हरीश सदानी

मुलींचा आत्मविश्वास, त्यांच्यातली धाडसी वृत्ती जागी करून त्यांना त्यांची स्वप्नं पूर्ण करण्याचं बळ देता यावं, त्यांना समाजात सुरक्षित वाटावं, यासाठी आजूबाजूला तसं पोषक वातावरण हवं. यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे मुलग्यांना ‘पुरुषत्व’ ही संकल्पना नव्यानं उलगडून सांगायला हवी. मुलामुलींच्या मनात लिंगभाव समानता रुजवणं किती आवश्यक आहे, हे अक्षत सिंघल या तरुणानं ओळखलं. त्यांनी आपल्या परीनं त्यासाठी काही साधेच, पण परिणामकारक उपक्रम सुरू के ले आणि त्याची सकारात्मक फळंही दिसू लागली. त्यांच्या या आगळ्या ‘प्रयोगशाळे’ची ही गोष्ट..   

जन्मल्यापासून काही जणांना फायदे, विशेषाधिकार प्राप्त होतात. ज्यांना ते प्राप्त होतात त्यांना त्याची जाणीव, त्याचं भान लगेच येत नाही. काहींना आपल्याला इतरांपेक्षा ‘प्रिव्हिलेजेस’ म्हणजे विशेषाधिकार आहेत हे मान्यच नसतं. पुरुष म्हणून मिळणारे फायदे मुलग्यांना मिळतातच, पण ‘जेन्डर’ अर्थात लिंगभावानं मिळणाऱ्या ओळखी- व्यतिरिक्त इतर असलेल्या ओळखीही काही पुरुषांना अतिरिक्त फायदे देत असतात, जसं की तथाकथित उच्च जातीत वा उच्च वर्गात जन्मल्यामुळे मिळणारे फायदे, आपलं झालेलं शिक्षण, वय, प्रांत, यांमुळे मिळणारे तुलनात्मक फायदे इत्यादी.

वाढत्या वयात मुंबईत राहाणाऱ्या अक्षत सिंघलला आपण उत्तर प्रदेशातील उच्च जातीतील, बनिया अर्थात व्यापारी समुदायातील, सधन परिवारात जन्मलेले, इंग्रजी शाळेत शिकणारे, पुरुष आहोत याची जाणीव झाली. आपल्या सहा थोरल्या बहिणी आणि आईच्या समाजमान्य नसलेल्या, घरातील अवेतनीय श्रमावर आपलं जगणं आणि करिअर उभारलं जात असल्याचं भान अक्षतला हळूहळू येऊ लागलं. मुलगा म्हणून जन्मलो म्हणून आपल्या होणाऱ्या विशेष कौतुकाची जाणीव होण्याबरोबरच आपल्याकडे एक ‘इन्व्हेस्टमेंट’ अर्थात गुंतवणूक म्हणून पाहिलं जातंय याची आणि काही अनुस्यूत अपेक्षांची समजदेखील त्याला आली. मोठं होऊन कमावता, रक्षणकर्ता, वडिलांचा वारसा पुढे नेणारा, या भूमिका आपल्याला वठवायच्या आहेत, याची आपली तयारी केली जाते, हे त्याला कळू लागलं. ‘‘प्रत्यक्षात मात्र सतत नियंत्रणात असलेल्या माझ्या बहिणीच रक्षणकर्त्यांची भूमिका बजावत होत्या,’’ असं अक्षत स्वत:चा प्रवास कथित करताना नमूद करतो.

