News Flash

उद्योगाचे दारी

उद्योगाचे क्षेत्र हे पुरुषप्रधान क्षेत्रच मानले जायचे, मात्र हळूहळू स्त्रियांनी यात शिरकाव केला आणि बदल घडू लागला. ग्राहक स्त्रियांची मानसिकता ओळखून नवनवीन उत्पादने बाजारात आणली

| August 29, 2014 01:07 am

उद्योगाचे क्षेत्र हे पुरुषप्रधान क्षेत्रच मानले जायचे, मात्र हळूहळू स्त्रियांनी यात शिरकाव केला आणि बदल घडू लागला. ग्राहक स्त्रियांची मानसिकता ओळखून नवनवीन उत्पादने बाजारात आणली गेली, तर कधी तिच्यातल्या स्त्रीगुणांचा-अधिकाराचा उपयोग कंपन्यांच्या कार्यकुशलतेवर झाला. त्यातूनच उद्योजिका घडत गेल्या.

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रचणाऱ्या महाराष्ट्राला खरे तर स्त्री शिक्षण, स्त्रियांचा सामाजिक जीवनातील सहभाग आणि त्यामुळे साधणारी प्रगती याबद्दल सांगायची गरज नाही. विषमता असली तरी चित्र पूर्ण निराशावादी राहिलेले नाही. स्त्री आज अनेक क्षेत्रांत आपल्या वेगळेपणाने, कामाच्या पद्धतीने आपला ठसा उमटवत आहे.
काही मोठय़ा कंपन्यांमध्ये स्त्रियांनी ‘स्त्रीसुलभ’ कार्यसंस्कृती वापरून आपल्या उद्योगाची कार्यक्षमता वाढवल्याची उदाहरणे अनेक आहेत. स्त्री असल्याने स्त्रियांचे प्रश्न त्या अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतात आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या व्यवसायावर सहज पडते आहे, मग तो खासगी व्यवसाय असो की बँकिंगसारखे क्षेत्र. स्त्री ज्या पद्धतीने स्वत: पुढचा विचार करून आज, उद्या लागणारी गोष्ट साठवून ठेवत असते त्याचा साहजिकच परिणाम त्या त्या उद्योगांवर होत असतो. इतकेच नव्हे, तर एखादी स्त्रीच स्त्रीचे गर्भारपण वा संगोपनाचे प्रश्न लक्षात घेऊन त्यानुसार ‘फ्लेक्सिबल’ वेळेचे गणित जुळवून त्यातून फायदा कमावण्याचा विचार करू शकते. स्त्रिया आज कॉर्पोरेट क्षेत्रातही उच्च पदावर काम करीत आहेत. त्याचे प्रमाण भले कमी आहे, परंतु त्या यशस्वी ठरत आहेत आणि आपल्याबरोबर उद्योग क्षेत्रातही नवनवीन प्रयोग करीत आहेत.
सुनीता रामनाथकर याचेच एक बोलके उदाहरण सांगतात. रामनाथकर यांनी २७ वर्षे ‘फेम’च्या सहसंचालिका म्हणून काम पाहिले. उद्योगाच्या अगदी सुरुवातीपासून त्यांनी इथे विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांच्या ‘फेम लिक्विड हँडवॉश’ची सुरुवात कशी झाली त्याची गोष्टच त्या सांगतात. पूर्वी हात धुवायच्या साबणाच्या जाहिरातींमध्ये कायम घरच्या स्त्रीचे हात कोरडे- रखरखीत झालेले दाखवत असत. मात्र साबण वापरणाऱ्या स्त्रियांशी प्रत्यक्ष बोलल्यावर त्यांना वस्तुस्थिती वेगळीच आहे हे लक्षात आले. घरी काम करत असताना, स्वयंपाक करत असताना स्त्रियांना अनेक वेळा हात धुवावे लागतात. कधी बेल वाजते, कधी मुलांना बघायला जावे लागते किंवा अगदी मांसाहारी जेवण बनवताना तेच हात दुसऱ्या कशाला लावण्याआधी खसखसून धुवावे लागतात. अशात, स्त्री साधारण ८ ते १० वेळेला साबणाने खसखसून हात धुते. आपला नेहमीचा साबण इतक्या वेळी हाताला लागल्यावर त्यांना मुलायम ठेवू शकत नाही. त्यामुळे हात खरखरीत होण्याचे खरे कारण कपडे किंवा भांडी घासायचा साबण नसून हात धुवायचा साबणच आहे हे लक्षात आले. साधारणपणे घरात भांडी-धुणे करायला कोणी मदतनीस असते किंवा वॉिशग मशीन असते, त्यामुळे धुण्याचा साबण खरा व्हिलन नाही याचा उलगडा झाला. या नव्या माहितीने ‘फेम’चा फोकसच बदलला आणि हात धुवायचा साबण अधिक सौम्य कसा करता येईल यावर संशोधन सुरू झाले.
