आभाळमाया : मर्मबंधातली ठेव ही!

ल्या पन्नास वर्षांच्या आमच्या सहवासातील कित्येक क्षण निसटून गेले आहेत तरी आठवणींचा दरवळ मात्र मी आजही अनुभवते आहे..

(संग्रहित छायाचित्र)

अनुराधा सरदेशमुख-कशेळीकर

‘‘पुरस्कार- मानसन्मान यापलीकडे विचारांतील ‘स्थितप्रज्ञ’ वृत्ती बापूंच्या ठायी होती. आपल्या साहित्याचे मूल्य बापूंनी चांगलेच जाणले होते. कोणत्याही गटाशी संबंधित न राहता त्यावेळच्या सोलापूरसारख्या दुर्लक्षित गावी राहून, त्यांनी ‘साहित्यसाधना’ हा आपल्या जीवनाचा स्रोत मानला आणि लेखणीचा बाणा जपला. काव्य, समीक्षा, कादंबरी या माध्यमांतून बापूंनी मोजके आणि अव्वल दर्जाचे, सर्वस्पर्शी लेखन केले.’’ सांगताहेत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या कन्या अनुराधा सरदेशमुख-कशेळीकर..

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, समीक्षक, माझे वडील त्र्यंबक विनायक सरदेशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षांची सांगता, येत्या २२ नोव्हेंबर २०१९ रोजी होत आहे. गेल्या पन्नास वर्षांच्या आमच्या सहवासातील कित्येक क्षण निसटून गेले आहेत तरी आठवणींचा दरवळ मात्र मी आजही अनुभवते आहे..

एका दुर्दैवी आपत्तीला सामोरे जातांना, माझ्या आजोबांना (विनायक मल्हार सरदेशमुख) संस्थानातील मुख्य सचिवपद सोडून, सोलापूरला स्थायिक व्हावे लागले. समाजातील अराजक स्थिती आणि असंतोषाचे दूषित वारे, त्यांना मानवले नाही. राजेसाहेबांचे अत्यंत विश्वासार्ह आणि निष्ठावान सहकारी म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. ते वर्ष होते १९३१. बापू, माझे वडील त्यावेळी फक्त १२ वर्षांचे होते. पण या कठोर वास्तवाचा दुखरा व्रण त्यांच्या मनावर उमटून निघून गेला खरा मात्र, सल कायम राहिला.

सोलापूरात, ‘हरिभाई’तील शालेय शिक्षणानंतर, बापूंनी पुण्यात, एस. पी. महाविद्यालयात प्रवेश घेतला. ग्रंथप्रेमाचा वारसा घरातून लाभल्याने या काळात त्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त जगभरातील प्रतिभावंतांचे ग्रंथ वाचून काढले. कधी सहली केल्या तर कधी निकटच्या मित्रांसोबत हॉलीवूडचे उत्कृष्ट चित्रपट पाहिले. टेनिस खेळायलाही सुरुवात केली. संगीतात रुची असल्याने, शास्त्रीय सुगम संगीताच्या मैफिलींचा आस्वाद घेतला. नामवंत वक्त्यांची व्याख्याने, मैफिलींचा आस्वाद घेतला. एकंदरीत त्यांचे भावविश्व फुलविणारे हे दिवस होते. जीवन समरसून जगण्याची ‘रसिकता’ या सर्व गोष्टींतून मला जाणवली.

माझ्या जन्मापूर्वीच्या, काही महत्त्वाच्या घटना सांगायच्या झाल्या तर आण्णांच्या (माझे आजोबा) आयुष्यातील प्रसंग आठवतात.. ते मला सांगायचे, ‘‘ऐन पंचविशीत असलेल्या आपल्या पाठच्या बहिणीच्या, कमाताईच्या निधनाने बापू फार एकाकी झाले. नंतर दोन वर्षांत तिचे यजमानही गेले. त्यांची दोन लहान मुले बापूंजवळच वाढली. मात्र त्या काळी शिक्षकांना मिळणारे वेतन बेताचे होते. आर्थिक ओढाताण, असली तरी त्यांनी ही जबाबदारी समर्थरीत्या पेलली. आपल्या कर्तव्यात थोडीही कसूर न करता, भाच्यांच्या कल्याणासाठी, त्यांनी  सर्वतोपरी कष्ट घेतले.’’ आईनेदेखील त्यांच्या सुखकर भविष्यासाठी, जी साथ दिली.. त्याचे मला विशेष वाटते.

