30 March 2020

News Flash

मी आणि माझे

काही दिवसांपूर्वी आमच्या एका ओळखीच्या आजींनी कमालच केली. दहावीच्या निकालानंतर पेढे द्यायला आलेल्या तीनपैकी दोन मुलींनाच बक्षीस दिले. कारण काय? तर त्या दोघी ‘माझ्या’(त्यांच्या) नातेवाइक

| July 12, 2014 01:01 am

काही दिवसांपूर्वी आमच्या एका ओळखीच्या आजींनी कमालच केली. दहावीच्या निकालानंतर पेढे द्यायला आलेल्या तीनपैकी दोन मुलींनाच बक्षीस दिले. कारण काय? तर त्या दोघी ‘माझ्या’(त्यांच्या) नातेवाइक आहेत, तिसऱ्या मुलीशी ‘माझी’ फारशी ओळख आहे ना नाते आहे? वास्तविक एक छोटेसे बक्षीस मुलांचा आत्मविश्वास वाढवू शकते, त्या बक्षिसाच्या पैशाला अथवा वस्तूला किंमत नसून त्यामागील भावना, मुलांच्या परिश्रमाचे कौतुक अभिप्रेत आहे हे कळत नाही असे नाही, पण ‘मी’ आणि ‘माझे’ या कल्पनेत आपण खूप काही हरवून बसतो. वास्तविक उपनिषदांनी सांगितलेली चार ब्रह्मवाक्ये, जीव व परमात्मा, यांतील ऐक्यच दाखवितात. ‘प्रज्ञान ब्रह्म ’, ‘तत्वमसि’, ‘अहं ब्रह्मस्मि’, ‘अयमात्मा ब्रह्म’ या महावाक्यांना अनुभूतीचे परिमाण लावायचे असेल तर साध्या साध्या गोष्टींमध्ये ‘मी’ व ‘माझे’पण टाकायला शिकलेच पाहिजे. ‘योगयुक्तात्मा’ होण्यासाठी प्रथम खरे ‘साधक’ होणे आवश्यक आहे. जेव्हा आपण फक्त आपल्या माणसांवर प्रेम करतो, तेव्हा आपण ‘परिच्छिन्न’ म्हणजे भेद करणारी ममता दाखवितो, परंतु सगळी मुले म्हणजे परमेश्वराची अभिव्यक्तीच आहेत हा भाव आला, की कौतुक करताना अगदी समोर तरी भेदाभेद होणार नाही. शेवटी ‘साधना’ म्हणजे तरी काय? आपल्याकडून कुणीही कमी दुखावले जाण्यांसाठी केलेली वर्तणूक!
  तिर्यक ताडासन
आज आपण तिर्यक ताडासनाचा सराव करू या. दंडास्थितीतील विश्रांती अवस्था घ्या. आता दोन्ही पायांत अंतर घ्या. दोन्ही हात डोक्यांच्या दिशेने वर घ्या आणि हात एकमेकांत गुंफा. आता तळवे आकाशाच्या दिशेने वर करा. आधी शरीर प्रथम उजवीकडे झुकवा. पाय गुडघ्यात सरळ ठेवा. दीर्घ श्वसनाची ४ ते ५ आवर्तने केल्यावर पुन्हा मध्यभागी या. आता डाव्या बाजूने हीच कृती पुन्हा करा. आसनाच्या अंतिम स्थितीत शरीर व श्वासाच्या एकतानतेवर लक्ष एकाग्र करा. दीर्घ श्वसनाची आवर्तने श्वसनक्षमता, पाठकण्याची ताणस्थिती सुधारण्यास मदत करतात.        

