scorecardresearch

अजून खूप काळ जावा लागेल..

अपेक्षेप्रमाणे अनेक स्त्रियांनी आपली मतं मांडली त्याप्रमाणे काही पुरुषांनीही आपली मतं अगदी टोकाच्या विरोधासह मांडली.

lekh1 housewife

संपदा वागळे

आरती कदम यांच्या ‘बाई तुझं चुकलंच?’ या ७ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या लेखाला वाचकांनी भरघोस प्रतिसाद दिला. अपेक्षेप्रमाणे अनेक स्त्रियांनी आपली मतं मांडली त्याप्रमाणे काही पुरुषांनीही आपली मतं अगदी टोकाच्या विरोधासह मांडली. या सर्वामध्ये एक गोष्ट समान होती, ती म्हणजे स्त्री आणि घरकाम या बाबतीत घराघरात बदल घडण्यासाठी अजून खूप काळ जावा लागेल याची स्वीकृती. काही वाचकांनी त्याचं विश्लेषण करताना पुन्हा एकदा पुरुषप्रधान संस्कृती आणि लहानपणापासून घरातूनच मिळालेले संस्कार याला दोष दिला आहे. काही प्रतिक्रिया खूपच विचार करून संदर्भानिशी दिल्या आहेत. काहींनी स्वत:च्या घरातले असमानतेचे दाखले दिले आहेत. काही पत्रं तर खूप दीर्घ होती. सर्वाच्या पत्रांचा समावेश करता येणं शक्य नसल्यानं संपादित पत्रं प्रसिद्ध करीत आहोत. या लेखामुळे काहींच्या घरात जरी सकारात्मक बदल झाला तरी लेख प्रसिद्ध केल्याचं सार्थक होईल.

आरती कदम यांनी, बाई तुझं चुकलंच?! हा अतिशय मनातले मनापासून लिहिलेला लेख लिहून मला माझी मत व्यक्त करायला प्रवृत्त केले. मी एक सेवानिवृत्त शिक्षिका आहे. मला आलेले अनुभव अतिशय वेगळे आहेत. माझे वडील स्वातंत्र्यसेनानी होते. आम्ही चार भावंडे. तरी वडिलांनी माझ्या आईला पुढे शिकवण्याचा निर्णय घेतला. आई रात्रीच्या शाळेत जायची आणि वडिलांना पहिल्यापासूनच स्वावलंबनाची सवय असल्याने ते स्वयंपाक स्वत: करायचे. माझ्या आईला अगदी वाल सोलण्यापासून सर्व मदत करायचे. त्यांनी पुढे आईला नर्सिग कोर्सला पाठवून नोकरीला लावले आणि स्वत: च्या पायावर उभे केले. मलाही माझा नवरा सर्वतोपरी मदत करणारा मिळाला. सासूबाई मला म्हणाल्या, तू खूप नशीबवान आहेस. तुझ्या नवऱ्याला सर्व स्वयंपाक येतो. पोळय़ा सोडून तुझे काहीही अडणार नाही. अगदी तसेच झाले आहे. आता माझा मुलगाही स्वावलंबी आहे. त्यालासुद्धा स्वयंपाक करण्याची मनापासून सवय आणि आवड आहे. ते दोघेही नोकरी करत असल्याने एकमेकांना मदत करतात. हा बदल खूप चांगला आहे.    

– आशा बुरसे

आरती कदम यांचा ‘बाई तुझं चुकलंच?’ हा लेख वाचल्यानंतर २ गोष्टींची फार प्रकर्षांनं आठवण आली. छाया दातार यांच्या ‘जीवनसंवर्धन’ विषयक विश्लेषणाची आणि दुसरी- ‘व्हाय आय वॉन्ट अ वाइफ?’ हा  स्त्रियांच्या समानतेच्या हक्काच्या लढय़ातल्या भाषणाचा एक भाग म्हणून जुडी ब्रॅडी या अमेरिकी स्त्रीवादी लेखिकेनं लिहिलेल्या निबंधाची, ज्याला आज साधारण ५० पेक्षा जास्त वर्ष झाली आहेत तरी ट्विंकल खन्नासारख्या स्त्रीला अजूनही हा मुद्दा भेडसावत आहे. त्यामुळे या दोन बाबी नक्की होतात. एक- ब्रॅडी यांचे विचार, लिखाण कालातीत आहेत आणि दुसरं याचंच दु:ख आहे की ते कालातीत ठरत आहे.

