स्वातंत्र्य लढय़ाचा भाग म्हणून ब्रिटिशांच्या आर्थिक सत्तेविरोधात सातत्याने लढण्यात हजारोंच्या बलिदानासह ज्यांनी आपल्या अनेक पिढय़ा बरबाद करून घेतल्या त्या छप्परबंद जमातीतल्या लोकांना स्वराज्यात मात्र घर नाही, शिक्षण नाही, आरोग्य नाही, ओळख पटवायला किमान आधार नाही.
‘‘ह मारे हाल क्या पुछतें हो जी, हमें ना मुस्लिम अपना मानते हैं, ना बाकी समाज। पुलिस का तो पुछोही मत। वो तो हमें गन्ना समजते हैं, फोडो और चबाओ। और भटकी जमातके लीडरों का कर्तब क्या     बताऊं ? मुंढवा सेटलमेंट के पास हमारे खुदके मकान बनवाने हर एक को आधा गुंठा जमिन सरकारने मंजूर की हैं, लेकिन फर्मान निकला है- ‘तुरंत जमिन का ताबा लेने के लिये जुग्गी अगर पत्रेका शेड बनवाकर हमें वहां रहना होगा, हरएक को पांच हजार रुपया खर्चा आयेगा, जो पाँच हजार देगा वहीं जगा और मकान पायेगा.’ – ऐसा, भटकी जमात के जानेमाने लीडरोंने कहाँ तो तुरंत हमारे में से देडसों से जादा लोगों ने, अपनी माँ, बहेन, पत्नी के गहने गिरवी रखके, पाँच पाँच हजार रुपये उनको दे दिये। लीडरोंने जगा दिखाई। छे-सात शेड बनवाने का काम शुरू हो गया। लीडरों के नाम और फोटो के साथ वहाँ बडा बोर्ड भी लग गया। थोडेही दिनमें सरकारी लोग और पुलिसने सभी शेड के साथ बोर्ड भी उखाडम् दिया। सरकार का कहना है यह अतिक्रमण था। मदार धुली शेख, हैदर मौला शेख, इमाम शेख, सोहेल धुली शेख के साथ हमारे पाँच-छह युवा कार्यकर्ताओं को पाँच दिन तक पुलिस कस्टडी में रखा था। तीन-चार साल से अभी तक कोर्ट केस चल रहीं हैं। सभी कार्यकर्ता हर महिना कोर्ट तारीख को हाजरी लगा रहे हैं। लीडर लोग गायब हैं। आठ-नौ लाख रुपये के लिए गरीब लोग तो लूटे गये। ऐसे तो हमारे हाल ही हाल हैं। जितना बताऊं  उतना थोडा हैं। बस्ती में इतनी गंदगी और बिमारी हैं की लोगों की सारी कमाई दवापानी में ही खतम होती है।’’ स्वानुभवातून आपलं दु:ख ओकत होत्या ‘छप्परबंद’ या भटक्या जमातीच्या अरिफा सलिम शेख, हुसेनबी पिरजादे, मैमुना छप्परबंद आणि इतर अनेक महिला. मोहमद इंडिकर, सलिम शेख आणि जुनेजाणते वयस्कर अब्दुल हमीद शेख यांच्यासह आम्ही भेट दिली होती पुण्यातील मंगळवार पेठ, जुना बाजारजवळील रेल्वे भरावावर वसलेल्या छप्परबंद जमातीच्या अनधिकृत वस्तीस.
छप्परबंद ही मूळची बंगाल प्रांतातली हिंदू जमात. मध्ययुगीन काळातल्या सुलतान व राजे-महाराजे यांच्या लष्करी किंवा नागरी मोहिमांमध्ये अनेक जमाती त्यांच्या कौशल्यानुसार सामील झालेल्या होत्या. छप्परबंद जमातीला त्याकाळी त्यांच्याकडे असलेल्या दोन परंपरागत कौशल्यासाठी राजाश्रय होता. पहिले कौशल्य, सोने-तांबे-जस्त-पंच धातू वितळवून त्याच्या मोहरा, होन अथवा नाणी तयार करण्याचे आणि दुसरे कौशल्य, लष्कराच्या छावण्यातील राजा व प्रमुख सरदारांच्या तात्पुरत्या घरांचे छप्पर तयार करण्याचे.
