डॉ. नितीन पाटणकर

अल्झायमर वा विस्मरण झालेल्या रुग्णांच्या रक्तात झिंकचे प्रमाण खूप कमी असते. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी झिंकचा उपयोग होतो. झिंक कमी असल्यास इन्सुलिन तयार होणे, साठवणे आणि पाझरणे या सर्व क्रिया कमी होतात. तसेच मधुमेह झालेल्या व्यक्तीत हृदयरोग, रक्तदाब हे तीव्र स्वरूपात आणि लवकर प्रताप दाखवतात. तर थकवा, मरगळ हे कॉपरच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. कॉपरचे आणि झिंकचे स्रोत सारखेच असले तरी भारतीयांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे, पालेभाज्या आणि मसाल्याचे पदार्थ यांतून कॉपरची गरज भागू शकते.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
What is Microsoft warning to India about China regarding AI
‘एआय’च्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गोंधळ उडवणे शक्य? चीनबाबत मायक्रोसॉफ्टचा भारताला कोणता इशारा?
Mahanirmiti Koradi Bharti 2024
Nagpur Jobs : महानिर्मिती कोराडी येथे १९६ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा

ओम् या नादातून विश्वनिर्मिती झाली, असा एक सिद्धांत आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या निर्मितीत ‘ओम्’चा महत्त्वाचा सहभाग आहे, मात्र आरोग्याच्या विश्वातले ओम् वेगळे आहेत. पहिला ओम हा ‘जीनोम’ म्हणजे आपल्या जीन्सचा समुच्चय. दुसरा ओम हा ‘प्रोटिओम’ म्हणजे या जीनोमच्या आज्ञावली वापरून बनलेली विविध प्रथिने (प्रोटिन्स). तिसरा ओम म्हणजे ‘मेटॅबोलोम’. यात विविध प्रकारचे पदार्थ ज्यांची जुळणी (अ‍ॅनाबोलिजम) आणि मोडणी (कॅटॅबोलिजम) यातून जीवनाचे चक्र चालते. अलीकडच्या काळात आणखी एक ‘ओम’ समोर आला आहे त्याचे नाव आहे ‘मेटॅलोम.’ विविध मेटल्स म्हणजे धातू हे अत्यल्प पण अत्यावश्यक असतात. जीनोम, प्रोटिओम आणि मेटॅबोलोम यांच्या कार्यासाठी मुख्यत: उत्प्रेरक (कॅटॅलिस्ट) (स्वत: न बदलता रासायनिक प्रक्रिया जलद गतीने घडवून आणणारा पदार्थ) म्हणून धातूंची भूमिका खूप महत्त्वाची आहे.

याच मेटॅलोमपैकी झिंक आणि कॉपर अर्थातच जस्त आणि तांबा या दोन धातूंबद्दल आपण माहिती घेणार आहोत. खरे तर लोह (आयर्न) ही यांच्यासोबत हवा, पण लोहाबद्दल लोकांना इतकी माहिती असते की मी त्यात काय भर घालणार हाच विचार मनात येतो. झिंक आणि कॉपर यांचा विचार केला तर झिंकचे प्रमाण हे ‘बहुसंख्याक’ म्हणता येईल तर कॉपरला ‘अल्पसंख्याक’ म्हणता येईल. झिंकचे शरीरातील प्रमाण हे २००० ते ३००० मिलिग्रॅम इतके असते तर कॉपर ९० ते १३० मिलिग्रॅम इतके असते.

