अनंत सामंत alekh.s@hotmail.com

पाचवीत सुरू झालेल्या माझ्या ‘गद्धेपंचविशी’त मी पहिल्या पाचात येण्याच्या फालतू अपेक्षा-इच्छा त्यागून त्यासाठी अभ्यास करणं सोडून दिलं. त्यापेक्षा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी निरुद्देश हुंदडायचो. मग अल्पावधीतच घरी ‘बद्दड’ आणि शाळेत ‘वर्गाबाहेर उभा राहाणारा मुलगा’ म्हणून मी प्रसिद्ध झालो. अकरावीनंतर मी खूपसा घराबाहेरच राहिलो. कोका कोला, फॅन्टा विकला. पुण्यातल्या ‘पूनम’पासून ‘ताज’-‘सन अँड सँड’पर्यंत अनेक ठिकाणी फुटकळ कामं केली. तीन हजार कामगार असलेलं एक इंडस्ट्रिअल कँटीन चालवलं. गड-किल्ले पाहात रानोमाळ हिंडलो. कलंदरपणामुळे अतिशय समृद्ध जीवन जगता आलं. आकाश, जमीन, पाणी, माणसं, साऱ्यांचंच प्रेम मिळालं. सर्व क्षेत्रांत ‘वर्गाबाहेर सापडणारा मुलगा’ ठरलो, तरी सारे वर्गाबाहेर येऊन स्नेह जोडत राहिले..    

parbati barua, elephant, Hasti Kanya, Gauripur, Assam, mahout
हत्तीच तिचे मित्र
How Did Get Name Tulsibaug To Pune Famous Market
Pune : पुण्यातील प्रसिद्ध बाजारपेठेला ‘तुळशीबाग’ हे नाव कसे पडले? जाणून घ्या, या नावामागचा इतिहास
youth dies
मस्करी जीवावर बेतली; कम्प्रेसरच्या सहाय्याने मित्राच्या गुदद्वारात हवा भरली, तरूणाचा दुर्दैवी मृत्यू
lakshmi narayan yoga 2024
एप्रिल महिना सुरु होताच या ३ राशींना मिळेल अपार पैसा; बुध-शुक्राच्या युतीमुळे निर्माण होईल लक्ष्मी नारायण योग!

‘गद्धेपंचविशी’साठी लिहाल का?’ असं मला विचारलं गेलं तेव्हा मला शेजारच्या टीनाची आठवण आली. ‘बारावीनंतर काय करावं?’ हे विचारण्यासाठी तिनं माझी भेट मागितली. मी मोठय़ा उत्साहानं सर्व अपेक्षित प्रश्नांसाठी तयार होऊन बसलो. पण तिला पडलेल्या एकुलत्या एका प्रश्नानं मला ‘क्लीन बोल्ड’ केलं. ‘काका, तुमच्याप्रमाणे काहीही न करता जगण्यासाठी काय करावं लागतं?’ हा प्रश्न अतिशय गंभीरपणे तिनं मला विचारला तेव्हा मी ‘गद्धेचाळिशी’त होतो. ती पाहात होती तेव्हापासून मी ‘रिकामटेकडा’ वाटावा एवढं सहज जगत होतो. शाळेत असल्यापासून मी अनेकांचं ‘रोल मॉडेल’ होतो. तेव्हापासून आजपर्यंत ज्यांनी माझा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून जगण्याचा प्रयत्न केला त्यांना, त्यांच्या आई-वडिलांना किंवा बायका-मुलांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागलं, हे मी टीनाला समजावून सांगितलं. तिनंही ते ऐकलं. त्यामुळे आज ती ‘यशस्वी आणि समृद्ध’ आयुष्य उपभोगते आहे.

