मधुवंती शिदोरे

एड्स या रोगाचा भयानक विळखा समूळ नष्ट झालेला नसला तरी वैद्यकीय संशोधन आणि जनसामान्यांचे प्रबोधन यामुळे कमी नक्कीच झालेला आहे. या सामाजिक आरोग्याच्या यशामागे अनेक अनोळखी हात अखंड कार्यरत आहेत. १ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक एड्स दिन’ म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्त पडद्यामागे राहत एड्स निर्मूलनाचे पायाभूत काम करणाऱ्या डॉ. अलका गोगटे यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी ही मुलाखत..

सामान्य जनांमध्ये आरोग्य साक्षरता पोचवणे तुलनेने सोपे असते. मात्र समाजापासून सर्वार्थाने तुटलेले, वंचित, उपेक्षित लोक आरोग्य प्रबोधन, आरोग्य साक्षरता आणि आरोग्य सेवेपासूनही सतत दूर राहण्याचा धोका मोठा असतो. एचआयव्ही- एड्स या रोगाची भविष्यातली भयावहता दूरदर्शीपणे हेरून चौकटीपलीकडे जात या रोगाचं मुंबईतील प्रमाण दूरदृष्टीने आणि मेहनतीने जाणवण्याइतपत कमी करणाऱ्या, समाजाच्या आरोग्यासाठी तळमळीने झटणाऱ्यांपैकी एक महत्त्वाचे नाव म्हणजे डॉ. अलका गोगटे.

डॉ. अलका यांनी ज्या वेळी हे काम सुरू केले तो काळ एड्सबाबत समाज अनभिज्ञ असण्याचा होता. एड्स निर्मूलनाचा मार्गच काय साधी पायवाटही तोवर बनलेली नव्हती. मात्र त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सात वर्षांच्या अल्पकाळात संपूर्ण मुंबई विभागात एड्स निर्मूलनाचे महत्त्वाकांक्षी काम केले. त्यामुळे १९९८ला वेश्यांमधील एचआयव्हीचे प्रमाण

६४ ते ६५ टक्के  होते. ते २००५ला २० ते २२ टक्क्यांवर आले. तृतीयपंथी लोकांमध्येसुद्धा याचप्रकारची लक्षणीय सुधारणा दिसून आली. समिलगी लोकांमध्ये हे प्रमाण ४० टक्के होते, ते १५ ते १६ टक्के इतके खाली आले. सामान्य लोकांमध्ये ३ टक्के होते, ते १ ते दीड टक्का इतके कमी झाले. हे करण्यामागे त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे प्रयत्न आणि ठाम भूमिका होती. काय होती ती, हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा.

एड्स निर्मूलनाचे आव्हान पेलण्याचा निर्णय त्यांनी कसा घेतला या कुतूहलातून मी त्यांना पहिलाच प्रश्न विचारला, ‘‘या कामात आपण उतरावे, मागेपुढे काहीच दिसत नसताना एक सुरुवात करावी, असा विचार तुम्ही कधी केला? नेमकं काय घडलं?’’

