12 July 2020

News Flash

अपयशाला भिडताना : युरेका

रविवारी दुपारी साधारण अडीचच्या दरम्यान, मस्त भरपेट जेवण करून तो लोळत पडला होता

(संग्रहित छायाचित्र)

योगेश शेजवलकर

yogeshshejwalkar@gmail.com

‘‘त्या क्षणी माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि मी स्वत:लाच म्हणालो, ‘युरेका’! त्या क्षणापर्यंत सगळा वेळ मी फक्त आणि फक्त माझ्याकडच्या कोणत्या गोष्टी मी गमावल्या याची यादी करण्यात घालवला होता. पण त्या भानगडीत, इतकी उलथापालथ झाल्यावरही माझ्याकडे काय शिल्लक आहे, हे नीट तपासून बघायचं मला भानच राहिलं नव्हतं. मग ते शोधायला मी सुरुवात केली.’’ असं म्हणत काकाने पुढची खेळी केली..

रविवारी दुपारी साधारण अडीचच्या दरम्यान, मस्त भरपेट जेवण करून तो लोळत पडला होता. रविवारचा संथपणा, कॉलेजचा झालेला अभ्यास आणि डोक्यावर फिरणाऱ्या फॅनच्या थंडगार हवेमुळे ‘आता एक झकास पडी टाकावी,’ असा विचार त्याने केला. मग फोन ‘सायलेंट’ करण्यासाठी त्यानं हातात घेतला, तेवढय़ात फोनवर त्याच्या काकाचा मेसेज आला, ‘तीन वाजता बुद्धिबळ?’

जवळजवळ एका वर्षांने काकानं त्याला असा मेसेज केला होता. खरं तर गेली अनेक वर्ष दर रविवारी दुपारी दोन-तीन तास बुद्धिबळ खेळणं हा त्यांचा ठरलेला उद्योग होता. पण गेले वर्षभर त्यांचा खेळ पूर्ण बंद होता. अर्थात कारणही तसंच होतं. चांगली नोकरी सोडून स्वतची सॉफ्टवेअर कंपनी सुरू करणाऱ्या काकाची आर्थिक गणितं इतकी बिघडली होती की त्याच्या राहत्या घरावरही बँकेनं जप्ती आणली होती.

समारंभ, फॅमिली गेट-टुगेदर या अशा सगळ्यातून काका कधीच हद्दपार झाला होता. पण त्याची कमतरता जाणवणार नाही याची काळजी बहुतेक नातेवाईक त्याला ‘गॉसिप’ केंद्रस्थानी ठेवून घेत होते. उत्तम पगाराची नोकरी सोडून स्वतची सॉफ्टवेअर कंपनी सुरू करणारा काका हा खरं तर गेली अनेक वर्ष कर्तबगारीचं प्रतीक म्हणून बघितला जायचा. पण जप्तीची बातमी समजल्यावर कर्तृत्व आणि काका हे जणू काही विरुद्धार्थी शब्द असावेत, अशी वागणूक त्याला दिली जात होती.

काकाच्या कर्जाचे आकडे समोर आल्यावर तर त्याला टाळण्यासाठी लोक प्रयत्नांची पराकाष्ठा करायले लागले. ‘न जाणो, कर्ज फेडण्यासाठी त्यानं आपल्याकडेच पैसे मागितले तर काय घ्या?’ ही स्वाभाविक भीती अनेकांना सतावत होती. वास्तविक काकांनी कोणाकडेही असे पैसे मागितल्याचा एकही प्रसंग समोर आला नव्हता. ‘पण वेळ काय सांगून येते?’ या विचाराने लोक जरा जास्तच काळजी घेत होते. त्याची आणि काकाची लहानपणापासूनच ‘सॉलिड फ्रेंडशिप’ होती. त्यामुळे काकाबद्दल उलटसुलट बातम्या यायला लागल्यानंतरही त्यानं अनेक रविवार बुद्धिबळ खेळण्यासाठी मेसेजेस पाठवले होते. खेळल्यामुळे काकाला जरा ब्रेक मिळेल हा त्यामागचा एक हेतू होताच, पण त्याचबरोबर घडणाऱ्या गोष्टींचा कोणताही परिणाम आपल्या फ्रेंडशिपवर झालेला नाही हा मुख्य संदेशही त्याला काकाला द्यायचा होता. पण त्याच्या मेसेजवर काकांचं कधीच उत्तर आलं नाही, त्यामुळे काकाचा आजचा मेसेज त्याच्यासाठी अगदीच अनपेक्षित होता. त्यानं तातडीनं काकाला रिप्लाय केला, ‘‘चालेल. डायरेक्ट आपल्या स्पॉटवर भेटू या?’’ त्यावर काकाचं उत्तर आलं, ‘‘दोन पन्नासला नेहमीसारखा माझ्या बिल्डिंगपाशी ये. तिथून स्पॉटवर जाऊ.’’

