सुप्रिया सुरेश प्रभू
ट्रेन तशी अगदी शेवटच्या क्षणीच पकडली, शनिवार असल्याने गर्दी तशी कमीच होती. नेहमीच दुर्मीळ असणारी ‘विंडो सीट’ आज सहज मिळाली. स्थिरस्थावर होताहोतानाचा विशिष्ट गचका घेत गाडी सुरू झाली. आणि लगेचच तिनं वेगही घेतला. एरवीपेक्षा तुरळक, अपरिचित नवख्या माणसांच्या गर्दीचा आता थोडा शांत शांत, रेंगाळलेला प्लॅटफॉर्म पाहण्याचीही मजा वेगळीच असते.
डोकं खिडकीला टेकवून डोळे मिटून कार्यालयीन गडबडींचा कप्पा बंद केला आणि घरातील कामांच्या दालनाचं कवाड किलकिलं केलं, असंख्य कामांची यादी, भाताचा कुकर, कोशिंबिरीची तयारी, वरणाची फोडणी, उद्याचा साग्रसंगीत नाश्ता, आणि महत्वाचा प्रश्न उद्याच्या रविवारचे स्वागत कशाने करायचे, चिकन की मासे? अनेक प्रश्नांची मनातल्या मनात उत्तरे देऊन थोपवण्याचा, संपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत राहिले. एका सुट्टीत पुढल्या संपूर्ण आठवड्याची उस्तावार करायचा हा प्रयत्न… वर्षांनुवर्षं सुरू असलेला… उद्याची तयारी करता करता आजच्या दिवसाचा श्वासच आपण घोटतोय की काय असंही वाटू लागतं अनेकदा. आणि मुख्य म्हणजे हे अव्याहत चक्र किती दिवस चालणार आणि आपणही त्याबरोबर किती काळ गोल गोल फिरणार? हा तर न सुटणारा प्रश्न
विचार थोडे बाजूला करण्यासाठी हेडफोन लावून गाणी ऐकण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही मन रमेना. आयुष्य एकदम एकसुरी, निरस, गुळगुळीत झाल्यासारखं वाटू लागलं. आजचा दिवस कालसारखाच, उद्याचा ही तसाच. त्यातच आईच्या आठवणींचं काहूर… अशातच लागूनच असलेल्या अपंगांसाठी राखीव डब्यातून हास्यकल्लोळ ऐकू येऊ लागला. मागोवा घेण्याचा प्रयत्न केला… दृष्टिहीन मुलामुलींचा गट, त्यातला एक बहुधा मुका होता. मुका आणि दृष्टिहीनांचा चालू असलेला सुसंवाद मी ‘पाहत’ होते. कुठल्यातरी अपंग संस्थेचे सभासद असावेत. एकमेकांच्या विनोदावर हशा, टाळ्या देत, छोट्या छोट्या गोष्टींचा भन्नाट आनंद घेत आणि भरभरून दाद देत त्यांचा हा लोकल प्रवास सुरू होता. खरं तर त्यांच्यासाठी ही अशक्यप्राय गोष्ट, असं मला आत्तापर्यंत उगाचच वाटत होतं, कारण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसर्यावर अवलंबून राहायचंय, पुढचं पाऊल टाकतानाही खोल अंधार्या दरीत पाऊल टाकतोय की काय? असं वाटत असावं ना यांना?, या जाणिवेनेही अंगावर काटा आला. त्यांना पाहतापाहता माझी उत्सुकता ताणली गेली. सार्यांना न्याहाळू लागले. तितक्यात एक स्थानक आलं. कदाचित नेहमीच्या सरावानं त्यांना ते कळलं असावं. त्यातले तीनचार जण लालपांढरी काठी उलगडत, बॅगा सावरत, अंदाजे पाऊल टाकीत चाचपडत दारापाशी येऊन उभे राहिले. तोच गाडीने एक जोरदार गचका दिला. सारे धडपडले. इतक्यात त्यातील मुक्या मित्राने सार्यांना सावरलं. स्थानक आल्यावर सारे उतरूनही गेले. गाडी सुरू झाली. माझी नजर मात्र मार्गस्थ झालेल्या त्यांच्यावर शेवटपर्यंत खिळून होती. मनात काहूर उठलं, काय तीव्र इच्छाशक्ती या मुलांची? पदोपदी अनिश्चितता आणि अंधाराच्या न सुटणार्या चिमटीतूनही हसत हसत जगण्याची कला यांना उपजतच असावी…
