नीरजा

‘हजारो कविता लिहिल्यात कवींनी आमच्यावर. पण तरीही काहीच परिणाम होत नाही कोणावर. ‘भुंडं टेकाड’ करून टाकलंय विकासाच्या नावाखाली या पृथ्वीचं आणि कोणाला काहीच फरक पडत नाही आता. मग चिडतो हा निसर्ग. उलथापालथ करतो आयुष्याची.  रडू येतं तुम्हाला स्वत:च्या उद्ध्वस्त आयुष्याच्या कहाण्या सांगताना. आमच्या उद्ध्वस्ततेच्या कथा मात्र सहज विसरून जाता. तुम्ही नाळ तोडलीय तुमची या जमिनीशी जुळलेली..’

माणसं कापू शकतात माणसांना तर झाडांचं

काय घेऊन बसलात राव.

पाखरांचे पंख छाटले जातात हसत हसत

तर सहज रचू शकतात ते कट

झाडांच्या पानांचं हिरवेपण संपवण्याचा.

मी बदलू का रंग माझा?

करू का केसरिया भगवा

किंवा पांढरा शुभ्र गाईच्या

फेसाळणाऱ्या दुधासारखा?

माझ्यावर रोखलेल्या कुऱ्हाडीच्या पात्याला

पुरवून दांडा माझ्या खोडाचा

करू का प्रवेश त्यांच्या गोटात?

काय केलं तर थांबवतील ते हा संहार?

कोणत्या झाडाच्या पानांतून आवाज येतो आहे हा? कोण म्हणतंय ही कविता? तशी फारशी नाही कळत मला कविताबिविता. पण हल्ली ही नवी पाखरं बसायला लागली आहेत फांद्यांवर. ती गातात अधूनमधून कसलं तरी पर्यावरण संवर्धनाचं गाणं. जाता जाता कोरतात माझ्या पानांवर अश्रूंनी ओथंबलेलं गीत. पसरतात शब्दांची चादर आणि झोपवतात मला अंगाई म्हणून.

शब्दांचा अर्थ कळत नव्हता फारसा पूर्वी. नवाच जन्म माझा. असेन अगदी तरुण या पोरांएवढा किंवा लहानही त्यांच्यापेक्षा. डेरेदार वृक्ष होण्याच्या प्रतीक्षेत आहे कधीपासून. पण अलीकडे भीती वाटते वाढण्याचीही. वाढता वाढताच संपून गेलो कायमचा तर? कधी, कोणत्या वेळी घाव बसेल आणि वाहतील रक्ताचे ओघळ काहीच सांगता येत नाही. अलीकडे कोणत्याही नगरपालिकेत किंवा विधानसभेत किंवा अगदी लोकसभेतही घेतले जातात एकमताने निर्णय माणसांना पडलेल्या जगण्याच्या विवंचनाच संपवण्याचे. ‘ब्रेड परवडत नसेल तर केक खा,’ म्हणणाऱ्यांची परंपरा आहे या विश्वाला, तुमचा वंश नकोसा झाला असेल तर तो संपवण्याचीही प्रथा आहेच सार्वकालीन आणि सार्वत्रिक. कदाचित आमचाही वंश नकोसा झाला असेल या सिमेंट काँक्रिटच्या जंगलांच्या राजांना. त्यांच्या विकासामध्ये येणाऱ्या हिरवाईला कोंबतील ते गॅस चेंबरमध्ये आणि एका झटक्यात मारतीलही तिला.