बुद्धिबळ खेळण्याचा त्यांचा स्पॉट म्हणजे काकाच्या घराजवळची बाग. रविवारी दुपारी ही बाग उघडी असायची.. पण गर्दी तुरळक असायची. बागेच्या कम्पाऊंडला चिकटून असलेल्या एका मोठय़ा बाकडय़ावर बुद्धिबळाचा पट मांडला जायचा आणि मग या पटावर पुढचे दोन-तीन तास या दोघांच्या बुद्धिमत्तेची धुमश्चक्री रंगायची. या धुमश्चक्रीला चविष्ट करण्यासाठी बागेबाहेरच्या चहावाल्याकडून मसाला चहाचा निरंतर पुरवठाही होत राहायचा. बरोबर ठरलेल्या वेळी तो बाइकवरून काकाच्या बिल्डिंगसमोर आला. बिल्डिंगच्या दरवाजासमोरच असलेली दोन पार्किंग्ज काकाची होती. सहा महिन्यांपूर्वी काकाला त्याच्या दोन्ही गाडय़ाही विकाव्या लागल्या होत्या हे त्याला माहिती होतं. त्यामुळे रिकामी पार्किंग्ज पाहून त्याच्या पोटात कालवाकालव झाली. तो आपल्याच विचारात असताना त्याच्या पाठीवर थाप पडली आणि बाइकवर मागे बसत काका म्हणाला, ‘‘अरे, सध्या आम्ही याच बिल्डिंगमध्ये दुसऱ्या एका फ्लॅटमध्ये भाडय़ाने राहतो. तेव्हा म्हटलं आजही नेहमीसारखं इथूनच बरोबर जाऊ.’’

मग पुढच्या दहा मिनिटांत ते आपल्या नेहमीच्या जागेपाशी पोहोचले, बुद्धिबळाचा पट मांडला गेला आणि त्यांचा पहिला डाव लगेच सुरूही झाला. डाव चालू असताना गप्पा मारायच्या नाहीत, असा त्यांचा अलिखित नियम होता. पण आज मात्र त्याला राहवेना. शिवाय काका नेहमी ज्या पद्धतीने चाली खेळायचा, त्यापेक्षा काही तरी वेगळंच आज खेळत होता. एकुणातच कोणत्याच गोष्टींची टोटल त्याला लागत नव्हती.

काही मिनिटं शांततेत गेल्यानंतर तो काकाला म्हणाला, ‘‘आज एकदम अचानक मेसेज केलास?’’

‘‘अरे आता जरा गोष्टी कंट्रोलमध्ये आल्या आहेत. तेव्हा विचार केला की आपला खेळ पुन्हा सुरू करावा म्हणून मग लगेच मेसेजही केला.’’ ते ऐकून मोठय़ा उत्साहानं तो काकाला म्हणाला, ‘‘कंट्रोलमध्ये आल्या म्हणजे ते कर्जाचं होत आलं सगळं सेटल? मग घराचा ताबा कधी मिळणार?’’

पुढच्याच क्षणी आपण काकाला फार थेट प्रश्न विचारला याची त्याला जाणीव झाली. पण त्यावर हसून काका म्हणाला, ‘‘अरे कर्जाचं सेटल होऊन घर हातात मिळायला एक वर्ष तर नक्कीच आहे. खड्डा बराच मोठा आहे, शिवाय त्यात दोन-तीन लीगल कॉम्प्लिकेशन्सही आहेत. पण बघू, बँकेनेही मुदत दिली आहे. मात्र सर्वात चांगली गोष्ट ही आहे की, माझ्या प्रॉडक्टचं काम पुन्हा सुरू झालं आहे. माझ्या टीममधले तीन जण सध्या आपापल्या घरूनच आम्ही बनवत असलेल्या प्रॉडक्टवर काम करत आहेत. शिवाय पुढच्या सहा महिन्यांचे घरातले खर्च भागवण्यासाठी माझी पशांची सोय झालेली आहे.’’ त्याला अपेक्षित असलेली कोणतीही भव्यदिव्य गोष्ट काकाच्या बाबतीत घडलेली नसतानाही काका निवांतपणे हे सगळं सांगत होता. काकाचा तो निवांतपणा त्याला खटकत होता आणि अस्वस्थही करत होता.

