13 December 2019

News Flash

‘बोलायाचे आहे काही..’

सोमवार १ जुलै रोजी ‘डॉक्टर्स डे’ साजरा केला जाईल.. आयुष्यभरात प्रत्येक व्यक्तीचा, कुटुंबाचा या ना त्या कारणाने डॉक्टरांशी संबंध येतोच. पण अनेकदा आपलं आजारपण वा

| June 29, 2013 01:01 am

सोमवार १ जुलै रोजी ‘डॉक्टर्स डे’ साजरा केला जाईल.. आयुष्यभरात प्रत्येक व्यक्तीचा, कुटुंबाचा या ना त्या कारणाने डॉक्टरांशी संबंध येतोच. पण अनेकदा आपलं आजारपण वा आरोग्य यापुरतंच ते मर्यादित असतं. अनेक फॅमिली डॉक्टर अनेक कुटुंबांतले एक झालेले असतात. पण डॉक्टरांच्या कुटुंबात, त्यांच्या आयुष्यातल्या सुख-दु:खात फारसं कुणी डोकावत नाही. तिही माणसं असतात हे अनेकदा समजून न घेता त्यांच्याकडून खूप काही अपेक्षा केल्या जातात. डॉक्टरांच्या जगातले हे काही अनुभव त्यांनाही समजून घ्यायला हवं हे सांगणारे. त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला हवी हे सांगणारे..
आमच्या रुग्णालयातून बरे झाल्यानंतर एकदा एका रुग्णाने त्याचा अभिप्राय कागदावर लिहिला. बाकी काही नाही फक्त खालील ओळी –
‘बाबा तेरी अदालतमें मेरी जमानत कायम रखना;
 मैं रहू न रहू मगर डॉ. दंडवतेजी को सलामत रखना’!
त्या ओळींतून त्याच्या मनातील विश्वासाची, आदराची, कृतज्ञतेची भावना ओतप्रोत व्यक्त होत होती. रुग्णाचा आपल्याबद्दलचा असा विश्वास ही खरे तर प्रत्येक डॉक्टरची संजीवनी असते. डॉक्टरांना देव मानण्यापेक्षा, त्यांच्यावर विश्वास ठेवणारे व त्यांच्याबद्दल देवाकडे दुवा मागणारे रुग्ण लाभणं हे डॉक्टरचं भाग्य! एक जुलच्या ‘डॉक्टर्स डे’ निमित्ताने ‘डॉक्टरांच्या जगात’ घडणाऱ्या छोटय़ा छोटय़ा घटना मला आठवू लागल्या; ज्यांचा ते कधी उल्लेख पण करत नाहीत व आयुष्याचा एक भाग म्हणून त्यांनी या गोष्टी स्वीकारलेल्या असतात. पण या घटनांमधून त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बरंचसं काही अबोल, अव्यक्त, वेगळं असं मला तुमच्यासमोर व्यक्त करावंसं वाटलं. ही तक्रार नाही, की गाऱ्हाणं नाही; आहे फक्त वस्तुस्थिती. या अनुभवांचं भांडवल करायचा हेतू नाही. फक्त ‘ बोलायाचे आहे काही’..

 मुलगा डॉक्टर, पण इतरांसाठी
‘अहो सुनीलची आई, तुम्ही तब्येतीच्या छोटय़ा तक्रारींसाठी इतक्या लांब का येता? तुमचा सुनील एम.डी. मेडिसिन करतो आहे ना; त्याला सांगितलं तरी तो तुम्हाला तपासून लगेच औषध देईल.’ -मी म्हटलं.
‘अहो डॉक्टर, मी रोज डबेवाल्याबरोबर पाठवलेला डबा खायलाही वेळ नाही म्हणून निम्म्या वेळेला डबा तसाच परत येतो. वॉर्डमधली कामं संपता संपत नाहीत त्याची. तसा महिन्यातून एका रविवारी दोन तासांसाठी घरी येतो म्हणा; पण मी नाही सांगत त्याला माझ्या तब्येतीच्या तक्रारी! वाटतं, इतक्या थोडय़ा वेळासाठी घरी येतो, त्यात आपली काही दु:ख त्याला ऐकवू नयेत. रात्रंदिवस रुग्णांसाठी जागरणं करताना वजनही कमी झालं आहे त्याचं. तुम्हीच मला तपासून औषध सांगा.’ मी त्यांच्याकडे बघितलं, तर डोळे भरून आले होते त्यांचे..

