घटस्फोट घेणं हा कुणासाठीच आनंदाचा निर्णय नसतो. त्यामुळे संपूर्ण कुटुंब दुखावलं जातं, उद्ध्वस्त होऊ शकतं. पण म्हणून आयुष्यभर स्वत:ची फरफट करून दु:खी आयुष्य ओढत नेणं हे आता स्त्रिया टाळू लागल्या आहेत. सहमती घटस्फोटाच्या प्रक्रियेमुळे तो घेणं आता सुकर झालं आहे. हिंसामुक्त आयुष्य जगण्यासाठी त्या म्हणताहेत होय, आम्ही घेतोय घटस्फोट..स्त्रियांच्या बदलत्या मानसिकतेविषयी..
रिना एक पत्रकार. लग्न झाल्यावर थोडय़ाच काळात तिच्या लक्षात आले की नवऱ्याच्या तिच्याकडून संसारविषयीच्या, घरकामाच्या खूप अपेक्षा आहेत. तिने घरात खूप पदार्थ करावेत, तो ऑफिसमधून आल्यावर तिने घरी असावे, गरम गरम जेवण वाढावे, घर सदैव सजवलेले असावे वगरे वगरे वगरे. पत्रकाराची नोकरी कशी असते. त्यासाठी वेळेची लवचिकता कशी गरजेची आहे हे लग्नापूर्वी स्पष्ट सांगूनही, हे असे घडत होते. खूप प्रयत्न करूनही, संवाद साधायचा प्रयत्न करूनही रिनाच्या लक्षात आले की त्याला जशी बायको हवी आहे तसे होणे तिला शक्य नाही. रिनाने माझा सल्ला घेतला. वेगळे होताना घ्यायची खबरदारी, सहमतीने घ्यायच्या घटस्फोटाची प्रक्रिया, त्याला लागणारा वेळ, पसा याची चर्चा केली. आणि तिच्या बाजूने घटस्फोटाचा निर्णय नक्की केला. जेव्हा कोर्टात केस चालली तेव्हाही ती एकटीच येत होती. चहा पिताना इतर विषयांवर बोलत होती. सैलावली होती. स्वत:च्या निर्णयावर ठाम झाली होती.
    एक जोडपे सोनाली आणि विजय यांचे. दोघांनी माझ्याकडे वेगवेगळ्या वेळी येऊन घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले. प्रकरण दुसऱ्या जिल्ह्य़ात दाखल करणे आवश्यक असल्याने मी त्यांना त्या गावातील माझ्या एका वकील मत्रिणीकडे पाठवले. काही महिन्यांनी काम पूर्ण झाल्याचा तिचा फोन आला, तेव्हा ती म्हणाली, ‘‘जोडपे फारच समंजस वाटले, खरंच आश्चर्याची बाब. घटस्फोट घ्यायचा असूनही कोणतीही कटुता नाही. वाद नाहीत. पशाचे व्यवहार नाहीत. अगदी सहजपणे, सामंजस्याने त्यांनी घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण केली.’’

ज्यांना न्यायालयात जाऊन घटस्फोट घ्यायचा नसेल त्यांना घटस्फोटाशिवाय इतर गोष्टींसाठी तडजोडपत्र दाखल करता येते. विधी सेवा प्राधिकरणाने अशी सुविधा मोफत उपलब्ध केलेली आहे. लोकअदालतमध्ये अशी प्रकरणे दाखल करून त्यावर न्यायालयाचा आदेश होऊ शकतो. या आदेशाची अंमलबजावणी करता येते (एनफोस्रेबल). कित्येकदा समुपदेशन केंद्रामध्ये असे तडजोडपत्र पती-पत्नी स्वखुशीने तयार करतात. ती जर अशा लोक अदालतीमध्ये विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून ठेवली तर त्याला अशी कायद्याची चौकट लाभेल. मोठय़ा जिल्ह्य़ातून विधी सेवा प्राधिकरणासाठी स्वतंत्र न्यायाधीश आहेत तेथे हे काम वेग घेऊ लागले आहे.

live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?
Rural Health Services pregnant woman from Nandurbar lost her life due to lack of timely medical care
ग्रामीण आरोग्य सेवा : ठसठसती जखम!
