकळत त्याचा परिणाम त्यांच्यावर होतो, कष्ट करून वरचं स्थान मिळवण्याची आस लागते. माजी मुख्याध्यापिका संपदा जोशी सांगतात, की कुटुंबातले सदस्य, विशेषत: आई, मुलीला सतत सांगत असते की, ‘पुढे तुला दुसऱ्या घरी जायचं आहे, त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण होणं ही तुझी अत्यंत महत्त्वाची गरज आहे’, त्याचबरोबर त्यांना आसपास आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण नसणाऱ्या स्त्रियांची आणि त्यामुळे होणाऱ्या विपन्नावस्थेची काही उदाहरणं दिसत असतात, त्यामुळे त्याही कसून प्रयत्न करतात. याशिवाय जनुकीयदृष्टय़ा ‘एक्स एक्स’ गुणसूत्रं लाभल्याने त्या जास्त स्थिर बुद्धी, मती आणि स्थिर शरीराचा लाभ मिळालेल्या बनतात. यालाच जोड देणारा अनुभव  वैभवी सांगून जाते. ती म्हणते, ‘‘अभ्यासाचे वेध लागलेली मुलगी कसेबसे केस वगैरे बांधून अभ्यासाला बसते आणि बाकीच्या गोष्टी विसरून जाते, पण अभ्यास करणाऱ्या माझ्या मित्रांना जेव्हा मी पाहते तेव्हा सतत चुळबुळ करणारे, मोबाइल किंवा आरशामध्ये सतत डोकावत आपले ‘लुक्स’ बघणारेच जास्त दिसतात. त्यामुळे मुलांमधली अवधानक्षमता थोडीशी कमी तर मुलींमध्ये ती जास्त दिसते.’’ याच मुद्दय़ांवर शिक्षक अनिल खडपकर यांनी जरा वेगळं मत व्यक्त केलं. ते म्हणाले, ‘‘मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, मुलांना मुळातच जबाबदारी घेण्याची किंवा अनेक पिढय़ांच्या परंपरा आणि संस्कारातून आलेली संरक्षक म्हणून काम करण्याची सवय असते किंवा ते मूल्य त्याच्या तनामनात रुजलेलं असतं, त्यामुळे तो फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रित करूच शकत नाही. तर कुटुंबासाठीच्या बाकीच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असल्याने परीक्षेतील गुण वगैरेंचा फार गांभीर्याने विचार करत नाही.’’ याच्याच पुष्टय़र्थ एक पंचविशीतला मुलगा सहजच म्हणाला, ‘‘आम्हाला सहासष्ट गुण मिळाले की अडुसष्ट याने फारसा फरक पडत नाही. तो  तुम्हा मुली आणि बायकांना पडतो. एकेका गुणासाठी तुम्ही झगडत असता.’’ तेव्हा जाणवलं की एकमेकांबद्दल थोडीशी स्पर्धेची भावना ठेवणं, स्पर्धेमध्ये अव्वल येण्याची आस ठेवणं आणि तसे प्रयत्न करणं हे मुलांपेक्षा मुलींसाठी जास्त अंगवळणी पडलेलं दिसतं.

आणखी एक नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या पिढय़ा फारशा नाहीत. त्यामुळे त्यांना सतत स्वत:ला सिद्ध करायची गरज भासणारच. ती गरज अचूक जाणूनच मुली आपला गुणवत्तेचा ‘टक्का’ सतत वाढता ठेवतात.

‘यासाठी त्यांना ‘टक्केटोणपे’ खावे लागतात का’, असं विचारल्यावर ‘आता सर्वानाच नाही खावे लागत, अनेक घरांमध्ये मुलींनी शिकावं याची जाणीव निर्माण झालीय, त्याचबरोबर ‘घरकामात मुलींचा सहभाग असलाच पाहिजे, असंही नाही.’ हेही हळूहळू मान्य होतंय. बरोबरच घरात वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स साधनांमुळे मुलींनी कामं करण्याची अपेक्षाही कमी झालीय. मुलींसाठी असणाऱ्या सरकारी योजनांचाही परिणाम होतोय. पण काही ग्रामीण आणि आदिवासी भागांत मात्र अजूनही परिस्थिती थोडीशी अवघड आहे. तिथला संघर्ष अजूनही संपला नाही.’ याबाबत सर्वाचच एकमत झालंय.

एक मात्र लक्षात आलंय, अजूनही कौशल्याधारित अध्ययनात मुलग्यांचंच वर्चस्व असल्याचं शिक्षक, पालक, अगदी मुलींमध्येही एकमत आहे. सुधा मूर्ती इंजिनीअर असूनही त्यांना ते काम करण्यास रोखण्यापासून ते आज अनेक स्त्री-अभियंता अधिकारीपदावर रुजू होण्यापर्यंत स्त्रीचा प्रवास झाला असला तरी अनेक किशोरवयीन मुली आणि तरुणी म्हणतात, की अभियांत्रिकी क्षेत्रांची ओढ मुलग्यांमध्ये अधिक असते आणि त्यासाठी जास्तीत जास्त गुणांची आवश्यकता असल्यानं गुणांसाठी ते स्वत:भोवती एक ठरावीक भिंत आखून घेतात आणि त्यातच राहतात, त्यामुळे त्यांचा गुणवत्तेतला टक्का कमी  झाला आहे.

