News Flash

अहो आश्चर्यम्!

जगात किती आश्चय्रे आहेत याच्या संख्येवर दुमत असू शकेल; परंतु ‘किं आश्चर्यम्?’ जगातील सर्वात मोठे आश्चर्य कुठले? या यक्षप्रश्नावर युधिष्ठिराने छान उत्तर दिले.

| August 16, 2014 01:01 am

जगात किती आश्चय्रे आहेत याच्या संख्येवर दुमत असू शकेल; परंतु ‘किं आश्चर्यम्?’ जगातील सर्वात मोठे आश्चर्य कुठले? या यक्षप्रश्नावर युधिष्ठिराने छान उत्तर दिले. ‘प्रतिदिनी अनेक प्राणी/माणसे यमलोकास जात असतात. हे पाहात असतानाही उरलेले स्वत:ला चिरंजीव होता यावे अशी इच्छा करतात.’ हे जगातले फार मोठे आश्चर्य आहे. आपल्याला अतिशय अंतर्मुख करविणारे हे उत्तर आहे. असाच काहीसा संवाद ‘कठोपनिषदा’मध्येदेखील आहे.
आपले वेद विशेष करून उपनिषदे आपल्या शाश्वत तत्त्वज्ञानाबद्दल शरीराच्या नव्हे तर आणि फक्त आत्म्याच्या अमरत्वाबद्दल आपल्याला सतत सांगत असतात; पण सतत संभ्रमात असलेल्या आपल्या वृत्तीपर्यंत ही शिकवण खोल झिरपत नाही.
 अर्ध शलभासन
 आज आपण सुलभ अर्ध शलभासनाचा सराव करू या. हे आसन करण्यासाठी विपरीत शयन स्थिती घ्या. दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवा. दोन्ही पाय सरळ, एकमेकांना जोडलेले ठेवा. पायांची नखे जमिनीला टेकलेली असतील. हनुवटी जमिनीवर ठेवा. आता दोन्ही हातांच्या मुठी करून जांघेखाली आधाराला आत सरकवा. आता सावकाश डावा पाय गुडघ्यात न दुमडता जमिनीपासून वर उचला. श्वास रोखू नका. नाभीपासून डोक्यापर्यंतचा भाग स्थिर राहील. काही श्वास थांबून पाय खाली आणा. पुन्हा उजव्या पायाने ही कृती करा. कुठलाही अवाजवी ताण न देता कृती करा.
पाठकण्याचे स्नायू सक्षम करण्यासाठी, उदरस्थ अवयवांचे आरोग्य सुधारण्यासाठी या आसनाचा चांगला उपयोग होतो.    