तेव्हा काहीसं वैतागून तो म्हणाला, ‘‘अरे मग कंट्रोलमध्ये नक्की काय आलं आहे?’’ तेव्हा शांतपणे पुढची चाल खेळत काका म्हणाला, ‘‘कंट्रोलमध्ये मी आलोय.’’ काकाचं उत्तर आणि पटावरची ती चाल त्याच्यासाठी अत्यंत अनपेक्षित होती. ‘‘म्हणजे?’’ काहीही न समजून त्यानं विचारलं. तेवढय़ात टपरीवरचा पोरगा वाफाळलेल्या चहाचे दोन कप देऊन गेला. चहाचा घोट घेत काका म्हणाला, ‘‘गोष्टी इतक्या वेगानं घडत गेल्या की नक्की त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हेच मला समजेना. माझ्या कंपनीबद्दल तुला माहिती आहेच. सुरुवातीला आम्ही बाहेरचं प्रोजेक्ट घेतलं आणि मग गोष्टी मार्गी लागल्यानंतर स्वत:चं प्रॉडक्ट बनवायला सुरुवात केली. विषय खर्चीक होता, पण यशस्वी झाल्यावर ते प्रॉडक्ट जगभरात विकलं जाण्याची शक्यता होती. अशा सगळ्या शक्यतांचा विचार करून मी गणितं मांडली.. कर्ज घेऊन कामाला सुरुवात केली. पण गणिताच्या पेपरात खोऱ्याने मार्क मिळवणं वेगळं आणि व्यवहारातली गणित जुळवणं वेगळं.. हे लक्षात यायला लागलं. काही अनपेक्षित खर्च करावे लागले.. काही गोष्टी लाल फितीच्या कारभारात परवानगीसाठी अडकल्या.. तर काही गोष्टी आम्ही माती खाल्ल्यामुळे पुन्हा नव्यानं कराव्या लागल्या.’’

‘‘बापरे मग?’’ तो नकळतपणे म्हणाला. ‘‘मग सगळीच गणितं चुकायला लागली. लोकांचे पगार वेळेवर करण्यासाठी मी खिशातून पैसे टाकले. दोन-तीन नवीन प्रोजेक्ट हमखास मला मिळणार होते, त्याच्या जिवावर तर मी कर्ज काढलं होतं. तेही काही तरी होऊन शेवटच्या क्षणी मिळाले नाहीत. या सगळ्यात बँकेच्या हप्त्यांचं गणित पार बिघडलं आणि बँकेकडून जप्तीची नोटीस आली.’’

ते ऐकून काहीही न बोलता त्यानं आपली पुढची खेळी केली. मग काकाच म्हणाला, ‘‘सायन्सइतकंच कॉमर्सही का महत्त्वाचं असतं हा साक्षात्कार बँकांच्या फेऱ्या मारताना मला झाला. पण सगळ्यात हिट गोष्ट म्हणजे ‘माझ्या सगळ्या मित्रांसारखं मीही परदेशात गेलो असतो तर ते सर्वात फायद्याचं ठरलं असतं.’ हे माझ्या बिल्डिंगच्या सिक्युरिटी गार्डनंही मला एकदा ऐकवलं.. आता बोल.’’ काका काहीसं हसून म्हणाला.

‘‘हं’’ असं अस्पष्टपणे म्हणत त्याने पुढची खेळी केली. पण काका म्हणाला, ‘‘रोज बँकेच्या फेऱ्या मारून मला जवळजवळ वेड लागायचं बाकी होतं. काही तरी विषयांतर व्हावं म्हणून मी का कोण जाणे? पण बँकेच्याच चार बिल्डिंगपलीकडे मोठय़ा आत्याच्या घरी जायचं ठरवलं. आत्या आता पंचाऐंशी वर्षांची आहे आणि बहुतेक वेळा व्हीलचेअरवरच असते. तेव्हा मी घरी येणार म्हटल्यावर ती बाहेर जाईल ही तरी शक्यता नव्हती. त्या दिवशी सकाळी मी तिला ‘दुपारी चक्कर मारून जाईन,’ असा फोन केला. जेव्हा दुपारी तिच्या घरी गेलो तर मला आश्चर्याचा धक्काच बसला.. तशाही अवस्थेत तिनं तिला सांभाळणाऱ्या बाईच्या मदतीनं माझ्या आवडीच्या खोबऱ्याच्या वडय़ा करून ठेवल्या होत्या. का? कशासाठी? असे अनेक प्रश्न मी तिला विचारणार, तेवढय़ात वडय़ांची बशी समोर धरत ती म्हणाली, ‘‘तुला काय हवं-नको ते मला लहानपणापासून तू न सांगता समजतं. तेव्हा काहीही झालं तरी मी आहे, हे लक्षात ठेव. समजलं?’’

हे बोलून काका थांबला आणि क्षणभर विचार करून म्हणाला, ‘‘त्या क्षणी माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि मी स्वत:लाच म्हणालो, ‘युरेका’. त्या क्षणापर्यंत सगळा वेळ मी फक्त आणि फक्त माझ्याकडच्या कोणत्या गोष्टी मी गमावल्या याची यादी करण्यात घालवला होता. पण त्या भानगडीत, इतकी उलथापालथ झाल्यावरही माझ्याकडे काय शिल्लक आहे, हे नीट तपासून बघायचं मला भानच राहिलं नव्हतं. मग ते शोधायला मी सुरुवात केली.’’ असं म्हणत काकाने पुढची खेळी केली.