आपल्याकडे असलेल्या बोर्डाच्या परीक्षेतील गुणांवर आधारलेली मूल्यमापन पद्धत मुलांसाठी भविष्यात टक्केटोणपे खाऊ  घालणारी असावी का, असा संशय बळावतो. कारण लिंगसमानता म्हणायचं आणि मुलींच्या यशाचं ‘ग्लोरिफिकेशन’ करायचं या प्रवृत्तीचा वर्ग वाढतोय. दोघंही माणसेच आहेत हे लक्षात घेणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे. माझ्या या विचारांना बळकटी देताना शिक्षिका संपदा जोशी म्हणतात, ‘‘मुलग्यांचं भावनिक कुपोषण ही आजची मोठी खंत आहे. त्यामुळे अनेक मुलग्यांचा भावनांक कमी असतो आणि त्यातून व्यसनाधीनता, शाळेमध्ये सततची अनुपस्थिती, स्वैराचार वगैरे वाढलेलं दिसून येतं. त्याचाच परिणाम त्यांचा टक्का घसरण्यावर होतो.’’

त्याचबरोबर मुलामुलींच्या पौगंडावस्थेच्या वयाच्या असणाऱ्या फरकावर काही मुलगे बोट ठेवतात, ते म्हणतात, ‘दहावीच्या बोर्ड परीक्षांच्या काळाआधी मुली शारीरिक संक्रमण काळातून बाहेर पडलेल्या असतात, पण आम्ही मात्र त्याच वेळी त्यातून जात असतो, नकळत त्याचा परिणाम होतोच.’ या काळात मुलगे धोका पत्करतात; पण त्यांना परीक्षेतील गुणांपेक्षा कौशल्यावर भर द्यावासा वाटतो तर मुली मात्र या काळात लग्नसंस्थेत न गुरफटता काही तरी वेगळं करण्याचं  स्वप्न बाळगतात, त्यामुळे परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. असो, वरील सर्व विवेचन सर्व मुलं आणि मुलींना लागू होईलच असं नाही. पण शिक्षक, पालक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींशी बोलल्यावर प्रातिनिधिक स्वरूपात मिळालेल्या मतांचा हा गोषवारा आहे.

अर्थात मुली शिकल्या म्हणून स्त्रियांच्या आयुष्यातले ‘टक्केटोणपे’ संपलेत असं झालंय का हो खरंच? स्त्री आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण झाली, पण ‘नवऱ्याने आपल्याच नावावर भरपूर कर्ज करून ठेवलंय, त्यामुळे झेपत नसलं, मनात कितीही असलं तरी नोकरी सोडण्याचा विचार करू शकत नाही,’ असं डोळ्यांत पाणी आणत सांगणाऱ्या मध्यमवयीन स्त्रियांची संख्या काही कमी नाहीय. उलट ‘सुपरवुमन सिंड्रोम’च्या बळींच्या संख्येत भरच पडतेय.

आता अधूनमधून सोशल नेटवर्किंग साइट्सवर प्रश्न विचारला जायला लागेल, ‘आतापर्यंत अमुक-अमुक पुरुषांनी हे हे शोध लावले, मग कुठे आहेत रे त्या दहावी-बारावीला ९५ टक्के मिळवणाऱ्या मुली?’ खरं तर हा स्त्री-शिक्षणाची अवहेलना करणारा प्रश्न आहे असं मला वाटतं. पण त्याला ‘लाइक्स’ही तशाच भरभरून मिळतात. मुली शिकल्या तरी त्यांच्या पुढच्या करिअरला मर्यादा पडतातच. कितीही साथ देणारं वगैरे सासर असलं तरी कुटुंबाचा विचार आजही मुलींना करावाच लागतो. पुढे मुलं झाली की त्यात अधिकाधिक अडकणंही होतंच. मात्र यातूनच काही गोष्टींचा उगम झाला आहे. ‘शिकलेली बाई घरात कशी राहणार?’ हा प्रश्न विचारत कमी पगारावर मनुष्यबळ निर्माण करण्यात या वाढलेल्या टक्क्यांचा मोठा हात आहे. आजकाल ‘कायम विनाअनुदानित शिक्षणसंस्थांचं पीक आलं आहे,’ असं सर्रास म्हटलं जातं, ते पीक आणण्यात त्यासाठी अल्प मोबदल्यात उपलब्ध होणारा कर्मचारीवर्ग हा महत्त्वाचा घटक आहे. हा कर्मचारीवर्ग कोण? तर अशीच- ‘शिकलेय तर नुसती घरी कशी बसणार,’ असं म्हणणारी स्त्री. याचा पुरावा पाहिजे तर तुमच्या आजूबाजूच्या विनाअनुदानित शाळांमधलं स्त्री-शिक्षिकांचं प्रमाण पाहा, त्यांच्या मानधनाची चौकशी करा आणि त्या का नोकरी करतात हे जाणून घ्या. याचं एक कारण आहे, अजूनही स्त्रियांच्या उत्पन्नाला कुटुंबात प्राधान्यक्रम दुय्यम असतो. त्यामुळे तिचं उत्पन्न हे ‘गाजराची पुंगी’ म्हणून पाहिलं जातं. फक्त शाळाच नव्हे तर अनेक खासगी व्यवस्थापनांमध्ये कमी पगारावर जास्त प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या मनुष्यबळाचं गमक हे वाढलेले टक्केच आहेत.

