वय वाढतं तशी माणसाची उमेदही कमी व्हायला हवी, असं नक्कीच नाही! वयाच्या ऐंशी-नव्वदीतही सत्तेच्या सारीपाटावर सक्रिय असणारे राजकारणी, आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत कलेत रमणारे कलाकार आणि शंभरी ओलांडूनही जगण्याचा आनंद घेणारी माणसं आपल्याला हेच सांगतात की, दीर्घायुष्य निरोगी आणि आनंदी असू शकतं. आणि हे असं आयुष्य हवं असेल तर उत्साह, सर्जनशीलता, माणसांशी नातं आणि जगण्याचं प्रयोजन जपणं नक्कीच आपल्या हातात आहे. वृद्धत्वाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारी हीच ‘वृद्धशाही’ नाही का?

सक्रिय असलेल्या काही भारतीय राजकारण्यांची वयं बघा. फारुख अब्दुल्ला ८९, यशवंत सिन्हा ८८, डॉ. सुब्रमण्यम स्वामी ८७, शरद पवार ८६, मल्लिकार्जुन खरगे, पिनाराई विजयन आणि कॅप्टन अमरिंदर या तिघांचं वय ८२च्यावर, पंतप्रधानपद सोडताना मनमोहन सिंग ८१ वर्षांचे होते. ज्योती बसू मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले तेव्हा ८६ वर्षांचे होते. करुणानिधी यांचं ९४ व्या वर्षी निधन झालं तेव्हा ते पक्षाध्यक्ष आणि आमदार होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वय ८०. त्यांचे पूर्वसुरी जो बायडेन ८२ व्या वर्षापर्यंत अध्यक्षपदी होते. या तुलनेत कपिल सिबल ७८, पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन ७४ आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग ७३ हे लहानच म्हणायचे. या प्रकारे सर्वोच्चपदी वृद्ध असतात अशा व्यवस्थेला ‘जेरॉन्टोक्रसी’ म्हणतात. जेरॉन्टोलॉजी (वृद्धशास्त्र) आणि डेमॉक्रसी (लोकशाही) या शब्दांमधून घडवलेला शब्द ‘जेरॉन्टोक्रसी’. आपण याला ‘वृद्धशाही’ म्हणू या.

या नेत्यांचा इतक्या वाढलेल्या वयातला सार्वजनिक वावर, त्यांची ऊर्जा थक्क करते. हे येतं कुठून? ‘वृद्धावस्थेतले राजकारणी’ या विषयावर बरेच अभ्यास चालतात. राजकारणात शिखरावर पोहोचणार्यांकडे चिवटपणा, ताण-तणाव सहन करण्याचा सोशीकपणा असतो. सत्तारूढांमध्ये प्रतिकूलतेला अनुकूलतेमध्ये बदलण्याचं (‘आपदा में अवसर!’) कसब असतं. स्वत:च्या ऊर्जा व्यवस्थापनात ते कुशल होत जातात. उत्तम आणि त्वरित वैद्यकीय सेवा, मदतनीस-चमू, आर्थिक सुरक्षितता हे उच्चपदस्थ असण्याचे फायदे त्यांना मिळतातच. याहूनही संजीवक ठरते त्यांची समाजसन्मुखता. सतत लोकसंपर्क, अनुयायी यामुळे त्यांच्या अहंचं झाड कोमेजत नाही. महत्त्वाकांक्षा त्यांना अप्रासंगिक, कालबाह्य होण्यापासून रोखत राहते. वय-अनुभवाची ज्येष्ठता त्यांचं वलय वाढवत नेते.