बंगालमध्ये १७६५ साली राजा शिजावूदौलाचा पाडाव करून ब्रिटिशांनी ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या नावे राज्य सुरू केले. ‘सुरती नाणे’च्या रूपात त्यांनी त्यांचे स्वतंत्र चलन सुरू केले. त्यामुळे छप्परबंद जमातीचा राजाश्रय व व्यवसायस्वातंत्र्य संपले. सत्तांतरामुळे झालेल्या सामाजिक, सांस्कृतिक उलथापालथीच्या काळात, हे लोक सुफी संतांच्या संपर्कात आले. ‘पीर मलकान’ या सुफी संताकडून त्यांनी इस्लामची दीक्षा घेतली. या वेळी संताने या जमातीच्या लोकांना दूरदृष्टीचा एक आदेश दिला. ‘‘नाण्याला दोन बाजू असतात. तसे तुमच्या कौशल्य वापराला दोन बाजू आहेत. आतापर्यंत तुम्ही एका बाजूचा उपयोग केला. आता दुसऱ्या बाजूचा उपयोग करण्याची वेळ आली आहे. ब्रिटिशांच्या आर्थिक सत्तेवर धावा बोला. (अहिंसक हल्ला करा). या आदेशानंतर छप्परबंद जमातीने मानसशास्त्र व संमोहनशास्त्राचेही धडे घेतले. नंतर ‘जिथे ब्रिटिश सत्ता तिथे छप्परबंदची खोटी नाणी,’ अशी मोहीम उघडली, त्यासाठी त्यांनी कुटुंबासह भटकेपण, गरिबी, कष्टाचे व धोक्याचे जीवन स्वीकारले. छप्परबंद व्यक्तीने एखाद्यावर तीन खडे टाकले (तीन युक्त्या केल्या) की, किमान पाच दिवसांपर्यंत त्याची मती भ्रष्ट होते असे आजही म्हटले जाते. युक्त्या-प्रयुक्त्या, सांकेतिक खुणा, भाषा व मानसशास्त्र यांच्या आधारे होणारी यशस्वी वाटचाल पाहून यांना समाजात ‘चतुरबंद’ असे म्हटले जाऊ  लागले. ‘बंद’ म्हणजे समूह. ‘चतुरबंद’ या शब्दाचा अपभ्रंश आणि त्यांच्याकडे असलेले छप्पर तयार करण्याचे परंपरागत कौशल्य, नाण्यावर छापा उठविण्याचे कौशल्य या तिन्ही कारणाने त्यांना छप्परबंद संबोधले जाऊ  लागले.
युद्धात लुटलेल्या खजिन्याचे चलन तयार करून स्थानिक राजा-महाराजांना देण्याचे कामही हे करायचे. ब्रिटिशांकडून दुखावलेल्या राजा-महाराजांनी छप्परबंदांना पाठबळ दिले. म्हणूनच साधारणपणे खोटी नाणी तयार करण्याचे काम ब्रिटिशांच्या हद्दीबाहेरच्या क्षेत्रात केले जायचे. ब्रिटिशांनी यांना ‘ठग’ असे घोषित केले व ठगांच्या विरोधात कडक कायदा केला. पण उत्तरेतले खरे ठग व लुटारू लोक यांना ‘खूलसूटर्य़ा’ म्हणतात. यांना स्वत:पेक्षा वेगळे समजतात. शेवटी छप्परबंद जमातीच्या सात प्रमुख बंडखोरांना पकडण्यात ब्रिटिश सरकार यशस्वी झाले. त्या सातही जणांना ठग ठरवून अवध येथे १८४० मध्ये फाशी देण्यात आली. त्यांच्या मेंदूचा विशेष अभ्यास व संशोधन होण्यासाठी त्यांची डोकी ब्रिटनला पाठविण्यात आली.  