या शहरांवर आदळणाऱ्या माणसांच्या गर्दीला कमी पडायला लागलेत रस्ते, रूळ, गाडय़ा, लोकल्स. त्यांच्या वाहनांची सोय करायला हवीच ना. शेवटी त्यांचं जगणं महत्त्वाचंच. हे कळत होतंच आम्हाला आणि त्यासाठी अनेकदा झेललीही आहे कुऱ्हाड. तरीही आशा वाटायची अधूनमधून अशा परिस्थितीतही तगण्याची. कारण सोबत होते काही संवेदनशील लोक, आमच्यावर प्रेम करणारे, आम्हाला जपू पाहणारे, आमच्यासाठी आंदोलनं करणारे. पण आंदोलकांचं काय हो, ते सहज चिरडले जातात कोणत्याही देशात, कोणत्याही शहरात. बंदिवान करून चौकीत ठेवलं जातं सगळ्यांना. लाठय़ाकाठय़ा झेलणाऱ्या पोरापोरींना उद्या कोंबलं पोलीस व्हॅनमध्ये आणि केला दाखल गुन्हा त्यांच्यावर तर कोण ऐकणार आहे त्यांचा आक्रोश? आपली माध्यमं तर नवरात्रोत्सवाचे नऊ दिवस देवीला कसं पुजलं जातं आपल्या संस्कृतीत हे दाखवण्यात मग्न आहे. पूजा करताहेत देवीची, पण या भूमातेच्या सर्जनाचे स्रोतच बंद करण्याचा घाट घातला जातो आहे कित्येक वर्ष त्याविषयी नाही सांगत काहीच इथल्या माणसांना.

हिरव्या रंगाचे कपडे घालून आणि छायाचित्रं काढून वर्तमानपत्राच्या पानावर मिरवणाऱ्या या सृजनाच्या शक्तींना माहीत नाही का हिरवाईचा अर्थ? तो जोडलाय त्यांच्या गर्भाशयातल्या पाण्यात वाढणाऱ्या नव्या जन्माशी हे कळायला हवं त्यांना. त्या अशाच खेळत राहिल्या गरबा सरकारच्या तालावर तर कायमचा निघून जाईल हा हिरवा रंग त्यांच्या आयुष्यातून आणि ल्यावा लागेल त्यांना कायमचा काळ्या पत्थराचा करडा रंग. श्वास कमी पडतील त्यांच्या लेकरांना. तेव्हा कुठल्या गाण्यावर खेळणार आहेत त्या हा नवरंगांचा गरबा? आमचे आजेपणजे अजूनही उभे होते इथं ताठ मानेनं. सांगायचे किती वर्ष जुने आहोत आम्ही ते. पण असला अभिमान बाळगून काही उपयोग होत नाही हे कळायला लागलंय त्यांना आता. माणसाच्या मनात आलं तुमचं आयुष्य संपवायचं की संपलात तुम्ही.

ते दिलीप चित्रे नावाचे कवी किती अस्वस्थ झाले होते त्यांच्या वडिलांनी वडाचं झाड तोडलं तेव्हा. आपलं दु:ख सार्वत्रिक करण्यासाठी केवळ मराठीतच नाही तर इंग्रजीतही कविता लिहिली त्यावर आणि वर वडिलांच्या या कृत्याचा जाबही विचारला. जाब विचारण्याची परंपरा आहेच आपली. म्हणून तर म्हणाले ते,

तुम्ही प्लॉट पाडून जमीन विकण्यासाठी

माझा लहानपणापासूनचा वड तोडलात

कुऱ्हाडवाले मजूर लावून, औदुंबर तोडला,

लिंब, डाळिंब, शेवगा, प्राजक्त तोडला.

मग मला शहरात शिकायला पाठवलं..

..नंतर संस्कृतीसाठी बलिदान

करण्याच्या जिद्दीनं

आम्हा सर्वाच्या जन्माभोवतीची झाडी तोडून

आठवणीत ठेवलं एक भुंडं टेकाड.