 तहानभूक हरपून काम
डॉ. सागरला कर्करोगशस्त्रक्रियेच्या शाखेत स्पेशलायझेशनला प्रवेश मिळाला. काय खूष झाला तो! एकेक शस्त्रक्रिया चार-पाच तासांची अशा रोज कमीत कमी दोन-तीन शस्त्रक्रिया. त्यानंतर वॉर्डचा राऊंड, मग दुसऱ्या दिवशीच्या शस्त्रक्रियांची पूर्वतयारी. अखंड काम- घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं. आठवडय़ातून जेमतेम दोन-तीन वेळा रात्री मेस बंद व्हायच्या आत पोहोचला तर जेवण मिळायचं, नाही तर जवळच्या स्टेशनवर फक्त चहा बिस्किटांचं जेवण. वरिष्ठ मित्र म्हणाले, ‘अरे आँकोसर्जरीला आलास ना, स्वत:च्या नाकातून पोटात नळी घालून ठेव, त्यातून तुला कोणीही अन्न देईल, प्रश्न राहिला नसíगक विधींचा -त्यासाठीही नळी घालून टाकू; मग कितीही वेळ चालू देत काम.’ -हे ऐकून बापडा शिकला तो.. पाच मिनिटे मध्ये वेळ मिळाला तरी उंटासारखं खादाडून घ्यायला! आता मात्र तो चांगला रुळला- एका मागोमाग एक शस्त्रक्रिया शिकण्याच्या आनंदात या गोष्टी त्याला आता दुय्यम वाटतात.

तू खूप शिक, डॉक्टर हो !
नुकतीच एम.बी.बी.एस. झालेल्या माझ्या भाचीच्या घरातले पाच वर्षांपूर्वीचे संवाद -‘आई, मी आठवीपासून ठरवलं होतं की रुग्णांना बरं करण्यासाठी मला डॉक्टर व्हायचं आहे असं. अकरावी, बारावी दोन र्वष मी इतका अभ्यास करूनही मला का नाही सरकारी कॉलेजमधे प्रवेश मिळाला? प्रवेश मिळालेल्या शेवटच्या मुलाचे व माझे मार्क पण तंतोतंत एक आहेत; पण बघ ना, एकेका मार्कावर ४० विद्यार्थी असल्याने माझा गुणवत्ता क्रमांक मागे गेला व प्रवेश हुकला; सांग ना मी कुठे मागे पडले? खासगी मेडिकल कॉलेजच्या प्रवेशपरीक्षेतून मला मिळतो आहे प्रवेश; पण एवढी फी आपल्याला परवडेल कशी? का मी पुढच्या वर्षी पुन्हा सी.ई.टी.परीक्षा देऊ?’
‘अगं मनू, तू नाही कमी पडलीस. रात्रंदिवस तुझ्या ध्येयासाठी झटलीस, गेली दोन र्वष तुला अभ्यासाशिवाय दुसरं जगच नव्हतं. तू मार्क मिळवून सिद्ध केली आहेस तुझी क्षमता. पुन्हा परीक्षा देण्यात र्वष वाया नको जायला. आम्ही तुझ्या फीकरिता कर्ज काढू. तुझ्या इच्छेप्रमाणे तू खूप शिक, डॉक्टर हो!’
 