‘‘मग?’’ त्याच्या प्रश्नात उत्सुकता होती. त्यावर काका म्हणाला, ‘‘माझ्या बदललेल्या दृष्टिकोनामुळे अचानक अडकून बसलेल्या काही गोष्टी सुटल्या. मी माझ्या बंद पडलेल्या कंपनीतल्या लोकांना भेटलो. त्यात तीन जण असे निघाले की ज्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं की, त्यांचा प्रॉडक्टवर आणि ते यशस्वी होईल यावर कमालीचा विश्वास आहे. शिवाय दुसरी नोकरी शोधण्याची त्यांना इतक्यात घाई नसल्यामुळे पुढचं एक वर्ष तरी ते विनामोबदला घरून काम करू शकतील. प्रॉडक्टचं काही घडलं तर त्यांना त्यांचे पैसे मी द्यायचे या बोलीवर बंद पडलेल्या त्या प्रॉडक्टचं काम पुन्हा सुरू झालं. बँकेच्या विषयात मदत करण्यासाठी माझ्या शाळेतला एक जुना वकील मित्र पुढे आला. हे सगळं बायकोला सांगितल्यावर तीही म्हणाली की, ‘‘इतकी गुंतवणूक केलेलं प्रॉडक्ट अर्धवट राहणं म्हणजे आयुष्यभराची चुटपुट लागून राहण्यासारखं आहे. तेव्हा शक्य तेवढा वेळ देऊन प्रॉडक्ट पूर्ण कर. नंतर प्रॉडक्ट विकलं जरी गेलं नाही तरी ते प्रॉडक्ट बनवण्याचा अनुभव तरी पूर्ण होईल.’’

हे सगळं ऐकल्यावर काकाच्या कंट्रोलमध्ये खरंच काही गोष्टी यायला लागल्या आहेत हे त्याला जाणवलं आणि त्याला जरा बरंही वाटलं. त्यानंतर काकाने त्याला हेही सांगितलं की, सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी डोळ्यासमोर एक निश्चित टाइमलाइन ठरवलेली आहे. तेव्हा त्यानुसार प्रॉडक्ट पूर्ण करणार आणि मग पुढच्या गोष्टी ठरवणार. शेवटी बोलता बोलता काका त्याला म्हणाला, ‘‘अपयशाच्या पुढे जाऊन माझ्यापाशी नेमकं काय शिल्लक राहिलं आहे, हे डोळसपणाने बघणं हे या सगळ्यात निर्णायक ठरलं. कारण तेव्हा मला जाणवलं की माझ्याकडे बऱ्याच गोष्टी अजून शिल्लक होत्या.’’ असं म्हणत काकांनी पुढची खेळी केली आणि तो म्हणाला, ‘‘चेक अ‍ॅण्ड मेट’’.

तो थक्क होऊन बघत राहिला. कारण काकाचं बोलणं ऐकत असतानाही त्याचं पूर्ण लक्ष खेळावर होतं. आज आपला डाव इतक्या लवकर संपेल यावर त्याचा विश्वासच बसेना. पराभवाची खातरजमा करून झाल्यावर तो काकाला म्हणाला, ‘‘नेहमीपेक्षा तू आज काही तरी वेगळंच खेळलास.’’ त्यावर काका म्हणाला, ‘‘मी कॉलेजमध्ये जेव्हा स्पर्धात खेळायचो, तेव्हा शेवटच्या तीन अवघड राऊंडमध्ये समोर कोण आहे याचा विचार करण्यापेक्षा मी काय करू शकतो, याकडे जास्त लक्ष ठेवायचो. बहुतेक त्यामुळेच अनेक नामांकित खेळाडूंना मी जोरदार टक्कर देऊ शकलो. त्या दृष्टिकोनातूनच खेळणं हेच माझ्यासाठी सर्वात जास्त चांगलं आहे हे मी नंतर विसरलो. पण आता ते माझ्या लक्षात आलं आहे, तेव्हा तूही तयारीत राहा. यापुढचे डाव आता नक्कीच सोपे असणार नाहीत,’’ असं म्हणत काका दिलखुलासपणे हसला आणि पुढचा डाव मांडायला त्यांनी सुरुवात केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2020 1:08 am

Web Title: yureka apyashala bhidtana chaturang yogesh shejwalkar abn 97
Next Stories
1 निरामय घरटं : निवांत रमणं
2 खंबीरता महत्त्वाची
3 व्वाऽऽ हेल्पलाइन : इतिहासाला जेव्हा जाग येते
Just Now!
X