 ब्रॅडी लिहितात, घरकाम हे जरी स्त्रियांकडे आपसूक येत असलं तरी जेव्हा ‘इक्वलिब्रम’  (Equilibriuml) किंवा समतोल ढासळला जातो तेव्हा नव्यानं विचार होणं गरजेचं आहे. हा निबंध मुळातूनच वाचायला हवा. बाई काय काय करते आणि तिला बायको का हवी, याचं विस्तृत वर्णन यात आहे. डॉ. छाया दातार यांच्या मते, ‘जीवनसंवर्धन’ या शीर्षकाखाली मुख्यत: स्त्रियांची अनेक कामं चालतात. जगातील श्रमतासांची जेव्हा गणना केली तेव्हा असं लक्षात आलं, की एकूण शंभर तास धरले तर ६६ तास स्त्रिया काम करतात आणि पुरुष केवळ ३४ तास श्रम करतात. असं असूनही कोणत्याही अर्थशास्त्रज्ञाला, मार्क्‍सवादी दृष्टीलाही केवळ ‘उत्पादन क्षेत्र’, त्यात होणारे बदल आणि त्याचा समाजव्यवस्थेच्या गतिविधीवर होणारा परिणाम याचा विचार करावासा वाटला आणि ‘जीवन संवर्धनाचं’ महत्त्वाचं क्षेत्र कोणत्याही शास्त्रीय विश्लेषणाच्या बाहेरच ठेवले गेलं. ‘स्त्री पुरुष तुलना’मध्ये ताराबाई शिंदे यांनी तर पुरुषप्रधानतेचा किती खरपूस समाचार घेतला ते सर्वाना माहीत आहेच. नवीन पिढी खूप सकारात्मक आहे. अनेक चांगले बदल ते आपल्या जीवनशैलीत करीत आहेत, पण अजूनही मार्ग/ अंतर बरंच कापायचं आहे. तोपर्यंत मलाही एखादी पत्नी शोधायची आहे! 

–  डिंपल मापारी, अकोला</p>

‘बाई तुझं चुकलंच ! ’ हा लेख वाचत असताना काही लेखिका आणि त्यांची प्रसिद्ध वाक्य डोक्यात फेर धरून नाचत होती. पहिलं, One is not born, but rather becomes a woman.

(Simone de Beauvoir, The Second Sex) लेखात उल्लेख केल्याप्रमाणे आजीने केलं, आणि मग आता तूही कर, केलं पाहिजे, ही अपेक्षा किंवा गृहीत धरलेलं समीकरण. जाणून, समजून केलेली कामाची विभागणी आणि नेमानं निभावली जाणारी जबाबदारी हे सहज का असू शकत नाही. हे new normal म्हणून स्वीकारलं जाऊ शकतं एवढी प्रगल्भता आपण कधी दाखवणार? दुसरं, A woman must have money and room of her own if she is to write. (Virginia Woolf, A Room of    One’ s Own) हे वाक्य तर असं घुमत राहिलं जेव्हा लेखकांच्या संदर्भातलं मनोगत वाचलं. शांतपणे काम करायचं तर सगळं घर निजल्यावर किंवा उठायच्या आधी. म्हणजे साधारण नऊ दशकांपूर्वी लिहिलेला हा विचार किती व्यापक आहे. अगदी साधं काम जरी करायचं असेल तरी बरंच घरातलं आटोपून बसावं लागतं हे आपल्यापैकी बऱ्याच जणी मान्य करतील. तिचं म्हणून एक अवकाश नसावं का?  बदल होतो आहे, पण बराच काळ जावा लागणार आहे.

– अक्षरा पाठक जाधव

मी सरला जेमतेम नववी शिकलेली. पन्नाशीतल्या वयातली. घरातली सर्व कामं सांभाळून शेतीचीही बरीचशी कामं मला बघायला लागतात. मुलींची लग्न होईपर्यंत त्या मदतीला होत्या. दोन मुलगे आहेत, पण मी कटकट केली तरच मदत करतात. ग्रामीण भागामध्ये शेतीसाठी मजूर उपलब्ध नसतात त्यामुळे आम्ही बायका एकमेकींच्या शेतात ‘सावड’ करून कामं करून घेतो. मला घरातली सर्व कामं करायला लागतात. त्यामुळे मला माझ्या सावडी फेडणं शक्य होईना. एके दिवशी मी माझ्या पतीला माझ्यासोबत सावड फेडायला नेलं. त्यानंतर शेतातल्या सर्व बायकाच माझ्या नवऱ्याची टिंगल उडवायला लागल्या. तेव्हापासून मी माझ्या नवऱ्याला कधीच बायकांमध्ये कामाला नेलं नाही. या प्रसंगावरून मला असं वाटतं, की मुळात बायकांनीच आपले जुनाट विचार बदलायला हवेत. स्त्रियांना त्यांच्या स्वातंत्र्याची, अधिकारांची जाणीव करून द्यायला हवी आणि त्यांना त्यांचे हक्क मागण्यासाठी सक्षम करायला हवं. तेव्हा समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल.