‘‘मी या एड्स निर्मूलनाच्या कामात कशी पडले यामागे एक कहाणी आहे. १९९८ पासून मी मुंबईत एड्स निर्मूलनाच्या कामाला सुरुवात केली. तत्पूर्वी मला या कामाचा अजिबातच अनुभव नव्हता. मायक्रोबायोलॉजी (सूक्ष्मजीवशास्त्र) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर १९७८ पासून मी मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये सूक्ष्मजीवशास्त्र विभागामध्ये काम करत होते. १९८३ मध्ये मी डॉक्टरेट मिळवली आणि १९९२ पासून माझी येथेच विभागप्रमुख म्हणून नियुक्ती झाली. त्या वेळी मी लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या विविध रोगांवर काम करत होते. १९९४ मध्ये जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) या जागतिक संस्थेने आमच्या विभागाला भेट दिली. आमचे काम पाहून त्यांनी थेट जागतिक आरोग्य संघटनेच्या लैंगिक आरोग्य समितीची सदस्य म्हणून माझी नेमणूक केली. त्यातून माझे काम जागतिक स्तरावर सुरू झाले. या कामादरम्यान सबंध जगातच एड्स या रोगाचा फैलाव फार मोठय़ा प्रमाणावर होतो आहे, हे मला दिसून आले. त्याच सुमारास मुंबईच्या रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या एका परदेशी तरुणाच्या रक्त चाचण्या केल्या असता तो तरुण ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ असल्याचे समोर आले. यामुळे ‘भारतातसुद्धा एड्सचा फैलाव होतो आहे का?’ याचा भारत सरकारने शोध घेतला आणि भारतात या रोगाचे प्रमाण निदान एक टक्का तरी असावे असे लक्षात आले आणि त्यावर तातडीने उपाय योजना सुरु झाल्या. त्यात प्रत्येक राज्यात एड्स रोगाची माहिती देणारी व्याख्याने व सुरक्षित शरीरसंबंधांसाठी कॉन्डोम्सचा वापर करण्याचा प्रचार आदींचा समावेश होता. मात्र त्या फारशा प्रभावी ठरत नव्हत्या. तरीही या योजनांमुळे सरकारच्या एक गोष्ट लक्षात आली, की लहान गावे व खेडी यांच्या तुलनेत, मोठी लोकसंख्या असलेल्या आणि सतत औद्योगिक वाढ होत असलेल्या मुंबई, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद या मोठय़ा शहरांत एड्सचा फैलाव फार प्रचंड प्रमाणात होतो आहे. म्हणूनच अशा प्रत्येक शहरासाठी ‘एड्स कंट्रोल सोसायटी’ची स्थापना करण्याची गरज आहे. मुंबईसाठी अशा सोसायटीची स्थापना झाली तेव्हा मुंबईच्या तेव्हाच्या अतिरिक्त पालिका आयुक्तांनी, रत्नाकर गायकवाड यांनी मी यापूर्वी केलेल्या कामाची व्याप्ती पाहून, या सोसायटीची प्रकल्प संचालक म्हणून माझी नियुक्ती केली. २० वर्षे सायन हॉस्पिटलमध्ये काम केल्यावर वेगळे, आव्हानात्मक काम करावे असे मला वाटतच होते त्याच वेळी ही संधी मिळाली.’’

‘‘ या अवघड आणि कठीण कामाच्या  जबाबदारीचे दडपण नव्हते का?’’

‘‘मुळीच नाही. पूर्वी मी ‘हेल्थ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’चा डिप्लोमा केला होता आणि ‘एड्स कंट्रोल ऑर्गनायजेशन’कडून कामाच्या काही मार्गदर्शक सूचना मिळाल्या होत्या. त्यात एड्स रोगाला बळी पडणाऱ्या लोकांचे प्रबोधन करावे लागणार हे सांगितले गेले होते, पण हे प्रबोधन यशस्वी कसे करायचे हे ठरवण्याची जबाबदारी माझी होती. मुंबईसारख्या शहरात वेश्या, तृतीयपंथी आणि समिलगी लोक एड्सच्या कचाटय़ात अक्षरश: भरडून निघतात. त्यांचे प्रबोधन यशस्वीपणे करण्यासाठी मी एक धोरण निश्चित केले. भाषणे देण्यापेक्षा अशा लोकांमध्ये मिसळून, त्यांच्याशी मत्रीपूर्ण व आपुलकीचे संबंध निर्माण करून त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि तोही मी कोणी सरकारी अधिकारी आहे, असा आविर्भाव न ठेवता.’’