चौथीनंतरच्या उन्हाळी सुट्टीत एक पंधरवडा मी काही म्हातारे आणि विवेकानंदांचे समग्र ग्रंथ यांच्यासोबत राहिलो होतो. त्यावेळी म्हाताऱ्यांचे प्रश्न टाळण्याकरता मी ‘विवेकानंद’ वाचत गेलो. वाचलेलं नकळत जगण्याशी तोलत गेलो आणि लक्षात आलं की, या म्हाताऱ्या आजोबांच्या सगळ्या कुरबुरी, त्यांच्या अपेक्षा आणि इच्छांशी निगडित आहेत. आणि आपणही त्यांच्यापेक्षा फार वेगळे नाही. पाचवीपासून मग मी निरिच्छ, निरपेक्ष आणि आनंदी जगण्याच्या प्रयत्नांना लागलो. त्यामुळे मी कसा गुणी आणि समजूतदार आहे, कधीही कसलाही हट्ट करत नाही; असं माझं गुणगान होऊ लागलं. त्यानं मला इतकं प्रोत्साहन मिळालं की मी परीक्षेत चांगले गुण मिळवावेत किंवा उत्तीर्ण व्हावं यासाठीही हट्ट करणं सोडून दिलं. ती माझ्या ‘गद्धेपंचविशी’ची आणि पर्यायानं आई-वडिलांच्या समस्यांची सुरुवात होती. पण ही नक्की कशाची सुरुवात आहे हे मला किंवा त्यांनाही तेव्हा कळलं नाही.

पाचवीत सुरू झालेल्या या ‘गद्धेपंचविशी’त मी पहिल्या पाचात येण्याच्या फालतू अपेक्षा, इच्छा त्यागून त्यासाठी अभ्यास करणं सोडून दिलं. त्यापेक्षा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जो सापडेल त्याच्याबरोबर मी निरुद्देश खेळायचो, हुंदडायचो. बाबुराव अर्नाळकर वगैरे वाचायचो. मग अल्पावधीतच घरी ‘बद्दड’ आणि शाळेत ‘वर्गाबाहेर उभा राहाणारा मुलगा’ म्हणून मी प्रसिद्ध झालो. जगण्याच्या बाबतीत मी जेवढा निरपेक्ष आणि निरिच्छ म्हणून गुणी आणि समजूतदार आहे, तसाच आणि तेवढाच अभ्यासाच्या बाबतीतही आहे; हे कोणी समजूनच घेत नव्हतं. माझ्या निरिच्छ स्वभावानुसार मी ते कोणाला समजावून सांगायलाही गेलो नाही. पाठलागच नाकारल्यानं ध्येय, ‘गोल’, इर्षां हे सारे मुद्देच मोडीत निघाले होते. कशासाठी, कोणाबरोबर संघर्षच नव्हता, त्यामुळे मला शत्रू नव्हते. टपोरी मुलांपासून शिक्षकांपर्यंत सारेच माझे मित्र आणि हितचिंतक होते. वार्षिक परीक्षेत गरजेपुरता अभ्यास करून जेमतेम उत्तीर्ण होतोय, म्हणून कुटुंबीयही विवेकानंद न वाचताच समाधानी व्हायला शिकले होते. आणि कोणाशी कसली चढाओढच नसल्यामुळे मित्रही एकदम ‘जानी’ झाले.

अकरावीनंतर मी हॉटेल मॅनेजमेंटला प्रवेश घेतला. अख्ख्या भारतात तेव्हा हॉटेल मॅनेजमेंटच्या चारच इन्स्टिटय़ूटस् होत्या. या अनोख्या क्षेत्रात गेलो म्हणून जाणकारांनी माझं खूप कौतुक केलं. पण गेलो तेव्हा ‘हॉटेल’ म्हणजे काय हेही मला माहीत नव्हतं. तीन वर्षांत शिक्षण पूर्ण करून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी आपलं आपण जगू शकलो तर कुटुंबीयांना त्रास न देता आपल्याला हवंय तसं निरपेक्ष, निरिच्छ, आनंदी जगू शकू; एवढाच विचार मनात होता.