 – सरला देशमुख

हा लेख वाचून एक घटना आठवली. माझी चार वर्षांची मुलगी तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर घर घर खेळत होती. दोन जणी मातीमध्ये भातुकली घेऊन स्वयंपाक करत होत्या. त्यांच्यात खेळणारा मुलगा काहीतरी बनवायला तेथे गेला. लगेचच ‘अरे बॉईजनी कुकिंग नसतं करायचं. तू फक्त बस बरं , मी आणून देते तुला बनवून.’ असं एक चिमुरडी म्हणाली. त्याच्या मागोमाग, ‘तुझे बाबा करतात का किचनमध्ये काम? नाही ना? मग?’ अशी त्यांची चर्चाही सुरू झाली. तो मुलगाही गुपचूप बाजूला जाऊन बसला. कोणालाही त्यात वावगे वाटले नाही. एवढीशी मुले, पण काय अफाट निरीक्षण क्षमता! जर लहानपणापासून मुले असे भेदभाव सतत बघत असतील तर मोठे झाल्यावर त्यांच्या संसारात घराची संपूर्ण जबाबदारी ‘स्त्री’वरच राहणार यात शंका नाही. याबाबतीत स्त्रियांच्या काही सामान्य चुका ज्या घराघरांत होतात त्या अशा- घरातल्या लोकांना स्वत:चे काम स्वत: न करता येणे किंवा करायला वाव न मिळणे, मुलांना पूर्णपणे परावलंबी बनवणे, काही कामे उगाचच वाढवून ठेवणे, सर्वाना वाढून, त्यांचे जेवण होत आले, की शेवटी एकटेच जेवायला बसणे, अनेकदा वाया जाऊ नये म्हणून शिळे अन्न खाणे, यातून मार्ग काढणेही स्त्रीच्या हातात आहे. छोटी छोटी कामे आपापसात वाटून घेऊन सुरुवात करता येईल. मुलांना/ मुलींना स्वावलंबी बनवणे ही काळाची गरज आहे. स्वत:ला वेळ देणे, कला जोपासणे, आरोग्याकडे लक्ष देणे, मैत्रिणींशी मनमोकळय़ा गप्पा मारणे याचे महत्त्व घरातल्या लोकांना पटवणे आवश्यक आहे.

– डॉ. रसिका वि. ठोसर 

हा लेख वाचल्यावर टेनिसन (इंग्लिश कवी)चं वाक्य,  Man for the field and woman for the hearth आठवलं. काळ, वेळ आणि परिस्थिती अनुसार स्त्रियांनी कामाकरता घराबाहेर पडले पाहिजे. पण घर आणि बाहेरची कामे करताना, घरातल्या सदस्यांकडे लक्ष देताना, त्यांच्या वेळोवेळी गरजा भागवताना तिला सहयोगी पाहिजे असतो. हा सहयोग देण्यासाठी पुरुष सदस्यांनी पुढे येणे आवश्यक आहे.

    – वंदना पानवलकर

बाईचं आत्म्यानं घरातल्या माणसांत भावनिक आणि मानसिकदृष्टय़ा गुंतणं हेच खरं तिच्यावर लादल्या गेलेल्या काबाडकष्टाचे कारण आहे. अर्थात हे गुंतणं तिच्यावर लादलेल्या संस्काराच्या ओझ्याचा व विकसित झालेल्या तिच्या कौशल्यांचा आणि ‘त्याच्या’ अडाणीपणाचासुद्धा परिणाम आहे. बाईने घरात हवं नको ते पाहिलं नाही तर घरच्यांची झालेली आबाळ तिलाच त्रासदायक होते आणि अशी बाई म्हणजे इतरांनाच काय, पण तिला स्वत:लाही निष्ठूर वगैरे वाटते, पण बाई सतत कष्ट करत असते,तेव्हा तिच्याबद्दल काहीही कणव न वाटणाऱ्या कुटुंबाला कोणताही अपराधी भाव स्पर्श करीत नाही. आजकाल हे कुटुंब म्हणजे फक्त नवरा, सासू सासरे, मुलगा असे नाही तर मुलगी ही त्याचाच भाग बनली आहे. हा त्यातला पुढचा टप्पा मानायचा का? असा प्रश्न मला नेहमी पडतो.

