स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार आहे तसाच मेंदूचा विकारही आहे. स्किझोफ्रेनियामध्ये काही गोष्टींमध्ये दोष निर्माण होतो. व्यक्तींचा वास्तवाशी संबंध तुटतो व ते स्वत: भ्रामक व आभासी जगात जगू लागतात. त्यांचा मनावरचा ताबा सुटतो. मात्र वेळीच उपचार केल्यास यातून बाहेर पडता येते.
दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आमच्या मनोविकृतिशास्त्र विभागाला प्लास्टिक सर्जरी विभागातून एका नीलम नावाच्या १७ वर्षांच्या मुलीला पाहण्याची विनंती करण्यात आली. ती दुसऱ्या मजल्यावरून पडल्यामुळे जबडय़ाचे फ्रॅक्चर झाले होते. डाव्या बाजूचा चेहराही विद्रूप झाला होता. त्यासाठी तिची प्लास्टिक सर्जरी करायची होती. त्या वेळी तिने एक विचित्र तक्रार केली की, तिला कुजलेल्या प्रेतांचा वास येतो. तिची केस आम्ही नीट जाणून घेतली.
तिच्या आईने सांगितले की, त्यांच्या चाळीतला एक माणूस आठ महिन्यांपूर्वी भयानक अपघातात वारला होता. तेव्हा त्याच्या प्रेताला खरेच कुजलेला वास आला होता. सगळे नंतर त्याबद्दल विसरूनसुद्धा गेले. पण गेल्या सहा महिन्यांपासून नीलम तो वास येत असल्याची तक्रार करू लागली. त्यांनी सगळ्यांनी तिला समजावयाचा प्रयत्न केला. तरी तिची तक्रार सुरूच राहिली. तिला मावशीकडे, आजीकडे ठेवून पाहिलं. तरीही तो कुजकट वास येतच राहिला. तिचा चिडचिडेपणा वाढू लागला होता. त्यानंतर ती दुसऱ्या मजल्यावरून पडली आणि अपघात झाला आणि तिला आमच्याकडे दाखल करण्यात आलं.
ती नेमकी कशी पडली याची चौकशी आम्ही केली. तर सकाळी सहाच्या सुमारास ती पडली होती. तिच्या विव्हळण्याच्या आवाजाने चाळीतील तळमजल्यावर राहणाऱ्या शेजाऱ्यांनी तिला पाहिले व तिच्या आई-वडिलांना कळविले. आम्ही नीलमशी बोललो तेव्हा तिने सांगितले की गेले दोन-तीन महिने एक काळी सावली तिला सतत हाका मारत असते. त्या रात्री त्या सावलीने तिला झोपायला दिले नाही व पहाटे पहाटे काळ्या सावलीने तिला तिच्यामागोमाग चाळीच्या खाली बोलावले म्हणून तिने ती उडी मारली होती. तो एका स्त्रीचा आवाज होता व तिला तो स्पष्टपणे ऐकू येत होता. आम्ही तिच्या आई-वडिलांना याबद्दल विचारले तेव्हा आईने ही गोष्ट उडवूनच लावली, ‘ती अलीकडे मधून मधून असेच काहीतरी अर्थहीन बोलते तिच्याकडे काय लक्ष द्यायचे मॅडम?’
मूळ मुद्दा हाच होता. त्या मुलीच्या आईने वा पालकांनी तिची ही गंभीर तक्रार समजावून घेतली असती तर तिचा दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारण्याचा प्रसंग टाळता आला असता. नीलमच्या जिवावर बेतलेला हा प्रसंग चेहऱ्यावर निभावून गेला. पण तिचा भ्रम व भास ही स्किझोफ्रेनियाची गंभीर लक्षणे आहेत. ती जे बिनबुडाचे, असंबद्ध बोलत होती, ते तिला झालेल्या मनोविकारामुळे.
मानसिक आजार म्हटले की, आपसूक सगळे वेडेपणाबद्दल बोलतात. वेडेपणा म्हणजे मानसिक विकार, असा लोकांचा गैरसमज आहे. मनोविकाराची व्याप्ती खूप मोठी आहे. सायकॉसिस हा आजार आपण समजतो तसा वेडेपणाच्या लक्षणांचा आजार आहे. सायकॉसिसमध्ये रुग्णाचे वास्तवाशी जणू काही नातेच तुटलेले असते. भासाचे, भ्रमाचे काल्पनिक जग आता त्याचे खरे जग असते. वास्तवाविषयीची जाण/भान गेलेले असल्याने रुग्ण विक्षिप्त वागायला लागतात. त्यांच्या विचारात, भावनांत व वागणुकीत विसंगती दिसायला लागते. कधी कधी हे भ्रम व भास ठरावीक गोष्टींविषयी व माणसांविषयी असतात. तर कधी ते अनेक लोकांविषयीसुद्धा असू शकतात.
