रिकामं वाटणं, सुख दुखणं किंवा अदृष्टाच्या कल्पनेनं व्याकूळ होणं अनेक जणांनी कधी ना कधी तरी अनुभवलेलं असतं. हे वाटणं बदलून ‘निरंतर समाधानी,आनंदी आयुष्य’ म्हणजे काय याचा निरंतर शोध घेण्यासाठी आश्वासक मानसशास्त्रातून खूप मदत मिळते. मनाला तेलपाणी कसं द्यायचं हे यातून समजून घेता येतं.
विजय आणि आसिफ हॉटेलमध्ये गप्पा मारत बसले होते. विजयचा चेहरा बराच उतरलेला पाहून आसिफने त्याला विचारले, ‘काय रे हे विजय? आज का एवढा गुमसुम?’ ‘काय सांगू आसिफ! जगण्यात रामच वाटत नाही बघ!’ विजय खोल आवाजात म्हणाला. ‘म्हणजे काय? झालं तरी काय? चांगली नोकरी आहे, पगारवाढ झालीये, बायको हवी तशीच मिळालेय, बॉस खूश तुझ्यावर, मग काय पाहिजे आणखी?’ आसिफ आश्चर्याने म्हणाला. ‘तेच तर कळत नाही ना राव! तू म्हणतोस ते सगळं १०० टक्के खरंय. बोट ठेवायला जागा नाहीये. आता म्हणशील तर अजून भाडय़ाचंच घर आहे, पण फ्लॅटही बुक केलाच आहे मी. दोघंही कमावतोय, फिटेल लोनसुद्धा. पण तरी..’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘तरी काय? सुख दुखतंय का यार तुला?’ आसिफनं फटकारलं. सगळे हेच म्हणतात. पण खरंच सांगतो, आसिफ, हे सगळं चांगलंच आहे रे, पण मजा नाही येत यार! सारखी धास्ती वाटते, हे सगळं अचानक बदललं तर? नशिबाचा फटका बसला तर? शिवाय असंही वाटतं की एवढंच आहे का जगणं म्हणजे? खा-प्या-रोजचा दिवस घालवा..सगळं शिळं झाल्यासारखं वाटायला लागतं. कंपनीतली टार्गेट्स काय वरवरची असतात. त्यासाठी आपण टाचा घासतो. त्याचे रिटर्न्‍सही मिळतात. पण असं मनातून छान नाही वाटत रे. सगळं आयुष्य असं पॉझचं बटण दाबल्यासारखं वाटतं. काय करावं उमजत नाही!’ विजयचं बोलणं ऐकूण आसिफ पण गप्प झाला. त्यालाही वाटू लागलं ‘खरंच, आपल्याही डोक्यात हल्ली असे विचार अधूनमधून येतातच, नाही का! म्हणजे आपण ‘दु:खी कष्टी’ नाहीयोत पण खूप आनंदी, उत्साही वाटतं असंही नाही! मग काय आहे हे सगळं? नुसते विचारांचे खेळ? स्वत:ची कोडकौतुकं का स्वत:ची फसवणूक? त्यानं विजयला नुसतं थोपटलं आणि मान डोलावून पावती दिली.

More Stories onआनंदHappiness
मराठीतील सर्व आजचे पसायदान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about happiness and life satisfaction
First published on: 24-10-2015 at 01:01 IST