अजूनही पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना आपलं काम चोखपणे आणि प्रामाणिकपणे पार पाडण्याची सवय आहे. हे अनुभवासही येतं. अलीकडेच मी एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गेले होते, अर्थात आमंत्रित म्हणून. तिथे गेल्यावर लक्षात आलं, की त्या कार्यक्रमाचे एकमेव पुरुष आयोजक सोडले तर इतर साऱ्या स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. हळूहळू एक एक गोष्ट उलगडत गेली, स्त्रियांच्या गरजा कमी असतात किंवा त्या आपल्या गरजा ठामपणे मांडून पूर्ण करून घेण्यात अजूनही कमी पडतात, संधी मिळणे हा आजही त्यांचा प्राधान्यक्रम असतो, आर्थिक फसवणूक वगैरे झाली तर घरचा एक खांब म्हणजे कर्ता पुरुष पुरेसा कमावता असल्याने तिच्या फसवणुकीबाबत गप्प राहण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा, ‘याविरुद्ध आवाज उठवला तर माझ्या सगळ्याच वाटा बंद होतील,’ अशी एक भीती स्त्रीच्या मनात असते आणि माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं तसं, ‘‘अगं, मोठमोठय़ा अभिनेत्रींनाही अभिनेत्यांच्या तुलनेत कमी मानधन असतं, तर सामान्यांचं काय?’’ माझा एक वृत्तवाहिनीत काम करणारा मित्र अधिक भेदक चित्र सांगत म्हणतो, ‘‘आमच्या क्षेत्रात स्त्रिया हे ‘सेलेबल प्रॉडक्ट’ आहे. तिथे हा शिक्षणातला टक्का वगैरे दुय्यम.’’

दहावी-बारावीनंतर शिक्षणाचा मार्ग खुंटलेल्या मुलीही असतातच. यांचंही, ‘घरात बसून काय करणार, जे काही मिळेल तेवढीच कुटुंबाला मदत,’ असं म्हणून अनेक छोटय़ा-मोठय़ा, विशेषत: कार्यालयीन नोकऱ्या स्वीकारणं सुरूच असतं. अशा वेळी कमी पैशांत उपलब्ध होणारं हे मनुष्यबळ म्हणून व्यावसायिकाला फायदेशीर आणि नोकरीसाठी कोणतंही बंधन नाही. उद्या दुसरी मिळाली तर ही सोडली किंवा लग्न ठरलं तर ‘येत नाही’ म्हणून सांगितलं किंवा विवाहिता असेल तर ‘घरदार सांभाळून पंख्याखाली बसून करायचा जॉब आहे,’ ही अल्पसंतुष्टता. हे सगळ्या स्त्रियांच्या बाबतीत नाही, पण असं असणारा वर्गही काही लहान नाही.

आता या संक्रमणकाळात शैक्षणिक ‘टक्के’ वाढलेल्या या मुलींचे‘टक्केटोणपे’ कसे कमी होतील आणि त्यांना त्यांच्या कष्टांचा योग्य तो मोबदला कसा मिळेल आणि प्रतिष्ठेत कशी वाढ होईल, याचा विचार करायला पाहिजे हे नक्की!

दहावीच्या बोर्ड परीक्षांच्या दरम्यान मुली शारीरिक संक्रमण काळातून बाहेर पडलेल्या असतात, पण मुलगे मात्र त्यावेळी पौंगडावस्थेत असतात त्याचा नकळत परिणाम होतोच. मुलगे धोका पत्करतात. त्यांना परीक्षेतील गुणांपेक्षा कौशल्यावर भर द्यावासा वाटतो तर मुली मात्र या काळात लग्नाला नकार देत काही तरी वेगळं करण्याचं  स्वप्न बाळगतात आणि परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवण्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं.

joshimeghana.23@gmail.com

chaturang@expressindia.com