वडिलांचं घर छान ऐसपस असताना, घरातल्यांशी कसलाही संघर्ष नसताना अकरावीनंतर मी खूपसा घराबाहेरच राहिलो. कोका कोला, फॅन्टा विकला. ते करताना ट्रक चालवला. पुण्यातल्या ‘पूनम’पासून ‘ताज’-‘सन अँड सँड’पर्यंत अनेक ठिकाणी फुटकळ कामं केली. तीन हजार कामगार असलेलं, २४ तासांचं एक इंडस्ट्रिअल कँटीन चालवलं. गड, किल्ले पाहात रानोमाळ िहडलो. ‘एमटीडीसी’चा टूर मॅनेजरही झालो. हे सारं थोडक्यात सांगतोय. याच्या पोटात खूप काही उरलं आहे. ते ‘इन शॉर्ट’ सांगायचंच, तर सर्वसाधारण गद्धेपंचविशी मी विशीआधीच उरकली! अगदी निर्हेतूक. निरिच्छ. निरपेक्ष. उदाहरणार्थ; पुण्यात राहायला-खायला पैसे नाहीत म्हणून स्वस्तात राहायला बंड गार्डनच्या मॅक्सम्युलर भवनात प्रवेश घेतला आणि महिनाभर उगीचच जर्मन शिकलो. दिल्ली, पंजाबहून तिथे आलेल्या ‘बडे बाप के’ बेटय़ांचा मार्गदर्शक होऊन सगळी संध्याकाळ ‘ब्लू डायमंड’च्या ‘मस्तानी’ बारमध्ये घालवायचो, ते ‘बॉबी’चं शूटिंग संपवून येणाऱ्या ऋषी कपूर, िडपल आणि राज कपूरला पाहायला. तेही निरिच्छपणेच. खिशात फुटकी दमडीही नसताना. असं खूप काही सतत होत राहायचं.

नंतर ‘र्मचट शििपग’ जॉईन केलं तेव्हाही मला जहाजाबद्दल काहीच माहिती नव्हती. कॅप्टन, वगैरे व्हावं अशी ओझरतीही इच्छा नव्हती. ‘भटकू आपलं जगभर,’ म्हणून वेळ घालवायला जहाजावर गेलो ते हॉटेल मॅनेजमेंटच्या आधारावर. ‘चीफ स्टुअर्ड’ म्हणून. पहिल्याच जहाजावर ‘मी खाणार नाही, तुम्हाला खाऊ देणार नाही’ वगैरे मराठी बाणा दाखवला. ते ‘त्रिमाकासी मादाम’ कादंबरीत येतं थोडंफार. ‘फार तर काय होईल, कंपनी काढून टाकेल,’ या विचारानं धांदल केली. झालं उलटंच. कंपनीनं चार सीनिअर्सना काढून टाकलं. मलाही झाडलं. म्हणाले, ‘असं वागायचं असेल तर स्वत: कॅप्टन हो.’ आणि घरी पाठवण्याऐवजी कंपनीनं मला ‘कॅडेटशिप’ दिली, परीक्षेला बसायला मदत केली. म्हणून मी नेव्हिगेटिंग ऑफिसर झालो. ते वर्ष १९७४ असावं. १९८९मध्ये  प्रकाशित झालेल्या ‘एम.टी.आयवा मारू’ या माझ्या पहिल्या कादंबरीची ती सुरुवात होती. हे अर्थातच तेव्हा माहीत नव्हतं. आधी काही लिहिलं नव्हतं. लेखक वगैरे होण्याची इच्छाही नव्हती. तेही बरंच झालं. नाहीतर वारंवार पॅरिसला जाऊनही ‘लुव्र’ न बघण्याचं धारिष्टय़ झालं नसतं. आयफेल टॉवरच्या पायथ्यापर्यंत जाऊन वर न जाण्याएवढा निरिच्छ उरलो नसतो. तिथले मित्र-मत्रिणी भेटल्या नसत्या. पॅरिसचे गल्ल्याबोळ, छोटे छोटे रंगेल कॅफे ओळखीचे झाले नसते. फ्रान्समधले ते काही दिवस ‘अश्वत्थ’मध्ये येतात. मुंबईला परतायच्या तिकिटाची वाट पाहत आठवडाभर मला हॅम्बर्गमधल्या लॉजवर राहावं लागलं होतं. तिथली म्हातारी रिसेप्शनिस्ट रोज सांगायची,

