scorecardresearch

मरावे परी त्वचारूपी उरावे

मेल्यानंतर चितेवर जळण्यापूर्वी आपणही जर आपले त्वचादान केले तर कुणी तरी नवा जन्म घेऊ शकतो आणि आपणही मरून त्वचारूपी उरू शकतो..

(संग्रहित छायाचित्र)

रोहिणी आठवले

भारतात दर वर्षी साधारण आठ ते दहा लाख लोकांना भाजण्याच्या गंभीर अपघातांना सामोरे जावे लागते. त्यात साठ ते सत्तर टक्के स्त्रिया व मुले असतात आणि त्यातले दीड ते दोन लाख रुग्ण मृत्युमुखी पडतात. याचाच अर्थ दर चार मिनिटांना एक व्यक्ती भाजण्यामुळे मरण पावते. त्यावर उपाय आहे त्वचादानाचा. देहदानाप्रमाणे आपण दान केलेली त्वचा कुणाचे तरी प्राण वाचवू शकते. जाणीवजागृती नसल्याने आज आपल्याकडे अत्यल्प त्वचादान केले जाते. मेल्यानंतर चितेवर जळण्यापूर्वी आपणही जर आपले त्वचादान केले तर कुणी तरी नवा जन्म घेऊ शकतो आणि आपणही मरून त्वचारूपी उरू शकतो..

‘फटाक्यांच्या कारखान्यात आग लागून दहा बळी..’

‘बीपीसीएल रिफायनरीमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन त्रेचाळीस जण गंभीर जखमी..’

‘दिल्लीला जाणाऱ्या बसमध्ये आग लागून सत्तावीस लोक जळून खाक झाली..’

‘पुण्याला साडय़ांच्या गोडाऊनला आग लागून पाच जण मृत्युमुखी व लाखो रुपयांचे नुकसान..’

आग लागण्याच्या, अपघातांच्या अशा पन्नास ते साठ घटना भारतात रोज घडत असतात. त्या घटनांच्या बातम्या आपण वाचत असतो, टीव्हीवर पाहत असतो, मनापासून हळहळतो आणि विसरूनही जातो. पण ज्या व्यक्ती भाजून वा जळून गंभीर जखमी होतात तेव्हा त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर काय प्रसंग ओढवत असेल याची कल्पना करवत नाही. म्हणूनच अशा अपघातात भाजणाऱ्यांच्या वाढत्या संख्येविषयी, त्यावरील उपाय योजनेविषयी खूप गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. डब्ल्यूएचओ (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) च्या अहवालानुसार भारतात दर वर्षी साधारण आठ ते दहा लाख लोकांना भाजण्याच्या गंभीर अपघातांना सामोरे जावे लागते. त्यातील जवळजवळ दीड ते दोन लाख रुग्ण मृत्युमुखी पडतात आणि एक ते दीड लाख रुग्णांना तात्पुरते किंवा कायमस्वरूपी अपंगत्व येते. हाच निष्कर्ष वेगळ्याप्रकारे मांडला तर दर चार मिनिटांना एक व्यक्ती भाजण्यामुळे मरण पावते. म्हणजेच रस्ते अपघातानंतर आकडेवारी नुसार भाजण्याने मृत्यू पावणे दुसऱ्या क्रमांकावर आहे.

त्यातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे भाजण्याच्या अपघातात साठ ते सत्तर टक्के स्त्रिया व मुले (दहा ते पंचेचाळीस वर्षे) असतात. भाजल्यानंतरचा एक तास हा ‘गोल्डन पीरियड’ समजला जातो आणि त्या काळात ताबडतोब उपचार सुरू केल्यास रुग्ण वाचण्याचे प्रमाण अधिक असते. भाजल्यानंतर होणारी जखम ही अत्यंत वेदनादायी, अनेकदा चिघळणारी व दीर्घकाळानंतर बरी होणारी असते. गंभीर भाजण्यामुळे व्यक्ती शारीरिक, मानसिक, आर्थिक तसेच सामाजिकदृष्टय़ा उद्ध्वस्त होते. रुग्णालयातील दीर्घकालीन वास्तव्य आणि महागडे उपचार यामुळे अनेक कुटुंबांचे जगणे असह्य़ होते. कोणतीही जखम शारीरिक हानी तर पोचवतेच, पण भाजण्याचे व्रण आणि या घटनेचा धक्का मनावर खोलवर परिणाम करणारा असतो. आयुष्यभरासाठी त्या खुणा अंगावर बाळगण्यासाठी प्रचंड मानसिक धर्य लागते.