पूर्वी मुलींना वळण लावायचे म्हणून ती बिचारी आईबरोबर फरफटवली जायची, पण आजकाल तीही आईच्या विरोधी पार्टीत सामील झालेली आहे. कारण आयांनाही आताशा वाटू लागले आहे, की पुढे करायचंच आहे तिला घरकाम, जाऊ देत, आताच नको तिच्या मागे या जबाबदाऱ्या. पण म्हणून ती फार संवेदनशीलतेनं आईचा विचार करते असंही दिसत नाहीआणि तिची मानसिकता मुलग्यापेक्षा किंवा नवऱ्यापेक्षा वेगळी दिसत नाही. थोडक्यात काय, तर संस्कार आणि त्या त्या काळातली परिस्थिती हेच काय ते घडवत राहते, एक गोष्ट दुरूस्त करायला गेलं की दुसरी बिघडते, आणि पुन्हा तीही बदलायला वेळ लागतो. हे सार्वत्रिक चित्र आहे.  ग्रामीण स्त्रिया तर आवर्जून हे सांगतात, की मुलींना शिकवायचा आग्रह माझा, तिला मुलासम वागवायचा आग्रह माझाच, पण आपण वेगळं (समानतेचं) आयुष्य आपल्या आईमुळे जगतो आहोत आणि हेच मूल्य आपल्या आईलाही लागू होतं, तिच्यासाठी आपण विशिष्ट वयानंतर घरकामात भागीदारी करायला हवी, तिलाही विश्रांती, तिचा म्हणून वेळ मिळणं हा तिचा अधिकार आहे, असं मुलींना वाटत नाही, हे फारच त्रासदायक होतं. पण परिणामी त्याही (नवीन पिढीतील मुली) ही जीवन कौशल्य हरवून बसल्या आहेत.

मुलगे आणि मुली दोघांमध्येही जीवनकौशल्यांचा अभाव दिसतो. मुलीही घरकाम ही केवळ माझीच जबाबदारी नाही या विचारापर्यंत सर्वार्थानं पोहोचल्या आहेत, मुलगे मात्र अगदी आधुनिक, पण घरकाम बायकोनं केलं पाहिजे यावर ठाम आहेत किंवा त्यांच्याकडे ही जीवनकौशल्यं नाहीत, त्यामुळे प्रत्यक्ष व्यवहारात अडचणीच अडचणी. साहजिकच कुटुंबातील ताण-तणाव वाढत आहेत, कुटुंब व्यवस्थेला हे एक आव्हानच ठरत आहे. घरकाम हे ‘जीवनकौशल्य’ म्हणून पाहिलं पाहिजे. जी पिढी आता तिशीत आहे त्यातील स्त्रियांचे  शोषण कमी होईलच, पण ते पचवणे पुरुषांना सोपे नाही. ‘त्या’ बदलल्या असल्या तरी ‘ते’ बदललेले नाहीत, त्यामुळे हा  तिढा कुटुंबव्यवस्थेला चांगलेच धक्के देणार आहे. काही प्रमाणात ‘घरातील अन्न’ याविषयीचा आग्रह कमी होऊन बाहेरच्या तयार खाद्याची मागणी खूप वाढली आहे. वाढणार आहे. यापुढे घरकामात पुरुषांचा सहभागही वाढणार आहे. पण त्याआधी खूप पडझड आपल्या सर्वानाच पाहावी लागेल, असं चित्र मला तरी दिसतं.

– कुसुम बाळसराफ

स्त्रियांची मानसिकताच पुरुषांच्या नाकर्तेपणाला (घरकामाची जबाबदारी) नडते असं नाही का वाटत? बायकांनाच असं वाटतं, की घरकाम हे माझं क्षेत्र आहे. आयतं कुणाला नको असतं? आपली सगळी कामं, जेवणखाण अगदी नीटनेटकं टापटीप कुणी करून देत असेल तर पुरुषांसाठी मस्तच. आदर्श गृहिणी होण्याच्या नादात आपण कुठेतरी काहीतरी हरवतोय असं जेव्हा बाईला कळेल तेव्हा कुठे ती या सगळय़ा धबडग्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करेल. घरी कुणी पाहुणे येणार म्हटल्यावर घर टापटीप ठेवण्याकडे बाईचा कल असतो. कारण पाहुणे पुरुषांना कधीच दोष देणार नाहीत. तर त्या बाईची सगळीकडे कुप्रसिद्धी करून टाकतील, याची तिला खात्री असते. समाजाला घाबरून ती स्वत:च्याच पायात बेडय़ा घालते.