‘तुझं इंग्लंड पाहायचं राहून गेलंय, तिथे जाऊन ये. एवढय़ा घाईनं भारतात परतून काय करणार आहेस?’ ‘आईला भेटायचंय’ असं शेवटी मी तिला सांगितलं तेव्हा तिच्या डोळ्यांत भरून आलेलं पाणी लाखमोलाचं होतं. त्या पार्श्वभूमीवर मला सेंट पावलीच्या रस्त्यावर भेटलेली ‘एॅस्पा’ आणि ‘विरकर’ ‘माईन फ्रॉईंड’मध्ये येतात. इस्रायलमध्ये भेटलेली कमांडो नाशा येते. ‘किबुत्झमधला डॅनी इथे आला होता’ ही विमान अपहरणावरची कादंबरी लिहिताना आयलातपासून जेरुसलेम, तेल अवीवपर्यंत नाशाबरोबर तुडवलेला इस्रायल डोळ्यांसमोर होता. लुव्र, आयफेल टॉवर, बकिंगहॅम पॅलेस, शेक्सपिअरचं घर पाहात बसलो असतो तर रॉटरडॅमला पळून जाऊ पाहणारी ‘बेलिन्दा’ कथासंग्रहातली बेलिन्दा, मुलगा म्हणून जन्माला येऊन मुलीचं आयुष्य जगणारी ज्योसी, नाकाच्या टोकानं वारा, समुद्र, तुफान जोखू शकणारा कॅप्टन रॉस कधी आणि कसे भेटले असते? जहाजावरच्या फावल्या वेळात चार बाय २० ते ४० फुटांचे कॅनव्हास रंगवले. लहानसहान तर कित्येक झाले. काहीच कधी जपून ठेवलं नाही. काही जहाजी मित्रांच्या घराच्या भिंतींवर ती ‘त्यांनी स्वत: काढलेली’ पेंटिंग्ज म्हणून पाहातानाही मी ‘एन्जॉय’ केली. साहित्यात तर हे असं अनेकदा झालं. त्याचीही गंमतच.

साहित्यात पडलो तो गद्धेपंचविशीचा ‘क्लायमॅक्स’ होता. पत्र म्हणून लिहिलेला मजकूर पहिली कथा म्हणून प्रसिद्ध होणं. बुद्धिबळाचा खेळ अर्ध्यावर सोडून उठून जाऊन लग्न करणं. हनिमूनला गेलेल्या अनोळखी गावात आवडली म्हणून चार एकर जमीन विकत घेणं. मूर्खपणे कंगाल झाल्यावर भणभणत्या माथ्यानं ‘.. आयवा मारू’ खरडणं. मग कोणालाही न दाखवता पाच वर्षांसाठी रद्दीत फेकणं. कोणीतरी कराल का, विचारलं म्हणून ‘हॉटेल कन्सल्टन्ट’ होणं. कोणीतरी आग्रह केला म्हणून ‘इंटिरीअर डिझायिनग’ सुरू करणं. आणि मग कुणीतरी भरीला घातलं म्हणून ‘.. आयवा मारू’ प्रसिद्ध होणं! ‘.. आयवा मारू’च्या प्रसिद्धीपर्यंत एकही लेखक, प्रकाशक, संपादक, पत्रकार न पाहिलेल्या माझ्यासारख्या अनभिज्ञाला साऱ्यांनी एकाएकी प्रसिद्धीच्या झोतात आणणं. सगळंच अकल्पनीय. ज्यांचं लिखाण केवळ वाचलं-पाहिलं होतं असे मधू मंगेश कर्णिक, जयवंत दळवी, रत्नाकर मतकरी, विजय तेंडुलकर, उमाकांत ठोमरे हाताला धरून शेजारी बसवू लागले. तत्कालीन राजन खान ते विश्वास पाटील आणि अलीकडचे गणेश मतकरी ते प्रणव सखदेवपर्यंत सारे साहित्यिक माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्यांच्यातलाच समजतात याचं आश्चर्य वाटणं अजून थांबलेलं नाही. ‘..आयवा मारू’ लिहिली त्याला ३० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला. ‘पेंग्विन’नं ती इंग्रजीतही आणली.