धोरण निश्चित केल्यावर डॉ. अलका यांनी वेश्यांपासून कामाला सुरुवात केली. या स्त्रिया ज्या विभागात राहतात त्या-त्या ठिकाणी आणि त्यांच्या सोयीच्या वेळेतच जावे लागे. तेथे स्वत:साठी टेबल-खुर्ची न वापरता, त्या स्त्रियांसेबतच त्या खाली बसत. वेश्यागृहातला कोलाहल आजूबाजूला चालू असे. दारूचा भपकारा वातावरणात भरलेला असे. अशा परिस्थितीत त्या सहजपणे खेळीमेळीच्या गप्पा सुरू करत. साहजिकच या स्त्रियासुद्धा संकोच सोडून मोकळेपणाने बोलू लागत. कोठामालकिणीची दंडेलगिरी, गिऱ्हाईकांकडून होणारे शारीरिक अत्याचार, दलालांची दादागिरी, पोटच्या मुलांची होणारी परवड, अशा त्यांच्या असंख्य समस्या डॉ. अलका मायेनं ऐकून घेत. समस्या सांगताना अनेकींच्या मनाचा बांध फुटत असे. म्हणत, ‘‘मॅडम, आपका जीवन हमसे कितना अलग है, आपके हसबंड और बच्चे होंगे, खुदका घर होगा, हमारे नसिबमें ये सब कभी नहीं आयेगा।’’ गोगटे त्या स्त्रियांचे सांत्वन करत त्यांना शांत होऊ देत. मग या स्त्रियांच्या लैंगिक आरोग्याविषयी बोलणं त्यांना सहज शक्य होत असे. चर्चेबरोबरच त्या वेश्यांना विनामूल्य कॉण्डोम्सही वाटत असत. एक उच्चशिक्षित, सुसंस्कृत, घरेलू औरत इतक्या आपुलकीने आपल्याशी बोलते आहे हा अनुभव या स्त्रियांसाठी फार दुर्मीळ आणि आनंददायक असायचा.

डॉ. अलकांच्या आपुलकीच्या बोलण्यानेच या स्त्रियांना त्यांचा जिव्हाळा वाटू लागला. त्यांना इतके उपकृत वाटत असे की, ‘‘मॅडम एचआयव्ही क्या होता है, कितना भयानक होता है ये सारी बाते आपकी वजहसे हमारे समझमें आयी। हमारे भलेके बारेमें आप कितना सोचते है! आप जैसा बोलेंगी वैसाही हम करेंगे।’’ असं सांगत अलकाताईंनाच त्या आश्वस्त करत. मुंबईच्या विविध ‘रेडलाईट’ परिसरात त्या जात आणि प्रबोधन करत. परिणामस्वरूप मुंबईतल्या ९० टक्के वेश्या कॉन्डोम्सचा वापर, रक्तचाचणी, वेळेवर औषधे घेणे याबाबत जागरूक झाल्या.

तृतीयपंथी समाजातसुद्धा एड्सचे प्रमाण खूप असते. अशा लोकांची सामान्य माणसांना भीती किंवा किळस वाटते. डॉ. अलका गोगटे मात्र या समूहाचे प्रबोधन करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसह त्यांच्यात मोकळेपणाने संवाद साधत. लैंगिकदृष्टय़ा वेगळ्या प्रकारे जन्माला आलेल्या मुलांना किती तरी पालक घरातून हाकलून देतात. त्यांना शिक्षण मिळत नाही, नोकऱ्या मिळत नाहीत, घरकामालासुद्धा कोणी ठेवून घेत नाही. कोंडी झाली, की नाइलाजास्तव हे लोक रस्त्यावर भीक मागतात. उपेक्षित जीवन वाटय़ाला आलेले तृतीयपंथीय वेगळ्या वस्त्या करून समूहाने राहतात. आपली लैंगिक भूक भागवण्यासाठी अनेकदा आपापसात शरीरसंबंध ठेवतात. परिणामी त्यांना एचआयव्हीची लागण होते. ती टाळण्यासाठी कॉन्डोम्सचा वापर करणे आणि जोडीदार न बदलणे या दोन गोष्टींचे महत्त्व डॉ. गोगटे त्यांना समजुतीने सांगत. त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्यावर होत गेला. ‘‘हमारे जिंदगीके फायदेकी बात आपने कितने प्यारसे हमें समझायी। मॅडम, हम आपके बहोत एहसानमंद है।’’ अशी प्रतिक्रिया व्यक्त करत तृतीयपंथी गोगटे यांच्या पाया पडत. ‘‘कुटुंबापासून, समाजापासून, तोडल्या गेलेल्या या लोकांचे जीवन किती खडतर असते हे वास्तव आपल्यासारख्या सामान्य माणसांना कधीही जाणवत नाही. माझ्या कामामुळे मला ते समजले आणि मी शक्य तेवढं प्रेम देत या लोकांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला.’’ हे सांगताना डॉ. अलका यांचे डोळे पाणावले.

