शरीर एका ठिकाणी स्थिर करणं जरा तरी सोपं आहे, पण मन.. ते असं आवरून धरायला, एका ठिकाणी- एका विचार, अनुभवावर स्थिरावयाला महाकठीण! मनाची एकसंधता, एकरूपता किंवा तल्लीनता, ‘आज, आत्ता, इथे’ असणं हा आश्वासक मानसशास्त्रातील एक मोठा अभ्यास विषय आहे.
राधिका केस मोकळे सोडून आरशासमोर उभी होती. घडय़ाळ्यातला काटा तिची नजर खेचत होता. फक्त आठ मिनिटं होती तिच्या हातात. नाही तर नक्की उशीर होणार आणि अजून काय काय आवरायचं होतं. तशी तर सकाळपासून नुसती ‘घाईच’ चालली होती. स्वयंपाक, मुलांचे डबे, कामवालीला सूचना, आजी-आजोबांच्या हाकांना धावणे इत्यादी.. आंघोळ करताना आपण तोंडाला साबण लावला होता का नाही हेच तिला आठवत नव्हतं. (संशयाचा फायदा घेऊन दुसऱ्यांदा लावला!) डबे भरताना चार वेळा फ्रिजजवळ जाऊन ‘काय काढायचं ठरवलं होतं’ हेच विसरून ती पुन्हा ओटय़ाजवळ आली होती. थोडक्यात शरीर एका जागी काम करत होतं, तर चित्त अंतराळात भटकत होतं, त्याला एका ठिकाणी सारखं खेचून आणावं लागत होतं.
अजयचीही थोडी फार हीच अवस्था होती. त्यानं नव्या चित्रपट संहितेचं लेखन पूर्ण करत आणलं होतं, पण शेवटची बठक काही जुळत नव्हती. कागद-पेन किंवा लॅपटॉप जवळ घेऊन बसलं तरी अपेक्षित असणाऱ्या मित्रांच्या ‘पार्टी मेसेजची’ वाट बघण्यामुळे हातातल्या मोबाइलशी सारखा चाळा सुरू होता. दोन शब्द लिहिले की मेसेज टोनचा आवाज त्याला मोबाइलकडे बघण्यास भाग पाडत होता. एकीकडे स्वत:चाच राग येत होता, तर दुसरीकडे तो दूर ठेवायला मन धजत नव्हतं.
एखाद्या आरशाला धक्का लागून तो फुटल्यावर एकाच वेळी अनेक तुकडय़ांमध्ये जशी आपलीच आपल्याला अनेक प्रतििबबं दिसायला लागतात. तसंच बऱ्याचदा मनाचंही होत असतं. शरीर एका ठिकाणी स्थिर करणं जरा तरी सोपं आहे, पण मन? ते तर ‘अचपळ मन माझे..’ असं आवरून धरायला, एका ठिकाणी- एका विचार, अनुभवावर स्थिरावयाला महाकठीण! जणू रंगीबेरंगी फुलांवर उडणारं-क्षणात् इकडून तिकडे बागडणारं फुलपाखरूच! त्याला चिमटीत पकडायचं म्हणजे पकडणाऱ्याचा घाम निघणारच! पण एकदा जर ते सापडलं, तर मग मात्र नजरबंदी करणार. जग आनंदानं भरून टाकणार!
मनाची एकसंधता, एकरूपता किंवा तल्लीनता हा आश्वासक मानसशास्त्रातील एक मोठा अभ्यास विषय आहे. आपल्या रोजच्या जगण्यात आरशाच्या तुकडय़ांसारखं ते इतकं विभाजित झालेलं असतं की, त्या त्या क्षणाचा पूर्ण अनुभव घेण्याइतकी एकाग्रताही अगदी क्वचितच मिळते. अशी तल्लीनता ही खरं तर मनासाठी ऊर्जेचा एक मोठ्ठा स्रोत असते. किती साध्या साध्या गोष्टींमधूनही ही तल्लीनता, मनाचं पूर्ण भरलेपण आपण अनुभवू शकतो पाहा! एका कार्यशाळेत आम्ही एक छोटा प्रयोग करतो. प्रत्येक सदस्याच्या हातावर छोटासा बेदाणा ठेवतो आणि मग डोळे मिटून घेऊन तो तोंडात टाकायला सांगतो. काही सूचनांच्या साहाय्याने तो बेदाणा चघळताना, खाताना त्याचा स्पर्श, त्यातून मिळणारा रस, त्याचं तोंडामध्ये, जिभेवरून घशात उतरणं. त्याचं आपल्याला मिळणारं सुख अशा गोष्टींवर लक्ष द्यायला सांगत अवघ्या काही मिनिटांचा, एका कृतीचा ‘जवळजवळ संपूर्ण अनुभव’ देणारा तो काळ किती ‘मोठ्ठा’ वाटतो! त्या वेळी इतर सगळ्या संवेदना-जाणिवांना मनाची कवाडं बंद करून टाकलेली असतात. आपण एका संवेदनेमध्ये पूर्ण बुडून गेल्याचा तो अनुभव एक वेगळाच आनंद निर्माण करतो.