झिंक आणि काही आजार यांचा संबंध –

– अल्झायमर झालेल्या रुग्णांच्या रक्तात झिंकचे प्रमाण खूप कमी असते. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी झिंकचा उपयोग होतो. आजकाल ‘फॅटी लिव्हर’चे प्रमाण खूप वाढले आहे. झिंक डेफिशिअन्सीमुळे ‘फॅटी लिव्हर’ होऊ शकते आणि त्यातून पुढे अधिकच झिंकची कमतरता वाढते. यातूनच पुढे ‘लिव्हर सिरॉसिस’ होऊ शकतो. गरोदरपणात झिंकची अल्प कमतरता झाली तर आईला अन्नाची चव लागत नाही किंवा विचित्र चव लागते. नऊ महिने उलटून गेले तरी प्रसूतीला उशीर होत राहतो. प्रसूतीच्या वेळेस गर्भाशय पूर्ण जोराने आकुंचन पावत नाही आणि प्रसूतीनंतरही गर्भाशय पूर्ण आकुंचन न पावल्याने रक्तस्राव थांबत नाही. या सर्व गोष्टींमुळे नवजात बालकाला इजा होते. झिंक कमी असल्यास इन्सुलिन तयार होणे, साठवणे आणि पाझरणे या सर्व क्रिया कमी होतात. तसेच मधुमेह झालेल्या व्यक्तीत हृदयरोग, रक्तदाब हे तीव्र स्वरूपात आणि लवकर प्रताप दाखवतात. झिंक कमी असेल तर थायमस ग्लँडवर परिणाम होतो. लस देऊनही पुरेशी प्रतिकारशक्ती तयार होत नाही. वृद्ध व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती कमी होऊन संसर्गजन्य रोग बळावतात. वरचेवर जुलाबाचा त्रास होणे हे झिंक कमी पडल्याने होऊ शकते. अशा लोकांना बरेचदा (इरिटेबल बाऊल सिंड्रोम आयबीएस) असे लेबल चिकटते. झिंक आणि व्रण भरून येणे याचा निकटचा संबंध आहे. झिंक कमी पडल्यास व्रण भरून येत नाहीत. आम्लपित्तामुळे पोटात जखम होते पण झिंक कमी असेल तर ती जखम बरी न होता त्याचे अल्सरमध्ये रूपांतर होऊ शकते. झिंक आणि प्रजनन यांचा विशेष संबंध आहे. झिंकच्या कमतरतेमुळे वंध्यत्वाचा सामना करावा लागतो. खासकरून पुरुषांमध्ये.

मात्र हे वाचून घाबरून जायचे कारण नाही. आपल्या आहारातील अनेक गोष्टींतून पुरेशा प्रमाणात झिंक मिळते. सामिष अन्न (मांस, शेलफिश) हा झिंकचा सर्वात चांगला स्रोत आहे. मसूर हा झिंकचा उत्तम स्रोत आहे. मसुरामध्ये झिंकसोबत फायटेट्स नावाचे पदार्थ असतात. ते झिंक बांधून ठेवतात आणि त्याचे शोषण पुरेसे होत नाही. यासाठी मसुरांना मोड आणून, व्यवस्थित शिजवून, त्याची उसळ केली तर झिंक उत्तमरीत्या शोषले जाते. जाता-जाता सांगायला हरकत नाही की, मसूर हे आपल्याकडे सहज मिळणारे सुपरफूड आहे. तीळ, भोपळ्याच्या बिया, शेंगदाणे, काजू हे झिंकचे उत्तम स्रोत आहेत. डार्क चॉकलेट, बटाटा, रताळे, तांदूळ, गहू यांतूनही झिंक मिळते.

आता थोडं कॉपरबद्दल.

कॉपरची कमतरता कशी ओळखायची? थकवा, मरगळ हे कॉपरच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. लोह शोषले जाण्यासाठी कॉपरची आवश्यकता असते. त्यामुळे कॉपर कमी पडले तर लोहाची कमतरता वाढून रक्तक्षय होऊ शकतो. त्यामुळे थकवा येतो. तसेच प्रत्येक पेशीमध्ये ऊर्जा निर्माण करण्याच्या क्रियेत कॉपर महत्त्वाची भूमिका बजावतो. हेसुद्धा थकव्याचे एक कारण असू शकते. श्वेत रक्तपेशी तयार करण्यात कॉपरचा सहभाग असतो. कॉपर कमी पडले तर वरचेवर ताप येणे, सर्दी, खोकला, पोटाचे आजार होऊ शकतात. हाडांचा ठिसूळपणा म्हटला की आपल्याला कॅल्शियम आणि ड जीवनसत्त्व आठवतात. कॉपर कमी असेल तर पुरेसे ड जीवनसत्त्व मिळूनही हाडांचा ठिसूळपणा ‘ऑस्टिओपोरोसिस’ निर्माण होतो. कॉपर कमी असेल तर स्मृती टिकून राहण्यात अडचण येते. नवीन गोष्टी शिकण्यास वेळ लागतो. ‘स्मृती कमी झाली’ किंवा ‘हल्ली गोष्टी लक्षात राहत नाहीत’ ही अनेकांची तक्रार असते. अशी तक्रार असली तर बरेचदा ब १२ ची इंजेक्शने दिली जातात. कॉपरचा पुरवठा वाढवणे हाच योग्य उपाय आहे. (सांगितलेली कामे विसरली तर दरवेळेस ब १२ किंवा कॉपरची कमतरता असेल असे नाही. लक्ष नसणे, इतर कामात गुंतणे, मित्रमत्रिणींच्या गप्पात विसरणे, अशी कारणे अधिक लागू असतात. हे वाचून उगाच कोणी गैरफायदा घ्यायला नको म्हणून हे सांगितलेले बरे.) कॉपर कमी पडले तर नसांच्या आवरणावर परिणाम होतो. त्यामुळे मेंदूकडून संदेशवहन होण्यात अडचण येते. यातून चालताना लडखडणे, अवयवांमध्ये समन्वय नसणे, थरथरणे अशा गोष्टी होतात. दारू पिऊन माणूस लडखडत चालतो. दारू खूप काळापर्यंत पीत राहिलो तर इतर अनेक कमतरतांसोबत कॉपर कमी पडते. मग दारू सोडली तरी चालताना लडखडणे चालूच राहते आणि त्या माणसाने दारू सोडली यावर विश्वास बसणे कठीण जाते. दृष्टी कमजोर होणे, अकाली केस पांढरे होणे, त्वचा निस्तेज व फिकट होणे, थंडी सहन न होणे ही कॉपर कमी असण्याची आणखी काही लक्षणे आहेत.