माझा लहानपणीचा काळ फार सुखाचा होता. बापू सर्वार्थाने माझे गुरू होते. त्यांच्या हातच्या रेखीव वळणाने मी आद्याक्षरे गिरवली. विद्येचे आणि विविध कलांविषयीचे प्रेम मिळवले. आमच्या लहानशा घरात, बाहेरच्या खोलीत, तिन्ही भिंतींना, पुस्तकांची काचेची कपाटे होती. आवडीने जमवलेल्या, ग्रंथसंग्रहाची, त्यांनी अखेपर्यंत, उत्तम देखभाल केली. मे महिन्याच्या सुट्टीत बापू निवडक पुस्तके आवर्जून वाचण्यासाठी देत असत, नंतर त्यावर आपल्या भाषेत लिहून दाखवण्याचा त्यांचा आग्रह असे. मी ते आवडीने करीत असे. त्या वेळी ‘धर्मयुग’, ‘ललित’, ‘सत्यकथा’, ‘वीकली’, ‘रीडर्स डायजेस्ट’.. हे सर्व अंक नियमित घरी यायचे. यातून नव्या पुस्तकांची, नव्या विचारप्रवाहांची ओळख होत गेली. कुतूहल म्हणून हे सर्व वाचले जायचे. बापू रोज रेडिओवर इंग्रजी बातम्या लावत असत आणि सुरुवातीला कळत नसल्या तरी, त्या नेहमी ऐकाव्यात.. अशी त्यांची इच्छा असे.

पुढे महाविद्यालयीन काळात, आवडीच्या आणि हाताला येईल त्या, पुस्तकाचे वाचन होऊ लागले. १९६० मध्ये बापू दयानंद महाविद्यालयात अध्यापनासाठी रुजू झाले. काही लेखनसंकल्प त्यांच्या मनात होते. त्याच वेळी चारुदत्त, माझा मोठा भाऊ, अगदी कोवळ्या वयात, आमच्यातून निघून गेला. आई-बापूंसाठी हा फार मोठा आघात होता. ते १९६७ चे वर्ष होते. यानंतरच्या काळात, बापूंनी आपले अधिकाधिक लक्ष ‘अध्यापन, लेखन-वाचन आणि घर’ यावर केंद्रित केले. आणि पुढील वर्षांत, ‘अंधारयात्रा’, ‘धुके आणि शिल्प’, ‘शारदीय चंद्रकळा’, ‘प्रदेश साकल्याचा’, ‘रामदास प्रतिमा आणि प्रबोध’.. या साऱ्या समीक्षात्मक कृतींमधून त्यांची प्रतिभा बहरास आली. साठ-सत्तरच्या दशकात आमच्या घरी बाबा महाराज आर्वीकर, महाकवी डॉ. द. रा. बेन्द्रे, कवीवर्य कुंजविहारी यांच्या नित्य भेटी होत असत. या महानुभवांच्या सत्संगाने आपल्या आयुष्याला ‘अर्थ’ आला.. असा भाव बापूंनी व्यक्त केला आहे. लहान असताना, मीसुद्धा यांच्या भेटी अनुभवल्या आहेत.

आई घरच्या दैनंदिन कामात नेहमी व्यग्र असायची. तिने नेहमी शांतता राखण्याचा प्रयत्न करून बापूंच्या लेखनास मोलाचे सहकार्य केले. आमच्या घरी अधूनमधून वेगवेगळ्या क्षेत्रांतली मान्यवर मंडळी येत असत तेव्हा ती सर्व काही अगत्यपूर्व करत असे. घरी, नातलगांची ये-जा नव्हती. यामुळे मनाजोगा वेळ बापूंना आपल्या कामासाठी देता आला. आईने घरातील सर्व कुळधर्म-कुळाचार यथासांग पार पाडले. रोजचा स्वयंपाक तर ती रुचकर बनवायचीच, शिवाय सणावारी तिने केलेली पुरणपोळी, खवापोळी, बापूंना विशेष आवडायची. सुट्टीत नातवंडे आली, की आई खूप रमून जायची.