शरीराचा किती भाग भाजला आहे ते वैद्यकीय परिभाषेत मोजण्याचे परिमाण म्हणजे टीबीएसए (टोटल बॉडी सरफेस एरिया) दहा टक्के/ वीस टक्के/ तीस टक्के/ शंभर टक्के असा तो मोजला जातो. मनुष्याच्या त्वचेचे एकूण आठ स्तर असतात. जखम किती खोलवर आहे हे कळण्यासाठी फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री बर्न्‍स अशी परिभाषा वापरतात. पन्नास ते साठ टक्क्यांपेक्षा जास्त भाजलेल्या व्यक्ती मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण मोठे आहे. या सगळ्या प्रकारात आणखी एक खंतावणारी गोष्ट म्हणजे भाजलेल्या रुग्णांवर सगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार होत नाहीत. दहा-वीस टक्के टीबीएसए असेल तर मलमपट्टी करून, औषधे देऊन, रुग्णांना घरी पाठवतात. पण त्यापेक्षा जास्त भाजलेल्या व्यक्तींना रुग्णालयामध्ये दाखल होण्याची गरज असते. त्यांना मात्र जिथे ‘बर्न वॉर्ड’ आहे अशाच रुग्णालयांमध्ये जावे लागते. कारण जंतुसंसर्गाचा मोठा धोका अशा रुग्णांना असतो व त्यासाठी वेगळ्या सोयींची गरज असते. त्यासाठी स्वतंत्र

‘बर्न वॉर्ड’ लागतो. सध्या भारतामध्ये एकंदरीत १३५० ते १४०० बेड्स आणि तीनशे अतिदक्षता विभाग अर्थात आयसीयू बेड्स आहेत, जेथे भाजलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. भारताची एकूण लोकसंख्या आणि भाजण्याच्या अपघातांचे प्रमाण पाहिले तर साधारण सहा हजार बेड्स व आठशे आयसीयू बेड्सची आवश्यकता आहे.

भाजलेल्या एकूण अपघातातील जीवघेण्या अपघातांची कारणे टक्केवारीनुसार अशी सांगितली जातात. –

आग (ज्वाला) – ७५ ते ७८ %

गरम पाणी (कढत पाणी वा वाफ) – ५%

विजेचा धक्का (इलेक्ट्रिकल) – १२ ते १५ %

रासायनिक वा केमिकल – ३ ते ५ %

स्वयंपाक करताना चूल, स्टोव्ह, गॅस, चिमणी, टेंभे यांमुळे होणाऱ्या अपघातांचे प्रमाण लक्षणीय आहे. म्हणूनच स्त्रिया व मुले गंभीररीत्या भाजण्याचे प्रमाणही जास्त आहे.

भाजण्याचे बरेचसे अपघात आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांमध्ये होण्याचे प्रमाण खूप आहे. खर्चीक उपचार न परवडल्याने बऱ्याचदा ते अर्धवट सोडले जातात व बरा होऊ शकणारा रुग्णही मृत्युमुखी पडतो.