कॉपरचे आणि झिंकचे स्रोत सारखेच असले तरी भारतीयांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे, पालेभाज्या आणि मसाल्याचे पदार्थ यातून कॉपरची गरज भागू शकते. आजकाल तांब्याच्या बाटलीमधून पाणी साठवण्याची आणि पिण्याची पद्धत आहे. यातून पाणी शुद्ध किंवा जंतूमुक्त होण्यास मदत होते, पण त्यामुळे कॉपर मिळते असे सिद्ध झालेले नाही.

झिंक आणि कॉपर साठवून ठेवण्याची सोय नाही. त्यांची रोजची गरज रोजच भागवावी लागते. अनेक मल्टिमिनरल सप्लिमेंटमध्ये झिंक आणि कॉपर असते. लहान मुलांना शक्यतो कॉपर असलेल्या सप्लिमेंट्स देऊं नयेत. झिंक, लोह आणि कॉपर यांचे वर्णन, ‘तुझं नि माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना.’ असे करता येईल. कोणा एकाला झुकते माप दिले तर तो इतर दोघांच्या शोषण आणि वापरावर परिणाम करू शकतो. कॉपर कमी पडले तर यकृतामधून लोहाचा साठा बाहेर काढून त्याचे हिमोग्लोबिन बनविले जात नाही आणि कॉपर आहारात जास्त गेले तर लोह शोषले जात नाही. गरज नसताना उगाच लोह जास्त घेतले तर ते कॉपर आणि झिंकचे शोषण कमी करते. झिंक जास्त गेले पोटात तर ते कॉपरचे शोषण कमी करते तसेच कॉपर आणि लोह वाहून नेणारी प्रथिने कमी करते.

हे वाचून कुणीही म्हणेल की, हे असले एकमेकांत एक अडकलेले प्रकरण असेल तर आम्ही नक्की खायचे काय आणि किती? त्यावर उत्तर एकच आहे. या सर्वाचे संतुलन निसर्ग उत्तम रीतीने राखतो. आपण विविध अन्नघटकांचा आहारात समावेश केला तर बाकी काम निसर्गावर सोडावे. उगाचच न्यूट्रिशन सप्लिमेंट्स घेणे हा प्रकार टाळायला हवा. आजकाल वजन कमी करण्यासाठी जी ‘बॅरिअ‍ॅट्रिक सर्जरी’ केली जाते त्यानंतर कॉपर, लोह, झिंक यांच्या शोषणाचे गणित पूर्ण बदलते. तसेच सूक्ष्म अन्नघटकांचे फायदे सांगून, ती अवाच्या सव्वा प्रमाणात ठासून भरलेली औषधे आणि न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स, भरमसाट किमतीला विकत घेऊन पोटात घेतल्याने आजकाल सूक्ष्म अन्नघटकांचे परस्परसंबंध आपण बिघडवतो आणि त्यातून दुखणे अक्षरश: विकत घेतो. ते टाळण्याचे कौशल्य आत्मसात करायला हवे.

आजकाल तांब्याच्या बाटलीमधून पाणी साठवण्याची आणि पिण्याची पद्धत आहे. यातून पाणी शुद्ध किंवा जंतुमुक्त होण्यास मदत होते, पण त्यामुळे कॉपर शरीरात जाते, असे सिद्ध झालेले नाही.

feedback@wisdomclinic.in

chaturang@expressindia.com