-चेतन जोशी

‘रिश्तों का इल्जाम ना दो’ या तत्त्वावरची आम्हा दोघांची मैत्री असल्यानं आम्ही एकमेकांसाठी असलो तरीही एकमेकांचे नव्हतो. आम्हा दोघांच्याही जोडीदाराच्या कल्पना वेगवेगळ्या होत्या त्यामुळे आमच्या नात्याला ठरावीक भविष्य नव्हतंच, तरीही ती परदेशी जायला निघाली तेव्हा हृदयात तीव्र कळ का आली? संभाव्य वराच्या यादीत माझं नाव नसल्याची खंत का वाटली? या प्रश्नाचं उत्तर आजही अनुत्तरितच आहे.

शर्मिलाची आणि माझी ओळख झाली तीच मुळी हिंदी सिनेमात चपखल बसेल अशा एका घटनेमुळे. एका मैदानात तीन जणांनी मला घेरलं होतं आणि मला दरडावून, घाबरवून माझ्या हातातून चेंडू काढून घेतला होता. मला तो परत हवा होता, पण मागायला धजावत नव्हतो. तेवढ्यात, कोपऱ्यात उभ्या असलेल्या एका मुलीनं त्या मुलांच्या म्होरक्याच्या हातातून चेंडू हिसकावून घेतला आणि त्याला जमिनीवर ढकलून दिलं. प्रसंगाने अचानक वेगळीच कलाटणी घेतलेली पाहून ती मुलं ताबडतोब पळून गेली. ही तिची पहिली भेट. तेव्हा माझं वय सहा आणि तिचं सात असावं.

हेही वाचा…पंचतारांकित पर्यटनाचा ‘प्रलय’

ती आमच्या घराजवळच राहात असल्यामुळे वरचेवर आमच्या भेटी होत राहिल्या. नंतर एकदा या प्रसंगाची तिला आठवण करून देताना मी तिला म्हणालो, ‘‘त्या दिवशी तू एखाद्या देवीसारखी मदतीला धावून आलीस म्हणून मला तुझी आरती करावीशी वाटली होती.’’ यावर ती हसत सुटली. थोड्या वेळानं मला म्हणाली, ‘‘तिला घरचे लाडानं आरतीच म्हणतात!’’ त्या दिवसापासून मीही तिला आरतीच म्हणू लागलो. तिनंही आक्षेप घेतला नाही. जसं वय वाढत जातं तसं आठवणीही आकार बदलत राहतात आणि त्यांचं महत्त्वही बदलत जातं हे जरी खरं असलं, तरी त्या दिवशी तिनं माझा जीव वाचवला ही भावना मात्र कधीच बदलली नाही.

आरती अभ्यासू आणि हुशारही होती. मी केवळ अभ्यासू. ती एक इयत्ता पुढे असल्यामुळं मला माझ्या शिक्षकांपेक्षा तिचंच मार्गदर्शन जास्त मिळत गेलं. कित्येकदा वाटलं की, तिच्या मदतीची परतफेड करावी, पण तशी संधीच मिळाली नाही. त्यात, तिच्या वयाच्या सक्षम मित्र-मैत्रिणींची तिला कधीच कमतरता भासली नाही. मी मात्र संधी शोधत राहिलो आणि एके दिवशी ती मला मिळाली. दहावीनंतर विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन अभियांत्रिकीचं शिक्षण घ्यावं, अशी तिची इच्छा होती. तसे उत्तम मार्क्ससुद्धा तिला मिळालेले होते. असं असतानाही तिच्या घरचे तिला ‘कॉमर्स’ घ्यायला भाग पाडत होते. कारण तिच्या वडिलांची ‘अकाउंटिंग’ची कंपनी होती. त्यात तिला अजिबात रस नव्हता, पण घरच्यांचं ऐकल्याशिवाय काही पर्यायही नव्हता. त्या दिवशी ती माझ्यासमोर पहिल्यांदा कोलमडली आणि ढसाढसा रडली होती. तिची अवस्था पाहून माझ्यात कुठली शक्ती संचारली कोण जाणे. मी तिच्या आई-वडिलांना जाऊन भेटलो. त्यांच्याशी तावातावाने काय बोललो ते आता आठवत नाही, पण त्यांनी तिला तिच्या आवडत्या क्षेत्रात शिक्षण घ्यायची परवानगी दिली. जो चेंडू तिने मला मिळवून दिला होता तो मी तब्बल दहा वर्षांनी तिच्याकडे परत दिला होता. आय.आय.टी.मधून उत्तम गुण मिळवून तिनं त्या संधीचं सोनं केलं. तिचं हे यश पाहून मला जास्त आनंद झाला की मैत्रीत समतोल साधू शकलो याचा, ते सांगता येणार नाही. पण मला एक वेगळंच समाधान वाटू लागलं, वेगळाच आत्मविश्वास जाणवू लागला. त्या काळात कोणी कोणाचे उपकार शब्दातून मानणं हे कृत्रिम वाटत असे. आभारप्रदर्शनाचं कार्ड द्यावं, अशी प्रथाही नव्हती. त्यामुळे कृतीचं उत्तर कृतीतूनच देता आलं यात मला धन्यता वाटली.