मी उलटा फिरलो तर काय झालं

मीच शोधत राहिलो मुळं आणि पारंब्या जगभर

मला पाहिजे होतं स्वत:भोवती दाट अरण्य

आणि किडामुंग्यांशी, पशुपक्ष्यांशी,

माणसांशी नाती

एका भुंडय़ा टेकाडासारख्या समाजात

मी कवी झालो. (एकूण कविता- १)

सर्जनाचे स्रोत आटलेल्या, बथ्थड झालेल्या या समाजात सर्जनाविषयी कसं बोलणार कोणताही कवी. मग बिचारा लिहित राहतो झाडांवर कविता. हजारो कविता लिहिल्यात या कवींनी आमच्यावर. पण तरीही काहीच परिणाम होत नाही कोणावर. ‘भुंडं टेकाड’ करून टाकलंय विकासाच्या नावाखाली या पृथ्वीचं आणि कोणाला काहीच फरक पडत नाही आता. मग चिडतो हा निसर्ग. कोसळतो पाऊस अनावर. उलथापालथ करतो आयुष्याची. रडू येतं तुम्हाला स्वत:च्या उद्ध्वस्त आयुष्याच्या कहाण्या सांगताना. आमच्या उद्ध्वस्ततेच्या कथा मात्र सहज विसरून जाता. तुम्ही नाळ तोडलीय तुमची या जमिनीशी जुळलेली. तिच्यातल्या सृजनाच्या शक्यता काढून घेतल्यावर तुम्ही निघाला आहात निसर्गाच्या शोधात ट्रॅव्हल कंपनीबरोबर दुसऱ्या कोणत्या तरी देशातला निसर्ग पाहायला.

तुम्ही खुशाल, मग्न. पैसे खर्च करून पाहिलेल्या निसर्गात शोधता आहात तुमच्या आनंदाचा इंडेक्स. निसर्ग जपून ठेवलात तर आपोआपच वाढत जातो तो हे लक्षात कसं येत नाही तुमच्या. तुमचे आनंद बिल्डरने काढलेल्या सौंदर्यपूर्ण घराच्या चित्रांमध्ये कोंडलेत तुम्ही. बाहेरच्या नैसर्गिक तलावापेक्षा स्विमिंगपूल असलेला कॉम्प्लेक्स आवडू लागलाय तुम्हाला. आमच्या कुशीत येऊन फेरफटका मारण्यापेक्षा जॉगिंग ट्रॅकचा मोह अनावर होतोय तुम्हाला. वसंत आबाजी डहाके नावाचे एक कवी आहेत. कदाचित माहीतही नसतील तुम्हाला. कारण सृजनाशी संबंधच तुटला आहे तुमचा. कविता आनंद देते तसा विचारही करायला लावते राव. पण विचार करण्यापेक्षा ‘शांताबाई’च्या तालावर गरबा खेळणं अधिक सोपं. एकदा वाचा त्यांनी झाडावर लिहिलेल्या कविता. म्हणजे कळेल आमच्यावर घाव घालून काय काय गमावणार आहात तुम्ही ते. एका कवितेत ते म्हणालेत,

सतत फळ देणाऱ्या झाडावर

एकदम हल्ला करणं,

म्हणजे स्वत:लाच कोंडून ठेवून

मांजरासारखं रडणं

हे मला, तुला समजतं.

पण झाडं / घरं जाळणाऱ्यांच्या मध्ये

अशी एक चीर उत्पन्न होते,

निर्मिती आणि संहारामधली,

आणि ती उन्मादतात, आक्रंदतात

आणि रडू लागतात माणसासारखी.

स्वार्थ साधणाऱ्यांची नाटकी रडणी

आणि तुझ्यामाझ्यासारख्यांचे

अंत:करणातले उद्गार

सगळे एकच वाटायला लागतात

..आपण काही थांबवू शकत नाही,

म्हणजे आपण मेलेलेच आहोत.

हाच आपला बचावाचा मुद्दा.

हा मुद्दा कुठपर्यंत टिकणार आहे?

(चित्रलिपी)

कोणत्याही काळातलं सत्य सांगणारी ही कविता आजही खरी वाटावी अशीच. कवी द्रष्टा असतो असं म्हणतात ते काही उगाच नाही. सगळी नाटकी रडणी चालू आहेत आजूबाजूला. ‘होऊन जाऊदेत निवडणुका, मग पाहतोच एकेकाला.’ अरे पण तोवर आमचं तेरावं नाहीतर श्राद्धही पार पडले असेल राव. तेव्हा काय गोडाधोडाचं खायला येणार काय?