खा आनंदाने – आषाढी पौर्णिमा
वैदेही अमोघ नवाथे ( आहारतज्ज्ञ) – vaidehiamogh@gmail.com
नुकत्याच सुरू झालेल्या पावसामुळे निसर्ग बहरलेला आहे, मन उल्हसित आहे आणि अशा वेळी येणारी आषाढाची पौर्णिमा म्हणजेच ‘गुरुपौर्णिमा’. जन्माला आल्यापासून बाळावर संस्कार करण्याचे कार्य पार पाडत असलेले माता-पिता हे प्रथम गुरू. आयुष्यात ज्यांच्याकडून जे जे चांगलं शिकायला मिळतं असे सर्व आपले गुरूच नाही का? ‘यथा अन्नं तथा मन’ अर्थात जसं अन्न तसं मन आणि जसं मन तशी आपली वागणूक आणि जशी आपली वागणूक (कर्म) ते आपल्या आयुष्याचं फलित. एकदम सोप्पं समीकरण आहे. म्हणूनच जर आयुष्यात ‘खऱ्या अर्थाने’ यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या अन्नाचा विचार नको का करायला?
‘पोटाकडून मनाकडे’
हृदय जिंकायचं असेल तर पोटातून मार्ग काढायला हवा असं म्हणतात.
मग त्यासाठी हा आहार विचार :
*अन्न शिजवताना मन शांत असावं. शक्य असल्यास शुचिर्भूत होऊन    
स्वयंपाक सुरू करावा.
* मन प्रसन्न, शांत चित्त असावं. अन्न पचनासाठी हे खूप जरुरी आहे.
* निसर्गातील त्या शक्तीमुळे आपल्याला हा दिवस दिसला. त्याच्यामुळेच शेतामध्ये पिकं येतात आणि फळं मिळतात ही कृतज्ञतेची भावना मनामध्ये असावी.
* अन्नाविषयी वाईट शब्द काढू नये. अन्नाचा आदर करावा.
* अन्नामध्ये मधुर, तिखट, कडू, तुरट, खारट, आंबट अशा सर्व रसांचा समावेश असावा.
*  तामसी जेवण रागीट बनवते, राजसी जेवण आळशी बनवते आणि सात्त्विक जेवण प्रेम वाढवते.
खूप कठीण वाटतंय? इच्छा तिथे मार्ग! थोडेसे प्रयत्न केले आणि नीट नियोजन असेल तर काहीच कठीण नाही. बघा तुमच्या मनाला पटतंय का?
गुरुपूजन म्हणजे अनुभवांचे पूजन आहे. आदर्शवत मार्ग निवडून या मार्गावरून जाणे म्हणजे गुरुपूजन ठरावे असे वाटते. ज्ञानेश्वरांनी वर्णिलेला गुरूचा महिमा बोलका आहे. ‘सद्गुरूसारखा असता पाठीराखा..! इतरांचा लेखा कोण करी..!!’ असा ज्यांचा गौरव होतो त्या महान गुरूला, त्या आद्यशक्तीला माझे कोटी-कोटी प्रणाम.
मूगडाळ-मका ढोकळा
साहित्य : १/२ कप मूगडाळ , १/२ कप ताजे कॉर्न दाणे, २ हिरव्या मिरच्या, १ टी स्पून किसलेले आले, १ चमचा बेसन, १ चमचा तेल, २ चमचे आंबट दही, १ चमचा साखर, १ चमचा खायचा सोडा, थोडी चिरलेली कोथिंबीर, थोडा खवलेला नारळ, चवीनुसार मीठ.
फोडणीसाठी : २ चमचे तेल, १/२ चमचा मोहोरी, १ चमचा तीळ, १ हिरवी मिरची, कढीपत्ता, हिंग एक चिमूटभर.
कृती :  मूगडाळ धुवून २-३ तास भिजवा. जास्त पाणी काढून टाकावे.   मका, आले व हिरव्या मिरच्यांसह  मूगडाळ वाटून घ्यावी. एका भांडय़ात मिश्रण घेऊन, त्यात बेसन, साखर, दही, मीठ आणि तेल घाला. इडलीच्या पिठाप्रमाणे सरबरीत करा. सोडा घाला. ढोकळा पात्रामध्ये वाफवून घ्या. तो थोडा थंड करा आणि वडय़ा पाडून वरून फोडणी द्या. कोथिंबीर आणि नारळाच्या किसाने सजवून हिरव्या चटणीबरोबर खा.