या संशोधनानंतर ‘फेम’ने भारतातला पहिला ऑइल-बेस्ड म्हणजे खोबरेल तेलाचा वापर केलेला साबण बाजारात आणला. ते एवढय़ावरच थांबले नाहीत, तर त्यांनी भारतात पहिल्यांदा पंपाच्या बाटलीतला, म्हणजेच लिक्विड डिस्पेन्सर हँडवॉश बाजारात आणला. सुरुवातीला अनेक स्त्रियांनी तक्रारी केल्या. आमची मुले त्या डिस्पेन्सरशी खेळतात, तो सांडतात, सांडून तो वाया जातो वगरे.. पण हळूहळू त्यांच्याशी त्यांना समजावल्यावर या नव्या उपकरणाचा उपयोग त्यांच्या लक्षात आला. साधा साबण हा पटकन खराब होतो. त्याला घाण चिकटते. ती घाण साबणाची वडी वापरणाऱ्या सर्वाच्याच हाताला लागते. त्यामुळे लिक्विड हँडवॉश हा अधिक ‘हायजिनिक’ आहे हे साऱ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी करणाऱ्या स्त्रियांच्या लगेच लक्षात आले.
घरामध्ये कोणत्या वस्तू वापरायच्या हा निर्णय स्त्रीच घेत असल्याने हे निरीक्षण अतिशय महत्त्वाचे ठरले. ‘फेम’नंतर इतर अनेक कंपन्यांनी असे हँडवॉश बाजारात आणले. मोठय़ा प्रमाणात त्याची विक्री होऊ लागली. एक स्त्री उद्योजिका असल्याचा हा फायदा म्हणता येईल. ग्राहकाच्या वापरावर बारीक लक्ष ठेवून केलेला हा बदल ‘फेम’साठी आणि भारतातल्या साबण उद्योगासाठी गेम चेंजिंग ठरला!
असाच एक ‘गेम चेंजिंग’ प्रयोग केला      वीणा पाटील यांनी. ‘केसरी ट्रॅव्हल्स’बरोबर ३० वर्षे काम केल्यावर, त्यातून पूर्णपणे बाहेर पडून आज त्यांनी ‘वीणा वर्ल्ड’ नावाची एक स्वतंत्र पर्यटन कंपनी शून्यापासून सुरू केली आहे. विविध टूर्सबरोबर प्रवास करताना त्यांना कायम एक गोष्ट जाणवायची. आपली जवळ-जवळ ५० टक्के लोकसंख्या स्त्रियांची आहे, २५ टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यातल्या अनेकांकडे वेळ आणि पसा दोन्हीही आहे; पण या गटाकडे कधी स्वतंत्र ग्राहक म्हणून पाहिले गेलेले नव्हते. त्या सांगतात की, अनेकदा मनात असे येऊन गेले की, प्रवास करताना स्त्रियांना खरी विश्रांती मिळतच नाही. अनेकदा मुले, नवरा हे मजा करत असतात आणि त्या घरी असल्यासारखेच कुटुंब सांभाळत असतात. याला तोडगा म्हणून स्त्रियांसाठीच्या स्पेशल टूर्स सुरू करू या, अशी कल्पना पुढे आली. सुरुवातीला, बायकांना काय करायचे आहे बाहेर जाऊन किंवा फक्त बायकाच कशा बाहेर पडणार, अशा शंकाही व्यक्त केल्या गेल्या. ही मानसिकता बदलायला त्यांनी वृत्तपत्रांमधून केलेले सततचे लिखाणही कारणीभूत आहे, असे त्या म्हणतात.