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…

हे असे काही अनुभव अलीकडे वारंवार येऊ लागले आहेत. हल्ली येणाऱ्या केसेसमध्येही परस्पर सहमतीने होणाऱ्या घटस्फोटाची संख्या वाढू लागली आहे. घटस्फोटांची संख्या वाढू लागली आहे ही बाब काही नवीन नाही, मात्र त्यातला प्रामुख्याने जाणावणारा भाग म्हणजे आता स्त्रिया सहमती घटस्फोटासाठी मोठय़ा प्रमाणावर पुढाकार घेत आहेत. नवरा व्यसनी असेल, मारहाण करत असेल, पसे देत नसेल, मनाविरुद्ध फारच तडजोड करावी लागत असेल तर स्त्रिया आता ते फार काळ सहन करत नाहीत. विभक्त होणे, शक्यतो सामंजस्याने घटस्फोट घेणे याकडे त्यांचा कल दिसू लागला आहे.  
आकडेवारीच्या भाषेत बोलायचे तर २०११ मध्ये भारतात ४३ हजार घटस्फोट झाले. त्यापकी ६० टक्के सहमतीने झाले. राज्यांपकी महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे २० हजार घटस्फोट झाले. त्यात १५ हजार घटस्फोट मुंबई व पुण्यात झाले आहेत. पुण्यात २००५ मध्ये सहमतीने ७२९ घटस्फोट झाले. हेच प्रमाण २०१० साली ११३० एवढे झाले आहे. मुंबईत लग्नानंतर एका वर्षांत घटस्फोट घेणाऱ्यात ३० टक्के लोक सामंजस्याने घटस्फोट घेताना दिसतात.
िहदू विवाह कायदा कलम तेरा ब आणि विशेष विवाह कायदा कलम २८ मध्ये परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्याची तरतूद आहे. सदर तरतूद १९७६ साली करण्यात आली. असा घटस्फोटाचा अर्ज दोघांनी मिळून दाखल करायचा असतो. आमचे पटत नसल्यामुळे आमचे लग्न संपुष्टात आणावयाचे आहे अशा आशयाचा तो अर्ज असतो. मुलांचा ताबा, मुलांची व पत्नीची पोटगी, निवाऱ्याची सोय याची व्यवस्था काय असेल याचे विवरणही अर्जात असते किंवा ते तसे तडजोडपत्रात लिहून अर्जासोबत जोडावे लागते. अर्ज दाखल केल्यापासून सहा महिने ते अठरा महिन्यांच्या कालावधीत अर्ज मंजूर होतो. अर्थात अर्ज मंजूर करताना, तत्पूर्वी दोघे कमीत कमी एक वर्ष कालावधीकरता सलगपणे विभक्त राहणे आवश्यक आहे. अर्ज मंजूर व्हावयाच्या आधी मागे घेता येतो. त्या निर्णयावर वरच्या न्यायालयात दाद मागता येते.
बदलती सामाजिक परिस्थिती, बदलेले कायदे, सुविधांची उपलब्धता, पोषक वातावरण असेल तर घटस्फोटाची प्रक्रिया पूर्वीच्या तुलनेत कमी त्रासाची होत आहे. म्हणूनच घटस्फोटाच्या संख्येत वाढ होते आहे.
अर्थात घटस्फोटाचा निर्णय सहजपणे कुणीही घेऊ शकत नाही. कुटुंब मोडणं हे फारच अपवादात्मक उदाहरण वगळता कुणासाठीही आनंदाची प्रक्रिया असू शकत नाही. उलट त्यामागे असंख्य कारणे असतात, अनंत दु:खं, वेदनेचा इतिहासही असू शकतो. मात्र आपण एकमेकांना पूरक नाही. आपलं पटू शकत नाही हे एका टप्प्यावर नवरा-बायको दोघांच्याही लक्षात येते. सध्याच्या काळातील स्त्री- पुरुषांच्या बदलत्या भूमिका, फास्ट लाइफ, करिअरला प्राधान्य, बदलत्या नोकऱ्या व ठिकाणे, अस्थिर व असुरक्षित नोकऱ्या, लंगिक समस्या या कारणाने निर्माण होणाऱ्या सततच्या मतभेदांमुळे विवाहाचे नाते संपविण्याचा विचार केला जातो.
नीना एक इंजिनीयर तरुणी. तिला एक मुलगीही आहे. नवरा संशयी, तिला कामावर जाऊ द्यायचा नाही, तिला दारू पिऊन मारायचा. एकदा या लहान मुलीवर हात टाकल्यावर तिने वेगळं व्हायचा निर्णय घेतला. नोकरी करून कर्ज काढून उपनगरात स्वत:साठी लहानसा ब्लॉक घेतला. पुढे नवऱ्याने घटस्फोट मागितल्यावर हिने सहमतीने घटस्फोट दिला. विशेष म्हणजे अपेक्षा नसताना त्याने मुलीच्या भवितव्यासाठी काही रक्कमही दिली. याचाच अर्थ स्त्रीला उत्तम शिक्षण, आíथक सक्षमता असेल तर तिला िहसा सहन करत लाचारीने जगावे लागत नाही. लग्नाच्या नात्यातून मोकळे होताना पोटगीसाठी न्यायालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत नाहीत. मुलांच्या भवितव्याची आíथक जबाबदारी व त्यात वाटा उचलण्याइतपत जरी नवऱ्याकडून समज दाखवली गेली तरी मग परस्पर सहमतीने घटस्फोट होतो.  
येथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी. मुलांच्या वतीने त्यांच्या हक्कांची नोंद व वसुली करण्याचा पालकांना अधिकार आहे. परंतु मुलांचे कोणतेही हक्क सोडून देण्याचा त्यांना अधिकार नाही. उदा. वारसाहक्क. कोणत्याही पालकाकडे मुलांचा ताबा असला तरी मुलांचा आई व वडिलांकडील वारसाहक्क सुरक्षित राहतो. तडजोडपत्रात तसा स्पष्ट उल्लेख करता येतो.
तडजोडीने घटस्फोट घेणं आता फक्त आर्थिकदृष्टय़ा वरच्या गटातच नाही तर अगदी थोडय़ा प्रमाणात का होईना निम्न स्तरातही येऊ लागलं आहे. सीमाची कहाणी यातलीच. नवरा व्यसनी. कामावर जाणे नाही. उलट व्यसनाच्या पायी घरातील भांडी विकतो. सीमाला व मुलीला मारतो. सीमा अल्पशिक्षित, निम्न उत्पन्न गटातली आहे. नवऱ्याकडे पसे नाहीत म्हणून पोटगी मंजूर झाली तरी नवरा भरू शकणार नाही हे तिला माहीत आहे. त्रास नको म्हणून घटस्फोट हवाच आहे. तो सुलभतेने व्हावा म्हणून दोन्ही घरच्या समजूतदार नातेवाईकांना मध्ये घालून नवऱ्याबरोबर सहमतीने घटस्फोटाचा अर्ज करण्याची शक्यता ती तपासून पाहत आहे. नवऱ्याच्या त्रासामुळे एकत्र राहणे अशक्य झालेल्या अशा अनेक महिला आमच्याकडे येतात. व्यसन, कर्जबाजारीपणा याची भर असल्याने त्याच्याकडे पसेच नसतात हे लक्षात घेऊन, त्या घटस्फोटाच्या वेळी पोटगीचा हक्क सोडून देतात. तसे असेल तर मग नवराही घटस्फोटास संमती देतो. येथे कुटुंब सल्ला केंद्र नवऱ्याच्या व्यसनमुक्तीसाठी घटस्फोटानंतरही  काम करतात हे विशेष.
कुटुंब न्यायालये व तेथे असलेली समुपदेशनाची उत्तम व्यवस्था हेसुद्धा सामंजस्याने घटस्फोट होण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबई कुटुंब न्यायालयातील वरिष्ठ समुपदेशक अजित बीडवे सांगतात, ‘‘समुपदेशकाने समुपदेशन केल्यावर घटस्फोटाच्या निर्णयाप्रत आलेली कित्येक जोडपी पुन्हा एकत्र राहतात. तसेच अटीतटीने केस लढवणारेही सामंजस्याने घटस्फोट घेतात. हल्ली सहमतीने घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढत आहे हे खरे आहे. तिशीच्या आतल्या जोडप्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर अशा महानगरांत जेथे कुटुंब न्यायालये आहेत तेथे सहमतीने घटस्फोटाचे प्रमाण वाढते आहे. सहमतीने घेतलेल्या घटस्फोटात परस्परांवर कागदोपत्री आरोप राहात नाहीत, पुनर्लग्नाच्या दृष्टीने हा मुद्दा विचारात घेतला जातो.’’
सुमनची कथा या दृष्टीने महत्त्वाची. कारण अनेकदा कुटुंबातील लोक त्यांचे प्रेम प्रकरण अमान्य असल्याने जबरदस्तीने दुसऱ्याच मुलाशी वा मुलीशी लग्न लावतात. अशा वेळी आधीच्या नात्यात प्रामाणिक असणाऱ्या व्यक्तींची कुचंबणा होते. सुमनने लग्नानंतर नवऱ्याला लगेचच तिचे दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. हे लग्न तिच्या घरच्यांनी जबरदस्तीने लावल्याचे स्पष्टपणे सांगितले. ‘तुमचा दोष नाही. तुमचा कोणताही निर्णय मला मान्य आहे.’ असेही तिने त्याला सांगितले. नवरा समंजस निघाला. त्यांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेतला. विशेष म्हणजे त्याच्या पुनर्लग्नाच्या वेळी चौकशीला आलेल्या मुलीच्या वडिलांना मुलात दोष नाही हे सांगून सुमनने त्यांना खऱ्या गोष्टी सांगितल्या.    