या भासांव्यतिरिक्त ते सामान्य व्यक्तींसारखेही जगू शकतात. मात्र त्यांच्यात तर्कशुद्धता नसते. काही कृती विसंगत असतात. काही तरी विचित्र व विक्षिप्तपण सातत्याने जाणवते पण नेमकी लक्षणे दिसत नाहीत. यासाठी व्यवस्थित माहिती घेणे व निरीक्षण करणे गरजेचे आहे. या सायकॉसिसची अनेक कारणे असतात. मेंदूच्या प्रत्यक्ष समस्येने (दुखापत, इन्फेक्शन, व्यसनजन्य पदार्थाचा प्रभाव, उदा. चरस) सायकॉसिस होतो. स्किझोफ्रेनिया सायकॉसिसचा एक प्रकार आहे. हा गंभीर मानसिक विकार आहे. पण त्यासाठी आज उत्तम उपचारही उपलब्ध आहेत. मधुमेह, रक्तदाबासारख्या शारीरिक आजारांप्रमाणे या आजारालाही जीवनभर व्यवस्थित उपचार करावे लागतात.
दुसरी एक केस पाहू या. स्मिता नावाच्या ३४ वर्षीय तरुणीला तिच्या भावंडांनी आमच्याकडे आणले. ती काही खात पीत नसे. फक्त झोपून राही. तिने कित्येक दिवसांत आंघोळ केली नव्हती. लघवी-संडासही ती अंथरुणात करत असे. तिला घरातील इतरांच्या अस्तित्वाची अजिबात खबर नव्हती. साधारण दोन वर्षांपूर्वी स्मिता सर्वसाधारण मुलींसारखीच वागत होती. घरातले काम, बाजारहाट, सणवार सर्व करीत होती. हळूहळू तिचे इतरांबरोबरचे बोलणे-मिसळणे कमी व्हायला लागले. स्वत:च्याच तंद्रीत बसून राहायची. कुठे तरी हरवल्यासारखी दिसायची. कधी कधी स्वत:शीच अस्पष्ट पुटपुटायची. कामात अगदीच थंड पडली. तिला आंघोळ कर, जेवण घे, पाणी पी असे पुन्हा पुन्हा सांगावे लागत असे. अंगावरच्या कपडय़ांचे   
भान  नाही, हळूहळू भावंडांशी बोलणेसुद्धा टाकले. भारावल्यासारखी  चालली तर चालली. हळूहळू अंथरुणातून उठायलाच नकार द्यायला लागली. नंतर दैनंदिन सारे अंथरुणातच करू लागली. तिला जेव्हा आमच्याकडे आणले तेव्हा ती अतिशय अस्वच्छ स्थितीत होती. अंगावर घाण साचली होती. केसांच्या जटा झाल्या होत्या. हाता-पायाच्या नखांत घाणच घाण साचली होती, तोंडाला वास येत होता. अक्षरश: तिला स्ट्रेचरवरून आणले होते. तिच्या नातेवाईकांच्या मदतीने तिला साफसूफ केले. त्याला दोन दिवस लागले व कित्येक नर्सेस लागल्या. ती आपली पुतळ्यागतच होती. तिच्या नातेवाईकांशी बोलून केस व्यवस्थित जाणून घेतली. आम्हाला खरे तर तिच्या नातेवाईकांबद्दल आश्चर्य वाटले. तिची ही अशी दयनीय अवस्था होईपर्यंत मुंबईसारख्या शहरात असूनसुद्धा ते असे निमूटपणे कसे बसले होते? नकळत हळूच घरात शिरलेल्या या आजाराची तिच्या नातेवाईकांना काहीच कल्पना आली नाही? त्यांनी तिच्या खाण्या-पिण्याकडे लक्ष दिले, पण नंतर ती त्यांना काहीच प्रतिसाद देईना. पुतळ्यासारखी निश्चल व स्तब्ध रहायची. एकाच पोझिशनमध्ये झोपून राही. घरचे तिला अंथरुणात ठेवतील, तिचे कपडे बदलतील तशीच ती राहत असे. दोन वर्षांत हळूहळू झालेले हे लक्षणीय बदल. तर गेल्या सहा महिन्यांत झालेली ही दयनीय स्थिती असताना नातेवाईक इतके अनभिज्ञ कसे, हा प्रश्न होताच. पण याचे खरे कारण म्हणजे लोकांचे अशा मनोविकारांबाबतचे अज्ञान व भीती. ही केस कॅटाटॉनिक स्किझोफ्रेनियाची होती.
वरच्या दोन्ही केसेसमध्ये रुग्णाचा वास्तवाशी संबंध तुटलाच होता. त्यांच्या लक्षणांचे नातेवाईकांना आकलनच होत नव्हते. अशा प्रकारचा आजार असू शकतो हे त्यांना पटणारे नव्हते. त्यामुळे उपचार घ्यायची त्यांची तयारी नव्हती. ही सारी लक्षणे स्किझोफ्रेनियाची आहेत. ही लक्षणे विविध प्रकारची असतात.
स्किझोफ्रेनिया म्हणजे काय?