‘के फाइव्ह’वर एकांकिका, नाटक, चित्रपट आला. पंधरापेक्षा अधिक पुस्तकं प्रकाशित झाली. पुस्तकांहून अधिक पुरस्कार मिळाले. पण अजून मी स्वत:कडे ‘साहित्यिक’ म्हणून पाहू शकत नाही. खूपसं साहित्यविश्वही माझ्याशी सहमतच आहे.

जयवंत दळवींच्या इच्छेखातर मी काही वर्ष इंटिरिअर डिझाइिनग थांबवून ‘मॅजेस्टिक प्रकाशन’मध्ये बसत होतो. तेव्हा ‘आयवा मारू मॅजेस्टिकच्या किनाऱ्याला’, किंवा ‘मॅजेस्टिकमध्ये सामंतशाही’ अशा बातम्याही दैनिकांत झळकल्या. तिथे बसल्या बसल्या पुस्तकं विकलीच; पण प्रदर्शनंही मांडली, पुस्तकांसाठी स्टॅण्डस् डिझाइन केले, पुस्तकांची दुकानं-प्रकाशकांचं ऑफिस सजवलं, पुस्तकांचं डीटीपी केलं. दिवाळी अंक केले. घोस्ट रायटिंगसुद्धा केलं. साहित्यात जे जे काही घडतं ते सगळं केलं आणि मग कोणीतरी ‘चल, आता हेही कर’ म्हणालं म्हणून नाशिकला जाऊन ‘कन्स्ट्रक्शन’मध्ये पडलो. तिथे आधी ‘ज्ञानेश्वर’, मग ‘ओश्तोरीज’ घडली. रात्री स्लॅब टाकल्यावर पहाटे झोप येत नाही म्हणून ‘लांडगा’ लिहिली. सतीश नाईकांमुळे एक आठवडा सदानंद बाकरेंबरोबर मिळाला. त्यातून नंतर कधीतरी ‘ऑक्टोबर एण्ड’, ‘ब्रिटिश पेंटर’ची निर्मिती झाली.

अजूनही असंच सुरू आहे. दोनचार कादंबऱ्या ‘नाहीच छापायच्या’ म्हणून पडून आहेत. गेल्या वर्षी ‘चार दिवसांसाठी’ म्हणून बॅगही न घेता पुण्यात आलो. वर्ष होऊन गेलं. अजून पुण्यातच आहे. लिहायचं नाही असं ठरवलेलं असताना ‘करोना’ काळात वेळ घालवायला एक कथा लिहायला घेतली. अडीचशे पानं होऊनही आत्ताच सुरुवात झाल्यासारखी वाटतेय.

