scorecardresearch

Premium

समाधानी आयुष्याचा चढता आलेख

आनंदी आयुष्य’ म्हणजे काय याचा निरंतर शोध घेण्यासाठी आश्वासक मानसशास्त्रातून खूप मदत मिळते.

समाधानी आयुष्याचा चढता आलेख

रिकामं वाटणं, सुख दुखणं किंवा अदृष्टाच्या कल्पनेनं व्याकूळ होणं अनेक जणांनी कधी ना कधी तरी अनुभवलेलं असतं. हे वाटणं बदलून ‘निरंतर समाधानी,आनंदी आयुष्य’ म्हणजे काय याचा निरंतर शोध घेण्यासाठी आश्वासक मानसशास्त्रातून खूप मदत मिळते. मनाला तेलपाणी कसं द्यायचं हे यातून समजून घेता येतं.
विजय आणि आसिफ हॉटेलमध्ये गप्पा मारत बसले होते. विजयचा चेहरा बराच उतरलेला पाहून आसिफने त्याला विचारले, ‘काय रे हे विजय? आज का एवढा गुमसुम?’ ‘काय सांगू आसिफ! जगण्यात रामच वाटत नाही बघ!’ विजय खोल आवाजात म्हणाला. ‘म्हणजे काय? झालं तरी काय? चांगली नोकरी आहे, पगारवाढ झालीये, बायको हवी तशीच मिळालेय, बॉस खूश तुझ्यावर, मग काय पाहिजे आणखी?’ आसिफ आश्चर्याने म्हणाला. ‘तेच तर कळत नाही ना राव! तू म्हणतोस ते सगळं १०० टक्के खरंय. बोट ठेवायला जागा नाहीये. आता म्हणशील तर अजून भाडय़ाचंच घर आहे, पण फ्लॅटही बुक केलाच आहे मी. दोघंही कमावतोय, फिटेल लोनसुद्धा. पण तरी..’

‘तरी काय? सुख दुखतंय का यार तुला?’ आसिफनं फटकारलं. सगळे हेच म्हणतात. पण खरंच सांगतो, आसिफ, हे सगळं चांगलंच आहे रे, पण मजा नाही येत यार! सारखी धास्ती वाटते, हे सगळं अचानक बदललं तर? नशिबाचा फटका बसला तर? शिवाय असंही वाटतं की एवढंच आहे का जगणं म्हणजे? खा-प्या-रोजचा दिवस घालवा..सगळं शिळं झाल्यासारखं वाटायला लागतं. कंपनीतली टार्गेट्स काय वरवरची असतात. त्यासाठी आपण टाचा घासतो. त्याचे रिटर्न्‍सही मिळतात. पण असं मनातून छान नाही वाटत रे. सगळं आयुष्य असं पॉझचं बटण दाबल्यासारखं वाटतं. काय करावं उमजत नाही!’ विजयचं बोलणं ऐकूण आसिफ पण गप्प झाला. त्यालाही वाटू लागलं ‘खरंच, आपल्याही डोक्यात हल्ली असे विचार अधूनमधून येतातच, नाही का! म्हणजे आपण ‘दु:खी कष्टी’ नाहीयोत पण खूप आनंदी, उत्साही वाटतं असंही नाही! मग काय आहे हे सगळं? नुसते विचारांचे खेळ? स्वत:ची कोडकौतुकं का स्वत:ची फसवणूक? त्यानं विजयला नुसतं थोपटलं आणि मान डोलावून पावती दिली.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

आसिफ आणि विजयला जे वाटतं, ते आपल्यापैकी अनेकांना वाटतं. मुळात आपल्या खऱ्याखुऱ्या पायाभूत गरजा भागल्यानंतर (अन्न, सुरक्षा, भावनिक उब, किमान जीवनस्थैर्य..) आपल्या जगण्याच्या चढत्या आलेखात एक प्रकारचं पठार आल्यासारखं वाटतं, नाही? मग तो नोकरीत स्थिरस्थावर होऊनही ‘रिकामं’ वाटणारा विजय असेल किंवा नवरा-मुलं-सणवार अशा ‘जमलेल्या’ संसारात रात्री आढय़ाकडे बघत झोप आणण्याचा प्रयत्न करणारी एखादी सानिका असेल! असं रिकामं वाटणं, सुख दुखणं, किंवा अदृष्टाच्या कल्पनेनं व्याकूळ होणं अनेक जणांनी (माझ्यासकट) कधी ना कधी तरी अनुभवलेलं असतं. याचा अर्थ आपलं मन:स्वास्थ हरवलेलं असतं का? तर मुळीच नाही.