त्याचबरोबर आग विझवण्यासाठी भारतात उपलब्ध असणारी अग्निशमन यंत्रणा हासुद्धा अभ्यासाचा विषय आहे. ‘मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स’तर्फे २०१७ मध्ये संसदेमध्ये एका उत्तरात असे सांगण्यात आले, की भारतात २०१२ पर्यंत २९८७ अग्निशमन केंद्रे होती आणि गरज आहे ती ८५५९ केंद्रे असण्याची. त्याशिवाय भारताला

५, ५९,६८१ प्रशिक्षित अग्निशमन अधिकारी वा कर्मचाऱ्यांची गरज आहे आणि भारतात साधारण ८० हजार ते ९० हजार प्रशिक्षित कर्मचारी आहेत. अग्निशमनाची साधने व वाहने ६,७१२ आहेत व आवश्यक ३२,७१० आहेत (dgfscdhg.gov.in) (ही आकडेवारी २०१२ ची आहे). थोडक्यात, भारतात फायर ब्रिगेड स्टेशन्स, प्रशिक्षित कर्मचारीवर्ग, तसेच, आग विझवण्याची साधने व आगीचे बंब सगळ्याचीच कमतरता आजही आहे, पन्नास टक्क्यांपेक्षाही जास्त.

या जळून मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी एक अत्यंत चांगला आणि आपण ठरवले तर सहज उपलब्ध असा उपाय म्हणजे आपले त्वचादान. त्याचे खूप चांगले अनुभव आलेले आहेत. चार वर्षांची दिव्या घराच्या बाजूला खेळत होती. समोर कचरा जळत होता. त्यातील शीतपेयाचा रिकामा डबा फुटला आणि दिव्याच्या अंगावर उडाला. तिचा चेहरा, मान आणि दोन्ही हातांवर भाजले. नागपूरच्या ऑरेंजसिटी रुग्णालयाच्या त्वचापेढीतून वेळेत त्वचा मिळाल्याने तिच्या जखमा लवकर भरून आल्या आणि ती वाचू शकली. अशीच एक घटना म्हणजे नऊ वर्षांची जानकी अपघाताने ५३ टक्के भाजली होती. छाती, पोट, पाठीचा काही भाग आणि मांडय़ांवर जखमा झाल्या. तिला दिल्लीच्या रुग्णालयात दाखल केले गेले. पण १५-२० दिवसांमध्ये तिची तब्येत खालावत गेली. मांडय़ांच्या जखमा गंभीर होऊ लागल्या. वीस दिवसांनी तिला कोईमतूरच्या त्वचापेढीतून त्वचा मिळाली. तेव्हा जखमांवर त्वचारोपण केले आणि लवकरच तिची तब्येत सुधारू लागली.

अशा प्रकारे त्वचापेढीतून योग्य वेळेस त्वचा मिळाल्याने अनेक गंभीररीत्या भाजलेल्या रुग्णांचे प्राण वाचवता आलेत. पण त्याचबरोबर असंख्य हकिकती अशाही आहेत, की त्वचा उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले. त्वचा हा मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. ते शरीराचे संरक्षक कवच असते जे भाजल्यामुळे नष्ट होते. त्यामुळे जंतुसंसर्गाचा धोका वाढतो. त्वचेचे रोपण केल्यास जखम लवकर भरून येते व हा धोका टळतो. म्हणूनच भाजलेल्या रुग्णांवर उपचार करताना, वरदान ठरते ते त्वचादान व त्वचापेढीचे!

त्वचापेढी

भारतीय संस्कृतीमध्ये दानाचे महत्त्व खूप आहे. अवयवदान करणे हे माझ्या मते सर्वात श्रेष्ठ दान ठरेल. मृत्यूपश्चात आपण नेत्रदान, देहदान, त्वचादान केले तर मृत्यूनंतरही कुणाच्या तरी उपयोगी पडल्याचे समाधान आपल्याला तसेच आपल्या कुटुंबीयांना मिळू शकते. रक्तपेढीमध्ये जसे रक्त साठवले जाते तसेच त्वचापेढीमध्ये त्वचा साठवून ठेवता येते. त्या त्वचेचे रोपण भाजलेल्या जखमेवर केल्यास जखम लवकर भरून येते. अगदी ऐंशी टक्के भाजलेला रुग्णसुद्धा वेळेवर त्वचारोपण केल्यास मृत्यूच्या खाईतून परत येऊ शकतो. विकसित देशांमध्ये अत्याधुनिक उपचार आणि त्वचेची उपलब्धता यांमुळे सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त भाजलेले रुग्णही वाचवले जातात. अठरा वर्षांवरील कोणतीही निरोगी व्यक्ती मृत्यूपश्चात सहा तासांच्या आत त्वचादान करू शकते. अर्थात त्यासाठी तशी तिने इच्छा व्यक्त केलेली असणे आवश्यक असते किंवा तिचे नातेवाईकही याविषयी निर्णय घेऊ शकतात. याशिवाय जिवंत व्यक्ती त्वचादान करू शकते. तसेच ब्रेनडेड व्यक्तीचेही त्वचादान होऊ शकते.