    – सरिता अनिल काळे

माझी आई बिझनेस करते, त्याला २५ वर्ष पूर्ण झाली. या वर्षांमध्ये तिला कामवाल्या बायकांची बरीच साथ मिळाली, पण घरातल्यांची नाही. माझ्या वडिलांनी आतापर्यंत एकदाही जेवणाचं ताट धुतलं नाही, आईच्या स्वयंपाकाची तारीफ केली नाही. इथे चुकतं. सगळय़ा गोष्टी पुरुषांच्या हातात आयत्या का द्याव्यात? पुरुषांनी स्वत:ची कामं केली तर त्यांनाही घरातल्या स्त्रीचं महत्त्व समजेल. त्यांनाही कुणावरही अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही. जर नवीन काळानुसार आपण कपडे, संस्कृती, मोबाइल यातलं शिकतो मग भांडी घासणं, कपडे धुणं का शिकू शकत नाही?

    – श्रद्धा कांदळगावकर

‘घर आणि घरकाम’ हा विषय बाई अभिमानाने आपला मानते आणि मिरवतेही. त्यात तिला कमीपणा किंवा जाच वाटत नाही. म्हणजे यापलीकडचे कार्यक्षेत्र धुंडाळायचे नाही, अर्थार्जन मोलाचे मानायचे नाही असे मुळीच नाही, हे तिने सिद्ध केलेच आहे. तरी ती घरावरील आपली पकड सोडायला तयार नसते. आपल्या घराची ती अनभिषिक्त राणी असते. घरकाम तिचे राज्य. यात कुणाचीही लुडबुड तिला चालत नाही. याचं कारण सत्तास्पृहा! घरावरील तिची सत्ता व त्यातील समाधान गमावण्याची तिची इच्छा नसते. म्हणून मला असं वाटतं की ‘घर आणि घरकाम’ तू आपलं मानतेस यात तुझं काही चुकलं नाही.

    – सुरेखा बापट

आरती कदम यांचा हा लेख वाचला आणि वाटलं, अगदी खरं लिहिलं आहे तुम्ही. बहुतेक स्त्रियांच्या मनातलं. बाई गोड बोलून सांगून, हातापाया पडून दमते. रागावून सांगूनही उपयोग होत नाही, शेवटी आपल्यालाच नाक मुठीत धरून बोलावं आणि करावं लागतं तेव्हा बाई हतबल होते. तुम्ही लिहिल्याप्रमाणे काही कुटुंबात बदल आनंदाने स्वीकारत आहेत. पण बहुतेक कुटुंबांत पुरुषांची आणि स्त्रियांचीही मानसिकता कधी बदलेल कोण जाणे!

    – शैलजा भोगटे

कुटुंबातील सर्व सदस्यांनीही आपापल्या परीने घरकामात योगदान दिल्यास घरात आनंद नांदायला कितीसा वेळ लागेल? गृहिणीचे कुटुंबातील स्थान निश्चितच वरचे आहे! ती सगळय़ांची चिंता वाहते, परंतु व्यक्त होत नाही! रांधा, वाढा, उष्टी काढा यापलीकडे ती कितीतरी गोष्टी करत असते! तिच्या या कष्टांची किमान जाणीव इतरांनी ठेवली, घर दोघांचं, कामंही दोघांचंच,असा समन्वय साधला जायलाच हवा.

– श्रीकांत मा.जाधव, सातारा</p>

ट्विंकल खन्ना यांना बेस्टसेलर लेखकांमध्ये पहिला क्रमांक न मिळण्यास त्यांच्या वाटय़ाला आलेले घरकाम हेच कारण आहे, की घरकामात आपला वाटा न उचलणारे त्यांचे पति(राज) याला जबाबदार आहेत? घरकाम आणि ऑफिसमध्ये किंवा अन्यत्र केलेले पगारपर्यवसायी काम यांच्यात स्त्री-पुरुष समानतेसारखी समानता येणे हा एक उपाय आहे. स्त्रीपुरुष समानता हे तत्त्वत: सर्वाना मान्य झाले तर या समस्येतली गुंतागुंत बरीच कमी होईल. ऑफिसमध्ये बॉसने एखादे काम सांगितले तर आपण ते करतो, त्यात अपमान वाटत नाही, मग बायकोने काम सांगितले तर मुकाटय़ाने नव्हे आनंदाने करायला नवऱ्याला का जमू नये? हल्ली बहुतेक स्त्रिया नोकरी, उद्योग करतात त्यामुळे त्यांनाही हे पटेल की तिथे पगारावर लक्ष ठेवून आपण जसे आणि जेवढे सौजन्य दाखवतो तसे घरात दोघांमधील वागण्यात प्रेमापोटी येणे अशक्य नाही.  बाहेर जी तडजोड आपण करतो ती घरात करण्यात काही नुकसान नाही. 

  – गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर

आज मी एका वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. पण म्हणून घरकामाची मगरमिठी सुटली का? नाही. ती सैल झालीय, पण सुटली नाही. अजूनही ती माझीच जबाबदारी आहे, पण निदान घरकामात घरच्यांनी केलेल्या मदतीतला उपकाराचा सूर गेलाय हेही नसे थोडके. घरातल्या जबाबदारीची मला आता पूर्वीइतकी आठवण करून द्यावी लागत नाही. माझे लेखन करण्यासाठी आता मी थोडा वेळ काढू शकते. मुलं मोठी होत जातात तशी घरातल्या काही कामांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्याने आपली माया कमी  होत नाही तर मुलांना त्याच कामाला  किती मेहनत लागते हे कळतं. एखादी स्त्री जेव्हा तिच्या कामाच्या क्षेत्रात यशस्वी होत असते, तेव्हा इतर स्त्रियांनी तिला घरी काहीच काम नसतात का, तिचा नवरा कशी सगळी कामं करतो अशी उगीच तिची संभावना न करता तिच्या पाठी उभं राहावं.

    – सुवर्णलता वालावलकर

सासू- सून , नणंद- भावजय , अगदी हल्ली हल्ली आई – मुलगीसुद्धा .अशा अनेक नात्यांमध्ये दोन्ही बाजूंमध्ये स्त्रियाच आहेत. पण वर्षांनुवर्षे नात्यांमधील अपेक्षा, मत्सर, ताणतणाव काळानुरूप बदलला तरीही शाबूत आहे. म्हणूनच स्त्रीने स्त्रीला आधी समजून घेणे गरजेचे नंतरच पुरुषांकडून ती अपेक्षा स्त्रीने ठेवावी असं वाटतं.

– संध्या कुलकर्णी

घरकाम ही बाईची मक्तेदारी, असा पूर्वीपासूनच असलेला समज अजूनही कायम आहे. आता मी एका आयटी कंपनीत काम करीत आहे. माझी आई मला रोज काहीतरी  स्वयंपाक कर, असं सांगते कारण लग्नानंतर जरी नोकरी करणार असली तरी घरकाम हे करावंच लागतं. अर्थात आमच्या घरी चांगले वातावरण आहे. आईला जमेल तशी मदत मी व वडील करतो. मुख्य म्हणजे कधी स्वयंपाक करताना काही कमी-जास्त झालं, भाजीत मीठ नसणे वगैरे तर कुणीही आईला बोलत नाही. पण पुढे मला ती मदत मिळेल का माहीत नाही.

– उमा काळे

स्त्री चुकते की पुरुष हा वाद घालून वेळ व ऊर्जा वाया घालवण्यापेक्षा योग्य ते उपाय/विकल्प शोधून उचित निर्णय घ्यावेत.

– सुहास बल्लाळ, पुणे&nbsp; 

लिखाण  करताना एक बाई म्हणून खरंच खूप अडचणी येतात. घरात शांतता हवी असते. शिक्षण पत्रकारितेचं असल्याने आणि पत्रकारितेची जाण आम्हा दोघा नवराबायकोंना असल्याने आमच्यात समवैचारिकता आहे. दोघेही चर्चा करतो. त्यामुळे लिखाणाला, वाचनाला घरात कुठलंही बंधन नाही. पण स्त्री म्हणून कौटुंबिक जबाबदारी नाकारता येत नाही. ते सगळं करून लिखाणाला वेळ द्यायचा झाला तर सकाळी थोडं वाचन आणि रात्री १० ते १२ दरम्यान मी लिखाण करते. त्या वेळी मला शब्द आणि योग्य ती वाक्यरचना तयार करायला साजेसा वेळ असतो. पुरुष म्हणून पतीची भूमिका अतिशय मैत्रीपूर्ण आहे. मदत करतातच. घरकामात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे योगदान जास्त असते. पण पुरुषांवर कुटुंबाची आर्थिक जबाबदारी असते, हेही लक्षात घ्यायला हवं.

– लीना गोरख

 ‘बाई तुझं चुकलंच?!’ हा लेख वाचला आणि मनात आलं, आपल्या घरातील पुरुष बदलायचा प्रयत्न करत आहेत तर आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. स्वयंपाकघर हे आपलं, बायकांचं राज्य आहे ही भावना सोडली पाहिजे. 