घरच्यांनी जबरदस्तीने लावलेल्या लग्नात पती-पत्नी समंजसपणाने घटस्फोट घेत असल्याची अशी उदाहरणेही आता दिसू लागली आहेत. प्रेमसंबंध मान्य न करून घरचे भावनिकरीत्या ब्लॅकमेल करून दुसऱ्याशी लग्नाची जबरदस्ती करतात ही खूपच गंभीर बाब आहे. त्या उलट काही वेळा शिक्षण घेतानाच प्रेमात पडून काहीजण विवाहबद्ध होतात. घरी माहीत नसते. ही जोडपी एकत्र न राहता आपापल्या पालकांजवळ राहात असतात. कालांतराने नोकरीची बदलती ठिकाणे, घरचा विरोध , एकमेकांशी न पटणे यामुळे पुढे घटस्फोट घेताना दिसतात. हेही घटस्फोट सहमतीने होतात. आणि अनेकदा नंतर ते एकमेकांचे चांगले मित्र म्हणूनही रहातात.
घटस्फोट घेणाऱ्यांत तिशीच्या आतली जी अनेक जोडपी येतात त्यांच्याकडे वैवाहिक जीवनाचा फार अनुभव असतोच असे नाही. अनेकदा त्याचे मूळ फारच ठिसूळ असू शकते. बीपीओसारख्या ठिकाणी नोकरी करणाऱ्यांकडे आíथक प्रश्न नाहीत. पण कामाच्या वेळा, पद्धत, कामाचे तास आणि ताण, प्रवास, नोकरीतला परफॉर्मन्स, असुरक्षितता याचा परिणाम वैवाहिक नाते संपण्यात होतो. ही जोडपी सुद्धा सहमतीने घटस्फोट घेताना दिसतात. इथे मात्र अजित बीडवे धोक्याचा कंदील दाखवतात. मुळातच अशा जीवनपद्धतीत वैवाहिक नाते जोपासायला किंबहुना एकूणच नाती जोपासायला प्राथमिकता दिली जात नाही. संवाद अगदी कामापुरते होतात. उदा. जेऊया का, बिल भरायचे आहे इत्यादी. मुळातच संवाद आटत गेल्याने नाते कोरडे होऊन जाते. एकमेकांबद्दल काहीच वाटत नाही. समजून घेण्याचा प्रयत्नही केला जात नाही, त्यामुळे घटस्फोट घेतला जातो. तो शांततेत झाला तरी नाते जोपासण्याचा प्रयत्नच न झाल्यामुळे हा प्रकार गंभीर आहे. कुटुंब व्यवस्थेसाठी हानिकारक आहे.’’
स्त्री-मुक्ती संघटना कुटुंब सल्ला केंद्र चालवते तेथे अनेक स्त्रिया  व आता पुरुषही आपल्या समस्या घेऊन येतात. तेथील वरिष्ठ समुपदेशक शोभा कोकीतकर गेली सतरा र्वष समुपदेशनाचे काम करत आहेत. त्या लोकांच्या मानसिकतेतील बदल नोंदवतात. पूर्वी खूप र्वष िहसा सहन करून, नवऱ्याने घराबाहेर काढल्यावर, पसे मिळण्याचे, नातेवाईकांचे सर्व मार्ग बंद झाल्यावर स्त्रिया येत. पण आता स्त्रिया िहसामुक्त जीवन जगण्याचा पर्याय स्वीकारताना घटस्फोट घ्यायची त्यांची तयारी असते. तसे करताना त्यांना काय हवे आहे याची स्पष्टता येऊ लागली आहे. पूर्वी घटस्फोटाची केस असलेली जोडपी एकमेकांशी बोलत नसत, पण आता ते एकमेकांशी बोलताना, सहकार्य करताना दिसतात, एकमेकांच्या सोयीने तारखा घेतात. घटस्फोट घेऊन नवीन आयुष्य सुरू करतात.
