परवा एक वयस्कर गृहस्थ आपल्या सुनेला व नातवाला घेऊन चिकित्सालयात आले. तिघांचीही तक्रार एकच होती. ती म्हणजे ‘डॉक्टर, पोट साफच होत नाही, काय करू?’ म्हणजे हा काही आनुवंशिक आजार आहे का? कारण आम्हा सर्वानाच घरात हा त्रास होतोय. का आमचं काही आहारात चुकत असेल?
खरं तर हा प्रश्न आता कोणालाही विचारला तरी बहुतांशी लोकांचे पोट साफच होत नाही. काहींना त्रास जाणवत नाही, मात्र पोट पूर्ण साफ झाले आहे याचे समाधान होत नाही. मग वृद्ध लोकांचे रोज वेगवेगळ्या जाहिराती बघून नवनवीन औषधे घेणे सुरू होते. काही दिवस बरे वाटते व पुन्हा त्या औषधांची सवय होते, त्यामुळे पोट काही साफ होत नाही. असो. या सर्व तक्रारींमध्ये पोट साफ का होत नाही याचे कारण शोधणे मात्र गरजेचे असते. सरसकट सर्वानाच एक औषध देऊन उपयोग होत नाही.
आयुर्वेदात ‘अवष्टंभ: पुरिषस्य..’ असे सूत्र आहे. म्हणजे प्राकृत पुरीषाचे कामच मुळी ‘अवष्टंभ’ करणे म्हणजे साठून राहणे असे आहे. विचार करा, हे साठून राहण्याचे काम त्याचे नसते, तर लोकांना सतत एखादे ‘डायपर’ घालूनच फिरावे लागले असते. म्हणून मल तयार झाला की, तो प्रथम साठून राहतो. म्हणजे रोज काहींना ठरावीक वेळेत पोट साफ होण्याची सवय असेल तर तो आहे प्राकृत अवष्टंभ. मात्र ठरावीक वेळेला साफ होणारे पोट त्यानंतर दोन-चार तासांनंतरही अथवा एक दिवस होऊन गेला तरी साफ नाही झाले तर तो आहे ‘मलावष्टंभ’. या प्रकारामध्ये प्रामुख्याने आदल्या दिवशी घेतलेला आहार, त्याचे प्रमाण व होणारे पचन हे अवलंबून असते. घरगुती गरम पाणी, लिंबू पाणी अथवा लंघन केले तरी काही वेळाने पोट साफ होते व रुग्णाला बरे वाटते. मात्र हे सतत व रोजच चालू राहिले तर पचनशक्ती खालावते, अग्नी मंद होतो व रुग्णास सततचा ‘मलावष्टंभ’ हा आजार मागे लागतो. यासाठी मात्र चिकित्सा घ्यावी लागते. नाही तर ‘ग्रहणी’ नावाचा मोठा आजार अथवा ‘मूळव्याध’ मागे लागते. आपण आतापर्यंत अवष्टंभ, प्राकृत मलावष्टंभ, आजार स्वरूप मलावष्टंभ पहिले. या सर्वामध्ये लक्ष्य हे मलाकडे म्हणजे त्याच्या प्राकृत निर्मितीकडे द्यावे लागते. तशा पद्धतीची औषधी उपाययोजना केली की हे बरे होते. मात्र वृद्धापकाळात सततच्या प्रवाहनामुळे, पोट साफ होण्याच्या घेतलेल्या वेगवेगळ्या औषधींमुळे व वयोमानानुसार आतडय़ांची शक्ती कमी होते व ते तयार झालेला मल भाग पुढे ढकलण्यास सक्षम होत नाहीत. त्यास ‘कोष्ठबद्धता’ असे म्हणतात. म्हणून तर ‘मलबद्धता’ व ‘कोष्ठबद्धता’ या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एकात पचनशक्ती महत्त्वाची, तर दुसऱ्यात आतडय़ांची शक्ती महत्त्वाची. म्हणून यांच्या चिकित्साही बदलतात. तुम्हाला कोणता त्रास आहे हे प्रथम जाणून घ्यायला हवे. लहान मुलांमध्ये फक्त मलबद्धता असेल तर त्यांच्या आहाराकडे लक्ष द्या.
बाहेरचे पदार्थ पिझ्झा, बर्गर इत्यादी फास्टफूड कमी करा. १०-२० मनुके रात्री भिजत घालून पाण्यासह मनुके खाण्यास द्या. मुगाचे कढण अथवा मुगभात खिचडी खायला द्या. पपई, पेरू, डाळिंब, आवळा अशी फळे मुलांना खायला द्या. ज्वारीच्या लाहय़ा, साळीच्या लाहय़ा मुलांना द्या. एक वेळेच्या जेवणामध्ये आवर्जून भाकरीचा समावेश करा. हेच मोठय़ा माणसांमध्ये पोट साफ होत नसल्यास त्यांनी प्रथम आहार कमी करावा, पोटाला आवश्यक तेवढी विश्रांती द्यावी म्हणजे पचनशक्ती वाढते, तर वृद्ध मंडळींनी त्यांच्या आतडय़ांची शक्ती वाढवण्याकडे लक्ष द्यावे. रोज आहारातील तुपाचे प्रमाण वाढवावे. पोटाला रोज एरंड तेलाने मसाज करावा. आहारातही रोज १-१ चमचा एरंड तेल घ्यावे. याने आतडय़ांना बळ मिळते व कोष्ठबद्धता दूर होते. नुसती पोट साफ होण्याची औषधे घेऊ नयेत. यामुळे आतडय़ांची शक्ती कमी होते. आमची आज्जी आम्हाला एक नियम सांगायची, तो जर सर्वानी पाळला तर पोटाच्या ८० टक्के तक्रारी होतच नाहीत अथवा झाल्या तरी बऱ्या होतात. तो नियम म्हणजे ‘खाऊ की नको खाऊ ’असा प्रश्न पडला असेल तर न खाणेच चांगले व मलविसर्जनाला जाऊ की नको जाऊ , हा प्रश्न पडला असेल तर जाणेच चांगले.’
वैद्य हरीश पाटणकर
harishpatankar@yahoo.co.in

itching all over body but no rash sign of something serious illness
Health Special: अंगभर खाज येते व पुरळ कुठेच नाही… ‘ही’ असू शकते गंभीर आजाराची सुरुवात!
deepak kesarkar
माझ्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल नाही! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण
Personality Traits According to Zodiac Signs in Marathi
Personality Traits : प्रेमात पडण्यापूर्वी ‘या’ राशींचे लोक खूप वेळ घेतात; सहज प्रेमात पडत नाही
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : भरकटलेल्या युद्धांचा पोरखेळ ..