    – डॉ. रश्मी बोरीकर

मुळात आपल्याकडे दोन निष्कर्ष कालातीत आहेत. ‘स्त्री ही अनंतकाळची माता असते.’ आणि ‘स्त्रीशक्तीला पर्याय नाही’. काळानुरूप स्त्री कितीही बदलली तरीही या निष्कर्षांत फारसा बदल नाही.  नवरे मंडळीही वडीलधाऱ्या मंडळींच्या परंपरेच्या विचारांना डावलून पत्नीबरोबरीनं घरातली जेवढी जमतील तेवढी कामं करू लागला आहे, पण काही कामं ही स्त्रीमध्ये असलेल्या उपजत कलागुणांमुळे स्त्रीनं केली तरच चांगली होतात, मुख्य म्हणजे स्वयंपाक. स्त्री नोकरी करते त्यात दगदग होते म्हणून घरी कामात सवलत हवी आणि घरचं करून यावं लागतं म्हणून कचेरीतही सवलत हवी, असं दुटप्पी धोरण राबवू पाहणाऱ्या काही स्त्रीप्रवृत्ती (सन्मान्य अपवाद नक्कीच असतात) असतात. यातूनच स्त्री-पुरुष समानतेचे काही प्रश्न निर्माण होतात.

– श्रीपाद पु. कुलकर्णी पुणे                                           

सर्व सन्माननीय स्त्रियांनी सीमेवर जाऊन देशाचे रक्षण करावे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अवजड ट्रक हाकावेत. घरातील फर्निचर करण्याचे सुतारकाम करावे. घरांना रंग देण्याचे काम करावे. मग पुरुष आपोआपच घरात स्वयंपाक करतील. स्त्रीजन्म आहे हे मान्य करून कुरकुर न करता आनंदाने संसार करावा. आहे त्यात समाधान मानावं फार हाव धरू नये.

– रमेश वझे

स्त्रीनेच घरात मुले लहान असतानाच त्यांना घरकामे करायला लावून (अगदी  स्वयंपाक करणे, भांडी घासणे हीदेखील) त्याची सवय आणि गोडी निर्माण करायला हवी. त्यात त्यांनाही पारंगत करावे. ही सवय लहान वयातच लावली तर मुलेमुली ती छान आत्मसात करतात, हा अनुभव आहे. घरातील मोठय़ा/कर्त्यां पुरुषांनी स्वत: घरकामात मदत करून आदर्श निर्माण केला पाहिजे. 

– अशोक साळवे

आज साठी पार केल्यानंतर सर्व भूमिका पार पाडल्या गेल्यानंतर असा विचार येतो, की स्त्री (बाई) म्हणून माझेच चुकले. प्रत्येक स्त्रीमध्ये अगदी लहानपणापासून आत्मविश्वास निर्माण करायला हवा. काही वेळा पुरुषांपेक्षा स्त्रीला ‘ही तुझी कामे आहेत, तूच करायला पाहिजे, तुझेच चुकत आहे’ असे म्हणणाऱ्या स्त्रियाच जास्त असतात. मधल्या काळातसुद्धा बऱ्याच घरात पुरुष कामे करत होते. पण आजकाल बऱ्याचदा सर्व बाबतीत श्रेय घेत तारेवरची कसरत करताना आपलेच चुकते हे स्त्रियांच्या लक्षात येत नाही. आत्मविश्वास आणि सुसंवादाने परिस्थिती नक्की बदलेल.

–  सुजाता लेले

स्त्रियांची व पुरुषांची मानसिकता बदलणे कठीण आहे, पण आताची तरुण पिढी याला काही प्रमाणात उत्तर देते आहे असे मला वाटते. अलीकडेच नात्यात एक लग्न झाले. मुलीची सासू बऱ्यापैकी खाष्ट आहे. मुलगी आर्किटेक्ट आहे. सासूबाईंना सुनेच्या वडिलांनी सुरुवातीलाच सांगितले, की माझी मुलगी तिला काम असेल तेव्हा सण साजरे

करत बसणार नाही. तिला वेळ आणि आवड वाटली तर जरूर परंपरा जोपासेल. गंमत म्हणजे अशी अपेक्षा मुलाकडून कधी नसते.