आपण गणितात ‘आलेख’ काढलेला आहे. ‘क्ष’ आणि ‘य’ अशा दोन अक्षांना जोडणारा बिंदू म्हणजे शून्य किंवा प्रारंभबिंदू आहे असं आपण समजतो. त्या बिंदूकडून उजवीकडे किंवा वरच्या दिशेला सरकणं म्हणजे एखादी किंमत वाढत जाणं तर तिथून डावीकडे किंवा खालच्या दिशेला सरकणं म्हणजे एखादी किंमत कमी होणं असं आपण शिकतो. त्यामुळे उजवीकडचा वरचा चौकोन म्हणजे सगळ्या बाजूंनी चांगला चौकोन असं मानलं जातं. जसं कुटुंबात मिळणारं स्वातंत्र्य (‘क्ष’ अक्ष) आणि मिळणारं प्रेम (‘य’ अक्ष) दोन्ही एखाद्याला या चौकोनात नेत असेल तर त्या माणसाची कुटुंबातली समाधानाची बाजू भलतीच भक्कम म्हणता येईल. पण कधी कधी यातली एखादी बाजू थोडी लंगडी असू शकते. स्वातंत्र्य आहे पण प्रेम कमी, किंवा प्रेम आहे पण स्वातंत्र्य कमी! अशा वेळी आपण कुठेतरी प्रारंभबिंदूच्या चांगल्या बाजूकडे असतो पण कुठेतरी मागे असतो. त्यामुळे एकप्रकारची विषण्णता, चिडचिड, चिंता अधूनमधून मनाला वेढून राहते. कारण मन:स्वास्थ्य हे एखाद्या लंबकासारखं असतं. एका जागी कधीच स्थिर नसतं. अगदी विसोबा खेचरांवर संतापलेल्या संतशिरोमणी ज्ञानोबा माऊलींनासुद्धा शांत करण्यासाठी मुक्ताबाईला ‘ताटीचे अभंग’ सांगावे लागले होतेच ना!

प्रश्न असा आहे की हे मन:स्थ्याचं हेलकावणं आपण किती होऊ द्यायचं? ते कायम परिस्थितीवर अवलंबून ठेवायचं की आलेखाच्या ‘भक्कम’ चौकोनाकडे जाण्यासाठी स्वत:हून प्रयत्न करायचे? एका अभ्यासकांना तीन हजार लोकांच्या सर्वेक्षणात असं आढळलं की त्यातले ६० टक्के लोक हे सर्वसाधारण मन:स्वास्थ्य असणारे तुमच्या-आमच्या अनेकांसारखे होते. लंबक कधी उजवीकडे झुकणार (प्रमोशन, मुलांची प्रगती, मनासारखा जोडीदार, इतरांचं कौतुक) तर क धी डावीकडे (आजारपण, आर्थिक आव्हान, इतरांशी संघर्ष, आत्मविश्वासाला गळती..)! कधी खूप उत्साही, सकरात्मक तर कधी अगदी चिंतातुर जंतू! साधारण २० टक्के लोक हे मानसिक आजारांना कधी ना कधी बळी पडणारे किंवा पडू शकणारे होते. अशांच्या आयुष्यात त्यांना गडद रंग (मनाचा निस्तेजपणा) जास्त आढळला. ते मनोरुग्ण नव्हते पण अशा एका कडय़ाच्या टोकावर उभे होते की वेळीच कुणाचा आधार मिळाला नाही तर मनोविकाराच्या दरीत के व्हा कोसळतील कोण जाणे! पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे बाकीचे १७-१८ टक्के लोक असे होते की ज्यांचं मन:स्वास्थ्य खूपच दीर्घकाळ टिकलेलं होतं, उत्तरोत्तर वाढणारं होतं. (संतूरच्या जाहिरातीतील ‘संतूर मॉम’ सारखं!) खरोखर या सर्व ‘स्वस्थ’ लोकांच्या चढत्या आलेखाचं रहस्य काय असेल?
आश्वासक मानसशास्त्रातून ‘निरंतर समाधानी/आनंदी आयुष्य’ म्हणजे काय याचा निरंतर शोध घेण्यासाठी खूप मदत मिळते. एखादं यंत्र आपण विकत घेतो आणि वापर वापर वापरतो! अगदी ‘पैसा वसूल’ होण्यासाठी जंग जंग पछाडतो. मग कधीतरी त्या यंत्राला घरघर लागते. मोटार तरी बिघडते, स्क्रू तरी पडतात किंवा पोचे तरी पडतात. मग ते सारखं दुरुस्तीसाठी दुकानात टाकावं लागतं. पण त्याच यंत्राची देखभाल, जर आपण नियमितपणे करत असू तर पाच वर्षांची वॉरंटी असलेलं यंत्र पंधरा-पंधरा र्वषही सहज टिकतं. (माझ्या एका काकूकडे असा तेवीस वर्षे टिकलेला मिक्सर होता. त्याचं एकमेव रहस्य म्हणजे तिचा अत्यंत निगुतीचा वापर!)