बापूंची कुटुंबवत्सलता अनेक प्रसंगांतून प्रतीत झालेली मला जाणवते. चारूच्या मृत्यूनंतर, मोठय़ा धीराने, त्यांनी आईला सावरले. आपला दु:खावेग कधी शब्दात उमटू दिला नाही. ही दु:ख सहन करण्याची उदात्त रीत मला विचार करायला लावते. या घटनेनंतर जी पोकळी निर्माण झाली होती, तिची तीव्रता कमी करण्यासाठी, तसेच एकमेकांतील भावनिक ओलावा जपण्यासाठी बापू प्रयत्नशील राहिले. कुठल्याही प्रकारची शोकछाया घरावर येऊ न देण्याची दक्षता त्यांनी घेतली. वाचन-लेखनानंतरचा वेळ मुख्यत: घरासाठी दिला. काही बिकट प्रसंगी त्यांनी मला खंबीर, आश्वासक साथ दिली. एरवी मृदू, हळव्या आणि कमालीच्या संवेदनशील वडिलांचे करारी व कणखर रूपही त्यायोगे मला पाहायला मिळाले. अशा वेळी माझ्यातील आत्मविश्वास तर बापूंनी जागवला तसेच स्वतंत्र विचारांच्या दिशेने निर्भयतेने जगण्याचे बळ दिले. त्यांच्या सहृदयतेने आमचे नाते आणखी गहिरे होत गेले.

सासरी गेलेल्या मुलींच्या भेटी, नेहमी कशा होतील?, हा विचार बापूंच्या मनात नेहमी असायचा. मे महिन्यात जणू आनंदोत्सव असायचा. एरवी एकटे-एकटे असणारे

आई-बापू या वेळी फार उत्साहात असायचे. त्यांना वय विसरायला लावणारा हा काळ होता. सर्वाचा एकत्रित सहवास, रोज आमरसाचा थाट, मुलांचा मनसोक्त दंगा, खेळ.. यामध्ये दिवस कसे निघून जायचे कळत नव्हते, पण निरोपाचा दिवस जसजसा जवळ येई तसे बापू फार हळवे होत. त्यांची अस्वस्थता मला जाणवायची. पुढच्या भेटीचे नियोजन करून मग आम्ही आपापल्या घरी निघायचो. आज हे क्षण हरवले तरी, त्या आठवणी निरंतर काळजात दडून आहेत..

फारसे न बोलताही, खूप काही सांगून जाण्याची किमया त्यांनी साधली होती. बापूंच्या रोजच्या आचरणातून, अनुभवातून, मला किती तरी शिकता आले. काही गोष्टींचा मी जाणीवपूर्वक स्वीकार केला, तर काही गोष्टी कळत-नकळत आत्मसात केल्या गेल्या. त्यांच्या स्वभावातील पारदर्शकता, स्पष्टता आणि नि:स्पृहता मला आवडायची. पुरस्कार- मानसन्मान यापलीकडे विचारांतील ‘स्थितप्रज्ञ’ वृत्ती त्यांच्या ठायी होती. आपल्या साहित्याचे मूल्य बापूंनी चांगलेच जाणले होते. कोणत्याही गटाशी संबंधित न राहता त्यावेळच्या सोलापूरसारख्या दुर्लक्षित गावी राहून, त्यांनी ‘साहित्यसाधना’ हा आपल्या जीवनाचा स्रोत मानला आणि लेखणीचा बाणा जपला. बापू गर्दीमध्ये कधी रमले नाहीत. सभा-संमेलनांमध्ये त्यांना रस नव्हता. व्याख्याने देण्याचीही गोडी नव्हती. काव्य, समीक्षा, कादंबरी.. या माध्यमांतून बापूंनी मोजके आणि अव्वल दर्जाचे, सर्वस्पर्शी लेखन केले. त्यांच्या सर्व साहित्यकृतींमधून बऱ्याच अंशी, आत्मपर विचार भावनांचे प्रकटीकरण आपल्याला पहायला मिळते.

गाढ चिंतनशीलता, तेजस्वी प्रतिभा यांच्या साहाय्याने अद्भुत कल्पनाशक्ती आणि वास्तवाचे बेमालूम रसायन ‘बखर एका राजाची,’ ‘उच्छाद’ आणि ‘डांगोरा एका नगरीचा’ या तिन्ही कादंबऱ्यांमध्ये प्रकर्षांने आढळते. वास्तवातील ‘सत्य आणि सत्व’ यावर प्रकाशझोत पडल्याने, या कादंबरीत्रयीने मराठी वाङ्मयामध्ये गौरवाचे स्थान मिळवले. ‘दु:खभोग अटळ आहे. त्याला छेद द्यायला आणि तो सहन करायला आस्था, सामंजस्य, सख्य, संवाद, याहून काहीच सक्षम नाही..’ हे प्रखर सत्य बापूंच्या कादंबऱ्यांतून अधोरेखित झाले. ‘आपली इच्छा, बुद्धी, भावना – शिवसंकल्पाशी सतत जोडून ठेवण्याने, जो संतोष मिळतो, त्याला उपमा नाही.’ या प्रकारच्या बापूंच्या वैचारिक भूमिकेचा, माझ्यावर खोल परिणाम झाला आहे. या विचारप्रणालीने माझे अंतरंग समृद्ध झाले आहे. यातील ‘सार्वत्रिक सत्य’ मलासुद्धा नाकारता येत नाही.