 आपलं मूल कधी?
माझी मत्रीण एम. एस. झाल्या झाल्या परगावी नवऱ्याकडे राहायला गेली. डॉ. जयंतने नुकतेच कर्ज काढून स्वत:चे रुग्णालय चालू केले होते. दोघेही दिवसरात्र रुग्णांसाठी मेहेनत घ्यायचे. ५-६ महिन्यांनी जयश्रीला दिवस गेले. स्वत:चा रिपोर्ट अधीरपणे जयंतला दाखवायला ती गेली; तर तो फक्त एवढंच म्हणाला, ‘अरे, इतक्यात?’ बास एवढीच प्रतिक्रिया! जयश्री जरा नाराज झाली. तिचं वय होतं अट्ठावीस. मला फोनवर म्हणाली, ‘अगं, आपणच लोकांना सांगतो; की पहिलं बाळ आईच्या वयाच्या तिशीच्या आत व्हावं म्हणजे गर्भारपणातील गुंतागुंत कमी होते. मग मला आत्ता दिवस गेले तर याला जरासुद्धा आनंद होऊ नये?’ डॉ. जयंत माझाही मित्र असल्यामुळे दोन दिवसांत त्याचा फोन आला; ‘अगं वर्षां, दर महिन्याचा बँकेचा हप्ता भागवताना मानसिक ताण येतो. त्यात पुन्हा अजून एका जिवाची भर पडणार. या विचाराने मला त्या क्षणाचा आनंद नाही घेता आला. असं वाटतं, आपण वयाच्या कितव्या वर्षांपर्यंत आपापल्या आई-वडिलांपुढे हात पसरणार? मी काही जयश्रीला निराश करू इच्छित नाही. ज्याने निर्माण करायचं ठरवलं आहे तो त्याची व्यवस्था बघेलच, माझा विश्वास आहे त्याच्यावर; पण माझ्या कोरडय़ा प्रतिसादामागचं कारण तू एकदा जयश्रीला समजावून सांगशील का? प्लीज.’

 उपचार की लाखांचा बिझनेस?
आमचा एम.एस. झालेला अस्थिरोगतज्ज्ञ मित्र डॉ. नितेश वयाच्या पस्तिसाव्या वर्षी विरारमधील चांगलं चाललेलं स्वत:चं रुग्णालय बंद करून पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेला. त्याने तेथे पाच वष्रे राहून लहान मुलांच्या अस्थिरोगांवर स्पेशलायझेशन(FRCS) केलं. त्यानंतर तिथे स्वतंत्र प्रॅक्टिसची परवानगीदेखील मिळाली. पण भारताच्या ओढीने तो पुन्हा मुंबईत आला. या प्रकारचे रुग्ण विरारमध्ये संख्येने कमी मिळतील हे लक्षात घेऊन त्याने मुंबईतील पाच-सहा मोठय़ा रुग्णालयांत नोकरीसाठी प्रयत्न केला. पण जिथे जाईल तिथे व्यवस्थापनाने त्याला एकच प्रश्न विचारला; ‘तुमचं शिक्षण मान्य आहे हो डॉक्टर; पण तुम्ही आमच्या रुग्णालयाला दर महिन्याला किती लाखांचा बिझिनेस देणार?’ तो उत्तरला, ‘हे तर या प्रकारचे रुग्ण मिळण्यावर अवलंबून आहे, मी तुम्हाला आत्ता हे कसं सांगू? तुम्ही मला संधी द्या, मी तुम्हाला चांगले परिणाम दाखवून देईन.’ सर्व ठिकाणी त्याला नाकारण्यात आलं. सहा-सात महिने वाट बघून नाइलाजाने लंडनला जाऊन कायमचा स्थायिक झाला. आपल्या उच्चशिक्षणाचा उपयोग मातृभूमीसाठी करण्याचं त्याचं स्वप्न मिटून गेलं. तो कायमचा तिकडे जाऊन दहा वष्रे झाली तरी त्याचे जुने रुग्ण अजूनही त्याची आठवण काढून हळहळत आहेत.