मुंबईतील पाटकर महाविद्यालयात ‘मॅनेजमेन्ट स्टडीज्’ मध्ये पदवी घेतल्यानंतर अक्षतनं वडिलांचा उद्योग आणि इतर लहानसहान कंपन्यांमध्ये तीन वर्ष काम करण्याचा प्रयत्न केला. पण ‘बिझनेस-कॉर्पोरेट’ जगामध्ये त्याचं मन लागेना. याचदरम्यान आशुतोष गोवारीकर यांचा ‘स्वदेस’ चित्रपट पाहून तो प्रभावित झाला. समाजकार्यच करण्याचा आपला कल असल्याचं लक्षात आल्यावर त्यानं आपला शालेय जीवनातील मित्र अभिषेक ठाकूरबरोबर ‘ब्लू रिबन मूव्हमेंट’ (अर्थात बीआरएम) ही सामाजिक संस्था २०१० मध्ये स्थापन केली. युवकांमध्ये सामाजिक प्रश्नांविषयी जाणीव-जागृती निर्माण करण्यासाठी आणि तरुणांमधील नेतृत्वगुण वाढवण्याकरिता ही संस्था काम करू लागली. ‘अनलिमिटेड इंडिया’ या संस्थेनं अक्षतला तीन वर्ष आर्थिक आणि ‘मेन्टॉरिंग’चं सहाय्य देऊन कार्यरत होण्यासाठी तयार केलं. अशांक देसाई यांनी त्यांच्या दिवंगत मुलीच्या स्मृतिप्रीत्यर्थ अक्षतच्या संस्थेला २०११ मध्ये ‘अवंती युवती नेतृत्व कार्यक्रम’ सुरू करण्यास आर्थिक मदत केली. या उपक्रमांतर्गत १३ आणि १४ वर्ष वयोगटातील शालेय मुलींबरोबर काम करण्यासाठी १० महिन्यांची फेलोशिप द्यायला सुरुवात झाली. २०-२५ वयाच्या युवतींना ही फेलोशिप गेली १० वर्ष दिली जात आहे. या दशकात मुंबई, दिल्ली आणि हरियाणातील २९ फेलोंद्वारा मार्च २०२० पर्यंत सुमारे ३०,००० शालेय विद्यार्थिनींना स्व-जाणीव, नेतृत्व, लिंगभाव समानता, भगिनीभाव  या सर्व मुद्दय़ांवर सक्षम केलं आहे.

सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात तरुण बदलकर्त्यांचा मंच म्हणून ‘ग्लोबल शेपर्स’ हा समुदाय स्थापन झाला, त्यात अक्षतची निवड झाली. त्याला जगातील ५० ग्लोबल शेपर्समध्ये गणलं जाऊन ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ या अर्थविषयक संस्थेच्या चार दिवसीय वार्षिक बैठकीसाठी दावोस, स्वित्र्झलड येथे निमंत्रित केलं गेलं. यात सहभागी झाल्यानं अक्षतला अर्थ, उद्योग, राजकीय आणि नागरी समाज या जगतातील महत्त्वाच्या नेत्यांचे विचार ऐकून नेतृत्व, लोकशाही आणि समाज याविषयी नवे दृष्टिकोन जाणून घेण्याची संधी मिळाली. ग्लोबल शेपर्स समुदायाच्या मुंबई विभागामार्फत होणाऱ्या उपक्रमांशी अक्षत अजूनही जोडलेला आहे.

अवंती युवती नेतृत्व उपक्रम आणि फेलोशिप हे उपक्रम ‘बीआरएम’च्या ‘दि जेन्डर लॅब’अंतर्गत कार्यरत होत असताना मुलींइतकंच काम किशोरवयीन  मुलग्यांबरोबर होणं जरुरीचं आहे हे अक्षतला वेगवेगळ्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थिनी यांच्याशी बोलल्यानंतर  लक्षात आलं. त्यातूनच त्यानं ‘दि जेन्डर लॅब बॉईज प्रोग्राम’ २०१७ मध्ये सुरू केला. निम्न-मध्यम वर्गातील मुलांच्या खासगी आणि सरकारी शाळांमध्ये हा उपक्रम १३-१४ वर्षांच्या मुलग्यांना घेऊन राबवला जात आहे. २० तासांच्या या उपक्रमात प्रशिक्षित आणि अनुभवी व्यक्ती  सात संवादी सत्रं घेतात. यामध्ये राष्ट्र उभारणी, शरीर, श्रम, परंपरा व आधुनिकता आणि हिंसाचार या मुद्यांवर खुलेपणाने चर्चा घडवून लिंगभाव, लैंगिकता आणि पुरुषत्व या विषयांची समज मुलांमध्ये निर्माण केली  जाते.