मनात धाकधूक घेऊन जगायचं म्हणजे काय असतं त्याचा अनुभव तुम्हा शहरातल्या लोकांना नवा नाही. कधी कोण कसाब येईल आणि बंदुकीच्या फैरीनं नाहीतर बॉम्बस्फोटानं उद्ध्वस्त करेल आयुष्य याचं दडपण तुम्हालाही आहेच. आम्हीही त्यातूनच जातो आहोत युगानुयुगे. कधी कोण येईल आणि कुऱ्हाडीचं पातं बुडाला लावेल याचा नेम नसण्याच्या काळात जगायचं कसं झाडांनी या विचारानं अस्वस्थ होत असतो रोज. त्या रात्रीही असेच अस्वस्थ होतो आम्ही. या माणसांच्या विकासासाठी वेळ आली धारातीर्थी पडण्याची तर पडूया असाही विचार येत होता मनात. दिवसभर माणसांच्या श्वासात ऑक्सिजन भरून फुप्फुसात भरून घेतलेला कार्बन डाय ऑक्साइड सोडून जिवंत होत होतो परतत्या रात्री. गच्च अंधार पसरला होता. आभाळात कुठंतरी ढग विखुरले असले तरी दिसत होत्या चांदण्या. दिवसभर पिलांसाठी वणवण करून चारापाणी आणणारी पाखरं विसावली होती आमच्या वळचणीला. आणि अचानक कुठल्या कुठल्या आकृत्या दिसायला लागल्या.

आमच्यावर नंबर तर टाकले होतेच त्यांनी. ते इंग्रजीत म्हणतात ना ‘यू आर नम्बर्ड.’ तसंच. फक्त कधी नंबर येतो त्याची वाट पाहात होतो. तर हे आले अचानक. पण चोरासारखे. न्यायालयानं निकाल दिल्याबरोबर एका रात्रीत चढवायचं होतं त्यांना आम्हाला फासावर. अहो, फासावर जाणाऱ्या माणसालादेखील राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करता येतो. पण आम्हाला नाही दिली संधी. आला विकासाचा फाळ. घुसला अरण्यात आणि कत्तल करत गेला एकामागे एक झाडांची. उन्मळून पडत गेले आमचे पुराणपुरुष. शेकडो वर्ष वयाच्या झाडांपासून कोवळ्या मिसरूड फुटलेल्या पोरांपर्यंत सारे भुईसपाट झाले. जाताना ओरडत होती आमची पोरं संतापानं. म्हणाली, ‘‘आता घर मिळेल त्या मेट्रोला. उद्या आणखी कोणाच्या घरासाठी तुमच्यावरही नंबर टाकणार हे विसरू नका. बंद करा ऑक्सिजन कायमचा या लोकांचा. सोडत राहा रात्रंदिवस केवळ कार्बन डाय ऑक्साइड. त्याशिवाय नाही कळणार यांना जगण्याची किंमत.’’

त्या क्षणी सरणावर जाता जाता चिडले होते सारेच आणि साहजिकही होतं ते. खरंच नव्हतं कळत काहीच या आयटीसेलनं तयार केलेल्या इतिहासभूगोलावर वाढलेल्या या हिशेबी आणि आंधळ्या भक्तीत तल्लीन झालेल्या लोकांना. म्हणून तर दुसऱ्या दिवशी समाजमाध्यमांवरून , ‘लवासा झालं, मुंबईचं काँक्रिटचं जंगल झालं, तेव्हा हे पर्यावरणवादी कुठं होते?’ असे प्रश्न विचारत होते ते. यांना कसं माहीत असणार, की जेव्हा जेव्हा विस्थापित केलं आम्हाला तेव्हा तेव्हा पक्ष आणि सरकार न पाहता आंदोलनं केली आहेत या न्यायासाठी लढणाऱ्या लोकांनी. कोणत्याही सरकार किंवा पक्षाबरोबर उभी नाही राहिली ही माणसं. ती कायम उभी राहिली कोणत्याही प्रकारच्या शोषणाविरोधात. करत राहिली आंदोलनं आणि क्रांत्या. शोषणावर आधारलेल्या विकासाची जाहिरात होत असतेच, पण शोषणाविरोधात लढणाऱ्यांविषयी नाही बोलत हा समाज फारसं. पण आम्ही नाही विसरणार त्यांचे उपकार. आमच्यासाठी तळमळणाऱ्या या पोरांसाठी आम्हीही लढत राहू. जिवंत राहून फुंकत राहू त्यांच्या प्राणात श्वास. ते जगले तरच आम्ही जगणार आहोत हेही माहीत आहे आम्हाला.