हेही वाचा…शिक्षणाचे ‘निपुण’ उद्दिष्ट!

माझं सॉफ्टवेअरमधलं शिक्षण रडत-कुंथत चालू होतं. तेव्हाच तिला एका परदेशी कंपनीमध्ये नोकरी मिळाली. ही घटना आनंददायी असूनही, आता आमची भेट होणार नाही, हा विचार मला छळू लागला. आमचं नातं मित्र-मैत्रिणीचंच होतं तरीही हृदयात इतकी तीव्र कळ का आली? ते मी सांगू शकत नाही. ती नेहमीसारखी भेटू शकणार नाही याचा त्रास वाटू लागला. आय.आय.टी.मध्ये असतानासुद्धा ती दूर होती, पण भारतातच असल्याचा दिलासा वाटला होता. आता मात्र आरती परदेशी चालली होती. तिथे किती काळ असणार हे अनिश्चित होतं. कायमची गेली तर? या विचाराने पोटात खड्डाच पडल्यासारखं झालं. एखाद्याची एवढी उणीव भासू शकते म्हणजे याला प्रेम म्हणावं का? तर नाही. याला ‘दृढ स्नेह’ मात्र नक्कीच म्हणता येईल.

प्रेमिकांमध्ये घडतात असे केवळ आम्हा दोघांतच घडलेले, मनाला मोहरून टाकणारे, इतर कोणालाही सांगता न येण्यासारखे भावनिक प्रसंग आमच्यात कधीच घडले नव्हते. मला ती आकर्षक व्यक्तिमत्त्वाची, रेखीव चेहऱ्या-मोहऱ्याची आणि लाघवी स्वभावाची वाटायची. तेव्हाही वाटलं होतं, आताही कधी कधी मनात विचार येतो की, कोणतीही चांगली बातमी पहिल्यांदा एकमेकांना सांगावीशी वाटणं, एखादा नवीन पदार्थ खाल्ला की तो तिच्यासाठी आवर्जून न्यावासा वाटणं हे काय आहे? ते वेगळं नक्कीच होतं, तरीही आम्हा दोघांना आतून जाणवत होतं; माहीत होतं की मैत्री आणि प्रेमापेक्षा ही भावना भिन्न आहे. त्यात गल्लत होऊ नये यासाठी ना कोणतेही कष्ट घ्यावे लागले ना सावधगिरी बाळगावी लागली. एकदा तिच्या मैत्रिणीनं, ‘याचं कारण आमच्यात असलेलं एका वर्षाचं अंतर तर नसेल?’ असा प्रश्न विचारल्यावर आम्ही दोघांनीही तो विषय हसून टाळला. नंतर मात्र एकांतात असताना तशी खात्री करून घ्यावी का असा प्रश्न क्षणार्धाकरिता आला असेल का आमच्या मनात? सांगता येत नाही. एक मात्र नक्की की या संभाव्य संभ्रमाने आमच्या वागण्या-बोलण्यात कधीच अडथळा आला नाही. आमचं नातं अगदी बहीण-भावाचं जरी नसलं तरीही प्रेमी युगूल वाटू असंही नव्हतं. ‘रिश्तों का इल्जाम ना दो’ या तत्त्वावर आमच्यातलं मैत्र फुलत राहिलं.