कार्यशाळा घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वेच्छेनं निवडलेल्या एका प्रकल्पामध्ये गटात काम करून आपले अनुभव, निरीक्षणं ‘शेअर’ करायला सांगितलं जातं. खेळांमध्ये आढळणारी असमानता, घरकाम, स्त्री-सुरक्षा, सायबर छळ, नातेसंबंधांतील सहमती आणि नकार, लिंगाधारित भेदभाव, विद्यार्थ्यांना के ली जाणारी  शिक्षा अशा अनेक विषयांवर मुलांनी प्रकल्प घेतल्याचं अक्षत सांगतो. या प्रकल्पांमार्फत मुलगे व्यावहारिक गोष्टी शिकतात. उदा. एखाद्या पोलीस स्टेशनला भेट देऊन तिथलं कामकाज आणि स्त्रियांविषयीचे कायदे समजून घेणं, पुरुषत्व याविषयी घरातील वा अवतीभवतीच्या पुरुषमंडळींबाबत केलेली निरीक्षणं प्रस्तुत करून त्यावर मत मांडणं अशा गोष्टींचा यात समावेश होतो. किशोरवयीन मुलग्यांबरोबरच्या आपल्या कामाच्या मूल्यांकनाविषयी अक्षत सांगतो, की ‘दि जेन्डर लॅब बॉईज’ उपक्रमात आतापर्यंत ३ वर्षांत मुंबई, दिल्ली, इंदोर व हरियाणा येथील जिंद जिल्ह्य़ातील २ गावांमधील एकूण ६३ शाळांतील सुमारे ५,००० मुलग्यांनी सहभाग घेतला. पुरुषपणाच्या कल्पना या एकसाची, चिरेबंदी नसून त्यामध्ये लवचीकता असते, असं त्यांना समजल्यानंतर पुरुषत्वाची पुनव्र्याख्या स्वत:च्या उदाहरणांनी कशी करता येते याचं  आकलन त्यांना झाल्याचे दाखले अक्षत देतो. शिवीगाळ बंद करून, समोर कोणी मुलीची छेड काढत असल्यास हस्तक्षेप करून पुरुषत्व नव्यानं मांडता येऊ शकतं, हेही मुलं शिकतात. काही महत्त्वाच्या मुद्यांवर या मुलांच्या दृष्टिकोनात बदल झाल्याचं दिसून येतं. घराची निगा राखणं, स्वयंपाक करणं ही स्त्रियांची महत्त्वाची भूमिका असते, मुलींनी घराबाहेर रात्री उशिरा जाऊ नये, कुटुंबासाठी कमावून आणणं ही मुख्यत: पुरुषांची जबाबदारी आहे, रडणं हे पुरुषांच्या कमकुवतपणाचं द्योतक आहे, कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी स्त्रीनं हिंसा सहन केली पाहिजे, या सर्व मुद्यांबाबत सकारात्मक, बदललेला दृष्टिकोन मुलग्यांमध्ये रुजल्याचं  २०१८-१९ च्या कामाचं मूल्यांकन केल्यावर आढळलं, असं अक्षत सांगतो. ‘डिस्कव्हरी चॅनल’नं मागच्या वर्षी बनवलेल्या ‘मॅन, विमेन अँड मी टू’ या माहितीपटात ‘दि जेन्डर लॅब बॉईज’ उपक्रमाचं चित्रीकरण करण्यात आल्याचंही तो अभिमानानं सांगतो.