समिलगी लोकांनासुद्धा त्यांच्या वेगळ्या लैंगिक जीवनपद्धतीमुळे एचआयव्हीची लागण होऊ शकते. पण त्यांच्यापर्यंत कसे पोहोचायचे ही  डॉ. अलका गोगटे यांची अडचण अशोक रावकवी या समलिंगींच्या चळवळीतल्या महत्त्वाच्या व्यक्तीशी आधीच असलेल्या ओळखीमुळे दूर झाली. पालकांना आपले मूल समिलगी आहे हे समजल्यावर ते, हे सत्य लोकांपासून लपवू पाहतात व त्यांचे विरुद्धिलगी व्यक्तीशी बळजबरीने लग्न लावून टाकतात. पण ही लग्ने टिकत नाहीत. न्यूनगंड व नराश्य आलेली ही मुले मग समिलगी जोडीदाराच्या शोधात बाहेर पडतात. समिलगी लोकांच्या समूहात सामील होतात. यापैकी सुशिक्षित असलेले लोक स्वत:च कॉन्डोम्स वापरतात, रक्त चाचण्या करून घेऊन आवश्यकतेनुसार औषधे घेतात. पण यांच्यामधील अशिक्षित लोकांचे मात्र अनेकस्तरांवर प्रबोधन करावे लागत असे. तसेच दीर्घकाळ कुटुंबापासून दूर राहणारे तुरुंगातील कैदीसुद्धा लैंगिक गरज  भागवण्यासाठी समिलगी संबंध ठेवतात. या कैद्यांना भेटून डॉ. अलका त्यांनाही कॉन्डोम्स आणि रक्तचाचण्यांचे महत्त्व पटवून देत असत. याशिवाय ट्रकवरचे कामगार, माथाडी कामगार, कामधंद्यासाठी मुंबईत येऊन एकटी राहणारी माणसे, असे लोक पत्नीपासून दूर राहत असल्यामुळे इतर स्त्रियांशी लैंगिक संबंध ठेवतात. त्यांनी कॉन्डोम्स वापरणे किती आवश्यक आहे हे सांगण्यासाठी डॉ. अलका टोलनाक्यावर आणि डॉक्सवर जाऊन धडकत. कॉन्डोम्सचे मोफत वाटप करत. कॉन्डोम्स पाहून ‘हे तर फॅमिली प्लॅनिंगचे कॉन्डोम्स आहेत, आम्हाला एड्सचे कॉन्डोम्स द्या.’ अशी मागणी यांच्यातले काही लोक करत असत. अशावेळी ‘दोन्ही कारणांसाठी तेच कॉन्डोम्स उपयोगी असतात.’ हे या लोकांना शांतपणे पटवून द्यावे लागत असे.

सामान्य लोकांना ‘एड्सचा धोका कसा टाळावा’ याची माहिती देणारी पत्रके वाटण्यासाठी, डॉ. गोगटे त्यांच्या सहकाऱ्यांसह बाजार, रेल्वे स्टेशन, चित्रपटगृह अशा अनेक सार्वजनिक ठिकाणी जात असत. तिथे त्या कॉन्डोम्सचे मोफत वाटप करत.

शिवाय रेडिओ, टीव्हीवर त्यांच्या मुलाखती होत, त्यातून त्या एड्स, त्याचा प्रतिबंध अशा बाबींची माहिती देत.

