नीलिमा किराणे

वस्तुस्थितीचा समजून स्वीकार झाला की त्यातल्या अपेक्षाभंगाचं दु:ख टोचत नाही. आयुष्यात अशा अनेक गोष्टींचा सामना करावाच लागतो, ज्या आपल्याला आवडत नाहीत, नकोशा असतात. त्यातून अनेकदा बाहेर पडता येत नाही, पडलो तरी आठवणींचा सल कायम राहतो. नव्या वर्षांची नव्यानं सुरुवात करताना तुमच्याही मनात असतील असे काही सल तर स्वत:ला प्रगल्भ करत सारं काही शांतपणे स्वीकारून मनाचं दार त्यासाठी कायमचं घट्ट बंद करता येईल? यायला हवं, आपल्याच समाधानी आयुष्यासाठी!

marathi play savita damodar paranjape
‘ती’च्या भोवती..! अगम्य शक्तीमागची कुचंबणा!
readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Growing digital divide in education
शिक्षणातली वाढती डिजिटल दरी!

वास्तू

‘‘पुढच्या आठवडय़ात प्रोजेक्ट सुरू होईल. इच्छा असल्यास तुमचं जुनं घर पाडण्यापूर्वी एकदा पाहून या.’’ दीड वर्षांपूर्वी पुनर्बाधणीसाठी घर सुपूर्द केलेल्या बिल्डर मित्राचा सुरेशकाकांना निरोप आला. चाळीस वर्षांपूर्वी हौसेनं बांधलेला, गावाच्या मध्यवस्तीतला कलात्मक छोटा बंगला. एकुलत्या एक विवाहित कन्येनं, ‘माझ्या घराजवळच राहायला या’ असा हट्ट धरला, तेव्हा बंगल्याचा व्यवहार करून काकांनी मुलीच्या उपनगरातल्या सोसायटीत प्रशस्त फ्लॅट घेतला. काकू लगेच नव्या घरात गुंतल्या, काका मात्र रमले नव्हते.

आज दीड वर्षांनं आपलं घर ‘शेवटचं’ पाहायला दोघं निघाले, तेव्हा इतर नवीन इमारती, बांधकामं, सगळं अनोळखी वाटत होतं. वाहनांचे कर्कश आवाज आणि ट्रॅफिक जाम कंटाळवाणं होतं. घरापाशी आल्यावर तर टोलेजंग इमारतींच्या गर्दीत त्यांचा गोंडस बंगला दिसेनासाच झाला होता. दोघांनी घरात चक्कर मारली, देवघराच्या जागेकडे बघून हात जोडले आणि मागे वळूनही न पाहता काका गाडीत येऊन बसले.

‘‘खूप त्रास होतोय का?’’ काकूंनी हळुवारपणे विचारलं.

‘‘नाही गं. उलट मोकळं वाटतंय. इथे आल्यामुळे या जुन्या घराशी अडकून राहिलेले शेवटचे धागे तुटले. या गर्दीत राहिलो तर आता आपला श्वास कोंडेल. आपल्या नांदत्या घराच्या आठवणींची तर मनात कायमच सोबत असणार आहे. आता मुलीसोबत राहायला हवं, हे ओळखून तू नव्या घरात रमलीस. माझं ‘भावनिक क्लोजर’ मात्र आज झालं. आता मीही रमेन तिथं.’’

 काकू समाधानानं हसल्या. अटळ बदल डोळय़ांनी पाहिल्यावर काकांना आतमध्ये काही तरी उमगलं. घरात अडकलेले बंध अलगद सुटले. वस्तुस्थितीचा समजून स्वीकार झाला. विचार आणि भावना एकत्र येऊन जाणीव जागी झाली आणि भावनिक ‘क्लोजर’ मिळालं.

जोडीदार

 दोन वर्ष रिलेशनशिपमध्ये असलेल्या रिदिशा आणि साहिलचा ब्रेकअप झाला. आपलं दु:ख, राग, आरोप दोघंही कॉमन मैत्रीण नंदिताला ऐकवायचे. एकदा योगायोगानं दोघंही नंदिताकडे आले असताना पुन्हा त्यांचं तेच तूतू-मैंमैं आणि आरोप सुरू झाल्यावर मात्र नंदिता वैतागली. म्हणाली, ‘‘तुमच्या दोघांची रिलेशनशिप मी दोन वर्ष बघतेय. पहिले काही छान दिवस सोडले, तर दोन-तीन वेळा ब्रेक घेऊनही ‘लांब असताना आठवण आणि एकत्र आल्यावर भांडण’ हा पॅटर्न बदलेना, म्हणून ब्रेकअप केलात ना? आता ‘तुझंच चुकलं’ हा खेळ किती दिवस खेळणार आहात? इतके दिवस मी सहानुभूतीनं ऐकून घेतलं, पण आता पुरे. तुम्हाला उद्योग नसतील, पण माझ्या वेळेला किंमत आहे. एक तर दोघंही सज्ञान आहात, तुमच्यावर कुणीही रिलेशनशिपची सक्ती केली नव्हती, दोघांनीही सारखीच माती खाल्लेली आहे. मग हा विषारी द्वेष कशासाठी? कोण चूक, कोण बरोबर हे ठरवण्यामुळे तुमच्या नात्यात काय फरक पडतो? आता एकत्र येऊ शकणार आहात का? मग आपण एकमेकांना आवडतो, पण आयुष्य घालवण्यासाठी अनुरूप नाही हे प्रामाणिकपणे मान्य करा. जो आनंद मिळाला, त्याला सोबत ठेवून एकमेकांना गुडबाय करा, मूव्ह ऑन.’’