‘दि जेन्डर लॅब’तर्फे ‘आपण आपल्या मुलग्यांना कसं घडवतो’ याविषयी एक वार्षिक मेळावा आयोजित केला जातो. यंदाच्या शैक्षणिक वर्षांत टाळेबंदीमुळे हा मेळावा ‘वेबिनार सीरिज’द्वारे मे २०२० मध्ये ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आला. यात मुंबईतील शिक्षक,      संवाद-सत्र घेणारे मार्गदर्शक, पालक आणि मुलांबरोबर काम करणाऱ्या इतर संस्था, संघटनांच्या कार्यकर्त्यांना सहभागी करून वैचारिक व अनुभवांची देवाणघेवाण केली गेली. मुलामध्ये समानुभूती आणि भावनिक बुद्धय़ांक वाढीस लागण्याकरिता, तसंच घरकामाविषयी आदर, त्या संदर्भातील लिंगाधारित धारणा यांना प्रश्न करण्यास प्रोत्साहन कसं दिलं जावं याबद्दल रचनात्मक सूचना मांडल्या गेल्या. यामध्ये पालकांनी मुलग्यांशी बोलताना ‘आईला घरकामात मदत कर’ असं म्हणण्याऐवजी ‘घरकामाची अधिक जबाबदारी घे,’ असं बोललं पाहिजे. जीवनकौशल्याचा भाग म्हणून आठवडय़ातून किंवा महिन्यातून एकदा घरकामातील एक नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं सुचवण्यात आलं. देशातील अधिकाधिक शिक्षकांपर्यंत पोहोचण्याकरिता या वेबिनार सीरिजचं रेकॉर्डिग ‘दि जेन्डर लॅब’च्या यूटय़ूब वाहिनीवर मराठी, मल्याळम, कन्नड, गुजराथी, भोजपुरी व बांगला भाषेत उपलब्ध  करण्यात आलं आहे.

मागच्या आणि यंदाच्या वर्षी ‘करोना’च्या प्रादुर्भावामुळे शाळांमध्ये प्रत्यक्ष सत्रं फारशी घेता आली नाहीत. या पार्श्वभूमीवर अक्षतच्या चमूनं किशोरवयीन मुलींबरोबर केलेल्या ‘मैं  बोलूंगी’ पॉडकास्टचं सादरीकरण हरियाणातील  गावांमध्ये भरणाऱ्या ‘चौपाल’च्या ठिकाणी करून चर्चा घडवली गेली.

‘दि जेन्डर लॅब’मध्ये मागील आठ वर्षांपासून साथीदार, प्रवर्तक असलेल्या आयुषी बॅनर्जीशी नुकतंच, डिसेंबर २०२० मध्ये अक्षतचं नोंदणी पद्धतीनं लग्न झालं. एकूण ११ सहकाऱ्यांना सोबत घेऊन ३८ वर्षीय अक्षतचं वैशिष्टय़पूर्ण काम जोमानं चालू आहे.

‘दि जेन्डर लॅब’ या नावातील ‘लॅब’ शब्द म्हणजे प्रयोगशाळा. ‘जेन्डर’च्या प्रश्नांतील अनेक आयामांना तपासून सतत प्रश्न करणं, अनेक संबंधित लोकांशी बोलून या संदर्भात आपल्या जाणिवा एकत्रितपणे  विकसित करणं आणि नवनवा दृष्टिक्षेप घेत वाटचाल करण्याची संस्कृती रुजवण्याचा या लॅबचा मनोदय अक्षत बोलताना विशद करतो.

अक्षतप्रमाणे आपल्यापैकी प्रत्येक जण बदलासाठी छोटे छोटे प्रयोग दैनंदिन आयुष्यात करू शकतो. अक्षतच्या उपक्रमाची मूळ संकल्पना म्हणूनच वेगळी आणि विशेष उल्लेखनीय ठरते.

saharsh267@gmail.com