एखाद्या धरणाच्या िभतीपलीकडे साठलेलं पाणी धरणाच्या िभतीवर जोरजोरात धडका मारत असतं. कुशल अभियंते त्या िभतीतील ठरावीक दरवाजे उघडतात आणि त्यातून पाण्याचा प्रवाह उसळत, फेसाळत पलीकडच्या नदीपात्रात घुसून ते काठोकाठ भरून टाकतो, पण इकडेतिकडे पसरून नासधूस न करता! ती उसळत येणारी ऊर्जा म्हणजे जणू मनाची तल्लीनता! तो वेग कालांतरानं कमी झाला तरी आसपासची शेतजमीन भिजवत पाण्याची भूगर्भातील पातळी उंचावत पुढे जात राहतो. तसेच तल्लीनतेचे- त्या त्या क्षणात पूर्णपणे असल्याचे अनुभव अशीच जलपेरणी आपल्या मनाच्या आरोग्यासाठी करत असतात.
ही तद्रूपतेची कल्पना खरं तर योगशास्त्रातील ध्यान आणि बौद्ध तत्त्वज्ञानात मांडलेल्या विपश्यनेतील आहे. त्यातील ताकद ओळखून पाश्चात्त्य संशोधकांनी वस्तुनिष्ठ संशोधनाची त्याला जोड दिली, ज्यातून खूप आश्चर्यकारक (आणि आशादायक!) निरीक्षणं समोर आली आहेत. जॉन कोबाल्ट झिन या मानसशास्त्रज्ञाने तद्रूपतेवरील संशोधनातून असं दर्शवून दिलं की, जे लोक असे अनुभव वारंवार घेतात त्यांची रोजची प्रतिकारक्षमता अधिक बळकट असते. त्यांच्या हव्याशा भावनांमध्ये वाढ झालेली दिसते. इतकंच नाही तर स्मरण/आकलनासारख्या प्रक्रिया मेंदूतील ज्या भागांवर (ग्रे मॅटर) वर अवलंबून असतात त्यांच्या घनतेमध्येही वाढ झालेली आढळते. अशा व्यक्तींबाबत विध्वंसक वागणुकीची शक्यता जवळजवळ शून्यावर येते. तिहार येथे किरण बेदी यांनी कैद्यांसाठी जो विपश्यनेचा प्रयोग राबवला होता, त्याचे निष्कर्षही याला खूपच बळकटी देणारे आहेत.
मध्यंतरी तुर्कस्थानावरील ‘तुर्कनामा’ हे मीना प्रभू यांचं पुस्तक वाचनात आलं. तेथील पामुक्कले या गावात कॅल्शियमच्या अतिशुभ्र पण तीक्ष्ण क्षारांनी भरलेल्या काही छोटय़ा टेकडय़ा आहेत. त्यांच्या उतरंडीवरून निसर्गत: धावणाऱ्या पाण्याचे प्रवाह आहेत. पर्यटकांना अनवाणी होऊन त्या टेकडय़ांवरून पाण्यात भिजत खाली उतरता येतं. एका अंध मुलीनं त्या रमणीयतेचा जो स्पर्शानुभव घेतला त्याचं सुंदर वर्णन मीनाताईंनी केलं आहे. त्या क्षारांच्या मार्गाचा, पाण्याच्या उबेचा स्पर्श ज्या तल्लीनतेनं आणि सर्वागानं ती मुलगी घेत होती (जणू तिच्या पायालाच डोळे फुटले होते) तसा ‘आपल्यासारखे’ डोळस तरी घेऊ शकतील का? ती त्या वेळी फक्त त्या स्पर्शक्षणात वावरत होती, हे तिच्या चेहऱ्यावरच्या अपार आनंदानं लेखिकेला समजलं!