जगाचा, त्यात घडणाऱ्या गोष्टींचा, सतत विचार करतात ही पोरं. काय काय वाचतात आणि चर्चा करत राहतात आमच्या बुंध्याजवळ बसून. या सगळ्या कविता त्यांच्याकडूनच ऐकल्या आम्ही. अगदी मागच्या आठवडय़ात माझ्याच बुंध्याखाली उपोषणाला बसलेल्या या पोरांतला एकजण कोणा जोसे सारामागोविषयी आणि त्यानं लिहिलेल्या कांदबरीविषयी बोलत होता काहीतरी. त्यानं म्हणे एक कादंबरी लिहलीय, ‘द  इअर ऑफ द डेथ ऑफ रिकाल्डो रिस.’ असंच काहीतरी नाव होतं त्या कादंबरीचं. त्यात म्हणे दुसऱ्या महायुद्धाच्या आधीचा, म्हणजे १९३६ चा पोर्तुगालमधला काळ चितारलाय लेखकानं.

युरोपातील काही देशांत राष्ट्रवाद प्रबळ होण्याची सुरुवात होण्याच्या, सैन्याचं उदात्तीकरण करण्याच्या, फॅसिस्ट शक्तींना बळ मिळण्याच्या त्या काळात वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या या समाजात प्रत्यक्ष घडणाऱ्या घटनांविषयी क्वचितच असायच्या. सरकारला ज्या बातम्या याव्याशा वाटत होत्या तेवढय़ाच येत होत्या. एवढंच नाही, तर वर्तमानपत्र बातम्यांनी कमी आणि करमणुकीच्या कार्यक्रमाच्या जाहिरातींनी जास्त भरलेली होती म्हणे. करमणुकीच्या कार्यक्रमांना एवढं उधाण आलं होतं, की आजूबाजूला काय चाललं आहे याचे आवाजच लोकांपर्यंत पोचत नव्हते असंही या कादंबरीत लेखकानं सांगितल्याचं तो दाढीवाला मुलगा त्याच्या बाकीच्या मित्रांना सांगत होता.

आजपण तसंच झालं आहे का? आमचे, या पोरांचे आवाज पोचत नाहीत का लोकांपर्यंत? आज चोवीस तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या नेमक्या कोणत्या बातम्या देताहेत हा प्रश्न आम्हालाही पडला आहे. करमणुकीला काय कमी आहे आता? मालिका, वेबमालिकांपासून ते यूटय़ूब, टिकटॉक आणि काय काय सेवेला हजर आहे. ‘हसता आहात ना हसत राहा.’ म्हणणाऱ्या लोकांची हवा चालू असल्यानं लोक फक्त हसताहेत हेही दिसतंय. तिकडे अमेझॉनच्या जंगलात वणवा पसरला आहे असं लोकांना सांगितलं तर हसतात ते. त्यांना सांगितलं समृद्धीसाठी अदिवासींच्या जमिनी जाताहेत तर ते हसताहेत. त्यांना सांगितलं तुमच्या प्रवासाची सोय व्हावी म्हणून आम्हाला कापताहेत तर ते आणखी जोरात हसताहेत. कारण त्यांना सांगितलं आहे तुमचा आनंदाचा स्तर वाढवत राहा आणि तो वाढेल हसलात तरच. त्यासाठी हसताय ना मंडळी? हसायलाच हवं.

neerajan90@yahoo.co.in

chaturang@expressindia.com