घरपण नाहीच
 वैद्यकीय व्यवसायात अतिशय व्यग्र असलेल्या माझ्या एका मत्रिणीकडे धुळ्याला जाण्याचा मला एकदा योग आला. ती स्त्रीरोगतज्ज्ञ व तिचे यजमान बालरोगतज्ज्ञ. रोज सकाळचं काम संपवून जेवायला संध्याकाळचे ४-५ वाजायचे. जेवून जेमतेम एक तासात पुन्हा ६ वाजता रुग्णालयाचा बाष्टय़रुग्ण विभाग चालू होई. घर आणि रुग्णालय एकाच इमारतीत असल्याने कुठल्याही वेळेस रुग्णांना तपासायला यावं लागे, बोर्डवरील वेळा पाळणारे रुग्ण फार थोडे. या दिनचय्रेतच त्यांची दोन्ही मुलं मोठी झाली व वैद्यकीय शाखेत गेली. रात्री गप्पा मारताना मत्रीण मला म्हणाली,‘आम्ही आता या रुग्णालयापासून लांब घर बांधतो आहे. माझ्या दोन्ही मुलांचं लहानपण याच वातावरणात गेलं. दिवाळीचे फटाके उडवतानासुद्धा ती आम्हाला चारचारदा विचारायची , ‘आईबाबा, तुमचा कोणी रुग्ण गंभीर तर नाही ना? आम्ही अंगणात फटाके उडवले तर चालेल ना?’ कधी त्यांना रविवारी फिरायला घेऊन जायचं कबूल केलं; तर निघतानाच कोणीतरी अत्यवस्थ रुग्ण आला, की सगळ्या नियोजित कार्यक्रमावर पाणी पडायचं! आम्ही जायचो वॉर्डमध्ये व मुलं हिरमुसली होऊन घरी. मी विचार केला आता नातवंडांना तरी मोकळेपणा मिळू दे. दिवसातून काय हेलपाटे घालायचे आहेत ते घालू आम्ही. म्हणून उशिरा का होईना हा लांब राहण्याचा निर्णय घेतला.’

कुटुंबीयांसाठी वेळ कुठाय?
माझ्या कर्करोगतज्ज्ञ मित्राचे हात शस्त्रक्रियेत भराभर चालत होते, पण आज तो जरा गप्प गप्प होता; मी त्यासंबंधी त्याला नंतर विचारलं, तर म्हणाला, ‘गेले कित्येक दिवस मी माझ्या मुलांशी बोललेलोच नाही. मी सकाळी निघतो तेव्हा ती शाळेत गेलेली असतात, दुपारी उशिरा मी घरी येतो तेव्हा ती त्यांच्या अभ्यासात मग्न असतात. संध्याकाळी मी बाहय़रुग्ण विभागासाठी जातो तेव्हा ती वेगवेगळ्या छंदवर्गात गेलेली असतात आणि मी रात्री अकरा वाजता घरी येतो तेव्हा जेवून झोपलेली असतात. परवा माझी बायको म्हणत होती, ‘जरा वेळ काढ मुलांसाठी; नाही तर मी घरी नसताना बेल वाजवलीस तर तुलाच मुलं विचारतील- कोण तुम्ही? कधी पाहिल्याचं आठवत नाही तुम्हाला!’
क्षणभर मी तिचं विधान विनोद समजून मागे सारलं; तरी मनात सारखा विचार येतो आहे, खरं आहे तिचं बोलणं, अशीच वर्षांमागून र्वष जात राहिली तर माझ्याशी त्यांचा संवाद काय राहील? मला याचा आता गंभीरपणे विचार करावा लागेल.’