नंदिताच्या अनपेक्षित भडिमारानं रिदिशा आणि साहिल दोघंही आवाक झाले. तिच्या म्हणण्यात तथ्य होतं. तिला दोन्ही बाजू माहीत होत्या. थोडय़ा वेळाच्या शांततेनंतर काहीच न बोलता एकमेकांना शेवटची घट्ट मिठी मारून त्यांनी एकमेकांचा शांतपणे निरोप घेतला.

बाँडिंग

अपर्णाचा मुलगा रोहन हॉस्टेलवरून सुट्टीसाठी घरी आला की अपर्णा उत्साहानं कंबर कसून स्वयंपाकघरात शिरायची. ‘आईच्या हातचे आवडीचे पदार्थ’ हवेच असले, तरी रोहनचा ओढा मित्रमंडळींकडेही असायचा. अपर्णाची चिडचिड व्हायची. एकदा वैतागून ती रोहनला म्हणाली, ‘‘तुझ्या आवडीचं प्रेमानं खायला करते त्याची काही किंमतच नाही. तुला रोज बाहेरच जायंच असतं आणि रात्री लॅपटॉपवर सिनेमे बघायचे असतात.’’

आज मात्र रोहननं पूर्वीसारखा वाद घातला नाही. तिच्या गळय़ात हात टाकून म्हणाला, ‘‘अगं, रोज ब्रेकफास्टला माझ्या आवडीचं जे करतेस ते मी प्रेमानं हाणतो की नाही? मला मित्रांचीही ओढ असते. बाहेर पडल्यावर त्यांच्यासोबत होतं बाहेर खाणं, कधीकधी तुला कळवायचं राहतं. तू केलेलं नंतर खाल्लेलं चालतं मला. तुला मात्र मी गरम आणि ताजंच खाल्लं पाहिजे. हे कसलं जबरदस्तीचं प्रेम? मला कॉलेजमधल्या गमती तुला सांगायच्या असतात, मी पाहिलेल्या वेगळय़ा फिल्म्स रात्री तुला दाखवायच्या असतात, पण तू सतत स्वयंपाकातच असतेस. आधीच हातातला वेळ थोडा, त्यात खाण्यापलीकडे आपल्यात बाँडिंग नसेल तर आवडेल का तुला?’’

अपर्णा बघतच राहिली. मुलगा मोठा झालाय, त्याचं क्षितिज विस्तारतंय हे आपण विसरलोच. त्याला तिथंही आपली सोबत हवी आहे हे किती सुंदर आहे. ती मनापासून हसली. ‘माँ के हाथ का खाना’पासून सुरू होणाऱ्या असंख्य अपेक्षांचं ‘क्लोजर’ होऊन प्रगल्भ बाँडिंगसाठी नवीन दार उघडलं होतं. सल कधी कधी मनात एखादा जीवघेणा सल आयुष्यभर रुतलेला असतो पण तो कसा मोकळा होऊ शकतो, त्याबद्दलचा एका इंग्रजी मालिकेतला एक हृद्य प्रसंग लक्षात राहिलाय. चार वर्षांच्या बॉनीला तिची आई अनाथालयात सोडून जाते. व्यसनाधीनता आणि परिस्थितीचे फटके खात बॉनी मोठी होते. कालांतरानं बॉनीला

आई गेल्याचं समजतं. तिला रडू येत नाही, मात्र तगमग होत असते. त्यातून मोकळं होण्यासाठी, एका मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार, बॉनी गेलेल्या आईला पत्र लिहिते आणि तिला उद्देशून ते वाचते.

‘‘तू इतक्या लहान मुलीला सोडून जाऊच कशी शकलीस गं? आपण दोघींनी एकत्र म्हटलेली गाणी, कविता मला आठवायच्या. माझं काही तरी चुकल्यामुळेच तू मला सोडून गेलीस या अपराधी भावनेतून मी बाहेरच येऊ शकले नाही. समजायला लागल्यावर मी तुझा फक्त तिरस्कार केला. माझ्या प्रत्येक दुर्दैवाचं खापर तुझ्यावर फोडत आले. मात्र तुला दोष देऊन देऊन मी आता थकलेय. मी तुला माफ करू शकणार नाही, पण माझ्या प्रत्येक अपयशाशी तुला जखडून ठेवणारा दोर मला आज कापून टाकायचाय. यापुढच्या माझ्या आयुष्याची जबाबदारी फक्त माझी असेल.’’ आणि बॉनीच्या डोळय़ांतून अश्रू ओघळतात..

आपल्या प्रत्येक चुकीची जबाबदारी आईवर टाकत राहून आपण स्वत:च्या वागण्याला समर्थन शोधत राहिलो आणि स्वत:च्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलं, आपल्याला त्या त्या वेळी वेगळे निर्णयही घेता आले असते हे मान्य झालं, तेव्हा आई नव्हे, बॉनीच मुक्त झाली. आयुष्य नव्यानं जगायला प्रगल्भ आणि जबाबदार झाली.

क्लोजरचा अर्थच असा, की भूतकाळातल्या सल, जखमांना जाणिवेनं सामोरं जाणं, दुसऱ्यावर दोष न टाकता, स्वत:ची जेवढी असेल तेवढी जबाबदारी प्रामाणिकपणे मान्य करणं, आपल्या मनाच्या उलाढालींचं संतुलन फक्त आपणच करू शकतो याचं भान घेऊन त्या ओझ्यातून मुक्त होणं. मग मोकळय़ा मनानं नव्या दिवसाचं स्वागत करता येतं. नवीन वर्ष नुकतंच सुरू झालं आहे. तुमच्याही अशाच काही न पूर्ण झालेल्या आशा-अपेक्षांचं दार बंद करून टाका आणि मनाच्या खोल तळात बुडवून टाका, कधीही बाहेर न काढण्यासाठी. बघा आयुष्य किती छान होईल ते..