या सहलींमुळे स्त्रियांना स्वत:साठी वेळ मिळतो, त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि हा आत्मविश्वास त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला उपयोगी पडतो, असा त्यांचा अनुभव आहे. त्यांची ही कल्पना देशातील तसेच जगातील अनेक पर्यटन व्यावसायिक एक अभ्यास म्हणून पाहतात. जगभरात फिरलेल्या आणि लोकांना जगप्रवास घडवून आणणाऱ्या वीणा पाटील यांना महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात मोठी संधी दिसते.
   त्या म्हणतात, ‘समाजात असलेला कोणता तरी प्रश्न शोधावा, त्या प्रश्नाला आपल्या व्यवसायाने उत्तर निर्माण करता आले पाहिजे. असा एखादा प्रश्न शोधणे ही व्यवसायातली खरी कसोटी आहे आणि त्यातच व्यावसायिक संधीही आहेत.’ एका स्त्री उद्योजिकेचे हे उद्गार उद्योग क्षेत्रातल्या संधी अधोरेखित करतात म्हणूनच महत्त्वाचाही ठरतात.
उद्योगाशी संबंधितच, पण तरीही राधा शेलट यांचे क्षेत्र यापेक्षा बरेच वेगळे आहे. शेलट या ‘आव्हिराम नेटवर्क आणि नेव्हिस नेटवर्क’च्या संचालिका. याआधी त्यांनी ‘व्हेरीटास’ आणि ‘सिमांटेक’ सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये काम केले होते. एक स्त्री उद्योजिका असल्याचा, त्यातल्या अनुभवांचा उपयोग त्यांनी स्वत:च्या कंपनीमध्ये करून घेतला. त्यातल्या काही ठोस बदलांमधली एक म्हणजे कामाच्या वेळा. त्यांचे क्षेत्र अतिशय तांत्रिक आणि सॉफ्टवेअरशी निगडित असल्यामुळे बरेचसे काम हे एका जागी बसूनच करता येते. त्यामुळे त्यांच्या कंपनीमध्ये जाण्यायेण्याच्या वेळा या अजिबात बंधनकारक नाहीत. काम वेळेत पूर्ण झाले आणि निर्दोष असले की पुरे! त्यांच्या मते, आपण जितके स्वत:ला अधिक बांधून घेतो तितकेच आपले मुक्तपणे विचार करणे थांबते आणि आपली कार्यक्षमताही कमी होते. कामाची वेळ बंधनकारक नसल्याने स्त्रिया आणि पुरुषदेखील घराकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकतात. त्यांच्या मते स्टाफचे जेव्हा घर व्यवस्थित असते तेव्हा त्यांचे कामही चोख असते. कामाच्या वेळेबरोबरच त्यांनी आणखी एक बदल केला. त्यांच्या असे लक्षात आले की, बऱ्याच प्रोग्रॅमर्स आणि मुख्य म्हणजे स्त्री प्रोग्रॅमर्स लग्न झाल्यानंतर, घरच्या जबाबदाऱ्या वाढल्या, की नोकरी सोडून द्यायच्या. काही काळ नोकरीशिवाय राहाणे बरे वाटते, पण ज्यांना कामाची सवय असेल ते फार काळ कामाशिवाय राहूही शकत नाहीत. म्हणून त्यांनी अशा प्रोग्रॅमर्सना आपल्याबरोबर घेतले जे काही काळ कामाबाहेर आहेत. ते जरी इतरांपेक्षा कमी वेळ काम करत असले तरी, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी धडपडताना दिसतात. तसेच, या स्त्रिया पूर्वीसारखे केवळ पसे मिळवायचे साधन म्हणून या नोकरीकडे बघत नाहीत, ही नोकरी त्या आवड म्हणून करतात, यामुळे त्यांची कार्यक्षमता खूपच सुधारलेली असते.