बघता बघता करोनाची दुसरी लाटदेखील आली, पण पाचवीत सुरू झालेली गद्धेपंचविशी सत्तरीतही संपलेली नाही. टाइमपास म्हणून ‘ओटीटी’वर ‘हाचिको’ सिनेमा पाहिला. त्यात रिचर्ड गिअरला सापडलेलं कुत्र्याचं माठ पिल्लू कितीही प्रयत्न केला तरी फेकलेला चेंडू आणून देण्याचा खेळ खेळत नाही. तेव्हा हताश झालेल्या गिअरला त्याचा जपानी मित्र सांगतो, केवळ मालकाला खूश करायचं म्हणून बिनडोकपणे वागायला हा कुत्रा ‘अमेरिकन’ नाहीये. हा जपानी ‘अकिता’ आहे! तो ‘अकिता’ मला मित्रच वाटला माझा. सिस्टिम चेंडू फेकते, त्याला ‘ध्येय’ म्हणते. आपण धावत जाऊन चेंडू आणायचा. काही क्षण धापा टाकत ‘यशस्वी झालो’ म्हणून मिरवायचं. तोपर्यंत सिस्टिम तोच चेंडू परत फेकते. ते आपलं पुढलं ध्येय असतं. मग विजिगीषूवृत्तीनं वगैरे आपण परत धावायचं. मग परत! त्याला हल्ली ‘अमेरिकन ड्रीम’ म्हणतात. पूर्वी ‘मालकासाठी मान मोडून हाडं गोळा करणं’ म्हणायचे. पूर्वी स्वदेशी शिकून परदेशी ‘ड्रीम’ जगण्याला ब्रेन ड्रेन किंवा देशद्रोह म्हणायचे. आता परदेशी कमवून स्वदेशी डॉलर्स पाठवण्याला देशसेवा म्हणतात. काळ बदलतो, शब्द बदलतात. मालक आणि चेंडू बदलतात. खेळ तोच सुरू असतो. ते सांगतात त्याला आपण ध्येय म्हणतो. छाती फुटेपर्यंत धावतो.

चौथीनंतरच्या समज न आलेल्या वयात वाचलेल्या विवेकानंदांमुळे  माझ्यात काहीतरी विचित्र इम्युनिटी तयार झाली. ध्येय वगैरे दिसेनासंच झालं दृष्टीला. पराभवाची चिंताच संपली. यशासाठी लढणं, झगडणंही उरलंच नाही.

‘दृष्टी’वाचून अनेक अंधांना मी अंध वाटलो. ‘बायपासचे दिवस’नंतर अनेकांनी माझ्या नावासमोर ‘डॉ.’ लिहायला सुरुवात केली. ‘ओश्तोरीज’ वाचून मी फोटोग्राफर्सना फोटोग्राफर वाटलो. ‘ऑक्टोबर एण्ड’ वाचल्यावर मी ‘जेजेचा’ असं प्रभाकर कोलतेंना वाटलं. ‘..आयवा मारू’ने मला खलाशी ठरवलं. साहित्यविश्वाला अत्यावश्यक असणारी ‘माझी जात’ मात्र माझ्या साहित्यात अस्पृश्यच राहिली; सहजच!

या कलंदरपणामुळे अतिशय समृद्ध जीवन जगता आलं. आकाश, जमीन, पाणी, माणसं, साऱ्यांचंच प्रेम मिळालं. सर्व क्षेत्रांत ‘वर्गाबाहेर सापडणारा मुलगा’ ठरलो तरी सारे वर्गाबाहेर येऊन स्न्ोह जोडत राहिले. पण ही समृद्धी ध्येय, उद्दिष्ट म्हणून मिळवलेली नसल्याने याला यश म्हणता येत नाही. तरीही ‘वर्गाबाहेर उभा असणारा मुलगा’ असण्याचा आनंद मी आयुष्यभर उपभोगतो आहे.

व्हॅन गॉफ आणि वासुदेव गायतोंडेंबद्दल मला पराकोटीचा आदर वाटतो. ते कधी भेटले तर मला त्यांना विचारायचंय, त्यांच्या मते ते यशस्वी होते की पराभूत?