योगासन वर्गातील एक सुरेख अनुभव म्हणजे ‘चल’ ध्यानाचा! एरवी ज्या साध्या हालचाली आपण भराभर, प्रतिक्षिप्तपणे करतो, त्याच डोळे पूर्ण मिटून घेऊन, अत्यंत सावकाश करत असताना प्रत्येक हालचालीबरोबर येणाऱ्या सूक्ष्म संवेदना कशा जिवंत होतात आणि ते ते अवयव किती हलकेफुलके होतात त्याचा प्रत्यक्ष अनुभवच घ्यायला हवा. असं पंधरा-वीस मिनिटांचं एकतानतेनं केलेलं ‘चल’ ध्यान आपल्या भावनाकोषावर अतिशय हळुवारपणे संस्कार करत असतं आणि त्याला अधिक परिपक्व बनवत असतं, असं योगशास्त्रातील अभ्यासक आग्रहाने मांडतात.
सूर्याचे विखुरलेले एकेकटे लक्षावधी किरण तेज असूनही जी उष्णता निर्माण करू शकत नाहीत, ती एका दोन इंची व्यासाच्या बहिर्गोल िभगावर पडता क्षणी तयार होते आणि खाली ठेवलेला कागद भुर्रकन पेटतो, हा आपण सर्वानीच घेतलेला वैज्ञानिक अनुभव आहे. मनाची ऊर्जाही अशीच विखुरलेली असते. ती एका िबदूवर स्थिर करण्याचं काम असे ‘तद्रूपता’ देणारे प्रसंग करत असतात.
काय काय घडतं यातून? मानसशास्त्रात या परिणामांना खूप गमतीदार उपमा देतात. संगणकात एखादा व्हायरस (विषाणू) शिरला की गडबड होते. मग संगणकतज्ज्ञ त्याला अ‍ॅन्टी व्हायरस प्रोग्रॅमचा उतारा देतात. डिबगिंग किंवा नवे विषाणू येऊ नयेत म्हणूनही त्याचा वापर करतात. माइंडफुलनेस (एकतानता) चे वर वर्णन केलेले अनुभव मनातल्या विषाणूंना (कुविचार/अनावश्यक भावना कल्लोळ/ पूर्वग्रह). हद्दपार करण्याचं बळ पुरवतात. जणू मनात येऊ पाहणाऱ्या वादळांना कुंपणाबाहेरच थोपवून धरतात. अशा क्षणांचे साक्षी फक्त आपणच आपले असतो ना! त्यामुळे त्या वेळी येणाऱ्या विचारांना आपण तटस्थपणे सामोरे जाऊ शकतो. खरं तर आपलीच आपल्याशी मत्री वाढवण्याचे हे दुर्मीळ, पण लोभस क्षण असतात.
खरंच विचार करून पाहा, आपलं रोजचं जगणं इतकं यांत्रिक (रोबोटिक) बनलं आहे, की जणू स्वयंचलित वाहनच! ब्रेक दाबला गेला नाही, तर इंधन असेपर्यंत आंधळेपणानं सुसाट धावणार! काही गोष्टी आपण रुटीनपणे का करत असतो आपलं आपल्यालाही कळत नाही. तल्लीनतेच्या निमित्तानं मग मनालाच असे प्रश्न पडू लागतात. आपण फक्त निरीक्षण करायचं. काय मनापासून होतंय? काय लादलं जातंय? कशात निखळ आनंद आहे? कशाचं ओझं झटकावंसं वाटतंय? स्वत:ला कुठलीही लेबलं (दूषणं) न लावता अशा वेळी स्वत:चा स्वीकार करता येतो. आपल्या अधिकाधिक कृती जास्त निश्चितपणे ठरवून आणि ‘स्व-खुशीने’ होतात. (त्यात शारीरिक-मानसिक ताण असला तरीही!) किती तरी चाकोरीबाहेरच्या कल्पना ज्या मनात अंधूकपणे लपलेल्या असतात त्या आकार घ्यायला लागतात. लहानपणी मी पुस्तक वाचायला लागले की अशीच तंद्री लागायची. हाका मारून दमलेली आई खूप ओरडायची. ‘‘हिच्यावरून रोडरोलर गेला तरी कळणार नाही हिला!’’ असं गमतीनं म्हणायची; पण त्या वेळी छंद म्हणून वाचनातल्या ‘तंद्रीबहाद्दर’पणाचा जो आनंद अनुभवला तो आज वेगवेगळ्या कृती करताना जाणीवपूर्वक अनुभवते तेव्हा त्यात किती ताकद आहे हे लक्षात येतं.