‘डांगोरा एका नगरीचा’ या कादंबरीला ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार २००४ मध्ये मिळाला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे बापू दिल्लीला जाऊ शकत नव्हते. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते, हा समारंभ सन्मानपूर्वक, राहत्या घरी संपन्न झाला. चहापान आणि अनौपचारिक गप्पांनंतर, मुख्यमंत्री परतले. संमिश्र भावना बापूंच्या मनात दाटून आल्या होत्या. काही क्षण नि:शब्दतेत गेले आणि त्यांनी आपल्याला मिळालेला पुष्पहार आण्णांच्या तसबिरीला नमस्कार करून अर्पण केला. मला म्हणाले, ‘‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या घरी येऊन, ‘डांगोरा’च्या रूपाने जो सन्मान मला प्राप्त करून दिला, त्यामुळे आण्णांवर झालेल्या अन्यायाचे मी काही अंशी परिमार्जन करू शकलो. आण्णांना न्याय देऊ शकलो.’’ बापूंसाठी ते भावुक, गौरवशाली क्षण अनुभवतांना मी व माझा मुलगा सिद्धार्थ त्यांच्याजवळ होतो.

बापूंना आणखी एक नेहमी ऊर्जा देणारी आणि उत्साहित करणारी गोष्ट म्हणजे, जिवलगांचे सख्य!  महाविद्यालयीन जीवनापासून अगदी अखेरच्या दिवसांतही, त्यांना ते अनुभवता आले. त्र्यंबक जोशी,  प्रा. गो. म. कुलकर्णी, कविवर्य मा. गो. काटकर, नरेश कवडी यांच्यासारख्या सहृदय मित्रांचा सहवास बापूंना लाभला. सोलापुरात नित्य भेटणारे नारायण कुलकर्णी, निशिकांत ठकार, बी. एस. कुलकर्णी, आझमभाई शेख. डॉ. एन. के. जोशी यांच्या अकृत्रिम स्नेहाचा, कृतज्ञतापूर्व उल्लेख केल्याशिवाय मला राहवत नाही. अधून-मधून नेहमी घरी येणारे, नितीन वैद्य, रजनीश जोशी,  हेमकिरण पत्की आणि सीमा चाफळकर, जयंत राळेरासकर, शिरीष घाटे, सुनील साळुंखे, पुरुषोत्तम नगरकर हे सारे जण बापूंशी अंत:स्थ स्नेहधाग्यांनी जोडले गेले होते. यांच्या संवाद, संगतीने परस्परांची अंत:करणे जाणती झाली होती.

‘अंधारयात्रे’पासून बापूंच्या लेखनाशी आलेला संबंध ‘मौजे’चे प्रकाशक श्री. पु. भागवत – यांना आनंददायी आणि अभिमानाचा वाटत होता. ‘डांगोरा’ कादंबरीच्या लेखनप्रक्रियेत त्यांनी लेखकाला पूर्ण स्वातंत्र्य देऊन त्याचे सार्वभौमत्व मानले ही विशेषत्वाने लक्षात घेण्याची बाब आहे. बापूंसारख्या ज्येष्ठ साक्षेपी लेखकावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. ‘स्नेहभावनेचे मूळ शोधावे कशाला? स्नेहाने फक्त असावे. सफल व्हावे’ या  श्रीपुंच्या पत्रातील दोन ओळींवरून, आपल्याला खूप काही समजून येते.

मराठी – हिंदी भावमधुर गीते बापूंना आवडत होती. साहिर लुधियानवी, शैलेंद्र हे त्यांचे आवडते कवी! एखाद्या संध्याकाळी आम्ही एकत्र असताना ही गाणी खास लावून ऐकली जायची. संगीताचे हे दैवी अभिजात सूर, सुख-दु:खापलीकडे जाऊन त्यांच्या मनाला उल्हसित करत. आयुष्यामध्ये उदंड अनुभव घेत असताना विस्कटल्या मन:स्थितीतही बापू असे आनंदाचे कण वेचत राहिले. युगायुगातील थोर विभूतींच्या ग्रंथरूपी सहवासातून, त्यांच्या विचारांतून बापूंच्या आयुष्याला उजाळा मिळून गेला. या मनस्वी चिंतकांची प्रतिभा हे त्यांचे सहनाचे बळ होते. म्हणून ‘वैफल्यग्रस्त काळातही निसर्गदत्त निर्माणशक्ती आणि माणसातले सौहार्द अखंड प्रवाही राहतात’ हे त्यांच्या सहवासातून मला उमगत गेले. बापूंची ही मनोभूमिका, त्यांचे वेगळेपण आणि मोठेपण ठळकपणे दाखवते, असे मला वाटते.