– मृणाल मोहन भावे

संसार हा दोघांचा असतो, पण खरी कसरत तेव्हा असते जेव्हा दोघेही नोकरीला जातात.  मी घरातलं बरचंसं काम करतोच. पण आता माझा मुलगा त्याच्या मुलाचे डायपर  बदलतो. मुलाला आंघोळ घालतो. कधी कधी मुलाला आवडणारा स्वयंपाक करतो. बदल होत आहेत पण अजूनही मोठा भार बाईकडेच आहे.

– सुरेश पाटील

माझ्या आईची नोकरी करताना घरकाम आणि नोकरी यात होणारी ओढाताण मी अनुभवली आहे. त्याचा लहान वयात माझ्या मनावर खोल परिणाम झाल्यामुळे मी पूर्णवेळ गृहिणी म्हणून राहणे पसंत केले. बदल घडवायलाच हवा त्याची जबाबदारीही स्त्रियांच्यावर आहे. त्यासाठी शारीरिक, मानसिक, भावनिक संघर्षही स्त्रियांना करावा लागणार आहे हे एक कटू सत्य. 

– रेखा देसाई

जी बाई केवळ घर सांभाळायची ती आज बाहेर पडली, पण घरकामातून तिची सुटका झाली नाही. घरकामं या समजून करायच्या गोष्टी आहेत. सांगून, पाठी लागून ऐकलं तर बरं, नाही तर वेळ आणि शक्ती तर जातेच वर मनस्ताप होतो तो वेगळा. रोज घरात वाद होण्यापेक्षा करून मोकळं झालेलं बरं, असा विचार करून आजही बऱ्याच ठिकाणी बाईच घरकाम सांभाळताना दिसते. आणि एखादे वेळी विरोध केला, असहकार पुकारला की आलंच घरात वादळ. जोपर्यंत समाजमन बदलत नाही तोपर्यंत घरकामाचा वाद असाच पुढेही चालू राहाणार.

  – वर्षां देसाई, बोरिवली

‘बाई तुझं चुकलंच’ हा आरती कदम यांचा लेख स्त्रीला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आहे. किंबहुना तिला आपलेपणाने जागं करणारा आहे. तरीही काही वेळा बाईचं खरंच चुकतं, हे दाखवून देणारा माझा हा अनुभव. २५-३० वर्षांपूर्वीची गोष्ट. माझा नवरा, बायकोच्या कष्टांची बूज राखणारा, घरकामात स्वत:हून मदत करणारा, पण त्यांची मदत म्हणजे आपल्यासाठी दुप्पट काम. उदा. रविवारी सकाळी ब्रेड-आम्लेटचा गरमागरम नाश्ता आयता हातात मिळाला तरी पंख्याच्या वाऱ्यावर सर्वत्र उडणारी कांद्याची सालं, ओटय़ावर वाहणारे अंडय़ाचे ओघळ पाहताना तो नाश्ता टोचत राही. कामवाली बाई आली नाही, की तो कपडे धुवून दांडीवर घालायचा. मात्र त्यानंतर कुठेही कसेही वाळत घातलेल्या कपडय़ांची उस्तवार करताना माझ्या नाकी नऊ येत. नातेवाईकांची मैफल जमली, की यांची ही घिसाडघाई (त्या मागचं प्रेम समजून न घेता) रंगवून सांगणं हा माझा त्या वेळचा आवडता उद्योग होता. माझ्या या मन:स्थितीला एकदा चारशे व्होल्टचा शॉक बसला. आमच्या शेजारी नवं जोडपं राहायला आलं. दोघेही डॉक्टर. शिकतानाच प्रेम जुळलेलं. साहजिकच ती त्याला रवी (पक्षी : रवींद्र) अशीच हाक मारे. पण एकदा अचानकपणे तिने डॉक्टर म्हणायला सुरुवात केली. कारण विचारलं तर म्हणाली, काकू जर मीच त्याचा मान ठेवला नाही तर सोसायटीतील सगळेच त्याला रवी, रवी म्हणतील ना! तिच्या त्या वाक्याने मी खाडकन शुद्धीवर आले. ‘आपल्या माणसाची किंमत आपणच राखायची असते,’ हा धडा मला त्या तरुण मुलीने दिला. सहजीवन म्हणजे एकमेकांच्या मर्यादा समजून, परस्परांना मोठं करणं या व्याख्येचा अर्थ मला त्या दिवशी उमगला.

राजन बुटाला, मनाली लेले, यतिन राजहंस,  धनश्री साळुंखे, श्रद्धा मोहिते, सूर्यकांत भोसले,  अंजली भातखंडे , सरिता देशपांडे, डॉ. मृदुला रायपुरे यांनीही याच आशयाची पत्रे पाठवली आहेत.

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 09:40 IST