तेवढ्यात दादर आलं. तिथे चढलेली भाजीवाली. घट्ट ,चापूनचोपून साडी नेसलेली. नेहमीची असल्याने ओळखीची झाली होती. गर्दी नसल्याने तिही जरा टेकली. भाजीच्या टोपलीतून पाण्याची बाटली काढून घटाघटा पाणी प्याली. कपाळावरून, नाकावर घरंगळत आलेला घाम पदराने टिपून खिडकीतला वारा अंगावर घेत ताजीतवानी झाली. माझ्याकडे पाहून ओळखीचं हसली. मी ही उत्तरादाखल हसले. ‘‘गवार घेते का? गावठी आहे. मेथी पण मस्त कोवळी, हिरवीगार हाय.’’ घेण्याच्या विचारावर उद्या रविवार असल्यानं काट मारली आणि तिला सहज ‘नाही’ म्हणून मोकळी झाले. ती मात्र भाजी नीट करता करता काही तरी गुणगुणत त्यातच गुंग झाली.
माझा डोळा कधी लागला कळलंच नाही. उतरायला दोन तीन स्थानकं असताना कुठल्याशा फेरीवाल्यांच्या ओरडण्याने जाग आली, तोवर तिचीही आवराआवर चालू होती. मी जागी होण्याची वाटच पाहत होती जणू. तिच्या हातात नीट खुडून ठेवलेली मेथीची पिशवी होती. माझ्या मांडीवरच्या पिशवीत टाकत ती म्हणाली, ‘‘ घरी गेल्या गेल्या पटकिनी कर. मोडून दिली बघ तुला. मला जास्तीची झाली. माझ्यापुरती ठेवली. ही ठेव तुला. तुझा त्रास वाचिवला बघ मी.’’ ती पटापट आणि प्रेमाने बोलत होती… आणि मला नाही म्हणायचा, पैसे विचारायचा अवधीही न देता टोपली सावरत स्थानकावर उतरून निघूनही गेली. माझी नजर तिच्या पाठमोर्या झपझप चालणार्या आकृतीवर थिजून राहिली. दिवसभरात किती सोसलं असेल हिनं तरीही इतकी उत्साही, आनंदी. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून हिने आनंद दिलाही घेतलाही. मी मात्र तिथेच माझ्यापाशी काय आहे त्यापेक्षा काय नाही याचाच विचार करत कुढत बसलेली…
अध्र्या पाऊण तासाच्या प्रवासातली ही असंख्य माणसं. हे प्रसंग, अनुभव विचार करायला भाग पाडतात. दिवसभर ओझं वाहून, कष्ट करून स्वत:च्यातली भाजी स्वच्छ करून किती सहजपणे तिनं माझ्या स्वाधीन केली. त्यावेळी ती कुठल्याही बड्या तत्त्ववेत्त्यापेक्षा कमी नाही वाटली. त्याही आधीची छोट्या छोट्या प्रसंगाचा आनंद घेत टाळ्या देणारी ती दृष्टिहीन आणि मुकी मुलेही मला जास्त डोळस व बोलकी वाटली. माझं स्थानक आलं. मेथीची पिशवी पर्समध्ये टाकत आता भाजी करू की उद्या पराठे हा ‘टिपिकल’ विचार मनात घोळवत ट्रेनमधून उतरले. मनात काही तरी उलथापालथ होत होती, पण ती तात्पुरती की टिकणारी? कुणास ठाऊक. स्वत:शीच हसले आणि रिक्षाच्या शोधात गर्दीत पुन्हा हरवण्यासाठी व पुन्हा शोधून सापडण्यासाठी मार्गस्थ झाले.
prabhusupriya0@gmail.com