आनंदाची निवृत्ती : समाधान फक्त पैशांत नसते
सुहास मुंगळे
पुणे महानगरपालिकेतला निवृत्तीचा दिवस उजाडला. निरोप समारंभाच्या भाषणातून सगळेच म्हणाले की, मास्तर स्वस्थ बसणार नाहीत. त्यांनी पुढील आयुष्याची दिशा ठरवलेली असणारच. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून दिनचर्या सुरू झालीच.
माझ्या वडिलांच्या म्हणजे कै. सदाशिवराव मुंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मी सत्यनारायणाच्या पूजा करायचो. त्यात मधल्या काळात खंड पडला होता. त्याचाच पुन्हा श्रीगणेशा केला. मांडणी कशी करायची, साहित्य काय काय असते? संकल्प म्हणजे काय? अध्याय किती असतात? त्याचे ज्ञान हळूहळू मी वडिलांकडून घेतले. लोकांना प्रथम विचारायचो, ‘पोथीवरून पूजा सांगितलेली चालेल का!’ पहिल्यापासून धार्मिक वातावरणात वाढल्याने माझ्या कपाळी गंध, बुक्का, असल्यामुळे समोरच्यावर छाप पडे. श्रावण-भाद्रपद महिन्यांत काम मिळे. जी दक्षिणा मिळेल त्यात पूर्ण समाधानी होतो. कित्येक वर्षे प्रथम २१ रुपये, नंतर ५१ रुपये दक्षिणा मिळे आणि पूजेसाठी तांदूळ, गहू, फळे, गूळ-खोबरे ही शिधासुद्धा! सुरुवातीला धोतरही नेसता येत नव्हते, पण अनुभवातून शिकलो. दोन वर्षांनंतर पुष्कळ निमंत्रणं येऊ लागली. मग नियोजन केले, डायरीत नोंद ठेवली. सायकलवरून आमच्या परिसरातच (विठ्ठलवाडी, हिंगणे, आनंदनगर) जात असे.
ज्यांच्या घरी पूजा असे त्यांना प्रथम सत्यनारायणाची पूजा म्हणजे काय, कलश, शंख, घंटापूजा, दीपपूजा इ. म्हणजे काय समजावून सांगतो. नवग्रह अष्टदिशा, सुपाऱ्या किती, प्रसादाचे महत्त्व व अध्यायातील महत्त्वाचा भाग हे समजावून सांगतो. त्यामुळे पोथी वाचनाच्या वेळी शांतता असते. त्याच्या चेहऱ्यावरील आनंद हीच माझी दक्षिणा! त्यांच्या समाधानामुळेही आपण करीत असलेल्या कामाचा कंटाळा न येता आनंद वाटत राहिला! दक्षिणेचा आग्रह नव्हता. पैशाने जरी गरीब असले तरी हे लोक मनाने श्रीमंत असतात, हा अनुभव मी स्वत: घेतला. या सत्यनारायणाच्या पूजेत खरोखर मला एक प्रकारचे मानसिक समाधान मिळत गेले. पैशातच आनंद असतो हे चुकीचे आहे, या निर्णयापाशी मी आज येऊन थांबलोय. पुढे मग (कलशपूजन, वास्तुशांत, लग्न लावणे, साखरपुडा, गंगापूजन) असे धार्मिक कार्यक्रम करू लागलो. आता मात्र दिवसात दोनच पूजा घ्यायचा असा निश्चय व निर्णय केला आहे. कारण प्रत्येकाने कुठे तरी थांबलेच पाहिजे!
इतर वेळेला दुकानदारी करतो (पूजा भांडार). तेव्हा वेळ कसा जातो हे कळत नाही. आपण स्वत:ला गुंतून घेतले की मानसिक समाधान, आनंद मिळतोच. गेली आठ वर्षे मी भिक्षुकी आणि दुकानदारीत गुंतवून घेतले आहे. त्याने निवृत्तीनंतरच्या वेळेचा सदुपयोग तर झालाच, पण मी समाधानीही झालो.    