जिवंत व्यक्ती – भाजलेल्या व्यक्तीला त्याच्याच शरीराची निरोगी त्वचा काढून त्वचारोपण (स्किन ग्राफ्टिंग) करता येते. किंवा अशा रुग्णांसाठी आईवडील, भाऊबहीण, जवळचे नातेवाईक जिवंतपणी त्वचादान करू शकतात; पण अत्यावश्यक असेल तरच हे केले जाते. कारण ती प्रक्रिया फारच किचकट आहे.

ब्रेनडेड व्यक्ती – सर्व चाचण्या करून  अशा व्यक्तींचे त्वचादान केले जाऊ शकते.

मृत व्यक्ती – १८ वर्षांवरील कोणतीही निरोगी व्यक्ती मृत्यूपश्चात त्वचादान करू शकते. मात्र त्या मृत व्यक्तीला कर्करोग, हिपॅटायटिस, एचआयव्ही यांसारखे आजार नसावेत. तसेच त्वचारोग किंवा कोणतेही संसर्गजन्य आजार नसावेत. त्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात नातेवाईकांनी दोन तासांच्या आत त्वचापेढीला फोन केला तर तिथले तज्ज्ञ डॉक्टर घरी (किंवा मृतदेह जिथे असेल तिथे) येतात. मृत व्यक्तीच्या पाठीवरील आणि दोन्ही मांडय़ांवरील त्वचेचा पातळ १/८ भाग विशिष्ट उपकरणांच्या (डर्मेटोम) साहाय्याने काढून घेतला जातो. त्या जागी बँडेज करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जातो. या प्रक्रियेला साधारण ४०-४५ मिनिटे लागतात. यासाठी चेहऱ्यावरची वा दर्शनी भागावरची त्वचा काढली जात नाही. मृत व्यक्तीच्या शरीराचा आदर राखला जातो आणि कुठल्याही प्रकारे मृतदेह विद्रूप होणार नाही याची काळजी घेतली जाते. काढलेली त्वचा फॉस्फेट सलाइन बफरमध्ये ठेवून त्वचापेढीत आणली जाते. तसेच मृतदेहाच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. मृत्यूनंतर सहा तासांच्या आत ही प्रक्रिया होणे गरजेचे असते. त्वचापेढीमध्ये या त्वचेची र्निजतुक कॅबिनेटमध्ये तपासणी केली जाते. तसेच रक्ताच्या चाचण्याही केल्या जातात. त्वचा पूर्णपणे निरोगी असेल तरच त्यावर प्रक्रिया करून ग्लिसरॉलमध्ये विशिष्ट तापमानाला ती साठवता येते. या पद्धतीने त्वचा ३ ते ५ वर्षांपर्यंत उपयोगी राहू शकते.