कायदेकानू : पोटगीमधील बदलाचा अधिकार
प्रीतेश सी. देशपांडे – pritesh388@gmail.com
मागील काही भागांमध्ये आपण वृद्धांना मिळणाऱ्या पोटगीचा अधिकार व त्यासंबंधीच्या काही महत्त्वाच्या तरतुदींची माहिती घेतली. या भागामध्ये आपण पोटगीची रक्कम कमी-जास्त करण्याचा न्यायाधिकरणाचा अधिकार आणि इतर बाबींसंदर्भात माहिती घेणार आहोत.
ज्येष्ठांसाठी कायदा २००७ अंतर्गत आपण पालकांस अथवा ज्येष्ठ नागरिकांस पोटगी मिळू शकते हे पाहिले. मात्र बदलत्या परिस्थितीनुसार आणि इतर न्यायालयांच्या निर्णयांच्या अनुषंगाने ही पोटगी रकमेत बदल करण्याचा अधिकार न्यायाधिकारणास आहे. या कायद्याअंतर्गत न्यायाधिकरणाने (Tribunal पारित केलेल्या आदेशाची प्रत पालकांस अथवा ज्येष्ठ नागरिकांस विनामोबदला देण्याची तरतूद आहे.
या कायद्यात नमूद केल्याप्रमाणे पोटगीच्या तरतुदीचे फायदे ज्येष्ठ नागरिकांस मिळतात. मात्र ज्येष्ठ नागरिक अथवा पालकांना भारतीय फौजदारी संहिता कलम १२५ अन्वये अथवा ज्येष्ठांसाठी कायदा २००७ या दोन्ही कायद्यांअंतर्गत एकत्रित पोटगीचे लाभ उठवू शकत नाहीत. या कायद्याअंतर्गत पोटगीचा आदेश झाल्यापासून पाल्यास ३० दिवसांच्या आत पोटगीची ठरविलेली रक्कम न्यायाधिकरणात जमा करणे बंधनकारक असते. या कायद्यान्वये प्रसंगी, न्यायधिकरण पोटगीच्या रकमेवर व्याजाच्या (सरळ व्याज) आकारणीचा आदेश पारित करू शकते. या व्याजाचा दर ५ टक्क्यांपेक्षा कमी अथवा १८ टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. मागे नमूद केल्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिक अथवा पालकांस २००७चा कायदा अथवा भारतीय फौजदारी संहितेच्या कलम १२५ च्या अंतर्गत पोटगी मागता येते. जर कुण्या ज्येष्ठ नागरिक अथवा पालकाने भारतीय फौजदारी संहिता कलम १२५ अन्वये कोर्टात दावा दाखल केला असेल तर तो दावा काढून टाकून त्या बदल्यात या कायद्याअंतर्गत पोटगीचा दावा न्यायधिकरणाकडे सादर करता येतो.     
खा आनंदाने! : श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे..
वैदेही अमोघ नवाथे   आहारतज्ज्ञ vaidehiamogh@gmail.com
श्रावण सुरू झाला आणि बघता बघता नारळी पौर्णिमा उद्यावर आलीसुद्धा! वजन किंवा कोलेस्टेरॉल कमी करायचं असेल तर नारळ जणू आरोग्याचा शत्रूच. पण आजी-आजोबांनो, प्रमाणात वापरला तर तो गुणीसुद्धा आहे. ओला नारळ / सुकं खोबरं / नारळपाणी सेवन करावं की नाही आणि किती प्रमाणात हे प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. १०० ग्रॅम खोबऱ्यामध्ये साधारण ३५० कॅलरीज मिळतात, पण त्याचबरोबर भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजंसुद्धा मिळतात. लोरिक आम्ल (lauric acid) हे फॅटी अॅसिड गुणकारी आहे, पण प्रमाणात घेतलं तरच.
 ज्या भाजीत नारळ घालायचा तर तेल एकदम कमी किंवा वाटणाच्या मसाल्यामध्ये इतर गरम मसाल्यांबरोबर भाजकं सुकं खोबरं कमी प्रमाणात घेतलं तरी तेवढाच स्वाद कायम ठेवतं. नारळपाणी लहान नारळाचं घ्यावं आणि बरोबर मलईसुद्धा. म्हणजे प्रथिने, लोरिक आम्ल आणि खनिजे योग्य प्रमाणात मिळतात. खोबरेल तेल आम्ही त्यांना वापरायला सांगतो ज्यांना इतर तेल पचत नाही. कारण त्यात  MCT नावाचे फॅट्स असतात जे थेट वापरता येतात.
नारळी भात (तिखट)
साहित्य-
२ टेस्पून तीळ, १ टीस्पून तूप, ३ टेस्पून काजू कणी, १/२ कप किसलेले नारळ, २ टीस्पून नारळ तेल किंवा इतर तेल, १ टीस्पून मोहरी, १ टीस्पून जिरे, १ टीस्पून उडीद डाळ, १ टीस्पून चणा डाळ, २  काश्मिरी लाल मिरची, ७ ते ८ कढीपत्त्याची पाने, १/२  टीस्पून हिंग, २ टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची, अडीच कप शिजवलेला भात, मीठ चवीनुसार
कृती – एका लहान पॅनमध्ये ३ ते ४ मिनिटे तीळ भाजून घ्यावे. थंड झाल्यावर खडबडीत पावडर करा. कढईत तूप गरम करा. मध्यम आचेवर काजू टाकून परता. काढा आणि बाजूला ठेवा. त्याच कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घालावी. मग जिरे, उडीद डाळ, चणा डाळ, लाल मिरच्या, कढीपत्ता पाने आणि हिंग घालून परता. मग तीळ पावडर, हिरव्या मिरच्या, शिजलेला भात, नारळ आणि मीठ घालून चांगले मिक्स करावे. काजू घालून सव्र्ह करावे.
यासह आणखी काही सोपे पदार्थ.
नारळ-टोमॅटो सूप – लहान तुकडे केलेला नारळ, दांडय़ांसकट कढीपत्ता, हिरवी मिरची तुकडे आणि टोमॅटो एकत्र उकळून मिक्सरमध्ये फिरवा आणि जिरं-हिंगाची, तुपाची फोडणी तोंडाला एकदम चव आणते. आलं-मिरची वाटून केलेले नारळ कोकम सार तर एकदम प्रिय आणि पुदिना-कोथिंबीर-नारळ-मिरची-आलं वाटून उडीद आणि लाल मिरचीची फोडणी केलेली चटणी – लय भारी!
मधुमेह असून नारळी पौर्णिमा नक्कीच साजरी करता येईल. नारळ फक्त जरा प्रमाणातच!