कायद्याने ज्यांना ठग ठरविता येत नाही, मात्र जे संशयित आहेत अशा सुफी संत गुरूंच्या यात्रेस आलेल्या २३ हजार लोकांची हत्या ब्रिटिशांनी एका रात्रीत अवध संस्थानात केली. इतिहासात मुस्लीम हत्याकांड म्हणून ही घटना प्रसिद्ध असली तरी ती मुस्लीम छप्परबंद लोकांची हत्या होती. एवढय़ा मोठय़ा संख्येने झालेल्या मनुष्यबळाची हानी हा जमातीला मोठा धक्का होता. माणूसबळ वाढविण्यासाठी त्यांनी शक्कल लढवली. दूरदूरच्या भागांतून लहान मुलं-मुली चोरून आणायची, त्यांना पोटच्या मुला-मुलींप्रमाणे प्रेमाने आपल्या संस्कारात वाढवायचे, वाढत्या वयातच क्रांतीची दीक्षा देऊन अंगीकृत कार्यात सामील करून घ्यायचे. त्यामुळे सामाजिकदृष्टय़ा  या जमातीचे दोन भाग पडले. पहिला मूळ छप्परबंदाचा विस्तार हा ‘बडा भाई’ तर दुसरा पळवून आणलेल्या मुला-मुलींचा विस्तार हा ‘नन्हा भाई’. कमाईतला १२ गंडेचा मोठा हिस्सा ‘नन्हे भाईचा’ आणि ६ गंडेचा छोटा हिस्सा ‘बडे भाईचा’ असा नियम केला गेला. या दोन गटांत रोटी व्यवहार असला तरी बेटी व्यवहार नाही.
चलनात झालेल्या घोळामुळे ईस्ट इंडिया कंपनीचे दिवाळे निघण्याची नामुष्की ब्रिटिश टाळू शकले नाहीत. व्हिक्टोरिया राणीला दिवाळे निघालेली ही कंपनी १८६० साली आपल्या ताब्यात घ्यावी लागली. तलवारीच्या बंडापेक्षा छप्परबंदांचे हे बंड मोठे परिणामकारक ठरले होते. हे बंड मोडून काढण्यासाठी राणीने कागदी नोटा चलनात आणल्या.
नोंद करण्याजोगी बाब म्हणजे, आर्थिक बंडखोरीच्या कार्यात महिलांची भूमिका अत्यंत मोलाची व दुहेरी होती. पुरुष आपल्या कार्यासाठी वर्षांतून नऊ  महिन्यांपेक्षा जास्त काळ घरापासून दूरदूर भटकत राहायचे. त्या काळात मुलाबाळांसह वृद्धांची जबाबदारी महिला निष्ठेने पार पाडत. मोलमजुरीची कामे, शिंदीच्या फरक्यापासून चटया बनविणे, गोधडय़ा शिवणे, लग्न समारंभात मंडप स्वच्छता, वाढपी, भांडी घासणे ही कामे महिला करत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे नाण्यांचे ‘मोल्ड’ तयार करण्यासाठीची ‘गोपीचंदन’ माती कबरीच्या रूपात साठवून व सांभाळून ठेवण्याचे काम करत असत.
नमस्कार करण्याऐवजी ‘स्वतंत्र भारताचा भातवाली बोली भाषा बोलणारा भारत भातू’ अशी ओळख देऊनच पुढील बोलणी होत असत. भातू म्हणजे छप्परबंद माणूस. भातवाली, भातोली किंवा बातोली ही यांच्या बोली भाषेची नावे आहेत. बंग देशातील ‘बांगरू’ भाषेचा प्रभाव असलेल्या या भाषेत तेलुगू, कन्नड, मराठी, उर्दू व हिंदी शब्दही घुसले आहेत. याची बोलण्याची ढब व उच्चार असे खास आहेत की, ते लिहिणेच कठीण जाते. मुळातले हे फकीरही नव्हेत आणि शेख-शहाही नव्हेत. वेषांतर करून फिरताना भिक्षेकरी, व्यापारी व इतर प्रतिष्ठितांची घेतलेली ती रूपे आहेत. मानववंश शास्त्रज्ञांनासुद्धा यांच्या संबंधात खोलात जाता आलेले नाही असे दिसते. यावर आणखी अभ्यास व संशोधन होण्याची गरज आहे.