समुद्रातील किंवा आकाशातल्या हालचाली टिपण्यासाठी ‘रडार’ नावाचं उपकरण वापरतात. कोणत्याही सूक्ष्म बदलामुळे वातावरणात निर्माण होणारे तरंग त्यातून टिपले जातात. त्याचं क्षेत्र मोठं असतं. तल्लीनतेच्या अनुभवाचं क्षेत्र एखाद्याच हालचालीवर किंवा संवेदनेवर केंद्रित झालेलं असलं तरी ती जाणीव मात्र सर्व शरीराला आणि मनाला प्रफुल्लित करते. अशा वेळी आपण फक्त त्या ‘क्षणाचे’ (वर्तमानाचे) निरीक्षक असतो, त्या ‘क्षणां’साठी जगत नसतो. रोजच्या किती तरी छोटय़ा गोष्टी आपल्याला ही जाणीव विकसित व्हायला मदत करतात. स्नान करताना पाण्याचा स्पर्श अनुभवणं, डोळे मिटून दूरदूरचे आवाज कानात साठवणं, जेवताना काही घास तरी अगदी संथ, रवंथ केल्यासारखं घोळवून खाणं, ॐकाराचा जप करताना ‘म’ची कंपनं अनुभवणं, खूप दमल्यावर बादलीतल्या गरम पाण्यात पाय बुडवून ते तरंग जाणून घेणं.. किती तरी! संवेदनांच्या माध्यमातून मिळणारी हीच अनुभूती तद्रूपतेने केलेल्या प्रार्थनेतून, उपासनेतून येऊ शकते. नृत्य, गायन/वादन अशा कलांच्या आविष्कारात तन्मय होताना येते, निसर्गाच्या विराट रूपाच्या क्षणार्ध दर्शनातही होते. त्यातून आपल्यातले सूक्ष्म बदल कसे घडत जातात ते ज्ञान प्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट ‘यांनी स्वत:ला घडविण्यासाठी उपासना’ या एका छोटय़ा पुस्तिकेत सुंदर सांगितलं आहे. अशा आपोआप आलेल्या किंवा आवर्जून योजलेल्या तद्रूपतेतून आपल्या ‘असण्याची’ जाणीव होणं म्हणजे एक प्रकारचा प्रकाश अनुभवणं. त्याला म्हटलं आहे ‘चित्तप्रकाशन’! त्या जाणिवेचा पाया भक्कम झाला, की येतो स्वत:चा गुणदोषांसकट स्वीकार आणि बदलाची इच्छा म्हणजेच ‘चित्त विस्तार’! आपण भोवतालापेक्षा वेगळे नाहीच आहोत, अशी तन्मयता येणं म्हणजे ‘चित्त उल्हास’! आणि त्या अवीट आनंदामुळे आपल्या प्रत्येक कृतीला भक्कम इच्छाबळ मिळणं म्हणजे ‘चित्तप्रेरणा’ किंवा ‘कार्यप्रेरणा’! त्यासाठी वर्तमानातील जेवढे क्षण अ-यांत्रिक पद्धतीनं समरसून अनुभवता येतील, तेवढे अनुभवणं आपल्या हातात आहे. त्यातून विचारांचा अनावश्यक कोलाहल कमी होऊन एक प्रकारचं निवळपण मनाला प्राप्त होईल, असं अनुभवी मंडळी सांगतात. एक प्रकारे आपल्यातल्या सत्त्वगुणांची, भावना संतुलनाची बठकच त्यातून घडू शकते असं खात्रीनं वाटतं म्हणूनच इथे-तिथे भटकणाऱ्या अवखळ वासराला दावं बांधून खिळवावं तसं तद्रूपतेतून मनाला ‘आज, आत्ता, या क्षणी’ जगायला शिकवणं म्हणजेच ‘मन भरलं भरलं..’ असं घडणं ! त्यासाठी प्रयत्न करायचे ठरवू या म्हणजे झालं!
डॉ. अनघा लवळेकर – anagha.lavalekar@jnanaprabodhini.org

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व आजचे पसायदान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazing facts about the human heart
First published on: 10-10-2015 at 05:38 IST