वेश्यांशी संबंध ठेवणाऱ्या पुरुषांकडून त्यांच्या पत्नीकडे एचआयव्ही संसर्ग पोहचू शकतो व अशी पत्नी गर्भवती राहिल्यास तिचे मूल जन्मल्यापासून एचआयव्ही पॉझिटिव्ह होऊ शकते. अशा मुलांना एड्सपासून दूर ठेवण्यासाठी जन्मापासूनच औषधे द्यावी लागतात. त्यांना जागरूक करण्यासाठी गर्भवती स्त्रियांनाही रक्त चाचणीचं महत्त्व त्या पटवून देत. एचआयव्हीची लागण अनेक कारणांमुळे होऊ शकते. अमली पदार्थ इंजेक्शनद्वारे घेणारे लोक एकमेकांची सुई व सिरिंज वापरतात. त्यातूनही एचआयव्हीची लागण होत असल्याने प्रत्येकाने स्वतंत्र सुई व सिरिंज वापरण्याच्या कडक सूचना डॉ. अलका अतिशय तळमळीने देत. हॉस्पिटलमधल्या रुग्णांना अनेकदा बाहेरचे रक्त द्यावे लागते. हे रक्त एचआयव्ही पॉझिटिव्ह असेल तर कुठलीही चूक नसताना त्या रुग्णाला आयुष्यभराची शिक्षा भोगावी लागते. त्यासाठी डॉ. अलका मुंबईतील रक्तपेढय़ांमध्ये जाऊन प्रत्येक बाटली डोळ्यात तेल घालून तपासत. दूषित रक्त असलेल्या बाटल्या फोडून फेकून देत. हे काम दुर्लक्ष न करता आणि सातत्याने करावे लागत असे.

त्या काळातील एड्स, एचआयव्हीचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन शालेय विद्यार्थ्यांचंही प्रबोधन करणं त्यांना गरजेचं वाटलं. वयात येणाऱ्या मुला-मुलींच्या लैंगिक जाणिवा जागृत होत असतात, हे विचारात घेऊन मुंबईच्या शाळाशाळांमधे जाऊन अशा मुलांना ‘एड्स’पासून सावध राहण्यासाठी उपयुक्त व्याख्याने त्यांनी आयोजित केली. ‘मुलांसमोर असे विषय नकोत’ असे म्हणत काही शाळांनी या योजनेला नकार दिला तेव्हा त्या शाळाप्रमुखांचे बौद्धिकही डॉ. अलका यांना घ्यावे लागले.

डॉ. अलका किती दूरदृष्टी ठेवून काम करत होत्या, याचे हे उत्तम उदाहरण आहे. इतकेच नव्हे तर त्याकाळी जोरात सुरू असणाऱ्या डान्सबार्समधील नर्तिका हासुद्धा या एचआयव्ही-एड्सला बळी पडण्याचा धोका असलेला एक समाजघटक. हे वास्तव लक्षात घेऊन डॉ. अलका रात्री-अपरात्री, पहाटे २-३ वाजता डान्सबारमध्ये पोहोचण्याचे धाडस करत. आणि त्यांच्याशी संवाद साधत.