मनाचंही अगदी तसंच आहे. त्याला तेलपाणी कसं द्यायचं हे या आश्वासक मानसशास्त्रातून समजून घेता येतं. अर्थात् वेगवेगळ्या संस्कृती आणि पाश्र्वभूमींमध्ये ते वेगळ्या प्रकारे मांडलेलं असतं. अगदी आपल्या रोजच्या भाषेतूनसुद्धा! सहज आठवलं तर मराठीतल्या रोजच्या म्हणी, वाक्प्रचारांमध्येही हे प्रतिबिंबित झालेलं दिसतं. कोंडय़ाचा मांडा करणं, भाव तिथे देव, थेंबे थेंबे तळं साचे, निंदकाचं घर असावं शेजारी, झळाळलं तरच सोनं.. असे कित्येक. आपण ते भाषेचे अलंकार म्हणून पाहतो, तेच आपल्या आयुष्याला लावून पाहिलं तर? आलेखातील चढता रस्ता सापडणं शक्य नाही का?
हे मान्य की ‘चांगलं आयुष्य’ याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असणार. पण त्यातही काही मुद्दे अगदी सामायिक सापडतात. कामन्स या मानसशास्त्रज्ञानं जीवनाची गुणवत्ता मोजणारे सात निकष मांडले आहेत. वस्तू/ उपभोग्य गोष्टींची उपलब्धी, सुरक्षिततेची भावना, आरोग्य संपन्नता, भावनिक समाधान, स्नेहपूर्ण / जवळची नाती, समाजातील स्थान आणि कार्यक्षमता! या सातही निकषांवर आपण आपल्याच जीवनाची सफलता किंवा गुणवत्ता सतत पारखत असतो. इतरांना वरवर दिसणाऱ्या काही विरोधाभासांमागे वेगळंच सत्य लपलेलं असू शकतं. उदाहरणार्थ, नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात असं आढळलं की हिमालयातील ठाण्यांवर नेमणूक झालेल्या सैन्यबलातील लोकांना शहरे/ कारखान्यांमध्ये नेमलेल्या सैन्यबलापेक्षा अनेक गोष्टींत जीवनाची सफलता जास्त वाटत होती.

खरं तर हे सैनिक शहरी भागातल्यापेक्षा कितीतरी खडतर आयुष्य जगत असतात. कुटुंबापासून महिनोन्महिने लांब असतात आणि अशा सतत धोकादायक परिस्थितीतल्या दोन्ही सैन्यदलापेक्षा पोलीस दलातल्या कुटुंबासमवेत राहणाऱ्या लोकांना त्यांची स्वत:ची जगण्याची गुणवत्ता खूपच कमी वाटत होती. (म्हणजे ‘पुरुषांना’ आयुष्यात समाधानी वाटण्यासाठी ‘कुटुंब’ जितक्या लांब असेल तेवढं बरं असाही एक तिरकस अर्थ काढला जाऊ शकतो! अर्थात् माझं दुमत आहे त्याच्याशी!) अशा मजेदार निष्कर्षांचं स्पष्टीकरण मिळतं ते ‘व्यक्तिमत्त्वांच्या’ अभ्यासांमधून. व्यक्तिमत्त्वाच्या अनेक पैलूंपैकी ‘बहिर्मुखता’ किंवा बोलण्या-चालण्यातला मोकळेढाकळेपणा खुल्या दिलानं संपर्क करण्याची वृत्ती मानसिक आरोग्यासाठी लाभदायक आढळली आहे, तर अतिसंवेदनशील, भावनिक हेलकावे खाण्याची वृत्ती ही मारक आहे असं दिसतं. म्हणजे आपला मनारोग्याचा आलेख चढता ठेवायचा असेल तर याचा विचार करायलाच हवा.