अ‍ॅड. पूजा खुटे या कार्यकर्त्यां वकील. खूप र्वष स्त्रियांच्या केसेस लढवण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या. त्याही सहमती घटस्फोटाचे प्रमाण वाढल्याचे सांगतात. असा घटस्फोट दोन्ही बाजूने सोयीचा असतो म्हणून घेतला जातो. मुलांचा संयुक्त ताबा, पत्नीला घर व मालमत्तेला वाटा हे फायदे कायद्यात तरतूद नसतानासुद्धा तडजोडपत्र करून मिळतात. शिवाय आता निदान मुंबईमध्ये तरी स्त्रिया घटस्फोटाचा बाऊ करताना दिसत नाहीत. िहसा सोसत राहून लग्न टिकवण्यापेक्षा शांततामय जीवनाला त्या प्राधान्य देतात व पुढे जाताना दिसतात. पण ग्रामीण महिलांच्या बाबतीत वास्तव वेगळे आहे. त्या घटस्फोटाच्या बाबतीत आजही तयार नाहीत. त्यांना अशा प्रकारच्या घटस्फोटाची कल्पना असते.’’
कित्येक वेळा वकीलही दोन्ही पक्षांना समजावून मार्ग काढताना दिसतात. अ‍ॅड. लतिका बेिलडगे सांगतात, ‘‘दोघांना एकत्र राहायचे नसेल तर कोर्ट कचेरीत महत्त्वाची र्वष वाया घालवा, फीसाठी पसे घालवा, शारीरिक व मानसिक मनस्ताप सहन करा हे सर्व सहमती घटस्फोटात टाळता येऊ शकते. म्हणूनच सहमती घटस्फोटाची उदाहरणे वाढायला लागली आहेत. आधी एकाने दुसऱ्यावर घटस्फोटाचा दावा दाखल केला असला तरी दोघांना मान्य असेल तर तडजोडपत्र दाखल करून त्याचे रूपांतरण सहमती घटस्फोटात होऊ शकते. मात्र तत्पूर्वी समुपदेशनाचा सकारात्मक परिणामही होऊ शकतो. नवरा नपुंसक आहे अशी ठाम समजूत झालेल्या एका पत्नीला मेडिकल व समुपदेशनासाठी पाठवले असता त्यांचे रिपोर्ट नॉर्मल आले. समुपदेशनातून त्यांच्या समस्येची उत्तरे मिळाली. आज ती दोघे सुखात नांदत आहेत.’’ असे एक उदाहरणही त्यांनी दिले.
लोकांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, पूर्वी घटस्फोटित व्यक्तीचा पुनर्विवाह हीसुद्धा दुखरी बाजू असायची. पुनर्विवाह म्हणजे तडजोडच या समीकरणाला आता छेद जात आहे. त्यांच्याकडे विभक्त झालेले एक जोडपे सहमतीने घटस्फोटासाठी आले होते. त्यांनी आपल्या दुसऱ्या विवाहासाठी जोडीदारदेखील निवडले होते. घटस्फोटाचा निव्वळ औपचारिकपणा बाकी होता. एखाद्या विवाहात ‘यश’ आले नाही याचा अर्थ यापुढचे आयुष्य एकटय़ाने काढावे लागणार ही संकल्पनाही आता कमी होत चालली आहे. पहिला डाव मोडला तरी दुसऱ्या संसाराचा डाव मांडणे त्या गोष्टी घडू लागल्या आहेत. घटस्फोट हा आता ‘धब्बा’ राहिलेला नाही. जर कोणत्याही कारणाने शांततामय सहजीवन शक्य नसेल तर शांततेने घटस्फोट घेऊन पुढे चालत रहाणे लोक स्वीकारू लागल्याचे चित्र दिसते आहे. आíथक स्वतंत्रता, पुरुषप्रधानतेतून बाहेर येऊ पाहणारा जोडीदार, कुटुंब न्यायालये व समुपदेशनाच्या सुविधा यामुळे ओझे होत असलेल्या वैवाहिक नात्यातून बाहेर पडण्याची प्रक्रिया कमी क्लेशकारक होते आहे हे निश्चित. पण त्याहीपेक्षा नको असलेल्या नात्यात आताची पिढी अडकून राहात नाही. लोक काय म्हणतील असा विचार न करता  आपल्या आयुष्यातले गुंते शांतपणे सोडवून आयुष्याला परत नव्याने सामोरे जातात हे लक्षात घ्यायला हवे.
भारतात दरवर्षी एक लाख विवाहित महिला स्वयंपाकघरात ‘जळून’ मृत्युमुखी पडतात. त्या दृष्टीने अ‍ॅड. पूजा म्हणते ते खूप महत्त्वाचे वाटते की िहसामुक्त, शांततामय जगण्याचा स्त्रीला अधिकार आहे, ते मिळवण्यासाठी वेळ आलीच तर बोलणी करून सहमतीने घटस्फोट घेणे हे योग्य पाऊल आहे.