जसे रक्तपेढीमध्ये रक्त साठवता येते; तसेच त्वचा साठवून ठेवण्याची प्रयोगशाळा म्हणजे त्वचापेढी. त्वचेच्या योग्य तपासण्या करून सुरक्षित, जंतूविरहित वातावरणात त्वचेची साठवण केली जाते आणि आवश्यकतेप्रमाणे तिचा वापर करता येतो. त्वचापेढीमधील त्वचेचा उपयोग भाजलेल्या व्यक्तींच्या जखमेवर ड्रेसिंग म्हणून किंवा त्वचारोपणासाठी केला जातो. भाजलेल्या रुग्णांच्या जखमा लवकर भरून येतात. रुग्णाच्या वेदना कमी होतात, जंतुसंसर्ग आटोक्यात येतो तसेच प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच शरीरातील पाणी, क्षार आणि प्रथिनांचा समतोल राखण्यास मदत होते.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या सगळ्यांच्या त्वचेची रचना सारखीच असते. त्यामुळे कोणाचीही त्वचा कुणालाही दान केली जाऊ शकते. भाजलेल्या जखमेवर त्वचेचे ड्रेसिंग केले जाते, ते साधारण दोन-तीन आठवडय़ांत निघून जाते आणि आतून नवीन त्वचा तयार होत असते. त्यामुळे काही दिवसांनी त्वचेमध्ये काही फरक दिसत नाही.

हे सगळं वाचल्यावर तुम्हाला त्वचादान करावंसं वाटलं तर उत्तमच. त्वचादानासाठी कोणतीही व्यक्ती प्रतिज्ञापत्र भरून कुठल्याही रुग्णालयामध्ये किंवा ऑनलाइन नोंद करू शकते; पण प्रतिज्ञापत्र न भरताही मृत्यूपश्चात त्वचादान वारसांच्या संमतीने होऊ शकते. भारतात कायदा असं सांगतो, की मृत्यूनंतर तुमच्या शरीरावर तुमचा हक्क नसतो. तुमचे वारसच त्याबाबत निर्णय घेऊ शकतात. म्हणून तुमची इच्छा वारसांना सांगणे किंवा मृत्युपत्रात तशी नोंद केल्यास मृत्यूनंतर त्वचादान होऊ शकते. मात्र यासाठी एक काळजी घ्यावी लागते, ती म्हणजे, मृत्यूचा दाखला (डेथ सर्टिफिकेट) त्वचापेढीच्या डॉक्टरांना देणे बंधनकारक आहे. त्यानंतर वारसांना प्रतिज्ञापत्रावर सही करून द्यावी लागते आणि नंतरच त्वचादान करता येते. यात महत्त्वाचे म्हणजे दान करणाऱ्या व्यक्ती वा कुटुंबाला यासाठी काहीही शुल्क द्यावे लागत नाही.

वैद्यकशास्त्र खूप प्रगत झाले आहे. त्यामुळे कृत्रिमरीत्या त्वचा तयार करता येते; पण हे अतिशय खर्चीक आहे. १० x १० सेंमी. कृत्रिम त्वचेचा खर्च साधारण पन्नास हजार रुपये आहे; पण १० x १० सेंमी त्वचा दान करून मिळवली असेल तर खर्च फक्त हजार रुपये येतो. मात्र भारतातील  त्वचादान आणि त्वचापेढींची उपलब्धता हा एक गंभीर चिंतेचा विषय आहे. सध्या भारतात फक्त दहा त्वचापेढी किंवा त्वचेचे संकलन करणारी केंद्रे आहेत (खरे म्हणजे प्रत्येक जिल्ह्य़ाच्या ठिकाणी एक त्वचापेढी व ‘बर्न वॉर्ड’ असणारे रुग्णालय यांची गरज आहे.) त्याचे कारण म्हणजे सामाजिक तसेच शासकीय पातळीवरची त्वचादान व त्वचापेढीबाबतची अनभिज्ञता आणि उदासीनता.

या सगळ्याचा विचार करून त्यामध्ये व्यक्तिगत तसेच सामाजिक पातळीवर सुधारणा करण्याच्या हेतूने आम्ही ‘कुमुदिनी मेमोरियल पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली आहे. आम्ही त्यासाठी तीन पातळ्यांवर कार्यरत आहोत –  प्रतिबंध, उपचार आणि पुनर्वसन. ‘भाजण्याच्या अपघातांना एक सोनेरी किनार आहे,’ असे म्हटले जाते. म्हणजेच त्यातील बरेचसे अपघात योग्य काळजी आणि प्रशिक्षण घेतले तर टाळता येतात. आग लागण्याची वा भाजण्याची कारणे टाळण्यासाठी प्रतिबंधक उपायांची योजना घरगुती स्तरावर वा सोसायटय़ांमध्ये वा कारखान्यांमध्ये वा नागरी वस्त्यांमध्ये करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच अपघात झाल्यास प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण देण्याची योजना आहे. आर्थिकदृष्टय़ा दुर्बल रुग्णांना पूर्णपणे बरे होण्यासाठी अर्थसाहाय्य देण्यास संस्था प्रयत्नशील आहेच आणि राहील.