‘गेले द्यायचे राहुनी..’
मध्यंतरी माझ्या शल्यशास्त्राच्या गुरूंना भेटायला गेले होते. त्या व त्यांचे यजमान दोघेही सर्जन. माझी विचारपूस केल्यावर मॅडम म्हणाल्या, ‘अगं, आता शनिवार संध्याकाळची प्रॅक्टीस आम्ही दोघांनी बंद केली बरं का! वयाच्या साठीला आल्यावर तरी ऑपरेशन थिएटर, वॉर्ड, बाहय़रुग्ण विभाग हे सोडून बाहेर मोकळ्या जगात एकमेकांबरोबर चार निवांत क्षण एकत्र घालवता यावेत; म्हणून; नाहीतर नंतर असं वाटेल, ‘गेले द्यायचे राहुनी..’ खरं की नाही?’ मॅडमचं हे रूप आणि विचार मला नवीन होते. तेवढय़ात आतून सर आले आणि म्हणाले, ‘अगं मागच्या शनिवारी चक्क दोघं संध्याकाळी फिरायला बाहेर गेलो, तर तुझ्या मॅडम म्हणाल्या, ‘अरे रोजची संध्याकाळ बाहेरच्या जगात इतकी रम्य असते हे मला आता आठवतच नाही.’ मी म्हणालो, ‘कसं आठवेल? लग्नानंतर चारच दिवसांत कामावर रुजू झाल्यावर आपापल्या वॉर्डमध्ये राऊंड घेण्यात संध्याकाळ निघून जायची, मोकळे रविवार मिळाले ते गेले मुलांसाठी, स्वत:चं रुग्णालय चालू केल्यावर रोज संध्याकाळी ओ.पी.डी. मग बाहेरची सुरेख संध्याकाळ आपण पाहिली आहे कधी?’ ..आणि आम्ही तिघेही मनमोकळे हसलो.

डॉक्टरही माणूसच
‘कृपया मला देव म्हणू नका, मी तुमच्यासारखा माणूसच आहे. मुळातच आजार खूप वाढल्यावर तुम्ही हा रुग्ण माझ्याकडे आणला आहे. शस्त्रक्रिया करूनही आता हा फार काळ जगू शकणार नाही. मला तुमच्याकडून पसे मिळतील, पण मी त्याला बरं नाही करू शकणार; म्हणून मी ही शस्त्रक्रिया नाकारतो आहे. तुम्ही या मर्यादा समजून का घेत नाही? मी आता फक्त त्याला वेदना कमी करण्याची औषधं देतो.’ हा माझ्या पतीचा संवाद चालला होता- एका साठ वष्रे वयाच्या जठराचा कर्करोग झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांशी. त्याचं निदान झालं, तेव्हाच आजार यकृतापर्यंत गेलेला, पोटात पाणी, कावीळ, रक्त कमी, हाताला लागणारा जठराचा गोळा अशी त्याची अत्यवस्थ स्थिती होती. त्यात नातेवाईकांचा आग्रह होता, ‘डॉक्टर आमचा तुमच्यावर फार विश्वास, तुम्ही आम्हाला देवासारखे. आता याची शस्त्रक्रिया करून तुम्ही याला बरं करा’. मनात आलं, डॉक्टर रुग्णाच्या आजाराचं वेळेवर निदान करू शकतो, त्यावर उपचार करू शकतो, त्याची वेदना कमी करू शकतो. आपला रुग्ण बरा होऊ नये असं त्याला कसं वाटेल; तो सर्वतोपरी प्रयत्न करतो; पण यश मिळणं अथवा न मिळणं हे वरचा ‘तो’ ठरवतो. डॉक्टरांना देवत्व बहाल करण्याऐवजी त्याला माणूस म्हणून समजून घ्या; ही माझ्याप्रमाणेच माझ्या असंख्य सहकाऱ्यांची अपेक्षा ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने व्यक्त करते.
या व्यवसायाचं पावित्र्य, गांभीर्य, मांगल्य जपण्यासाठी ईश्वराने मला व माझ्या सर्व डॉक्टर मित्रमत्रिणींना सद्बुद्धी, सामथ्र्य, कौशल्य, सुरक्षा, सुयश द्यावं; ही माझ्याकडून प्रार्थना व सदिच्छा!

First Published on June 29, 2013 1:01 am

Web Title: your doctors life
Just Now!
X