अमितला बऱ्याचदा चिंतेनं ग्रासून टाकलेलं असायचं. गोष्टी असायच्या छोटय़ाशाच- जसं कलीला- त्याच्या मुलीला हव्या त्या शाळेत अ‍ॅडमिशन न मिळणं, त्याच्या बॉसचा एखादा नाराजीचा ई-मेल येणं, संध्याकाळी शाल्मलीला ऑफिसमधून यायला थोडासा उशीर होणं- की झालं! अमितला घाबरायला व्हायचं, धडधड वाढायची! शेवटी कंटाळून त्यानं मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला घेतला. बोलता बोलता लक्षात आलं की अमितच्या वडिलांनाही असा त्रास व्हायचा. ते एकदम टेन्शनमध्ये यायचे आणि चक्कर येऊन पडायचे. ती भावनिक अस्वस्थता काही प्रमाणात आनुवंशातून आणि काही प्रमाणात लहानपणापासून ते पाहून पाहून अमितमध्ये उतरली होती. शेवटी कळवळून अमित म्हणाला, ‘डॉक्टर मग मी आयुष्यभर असा घाबरट ससाच राहाणार का हो? मला कळतंय की हे वाटणं फार मूर्खासारखं आहे, मला ते टाळायचंय; पण जर माझ्यामध्ये वरूनच आलं असेल तर काय करायचं?

मानसोपचारतज्ज्ञ हसून म्हणाल्या, ‘अमित. अरे, मान्य आहे की काही गुणांची शक्यता आनुवंशामुळे वाढते, पण प्रयत्नांनी कितीतरी प्रमाणात स्वभाव मुरडता येतो, बदलता येतो. असं म्हणू या की तुमची आनंदी वृत्ती ५० टक्के ठरते, तुमच्या आनुवंशामुळे, दहा टक्के ठरते परिस्थितीमुळे तर ४० टक्के ठरते जाणीवपूर्वक केलेल्या विचारांमुळे आणि कृतीमुळे! आणि हे मी म्हणत नाही तर जगभरातलं संशोधन असं सांगतंय. बघ तुला सुधारणा करायला चाळीस टक्के मार्जिन आहे. काय म्हणतोस मग? जमवशील ना बदल करणं?’ अमित जरा अनिश्चित होता पण त्यानं निश्चय केला आणि छोटय़ा छोटय़ा युक्त्यांमधून, सवयी बाणवून स्वत:चा ‘चिंतातूर’ स्वभाव आटोक्यात आणला. ‘अस्वस्थ होणं’ पूर्ण गेलं नाही पण ती अस्वस्थता कमी वेळा, कमी तीव्रतेनं जाणवण्याइतकी प्रगती झाली. ‘आनंदी कावळ्याची’ गोष्ट आठवली ना? त्याचे कपडे चढवायचे ठरवले तरी ‘बरं वाटण्याची’ प्रक्रिया जलद होते. आपला आलेख शून्यापासून हळूहळू टॉपच्या चौकोनात वरवर चढू लागतो. मानसोपचारतज्ज्ञांनी अमितला त्यासाठी तीन गुरुकिल्ल्या सांगितल्या. एक म्हणजे आनंदाच्या अनुभवांचा बँक बॅलन्स वाढवणं, स्वत:ला गुंतवून ठेवणाऱ्या नवं क्षितिज दाखवणाऱ्या कामांत गुंतवून घेणं आणि आयुष्य अधिकाधिक अर्थपूर्ण बनवणं.