आनंदाची निवृत्ती : शिवणकामाची आनंदाची दुनिया
माझा लहाणपणीचा छंद म्हणजे शिवणकाम! लग्न झाल्यावर, मुलं झाल्यावर तो ठरला काटकसरीचा उपाय! मध्ये मोठी विश्रांती घेतल्यावर वयाच्या ७०-७५ वर्षी हा माझा छंद पुन्हा बहरला. म्हणजे काय तर अगदी छोटय़ा बाळांचे मला आवडतील त्या रंगसंगतीमध्ये कपडे शिवणे, रांगोळीतील डिझाइन कापडात बसवून बघणे. बदक, मनीमाऊ, बाहुली, क्रॉसस्टीचच्या टाक्यांनी भरलेली पर्स बनवून कुणाला भेट देणे. कापड खूप भारी-जरीचे असेल तर त्याची पर्स बनवून नवीन हँडल लावून वाढदिवसाला देणे व त्यांच्या चेहेऱ्यावरचा आनंद बघून स्वत: खूश होणे, या गोष्टी मी मनमुराद अनुभवू लागले.
लेकीला-नातीला त्यांच्या वाढदिवसाला, दिवाळीला छान कपडे आणले किंवा त्यांनी स्वत: जरी आणले तरी ड्रेसमधून उरलेले कापड (तसे शिंप्याला आधी सांगून ठेवल्यामुळे) मागवणे व यातून त्यांना मॅचिंग पर्स बनवून देणे, कोणे एके काळी केलेली शटलची नाजूक फुले, लेस लावून प्लेन कापडाच्या ड्रेसला शोभा आणणे, छान रंगाच्या कापडाची फुलपाखरे फुले-पाने बनवून जिथे उठून दिसेल तेथे पॅच करणे, नातवंडांच्या ड्रॉईंगच्या वहीतील अँग्री बर्ड्स, सोपीशी डिझाइन शोधून त्याचे पॅचवर्क करणे. रंगीत रिळांचा डबा, नानाविध फ्रिल, लेसचे तुकडे या घरातील उरलेल्या सामानातून मी माझी कलाकुसर आजमावू लागले. माझ्या भरजरी साडय़ांचे सुंदर विणलेले पदर साडीला चिरा पडू लागल्यावर हलक्या हाताने काढून मऊसे अस्तर लावून बाळाची कुंची करणे. सिल्कची सुंदर रंगाची छान बॉर्डरची साडी असेल तर नरम कापडाचे अस्तर घालून चारही बाजूंना नाजूक बॉर्डर लावून बाळासाठी छोटे पांघरून करणे या आणि अशा अनेक गोष्टींनी माझा दिवस व्यापून टाकलेला आहे.
हे माझे उद्योग दुपारी चालू असतात. घरातील सर्व मंडळी बाहेर गेल्यावर जेवायच्या टेबलावर कापड पसरून माझ्या शिवणाच्या पसाऱ्यातील लहान बाळांचे पेपर पॅटर्न काढून कापून ठेवते. माझ्याकडे पाय मशीन आहे, परंतु पाय पुरेसं काम करत नाहीत म्हणून त्याचे हात मशीन करून घेतले आहे. त्यावर शिवण करावयाचे, सुईत दोरा जायला वेळ लागला तरी तक्रार करायची नाही अन् एक इटुकला सुंदर ड्रेस किंवा वस्तू तयार झाली की खूश व्हावं. तोच माझा सध्याचा आनंद आहे.
आपल्या नात्यात किंवा बिल्डिंगमध्ये स्वत: जाऊन नवजात बाळाचे स्वागत करणे. स्वत: जाणे जमत नसेल तर छान ट्रान्सपरंट पिशवीमध्ये पॅक करून जाणाऱ्या बरोबर पाठविणे किती आनंदाचे असते. आपल्या छोटय़ा बाळाला एका आजीने बनविलेल्या वस्तू दिल्यावर त्या घरच्यांना खूप आनंद होतो हे मी अनुभवले आहे. या सगळ्यात माझा वेळ जातो, नाही कमीच पडतो.

‘आनंदाची निवृत्ती’ साठी मजकूर पाठवताना, निवृत्तीनंतर नवीन एखादी गोष्ट, कला-कौशल्ये शिकला असाल, तर त्याचा अनुभव पाठवावा. १५०-२०० शब्दांची मर्यादा असून पाकिटावर ‘आनंदाची निवृत्ती’  असा स्पष्ट उल्लेख करायला विसरू नका. सोबत आपला फोटो जरूर पाठवा. पत्ता- लोकसत्ता ‘चतुरंग’, प्लॉट नं. १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई, ४०० ७१० किंवा ईमेल करा-chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2014 1:01 am

Web Title: wonderful interlocution
Next Stories
1 आनंद साधना : यक्षप्रश्न
2 विषाद रोग ते विषाद योग
3 सुंदर मी होणार
Just Now!
X