एका आरोपाने त्याचं सारं आयुष्य दावणीला लागलं. जगत असताना आपल्यावरील अन्यायाविरुद्ध लढणं त्याने चालूच ठेवलं. तब्बल २५ वर्षे, न हरता. तो निर्दोष सुटला, पण वाया गेलेल्या आयुष्याचं काय? सत्यघटनेवर आधारित कथा.
वैशाखाचं जळजळीत ऊन, त्या झळीने त्रस्त झालेल्या नागिणीगत फुफाटणारी वाट अन् ‘अजूनि चालतोची वाट, माळ हा सरेना’चा जप करत खडखडणारी गंगारामची सायकल! दररोजच्या हेलपाटय़ापायी एखाद्या खडूस म्हातारगत ती कायम कुरकुरत चालायची. जराशाने घरं दिसू लागली. गंगारामने पॅडल मारलं. आज पत्रांबरोबर बऱ्याच मनीऑर्डरी पण होत्या. काम आटपून तो पोस्टात परतला तेव्हा ऊनं कलली होती. अदा केलेल्या मनीऑडर्सच्या पावत्या आणि शिल्लक तीनशे पासष्ट रुपये त्याने पोस्टमास्तर गटणे यांच्याकडे जमा केले.
‘सायेब, एकूण तीनशे पासष्ट आहेत. मोजून घ्या.’
‘ठीक आहे. ठेव ड्रॉवरमध्ये.’ रजिस्टरमध्ये खुपसलेलं मुंडकं बाहेर न काढता गटणे पुटपुटला. तुसडय़ा चेहऱ्याचा गटणे पोस्टात कुणालाच आवडत नसे, पण काय करणार?
 या घटनेला ८-१० दिवस झाले. सायंकाळची वेळ. गावात रोजचं लोड-शेडिंग त्यामुळे गंगाराम कंदिलाच्या काचा साफ करीत बसला होता. एवढय़ात बाहेर काही तरी गडबड जाणवली म्हणून तो बाहेर डोकावला.
‘‘तू गंगाराम?’’ तो पोलीस खेकसला.
‘‘होय सायेब, मीच गंगाराम, पण काय झालं?’’
‘‘लोकांच्या मनीआर्डरचे पैकं खातोस आणि वर मलाच विचारतोस? चल, तुला दावतो.’’ असं म्हणून पोलिसाने गंगारामची गचांडीच धरली. पोलीस स्टेशनात गेल्यावर समजलं की एकूण रकमेपैकी ६५ रुपये गंगारामने कमी भरल्याची तक्रार गटणेने पोलिसांत केली होती. आरोप समजला, पण पैसे कमी भरल्याबाबत त्याच दिवशी का नाही सांगितलं? आठ दिवसांनी पोलिसांत तक्रार का केली? हा एकच प्रश्न गंगाराम वारंवार विचारत होता. उत्तर मिळालं नाही, पण पोलीस कोठडी मात्र मिळाली. साहजिकच नियमानुसार नोकरी गेली. गंगारामच्या पत्नीने धावाधाव करून पैसे जमवले आणि त्याची जामिनावर सुटका झाली.
नोकरी गेली, पण कोर्टाची आशा होती. त्या एकमेव आशेवर पती-पत्नी दोघांनी कंबर कसली आणि मिळेल ते काम करण्याचा चंग बांधला. आपल्यावरल्या अन्यायाने गंगाराम अतिशय दु:खी झाला होता, पण तरीही संसाराचा गाडा हाकत होता. दु:खाचे दिवस जात नाहीत, सरपटतात.    ‘यथावकाश’ कोर्टाची तारीख उजाडली. आपण निरपराध आहोत त्यामुळे आपल्याला न्याय मिळणार अशी सर्वसामान्यांची ‘अंधश्रद्धा’ असते. गंगारामही त्याच विश्वासाने कोर्टात गेला, पण प्रथमग्रासे मक्षिकापात:! पोस्टमास्तर गटणे सुनावणीसाठी आलाच नाही. पुढची तारीख मिळाली. त्यानंतर दुसरी, तिसरी, चौथी! दरवेळी नवं कारण, नवीन निमित्त अन् नवी तारीख! तारखांचा सिलसिला तसाच सुरू राहिला. टेकीला आलेला गंगाराम हताश चेहऱ्याने आयुष्याचा हा तमाशा पाहायचा अन् असह्य़ झालं की तोंड लपवून रडायचा. कोर्टात त्याला त्याच्यासारखे अनेक त्रस्त-ग्रस्त चेहरे दिसायचे. भरभक्कम फी देऊनही वकिलांच्या मागे-मागे धावणारे, तर कधी धाय-धाय रडणारे! उत्साह दिसायचा फक्त काळय़ा डगल्यांमध्ये अन् गाडीवाल्या धेंडांमध्ये!
 २ वर्षे गेली. छोटी शीला लग्नाच्या वयात आली. सासरी गेली, पण त्यापायी गावची जमीन विकावी लागली. जमिनीचा एकमेव आधार गेला तेव्हा गंगाराम अतिशय निराश झाला, पण इलाज नव्हता. चिंतेची चिता धडाडून पेटली होती, गंगारामला भाजून काढत होती. तरीही कोर्टाचा प्रश्न अजूनही निकालात निघाला नव्हता. या देशात कोणताच प्रश्न चटदिशी हातावेगळा करण्याची पद्धत नाही. आधी एखाद्या सुंदर नदीचा गलिच्छ नाला बनवायचा आणि त्याने उग्ररूप धारण करून ‘मिठी’ मारली की पळापळीचा ‘ब्रेकिंग डान्स’ करायचा, असा इथला गलथान कारभार!
 तब्बल २५ वर्षांचा वनवास भोगल्यानंतर मेहरबान न्यायदेवतेने डोळय़ावरली पट्टी किलकिली केली. दरम्यान, फिर्यादी गटणे ‘ढगाआड’ गेला. छळवादी नियतीची पण हौस फिटली. वकिलाचा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला आणि गंगारामची निदरेष सुटका झाली. निदरेष सुटका! खरं तर किती आनंद व्हायला हवा, पण हलाखीच्या वणव्यात सारा आनंद जळून खाक झाला होता. आता प्रश्न उरला एवढय़ा वर्षांच्या वेतनाचा! त्यासाठी पुन्हा एकदा कोर्टाची पायरी, पुराव्यांची भेंडोळी अन् वकिलांची फी ही सारी कसरत करावी लागणार होती, तारीख-पे-तारीखचं हे कंटाळवाणं दळण दळण्याचं, गंगारामने नक्की केलंय, मुलाच्या मदतीने पुढचा डाव तो खेळणार आहे.
होय, त्यानं लढायचंच ठरवलंय, कारण लढणं त्याचं आता आयुष्य बनलंय आणि हार मानायचीच नाही हे ध्येय!
( या सत्यघटनेतील मूळ व्यक्तींची नावं बदलली आहेत.)