राधा यांच्या मते एकदा तुम्ही उच्च पदावर गेलात, की तुम्ही अनेक वेळा एक स्त्री म्हणून काही निर्णय घेत नसता. कंपनीसाठी निर्णय घेणारी जी व्यवस्था असते, त्या व्यवस्थेमध्ये स्त्रियांनी मत परखडपणे मांडायला हवे; परंतु त्या गटात आधीच स्त्रिया अतिशय कमी असतात. निर्णय घेणाऱ्यांमध्ये महिलांचा एक ‘क्रिटिकल मास’ तयार झाला, की त्या निर्णयांवर सकारात्मक प्रभाव पाडू शकतात.
असेच मत अनेक वर्षे ‘कोल इंडिया’च्या चीफ फायनान्स ऑफिसर म्हणून काम पाहिलेल्या इरावती दाणी यांचे आहे. दाणी यांच्या मते माणूस, स्त्री सर्वोच्च पदावर गेली, की तिला त्या पदाला साजेसेच वागावे लागते. तुम्हाला तुमच्या कंपनीचा विचार पहिला करावा लागतो. तिथे तुम्ही स्त्री किंवा पुरुष नसता; तुम्ही त्या पदाला न्याय देण्यासाठी नेमल्या गेलेल्या कर्मचारी असता.
यापेक्षा वेगळे मत मांडले ते असे सरस्वत बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टर उर्वशी धराधर यांनी ‘‘बँकिंग ही सíव्हस इंडस्ट्री असल्याने इथे स्त्रियांना आपल्या क्षमता योग्य पद्धतीने वापरता येतात. स्त्रिया निसर्गत:च अधिक उद्यमशील, एकमेकांना जोडून वागणाऱ्या असल्याने विशेषत: या क्षेत्रामध्ये आपल्याला स्त्रियांनी खूप प्रगती केली असे दिसेल. आज बँकिंग किंवा वित्तसंबंधी क्षेत्रात सर्वोच्च पदावर एक स्त्री आहे आणि त्या बँकेचा नफा वाढत नाही, असे आपल्याला दिसणार नाही. स्त्री ही स्वत: पुढचा विचार करून आज, उद्या लागणारी गोष्ट साठवून ठेवत असते. हेच गुण बँकिंगमध्ये स्त्रियांना उपयोगी ठरतात. त्या स्वत: बँकेसाठी योग्य निर्णय घेऊ शकतात, त्याचबरोबर त्या इतरांनाही योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करू शकतात. धराधर यांच्या मते हे सर्व गुण असल्याने त्या आज या पदावर उत्तम काम करू शकल्या आहेत.
धराधर यांनी बँकेमध्ये स्त्रियांसाठी स्वस्त दरात भांडवल उपलब्ध करून देणारी ‘उद्योगिनी’ नावाची योजनाही सुरू केली. स्त्रिया त्यांना दिलेल्या कर्जाची परतफेड कायमच योग्य वेळेत करू शकतात. त्यामुळे अशा ‘स्त्रियांच्या विशेष कर्ज योजना’ बँकेसाठी कायमच फायद्याच्या ठरतात असा त्यांचा अनुभव आहे. एक स्त्री म्हणून इतर स्त्रियांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी भांडवल उपलब्ध करून देताना त्या त्यांच्या बँकेचे हितही जपतात.
अनेक आंतरराष्ट्रीय अहवालांमध्ये सध्या स्त्रिया या उच्च पदांवर असल्यामुळे कंपनीचा नफा वाढतो, असे थेट संकेत दिले आहेत. ‘अर्न्‍स्ट अँड यंग’चा एक अहवाल तर असे सांगतो की, जगातल्या ३३ टक्के खासगी कंपन्यांपकी तब्बल २५ टक्के कंपन्या स्त्रियांनी सुरू केलेल्या किंवा चालवलेल्या आहेत. त्यांचा २०१० सालचा अहवाल तर असे सांगतो की, स्त्रियांनी सुरू केलेले उद्योग हे पुरुषांनी सुरू केलेल्या उद्योगांपेक्षा अधिक वेगाने वाढतात. या वाढीची दोन कारणे ते सांगतात. एक म्हणजे ‘विविधता’. स्त्रिया मुळातच व्यवसायाचा, उद्योगाचा विचार वेगळ्या पद्धतीने करू शकतात. व्यवसायात, कार्यशैलीमध्ये नावीन्य असले, बदल झाला की निश्चितच त्याचा परिणाम कार्यक्षमतेवर होतो. दुसरे कारण म्हणजे आíथक निर्णयांमधली प्रगल्भता. निर्णय घेणाऱ्यांमध्ये स्त्रिया असल्या, की निर्णय अधिक वास्तववादी असतात असा अनेकांचा अनुभव सांगतो. त्याबरोबरच, जर स्त्री एखादा उद्योग चालवत असेल तर तिला अधिक गुंतवणूकदारही मिळू शकतात.