पुण्यासारख्या शहरात, गेली पन्नास वर्षे ‘रेल्वे भराव छप्परबंद वस्तीत’ राहात असलेल्या ३५०पेक्षा जास्त कुटुंबांतून सातवीच्या पुढे शिकलेली एकही महिला दिसत नाही. सलिम शेखच्या संघटनेतर्फे  झालेल्या पाहणीनुसार राज्यभरातल्या या जमातीच्या एकूण महिलांपैकी ९९ टक्के महिला निरक्षर आहेत. सध्या वस्तीतल्या २५ मुली प्राथमिक शाळेत जात आहेत. त्याही सातवीच्या पुढे शिकण्याची शक्यता नाही. वस्तीतील पुरुषांत ३० टक्के साक्षरता आहे, सुमारे २००० लोकसंख्येत २७ मुले मॅट्रिक पास, त्यात २ मेरीटमध्ये असा स्वराज्यातला वस्तीचा शैक्षणिक विकास आहे. मातृभाषा वेगळी असल्याने सर्व राज्यभाषा यांना परक्या वाटतात. प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना आमची मातृभाषा येत असेल तर मुलांना शिकणे सुलभ होईल असे मत वस्तीतल्या महिलांनी मांडले.
राज्यातल्या २५००० लोकसंख्येत केवळ १२ पुरुष व ३ महिला मुंबई महानगरपालिकेच्या शाळांत शिक्षक-शिक्षिका आहेत. बाकी कोणाला सरकारी नोकरी नाही.
१८७१च्या गुन्हेगार जमाती कायद्याप्रमाणे जन्मत: गुन्हेगार समजल्या जाणाऱ्यांच्या यादीत ठग लुटारूंबरोबर छप्परबंद जमातीचे नाव आहे. असे करण्यामागे ब्रिटिशांची बाजू स्पष्ट होती- ब्रिटिश त्यांच्या सत्तेच्या विरोधातच होते. मात्र, लूटमार, फसवणूक, चोरी, खून-दरोडे, इ. गुन्हे या लोकांनी कधी केलेले नाहीत आणि करतही नाहीत. हे सरकारचे दप्तरच सांगेल. तरीही भारतातील सर्व राज्य सरकारांकडून ‘छप्परबंद’ जमातीला पूर्वाश्रमीचे गुन्हेगार अशीच वागणूक मिळते. ब्रिटिश सत्तेच्या विरोधात लढलेल्या सर्वच स्वातंत्र्यसैनिकांना हा न्याय लावायचा म्हटलं तर काय होईल, असा प्रश्न छप्परबंद विचारतात.
बहुतांशी छप्परबंद समाज १९२४ पासून महाराष्ट्रातील सेटलमेंट नावाच्या निरनिराळ्या तुरुंगामध्ये होता. स्वराज्यात संबंधित कायदा रद्द झाल्यानंतर हे लोक ‘फ्री’ झाले. यांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न झाले नाहीत. हे लोक निराधार व साधनविहीन राहिले. सोलापूर, पुणे, मुंबई, सांगली, मिरज, इचलकरंजी, अंबरनाथ, भिवंडी, औरंगाबाद, ठाणे इ. ठिकाणी ते विखुरले गेले.
स्वातंत्र्य लढय़ाचा भाग म्हणून ब्रिटिशांच्या आर्थिक सत्तेविरोधात सातत्याने लढण्यात हजारोंच्या बलिदानासह ज्यांनी आपल्या अनेक पिढय़ा बरबाद करून घेतल्या त्यांना स्वराज्यात घर नाही, शिक्षण नाही, आरोग्य नाही, ओळख पटवायला किमान आधार नाही, महिला सक्षमीकरण नाही. म्हणूनच त्यांच्या उत्थानासाठी, गरज आहे त्यांना प्रेम व माणुसकीची वागणूक देण्याची आणि प्राधान्याने विकासाची संधी उपलब्ध करून देण्याची. नाही तर सामाजिक बंधुत्वाला अर्थ उरणार नाही!
अॅड. पल्लवी रेणके -pallavi.renke@gmail.com