जेव्हा आपल्या व्यक्तिमत्त्वाला अनुरूप असणारी उद्दिष्ट आपण स्वत:हून ठरवतो तेव्हा ती कशी गाठायची याचा प्लॅनही मनात आपसूकच तयार व्हायला लागतो. त्यामुळे ती गाठण्याचा आनंद दामदुपटीने मिळतो. विश्वासची सवय प्रत्येक गोष्ट पूर्वनियोजन करूनच अमलात आणण्याची, तर नमिताला उत्स्फूर्तता जास्त भावणारी. ‘आपल्याला’ काय भावतं आणि जमतं हे निश्चित जोखता आल्यामुळे त्यांना इतरांबरोबरच्या तुलनेमुळे येणारे ताण कमी झाले. ऑफिसच्या शक्य नसल्या तरी घरच्या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांनी स्वभावाला अनुरूप कामं आपसूकपणे अंगावर घेतली. त्याचा परिणाम त्यांचं समाधान वाढवण्यात तर झालाच पण एकमेकांसोबतचं नातं अजून दृढ झालं. ‘जवळीक’ हीसुद्धा चढत्या आलेखाची आवश्यक शिदोरी आहेच ना! एखाद्या बागेला जपताना, फुलवताना जशी निगुतीनं देखभाल करावी लागते. माती सारखी करणं, तण काढणं, आवश्यक तेवढंच पाणी वेळेवारी देणं, कीड पडू नये म्हणून जपणं आणि पडलीच तर आटोक्यात यायला औषधं वापरणं.. असं कितीतरी सारखं करावं लागतं. नात्याचंही तसंच आहे. समाधानाचा किंवा आनंदाचा आलेख ‘नो प्रॉफिट नो लॉस’च्या पातळीवरून ‘प्रॉफिट मेकिंग बिझनेस’कडे न्यायचा असेल तर नात्यांच्या बागेची एकदा व्यवस्था लावून कृतकृत्य न होता सतत त्याची देखभाल करणं गरजेचं आहे ना?

आपण चढत्या आलेखाचे प्रवासी बनू शकतो का हे पाहण्यासाठी जरा या प्रश्नांची उत्तरं परखडपणे स्वत:लाच देऊन पाहा –
* मी कालच्यापेक्षा आज जास्त कृतिशील बनत आहे ना?
* माझी निर्मितीची, कार्यक्षमतेची कमान उंचावण्याचा प्रयत्न करत आहे ना?
* इतरांबरोबरचं नातं दृढ होण्यासाठी त्यांची वाट न बघता मी पुढाकार घेत आहे ना?
* माझ्या दैनंदिन कामात जास्त नेटकेपणा, सुनियोजितपणा आणण्याची धडपड होतेय ना?
* वृथा चिंता करण्याची उबळ रोखता येत आहे ना?
* अपेक्षाचं हट्टांमध्ये/अट्टहासांमध्ये रूपांतर होत नाहीये ना?
* काहीतरी चांगलं घडेलच’ यावरचा विश्वास घट्ट होण्यासाठी मी मनाला शिकवत आहे ना?
* भूतकाळ उकरणं किंवा भविष्यातल्या अनिश्चिततेला घाबरणं यापेक्षा आजचं भान वाढवण्याचं महत्त्व कळतंय ना?
* नियमित व्यायाम, स्वनियंत्रणाच्या छोटय़ा छोटय़ा संधी आपणहून घेत आहे ना?
* मी जसा/ जशी आहे तसं स्वत:ला स्वीकारून-गंडांतून बाहेर पडून मग बदल करत आहे ना?
* जवळिकीची नाती फुटकळ कारणांवरून पणाला लावत नाही ना?
* जगण्याचं समाधान घेणं आणि देणं’ हीच माझ्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची गोष्ट आहे, हे मी स्वीकारलंय ना?
या प्रश्नांची उत्तरं कायम ‘पूर्ण होकारार्थी’ नसतीलही कदाचित पण ती जेवढी जास्त ‘हो’ – ‘नेहमी’कडे झुकतील तेवढा आपला समाधान आलेख चढता राहील. निव्वळ ‘न्यूट्रल’ स्थितीकडून आपण अधिक टिकणाऱ्या आनंदाच्या ओवरीत जास्त काळ टिकून राहू असं नक्की वाटतं.
डॉ. अनघा लवळेकर – anagha.lavalekar@jnanaprabodhini.org

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व आजचे पसायदान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article about happiness and life satisfaction

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×