आमच्या घरी ज्या वेळी थोरामोठय़ांचे येणे व्हायचे ते दिवस मला खूप ‘अपूर्वाई’चे वाटत असत. बापूंना भेटण्यासाठी हे दिग्गज आवर्जून यायचे. त्यांच्या असामान्यत्वाची ओळख लहान वयात होत होती. नंतर ती विशेषत्वाने जाणवत राहिली. या मान्यवरांना भेटणे, त्यांचे विचार ऐकणे, ही माझी उत्सुकता असायची. मग बापूंना नेमकेहे कळायचे आणि थोडा वेळ आम्हा सर्वाना आपल्या दिलखुलास गप्पांमध्ये ते सामील करून घ्यायचे.

आईच्या दीर्घ आजारपणात बापूंचा बराचसा वेळ तिच्या शुश्रूषेत जायचा. ते घरात एकटे असायचे. अधून-मधून आमच्या येण्याने त्यांना खूप आधार वाटायचा. उतार वयातील थकलेपण अधिक जाणवत होते. डॉक्टरांचे उपचार, त्यांच्या भेटी, याबरोबर अत्यंत शांत आणि संयमित वृत्तीने बापू तिला सतत धीर देत. प्रकृतीस्वास्थ्य नसल्याने आई त्रस्त असायची. तेव्हा तिचे जगणे सुसह्य़ कसे होईल याकडे त्यांनी लक्ष दिले. कित्येक मित्रांच्या ‘आत्मीय सख्याने’ बापू या काळात उमेद टिकवून होते.

‘निर्मळ प्रेमभाव’ हा आमच्या नात्यातील खरा प्राण होता. बापूंची प्रत्येक भावना सच्ची आणि गंभीर होती. आत्मनिर्भरता आणि प्रसन्न मनाचा ठेवा मला त्यांच्याकडून लाभला. त्यांची मुलगी या नात्याने हा माझ्या आयुष्यातील भाग्ययोग.. पूर्वसंचित असावा असे मला वाटते. ‘स्मरण हे मरणालाही मागे टाकणारे चैतन्य आहे’ या बापूंच्या वचनानुसार, त्यांच्या अगणित आठवणींनी माझे मनोविश्व व्यापून गेले आहे. ते सदैव माझ्यासोबत आहेत हा विश्वास, माझे अंतरंग सुखावणारा आहे. बापूंच्या आध्यात्मिक अधिष्ठान लाभलेल्या विचारधारेला व्यापक जीवनदृष्टी, तरल संवेदनशीलता आणि तल्लख बुद्धिमत्तेची साथ होती. त्यांच्या अलौकिक प्रतिभेला मी विनम्र अभिवादन करते.

उद्या जन्मशताब्दीनिमित्त सोहळा

सोलापुरात उद्या, १० नोव्हेंबर २०१९ रोजी बापूंच्या, त्र्यंबक विनायक सरदेशमुख, यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘संस्मरण सोहळा’ हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या एम्फी थिएटरमध्ये आयोजित केला आहे. याचे सारे श्रेय नितीन वैद्य, रजनीश जोशी आणि मित्रपरिवारास आहे. वैद्य यांनी गेली दहा-बारा वर्षे बापूंच्या समग्र साहित्यावरील ‘सूची-ग्रंथ’ निर्मितीसाठी अथक परिश्रम घेतले. एका ध्यासाने प्रेरित होऊन, अत्यंत जिद्दीने, स्वत:चा खूप वेळ खर्ची घालून, त्यांनी हे काम पूर्णत्वास नेले याचा मला आनंद होतोय. या सूची ग्रंथामध्ये, बापूंचे सर्व प्रकाशित, अप्रकाशित लेखन, अनुवाद, मुलाखती, परीक्षणे, बातचीत यांचा समावेश आहे. या ग्रंथप्रकाशनाच्या कार्यक्रमाशिवाय कवितांचे अभिवाचन, मान्यवरांची मनोगते आणि व्याख्याने यांचाही कार्यक्रमात अंतर्भाव असेल.

siddhartha.kashelikar@gmail.com

chaturang@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Abhalmaya special memories t v sardeshmukh abn

ताज्या बातम्या