संगणकाशी मत्री : मराठीत टायपिंग कसे करावे?
संकलन-गीतांजली राणे – rane.geet@gmail.com
हल्ली मराठी लिपीतून स्वत:चा ब्लॉग लिहिण्यासाठी, फेसबुकवर स्वत:चे मत मांडण्यासाठी, ई-मेल लिहिण्यासाठी मराठी टंकलेखन लिपीची खूप आवश्यकता असते. परंतु अनेकदा मराठीतून संगणकावर लिहिण्यासाठी नेमका कोणता देवनागरी फाँट वापरायचा हेच ठाऊक नसते, कारण मराठीत अनेक फाँट आहेत. परंतु जर इंटरनेटवर मराठी भाषेतून काही लिहायचे असेल तर युनिकोड हा फाँट वापरावा लागतो. या फाँटचे वैशिष्टय़ म्हणजे हा फाँट कोणत्याही संगणकामध्ये दिसतो. परंतु जर तुम्ही ‘आकृती’, ‘लोकसत्ता’, ‘शिवाजी’, ‘श्रीलिपी’,‘कृती’ यांसारखे फाँट वापरत असाल, तर ते समोरच्या व्यक्तीच्या संगणकामध्ये हे फाँट असणेही गरजेचे आहे. हे फाँट विकत घ्यावे लागतात. या फाँटची किंमत ही अंदाजे ७५० ते ६५०० रुपयांपर्यंत आहे. युनिकोड हा फाँट वापरताना मात्र कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही, तसेच हा फाँट वापरायलाही सोप्पा आहे.
इंटरनेटवर अशा काही वेबसाइट्स आहेत ज्यावरून ऑनलाइन हा फाँट वापरता येतो. उदाहरणार्थ  क्विल पॅड. क्विल पॅडवर युनिकोडमधून टाइप करता येते. या संकेतस्थळावरून टाइप करण्यासाठी इंटरनेटची सुविधा असणे महत्त्वाचे आहे. ज्यांच्याकडे इंटरनेट नाही त्यांच्याकरता ‘बरहा’ या फाँटचा पर्याय आहे. परंतु हा फाँट डाऊनलोड करण्यासाठी मात्र इंटरनेटची आवश्यकता असते. हा फाँट वापरताना एक अडचण अशी आहे की मोफत डाउनलोड केलेला फाँट वापरत असताना तो ५ मिनिटानंतर वापरता येत नाही. पुन्हा फाँट वापरण्यासाठी ५ मिनिटे थांबावे लागते. यावर पर्याय म्हणजे हा फाँट विकतही घेता येतो. याशिवाय युनिकोडचा हा फाँट प्रत्येक संगणकात मुळातच असतो. फक्त आपल्या संगणक अभियंत्याकडून तो सुरू करून घ्यावा लागतो. काही संकेतस्थळांवर युनिकोडमध्ये लिहायची सोय करून दिलेली असते. उदा. जीमेल, फेसबुक
टीप – बराहा, क्विल पॅड या सॉफ्टवेअरमध्ये टाइप केलेला मजकूर कॉपी करून जिथे हवा असेल तिथे पेस्ट करावा. उदा. फेसबुक, मेल, वर्ड पॅड, ब्लॉग.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2014 1:01 am

Web Title: yoga practice
टॅग Yoga
Next Stories
1 हस्त उत्थानासन
2 स्वरूपे समासन्नता
3 परमानंद प्राप्ती
Just Now!
X