उपेक्षितांना माणुसकीची वागणूक दिली तर ते तुमचं प्रबोधन तर स्वीकारतातच शिवाय भरभरून प्रेमही देतात, याचा प्रत्यय देणारा अनुभव त्यांनी सांगितला, ‘‘एकदा मला कार अपघात झाला. त्यानंतर मी उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. ही बातमी या लोकांना कळताच ‘मॅडम कशा आहात तुम्ही?’ हे विचारणारे फोन सतत वाजत होते. काही दिवसांनी बरी होऊन मी कामावर रुजू झाले. त्यादिवशी यातल्या बऱ्याच जणांनी मला भेटायला कार्यालयात गर्दी केली. कोणी महालक्ष्मीला, कोणी माऊंटमेरीला, तर कोणी दग्र्याला जाऊन माझ्यासाठी नवस केला होता. या नवसपूर्तीचा प्रसादसुद्धा त्यांनी बरोबर आणला होता. ‘‘मॅडम, हमे आपकी बडी फिकर हो रही थी. क्यूंकी आपने हमारी जिंदगी सुधारी है. आप तो हमारे भगवान है ना.’’असं भरल्या डोळ्यांनी बोलत प्रत्येक जण माझ्या हातावर प्रसाद ठेवत होता. त्यांचं हे अकृत्रिम प्रेम पाहून माझ्याही डोळ्यात नकळत अश्रू उभे राहिले.’’ डॉ. गोगटे यांचा हा अनुभव म्हणजे त्यांनी केलेल्या निस्वार्थ सेवेची पावती होती, आज कामातून निवृत्त झाल्यावरही त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला, दिवाळीला, नववर्षांच्या सुरुवातीला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेकांचे दूरध्वनी येत असतात. अनेक जण त्यांच्याशी आजही संपर्क साधून आहेत.

प्रबोधनाव्यतिरिक्त दुसरी एक फार मोठी जबाबदारी डॉ. अलका यांच्यावर होती. मुंबई विभागाच्या एड्स निर्मूलनाच्या कामासाठी युनायटेड नेशन्स, वर्ल्ड बॅंक, जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकार या सर्व संस्थांकडून खूप मोठय़ा रकमांची मदत मिळत असे. एकूण ७ ते ८ कोटी रुपयांचे हे बजेट होते. या रकमांचा संपूर्ण तपशील त्यांना ठेवावा लागत असे. एड्स विषयाच्या परदेशात होणाऱ्या परिषदांसाठी त्यांना अभ्यासपूर्ण तयारी करून जावे लागत असे. केलेल्या खर्चाचा व कामाचा सविस्तर तपशील तिथे द्यावा लागत असे. एड्स समूळ नष्ट  करण्यासाठी एड्स निर्मूलनाचे काम सातत्याने करतच राहिले पाहिजे, असे डॉ. अलका म्हणतात.

त्यांच्या कामामुळे आणखी एक फायदा असा झाला, की एचआयव्ही आणि एड्स याविषयीची फार मोठी जागृती मुंबईच्या सर्व थरातील लोकांमध्ये झाली. सरकारी अधिकारी पदावर असूनही एखाद्या तळमळीच्या सामाजिक कार्यकर्त्यांप्रमाणे त्यांनी या कामात स्वत:ला ज्या प्रकारे झोकून दिले, त्याला खरोखरीच तोड नाही. अर्थात, त्या त्यांच्या कामाचे, यशाचे श्रेय एकटय़ाकडे नसून टीमकडे असल्याचे नम्रपणे नमूद करतात. हे श्रेय त्या डॉ. अलका कारंडे,

डॉ. अरुण बामणे, प्रमोद निगुडकर, डॉ. शांता शंकर रमन, अमिता अभिचंदानी, डॉ. अलका देशपांडे, डॉ. मिनी खेत्रपाल, डॉ. दिलीप वासवानी, मारुती जाधव या सहकाऱ्यांना देतात.

१९९८ ते २००५ या काळात अत्यंत धडाडीने आणि यशस्वीपणे मुंबई विभागात एड्स निर्मूलनाचे काम करणाऱ्या डॉ. अलका गोगटे आपल्या या कामाविषयी समाधान व्यक्त करत शेवटी सांगतात, ‘‘मी मुंबई विभागात एड्स निर्मूलनाचे काम करत असताना परिस्थिती फारशी अनुकूल नव्हती. मात्र मी आणि माझे सहकारी पाय रोवून उभे राहिलो. मला या कामादरम्यान अनेक अविस्मरणीय आणि हृदयस्पर्शी अनुभव आले. या अनुभवांमुळे माझे आयुष्य फार समृद्ध आणि संपन्न झाले आहे.’’

madhushidore@gmail.com

chaturang@expressindia.com