अधूनमधून ‘तुम एक-दुसरे के हो कौन?’ असे प्रश्न आपापल्या मित्रांमध्ये विचारले जाऊ लागले. आयुष्याच्या सर्वात महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये एकमेकांसाठी उभे असू, हा एकमेव दुवा आमच्यात आहे, हे वेगवेगळ्या शब्दांत सांगूनही बहुतांशी मित्रांना तितकंसं पटत नव्हतं. तिच्यापेक्षा एक वर्षाने लहान असल्यामुळे पुढचं, म्हणजे लग्नाचं पाऊल आम्ही दोघे टाकत नसल्याचा चेष्टेने आरोपही केला गेला.

हेही वाचा…सांधा बदलताना : हा खेळ आभासांचा

ती परदेशी गेली आणि अधिकृत प्रेम शोधण्यासाठी जणू मला मोकळीकच मिळाली. पण घडलं काहीच नाही. त्या दिशेने केलेली गोलंदाजी ‘वाइड बॉल’, ‘नो बॉल’ या प्रकारातच गणली गेली. काही वर्षांत मी स्वत:ला एक अयशस्वी प्रेमी मानून त्या मैदानातून स्वत:ला ‘रिटायर्ड हर्ट’ घोषित केलं आणि त्याच वर्षी आरती परत आली. तिनं माझं रडगाणं शांतपणे ऐकलं आणि मला ठणकावून सांगितलं, ‘‘आत्ताचा काळ हा मी निवडलेल्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवण्याचा, स्वत:ला सिद्ध करण्याचा आहे.’’ त्या काळात मी सॉफ्टवेअर नावाची ‘चलती का नाम गाडी’ चालवायचा प्रयत्न करत होतो. माझा त्यात फारसा जम बसत नव्हता, कारण मला त्यात रुची नव्हती. घरच्यांनी आणि मित्रांनी हे जवळून पाहिलं असलं, तरीही सत्य तोंडावर स्पष्टपणे बोलण्याचं धाडस पहिल्यांदा आरतीनं दाखवलं. ‘‘झेपत नसलेलं ओझं आयुष्यभर वाहण्यापेक्षा आवडीच्या आकाशात भरारी घे,’’ असं काहीसं ती म्हणाली आणि मला अचानक पंखच फुटले.

लिखाणाची आवड असून, इंग्रजीवर उत्तम पकड असूनही ते माझं उत्पन्नाचं साधन होऊ शकेल, असा मी कधी विचार केला नव्हता. पुढे काय होईल याची तसूभरही कल्पना नसताना स्वत:ला मी व्यावसायिक इंग्रजी लिखाणाच्या क्षेत्रात झोकून दिलं. पंख बळकट असल्यामुळे दरीच्या खोलीची भीती वाटली नाही. फक्त आरतीनं मला या पंखांची जाणीव करून दिली म्हणून हे घडू शकलं. परंतु मला एवढा मौलिक सल्ला देत असतानाही आरतीनं मला तिच्या स्वत:च्या आयुष्यातली सल सांगितली नव्हती. नंतर कळलं की, परदेशात एका सहकाऱ्यासोबत लग्नापर्यंत आलेलं नातं अचानक संपुष्टात आलं होतं. त्या वेळी मनाला एक विचार चाटून गेला की, मी तिथं असतो, तर असं होऊ दिलं असतं का?

तिच्याही घरी लग्नाची बोलणी सुरू झाली तेव्हा तिच्या घरच्यांनी तिच्यासमोर वेगवेगळ्या स्थळांची यादी ठेवली. त्यात माझं नाव नव्हतं याची मला खंत का वाटली, हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. जर योगायोगाने माझा विचार झाला असता तर? घरच्यांनी आणि मित्र-मैत्रिणींनी पटवून देण्याचा प्रयत्न केला असता, तर आमच्यापैकी कोणी होकार दिला असता की नसता? या जर-तरच्या गोष्टी झाल्या, पण बंद मुठ्ठी बंदच राहिली हे एका दृष्टीनं चांगलं झालं. माझी समजूत आहे की, नातं बदललं की माणसातले संबंधही बदलतात. हे मला कधीच चाललं नसतं. माझे आणि आरतीचे सूर कितीही जुळत असले तरीही आपापल्या जोडीदाराच्या कल्पना वेगळ्याच होत्या. हे न बोलताही आम्ही दोघं जाणून होतो.