त्याचप्रमाणे मानसिक धक्क्यातून बाहेर येण्यासाठी रुग्णांचे समुपदेशन करणे व फिजिओथेरपीच्या माध्यमातून त्यांना अपंगत्व टाळण्यासाठी मदत करण्याचेही आमचे उद्दिष्ट आहे. आम्ही त्वचादानासाठी जागृतीपर व्याख्याने विविध संस्था, महाविद्यालये, सोसायटय़ांमध्ये देऊन याबाबत जनजागृती करत आहोत. ‘कुमुदिनी ट्रस्ट’ सध्या पुणे येथे कार्यरत आहे; पण ती चळवळ आम्हाला हळूहळू महाराष्ट्रात आणि भारतभर पसरवायची आहे.

आमची प्रमुख उद्दिष्टे आहेत, प्रत्येक जिल्ह्य़ाच्या ठिकाणी भाजलेल्या रुग्णांवरील उपचारासाठी सुसज्ज यंत्रणा असावी. आवश्यकतेनुसार जखमी रुग्णांना ‘एअरलिफ्ट’ करून लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोचता यावे, प्रत्येक राज्यात किमान एक त्वचापेढी असावी व आवश्यकतेनुसार त्याची संकलन केंद्रेही असावीत, खेडोपाडी सगळीकडे लोकांना त्वचादानाचे महत्त्व समजावे यासाठी जनजागृती करणे, सरकारी पातळीवरूनसुद्धा जास्तीत जास्त कार्यक्षम यंत्रणा उभी करण्याचा आग्रह धरणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आगीचे प्रतिबंधात्मक उपाय योजून अपघातांची संख्या व जीवितहानी कमी करणे.

अशी सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आम्हाला एक लोकचळवळ उभारायची आहे. त्यासाठी जास्तीत जास्त लोक या चळवळीत सामील होणे गरजेचे आहे. नवी मुंबईच्या ऐरोली येथील त्वचापेढीत महिन्याला २० ते ३० त्वचा दान होतात; पण गरज आहे साधारण १५० ते १७० त्वचादानांची. त्वचादानाविषयी हे सगळे मुद्दे आपण विचारात घेतले तर त्याची सहजता, सोपेपणा, गरज आणि उपयोग यामुळे प्रत्येकाने याचा निश्चय करायची गरज आहे.

आपल्या मृत्यूनंतर चितेवर आपली त्वचा जळून खाक होणार आहे; पण आपण त्वचादान केले तर त्या भाजल्याने मृत्यूच्या तोंडी असणाऱ्या व्यक्तीचे प्राण नक्कीच वाचू शकतात. तेव्हा हे काम कराच. त्यासाठी  म्हणावेसे वाटते, ‘मरावे परी त्वचारूपी उरावे!’

त्वचादान करायचे असल्यास

मृत्यूपश्चात कोणत्याही व्यक्तीचे  त्वचादान करायचे असेल तर +९१२२ – २७७९३३३३ या क्रमांकावर दूरध्वनी केल्यास तज्ज्ञ डॉक्टर घरी येऊन त्वचादानाची प्रक्रिया पूर्ण करतात. किंवा ९४२३००७९१३ यावर संपर्क साधल्यास ‘कुमुदिनी मेमोरियल पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट’ आवश्यक ती सगळी मदत पुरवू शकते.

अधिक माहितीसाठी http://www.kumudinicharitabletrust.org rohiniathavale@yahoo.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Accidents of roasting skin donation abn

ताज्या बातम्या