स्किझोफ्रेनिया हा जसा मानसिक आजार आहे तसा मेंदूचा विकारही आहे. मेंदूतील डोपामिन या रसायनाची मात्रा कमी झाल्याने तो विकार होतो. सिटोटोनिन या रसायनाची मात्रासुद्धा या विकारात बदलते. माणसाचे नॉर्मल वागणे हे त्याचे विचार, भावना व वागणूक यांच्या सुसंगतीवर अवलंबून असते. पण स्किझोफ्रेनियामध्ये या तीन मुख्य गोष्टींमध्ये दोष निर्माण होतो. त्यांचा वास्तवाशी संबंध तुटतो व ते स्वत: भ्रामक व आभासी जगात जगू लागतात. त्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीच्या तुलनेने त्यांचे वागणे विसंगत असते. आपण विचारतो एक ते उत्तर देतात दुसरेच. त्यांचा मनावरचा ताबा सुटतो. त्यांच्या वागण्या-बोलण्यातले तारतम्य व समतोलपणा बिघडलेला असतो. आपण या जगात वावरताना आपले वेगळे अस्तित्व सामावून सामाजिक भान ठेवतो ते नेमके या व्यक्तींना जमत नाही.
स्किझोफ्रेनियाची मुख्य लक्षणे
स्किझोफ्रेनियाची लक्षणे आपण तीन प्रकारात समजू शकतो. पण या लक्षणात विविधता दिसून येते.
१. वागण्यात दिसणारे बदल-
– स्वत:शीच हसणे व बोलणे, उगाचच हातवारे करणे,  निर्थक भटकत राहणे, स्वत:च्याच भ्रमात भटकत राहणे, आरोग्याची देखभाल न करणे, अस्वच्छ राहणे,  कपडय़ांचे भान नसणे, आक्रमक होणे, उगाचच कुणाला तरी घाबरणे,
२. भावनिक बदल –
– परिस्थितीशी न जुळणारे, न शोभणारे भावनिक प्रदर्शन (कुणाच्या वाढदिवशी जोरात रडणे), चेहऱ्यावर वेडेपणाचा भाव, मख्ख चेहरा/ निर्विकार भाव, भावनांचा अनुभव स्वत:लाच जाणवत नाही, आक्रमक भाव, संशयी भाव
३. विचारांमधले बदल –
 असंबद्ध बोलणे, विचारात सुसूत्रता नसणे, विचारलेल्या प्रश्नांना विसंगत उत्तर देणे, दोन वाक्यांत वा कल्पनेत कुठलाच तर्कशुद्ध संबंध नसणे, त्यांच्या बोलण्याचा अर्थ न समजणे, अचानक मध्येच असंबद्ध बोलणे.
सुरुवातीच्या काळात जर स्किझोफ्रेनियासारखा आजार ओळखता आला तर उत्तम. कारण उपचारही लवकर सुरू करता येतात. जेवढे लवकर उपचार आपण सुरू करू शकू, तेवढे रुग्ण लवकर काबूत राहू शकतात. सर्वसाधारणपणे मनोविकारतज्ज्ञांकडे रुग्ण पोहोचतात तेव्हा त्यांचा आजार खूप वाढलेला असतो. काही रुग्णांमध्ये हा आजार भूकंपासारखा अचानक येऊन ठेपतो, पण सर्वसाधारणपणे बऱ्याच रुग्णांमध्ये हा आजार हळूहळू येतो. नातेवाईकांना व मित्र-मैत्रिणींना काही तरी बिनसले आहे हे कळते, पण नेमके काय ते कळत नाही. हे बदल पुढे येणाऱ्या तीव्र मानसिक आजारांची लक्षणे असतील याचा त्यांना अंदाज नसतो. या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये एकलकोंडेपणा, उगाचच वा बिनबुडाच्या गोष्टींनी मोठी चिडचिड करणे, आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, उगाचच स्वत:शीच हसणे, झोप न येणे, विचित्र बोलणे, निर्विकार राहणे इ. गोष्टींचा समावेश होतो.
केव्हा केव्हा ही मंडळी खूप भावूक व संवेदनशील होतात. अचानक खूप पूजा कर, उपवास कर, देवळात  वेळी-अवेळी जाणे अशा गोष्टीही करतात. या गोष्टी सातत्याने दिसल्यास डॉक्टरकडे या दरम्यान नेले तर उत्तम, कारण काही सायकॉलॉजिकल परीक्षण व बारकाईने लक्षणे जाणून घेऊन स्किझोफ्रेनियाचे निदान लवकर होऊ शकते.
पुढच्या लेखात (३० मे)या आजाराबद्दल आणखी जाणून घेऊ या.    

Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य
economic confidence china japan company
जर्मन कंपन्या चीनमधून पुन्हा जपानमध्ये का जात आहेत?
Mental Stress These 2 pranayama routines control anxiety best
Mental Stress: मानसिक ताण कसा कमी करावा? रोज करा ‘हे’ दोन प्रभावी प्राणायाम अन् व्हा स्ट्रेस फ्री
illegal annexation of crimea marathi news, russia crimea marathi news, russian pilot project marathi news
विश्लेषण : दहा वर्षांपूर्वी रशियाने विनाप्रतिकार घेतला क्रायमियाचा घास! ‘पायलट प्रोजेक्ट’ने कशी झाली युक्रेन आक्रमणाची सुरुवात?