हेही वाचा…स्त्री ‘विशद : क्रीडा क्षेत्रातील ‘स्त्री’त्व

‘‘कसा नवरा हवाय तुला?’’ या माझ्या प्रश्नावर ती फक्त म्हणाली, ‘‘तुझ्यासारखा’’. एवढंच. ही तिनं मला घातलेली मागणी नव्हती तर माझ्यातल्या गुणांना दिलेली दाद होती. ‘माझ्यासाठी तू जोडीदार शोध आणि तुझ्यासाठी मी.’ असं ती म्हणाल्यावर एक गोष्ट स्पष्ट झाली की, आम्ही एकमेकांसाठी असलो तरीही एकमेकांचे नव्हतो.

माझं लग्न झालं तेव्हा ती परदेशी होती. शुभेच्छांसोबत तिचा संदेश होता, ‘बायकोशी जर कधी पराकोटीचं भांडण झालं तर मला बोलव, मी सोडवीन ते.’ तेव्हा मी ठरवलं की, आरतीला कोणीही आवडला आणि त्याला जर ती तितकीशी उमगली नसेल तर त्याला तिच्यातली किमया समजावून सांगायला मी दुनियेतल्या कोणत्याही ठिकाणी जाईन.

माझ्यासारखीच तीसुद्धा इंटरनेटप्रेमी नाही. त्यामुळे नियमित ऑनलाइन भेटीही होत नाहीत, पण तिची उणीव भासत नाही कारण कोणत्याही प्रसंगी कुठलाही निर्णय घ्यायचा असला की एकच विचार येतो, ‘इथं माझी सखी असती तर तिनं काय सल्ला दिला असता?’ आणि अचानक मला निर्णय घेणं सोपं होऊन जातं. आम्ही स्वत:साठी घेतलेले काही महत्त्वाचे निर्णय चुकले, पण एक अजब सूत्र लक्षात आलं, माझे निर्णय तिला लागू पडतात आणि तिचे निर्णय मला. यामुळे आम्ही ठरवलंय की, यापुढे कोणतंही मोठं पाऊल उचलण्याआधी एकमेकांच्या कानावर घालण्यासाठी फोन उचलायचा. त्याद्वारे एकाने दुसऱ्याला नुसता ‘कानमंत्र’ दिला तरी पुरेसं आहे.

कधी वाटतं या निनावी भावनेचा छडा लावूयात, पण भीतीही वाटते की, जादूचं गुपित शोधायच्या नादात तिचा प्रभावच नष्ट झाला तर? आमची ही विस्मयकारी अवस्था अशीच रहावी एवढंच देवाला मागणं आहे की, जिंदगी युं ही चालती रहे…

हेही वाचा…स्वभाव – विभाग : अलिप्त मी!

पुरुष वाचकहो, तुम्ही मांडायचे आहेत तुमचे अनुभव! आहे का तुमची एखादी अशी निखळ मैत्रीण, जिच्याबरोबरचं नातं ना तुम्हाला कधी लपवावंसं वाटलं, ना तुम्हा दरम्यानचं अंतर तोडावंसं वाटलंय? अर्थात भिन्नलिंगी मैत्रीण म्हणून वाटलंच असेल ‘वेगळं’ आकर्षण, तर त्या भावनेची वासलात कशी लावलीत? काय आहे तुमच्या दोघांच्या घट्ट नात्याचं रहस्य? काय आहे तुमच्या नात्यातलं चुंबकत्व? आणि हो, होऊ शकते का अशी निखळ मैत्री? आम्हाला सांगा. महत्त्वाचं, या सदरात फक्त पुरुषांनीच आणि तेही आपल्या मैत्रिणीविषयी, त्यांच्यातल्या नात्याविषयी मनमोकळेपणानं लिहिणं अपेक्षित आहे. आम्हाला पाठवा ते अनुभव तुमच्या प्रत्यक्ष मैत्रीच्या उदाहरणांसह ५०० किंवा १००० शब्दांत. आमच्या ईमेलवर chaturang.loksatta@gmail.com

chetanjoshi1969 @gmail.com