पोटदुखी (उदरशूल)

चा रविवार मात्र ‘अपथ्य दिवस’ म्हणून ते जणू सेलिब्रेट करतात

माझ्याकडे एक सधन कुटुंब चिकित्सेसाठी येत असे. अगदी घरात छोटीमोठी काहीही तक्रार झाली तरी ते मलाच प्रथम कळवतात. गेली अनेक वर्षे असे चालू आहे. पण त्यांचा रविवार मात्र ‘अपथ्य दिवस’ म्हणून ते जणू सेलिब्रेट करतात. मी कितीदा तरी सांगितलं तरी ते रविवारी मात्र हॉटेलमध्ये जातातच. त्यांचं एकच म्हणणं असतं की आम्ही उरलेले सर्व दिवस पथ्य पाळतो ना? मग एक दिवस आम्ही अपथ्य केलं म्हणून काय बिघडलं? आणि रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो हो, तेवढंच एक दिवस बाहेरचं खाल्लं की बरं वाटतं आणि घरातील मंडळींना पण स्वयंपाकापासून एक दिवस सुट्टी मिळते. मग काय आम्ही आपले ठरवले आहे, दर रविवारी हॉटेलमध्ये जायचे म्हणजे जायचेच.
असेच एक रविवारी ते जेवायला बाहेर गेले होते.. आणि त्या रात्री साधारण १२ वाजता त्यांचा मला फोन आला, छोटय़ा मुलीच्या पोटात अचानक फार दुखू लागले आहे म्हणून. घरातील एकूण पाच माणसे जेवायला गेली मात्र त्रास एकालाच झाला, त्यामुळे तो हॉटेलच्या जेवणाने झाला असावा असं त्यांना काही वाटत नव्हतं. मी त्यांना विचारलं की हॉटेलमध्ये काय खाल्लं होतं? ते म्हणाले की, ‘‘आम्ही आज सर्वानीच स्पेशल चीज पिझ्झा खाल्ला होता. आम्ही फार स्वच्छ व उत्तम दर्जाच्या ठिकाणी खाल्ला. आम्ही यापूर्वीही अनेकदा तिथे गेलो आहे. यापूर्वी असं नाही झालं कधी. काही वेगळं कारण तर नसेल ना? कौटुंबिक रुग्ण असल्याने मला त्या मुलीची प्रकृतीही माहीत होती. या सर्वाना जरी त्या खाण्याचा काही त्रास झाला नसला तरी तिच्या प्रकृतीनुसार तिला तो होऊ शकतो याची मला जाणीव होती. पण तिचं फारच पोट दुखत होतं, लवकर काहीतरी सांगा असा आग्रहच त्यांनी धरला. मी त्यांना एक ग्लास पाणी घेऊन त्यात एक चमचा ओवा व पाव चमचा हिंग घालून उकळून अर्धा ग्लास राहिल्यावर गाळून कोमट करून पिण्यास सांगितले. घरातील तीळ तेल किंवा शेंगदाणा तेल कोमट करून त्यामध्ये थोडा हिंग भाजून तो नाभी प्रदेशी चोळून लावायला सांगितला. साधारण अध्र्या तासानंतर तिचं पोट दुखणं हळूहळू कमी होत गेलं व थांबलं. तिला झोपही शांत लागली.
तिच्या खाण्यात पचायला जड चीज आल्याने हे झालं होतं. तसेच पिझ्झाचा बेस हा फार जाड असतो. यामध्ये मैदा तसेच अन्य पचायला जड असणारे पदार्थ टाकलेले असतात. त्यामुळे लहान मुलांचा अग्नी यास पचवू शकत नाही व अन्न अपचीत राहिल्याने त्यातून वाताची निर्मिती जास्त होते. मग हा वातच पोटदुखीचे कारण ठरतो. कारण ‘शूलं नास्ति विना वातात..’ असे आयुर्वेदाचे सूत्र आहे. मग या ठिकाणी ओवा हा अग्निदीपन करून शूलशमनाचे काम करतो, तर हिंगामुळे वाताचे अनुलोमन करतो म्हणजे वायू बाहेर जाऊ लागतो व पोटदुखी थांबते. त्यात तेल व हिंग नाभी प्रदेशी लावल्याने उष्ण तेलामुळे पुन्हा वातशमन झाले व हिंगामुळे शुलघ्न कार्य झाले.
लक्षात ठेवा, आपली प्रत्येकाची पचन शक्ती वेगवेगळी असते. त्यात बऱ्याचदा आपण घेतलेला पूर्वीचा आहार पचला आहे का नाही हे पाहून पुढील आहार घेणे गरजेचे असते. मोठी माणसं जे अन्न पचवू शकतात तेच अन्न कधी कधी लहान मुलांना पचायला जड पडते. प्रत्येक वेळी घेतलेला आहार जरी समान असला तरी प्रत्येक वेळी त्या आहाराला पचवणारा अग्नी सम असतोच असे नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या पचनशक्तीचा विचार करून आहार घेतला पाहिजे.

वैद्य हरीश पाटणकर
harishpatankar@yahoo.co.in

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आयुर्वेदाच्या स्मृतीतून बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ayurvedic treatment for stomach pain