या अहवालाची साक्ष देणारे एक उदाहरण आइसलँडचे. २००८ पासून आइसलँडला मोठय़ा आíथक संकटांनी घेरले होते. या संकटातून बाहेर येण्यासाठी सर्वच वित्त व्यावसायिक नव्या पद्धतींचा, नव्या कल्पनांचा विचार करत होते. या संकटातून मार्ग काढण्यासाठी हाला टोमासडोटीर या व्यावसायिकेने अतिशय साध्या-सोप्या वाटणाऱ्या काही कल्पनांचा वापर केला. तिच्या मते या कल्पना अतिशय ‘स्त्रीसुलभ’ आहेत. त्यांच्या कंपनीने गुंतवणूक करण्यासाठी आणि एकूणच व्यवसाय करण्यासाठी एक निकष ठरवला, तो म्हणजे ‘जे आपल्याला कळत नाही, त्यामध्ये गुंतवणूक करायची नाही!’ दुसरे म्हणजे, जे मनात आहे ते स्पष्टपणे बोलायचे, उगाच गोष्टी वाढवून सांगायच्या नाहीत आणि तिसरे, गुंतवणूक करताना नफ्याबरोबर भविष्यात काय योग्य आहे याचा विचार करायचा. हालाच्या मते २००८ च्या आíथक संकटातून त्यांची कंपनी याच सूत्रांचा वापर केल्यामुळे तग धरू शकली आहे. या आíथक संकटाचे कारण काय असेल असे विचारले तर ती निर्णयप्रक्रियेमध्ये नसलेली विविधता, असे सांगते. तिच्या मते सर्वच मोठय़ा कंपन्यांमध्ये निर्णय घेणारे केवळ पुरुष असतात आणि कितीही म्हटले तरी ते एखादी स्त्री जसा विचार करू शकते तसे ते करू शकत नाहीत. त्यामुळे निर्णय घेणाऱ्या गटामध्ये पुरुषांबरोबर बाईदेखील असणे अत्यावश्यक आहे. त्याने निर्णय घेणाऱ्यांमध्ये विविधता येते. विचारांमधली ही विविधता एखादी नवी वस्तू बाजारात आणताना उपयोगी पडते. एखादी सहज नजरेतून सुटून जाणारी गोष्टसुद्धा एखाद्या उद्योगाला मोठी उभारी देऊन जाते.
जगातल्या बाजारपेठांचे विश्लेषण करणाऱ्या अनेक संशोधन संस्थांचे लक्ष सध्या स्त्रियांच्या खर्च करण्याच्या पद्धतींवर आहे. आज जगातल्या संपूर्ण उलाढालींमध्ये ४५ ते ५० टक्के उलाढाली या स्त्रिया करतात. २०३० पर्यंत हा टक्का वाढून ७० ते ७५ टक्के होणार आहे. एवढय़ा मोठय़ा बाजारपेठेसाठी कॉर्पोरेट जगताला तयार राहावे लागणार आहे. तुमचा व्यवसाय मोठा करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ‘स्त्रीसुलभ’ कौशल्यांचा अभ्यास आणि उपयोग करावा लागेल हे निश्चित.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:07 am

Web Title: womens in business sector
टॅग : Chaturang
Next Stories
1 वेगळी लेखणी
2 पोलिसी खाक्या
3 महाराष्ट्रकन्या
Just Now!
X