दीर्घायू माणसांविषयी बोलताना खुशवंत सिंग यांची आठवण येतेच. आयुष्य पुरेपूर जगलेले, तीक्ष्ण अंतर्दृष्टीचे लेखक. मानवतावादी, दांभिकपणाची खिल्ली उडवणारे, निखळ ऐहिक आनंदाचे आस्वादक. ‘खुशवंतनामा : द लेसन्स ऑफ माय लाइफ’ हे त्यांचं पुस्तक २०१३ मध्ये प्रसिद्ध झालं तेव्हा ते ९८ वर्षांचे होते. २०१४ मध्ये ते वारले. त्यांच्या उत्कट आणि उत्फुल्ल जगण्याचं मर्म या पुस्तकात आहे. पंडित रविशंकर यांचं निधन झालं ९२ व्या वर्षी. त्याआधीच्या महिन्यातली त्यांची मैफील अखेरची ठरली. हृदयविकार, श्वसन-त्रास यामुळे नाकात ऑक्सिजनच्या नळ्या घातलेल्या अवस्थेतदेखील त्यांनी नेहमीसारखं तल्लीनपणे सतारवादन केलं. त्याही स्थितीत त्यांचं भान इतकं तल्लख की, पूर्व अमेरिकेत तेव्हा येऊन गेलेल्या हुरिकेन वादळाचे बळी ठरलेल्यांना ही मैफील त्यांनी समर्पित केली. बाबा आमटे ९३ व्या वर्षी वारले. ते ७२ वर्षांचे असताना कन्याकुमारी ते काश्मीर हे संपूर्ण अंतर ‘भारत जोडो मिशन’ यात्रेत चालले होते. पुढे ७५ व्या वर्षी आसाम ते गुजरात यात्रेत त्यांनी प्रवास केला. गांधीवादावर अढळ श्रद्धा आणि संकटांवर मात करण्याचा झुंजारपणा यामुळे ते सदैव कार्यरत राहिले. कंबरेच्या मणक्याच्या आजारपणातदेखील आडव्या झोपलेल्या स्थितीत आंदोलनांमध्ये भाग घेत राहिले.

शेवटचा जाहीर कार्यक्रम केला तेव्हा आशा भोसले ९१ वर्षांच्या होत्या. जगणं आणि गाणं याबद्दलच्या त्यांचा सळसळत्या उत्साहाचे आपण साक्षीदार आहोतच. अभिनेते देव आनंद ८८ व्या वर्षी गेले. ‘रोमान्सिंग विथ लाइफ’ या त्यांच्या आत्मचरित्राच्या शीर्षकातूनच त्यांची जीवनदृष्टी दिसते. ‘जो मिल गया उसी को मुकद्दर समझ लिया, जो खो गया, मैं उसको भुलाता चला गया ’ हे त्यांच्या चित्रपटातलं गीतच त्यांचं जगण्याचं तत्त्वज्ञान होतं. देव आनंद यांनी एका मुलाखतीत सांगितलंय की, म्हातारपण, मृत्यू सगळ्यांनाच येणार. पण सर्जनशीलता, समाजाभिमुखता तुमच्या जगण्याचं सोनं करू शकते.

‘कोई खामोश जख्म लगती है, जिंदगी एक नज्म लगती है।’ अशा जीवनदृष्टीचे ९२ वर्षांचे कवी गुलजार आजही तरुण पिढीला भुरळ पाडतात. प्रत्येक व्यक्तीकडे उच्च कोटीची प्रतिभा असेल-नसेल. पण या उदाहरणांवरून लक्षात येतं की, जगण्याला एखादा हेतू, ध्येय, एखादं गुंतलेपण असलेल्यांचं म्हातारपण त्यांना स्वत:ला, समाजाला समाधान देणारं ठरतं. अशी ही निरोगी वृद्धशाही. अर्थात, या ध्येयवेड्यांचं ज्यासाठी कौतुक होतं, त्या बाबी त्यांच्या पाल्यांची, कुटुंबांची काळजी वाढवणार्या ठरू शकतात. उदाहरणार्थ, बाबा आमटे तब्येत ठीक नसतानाही कामं करत राहायचे, याबद्दल डॉ मंदाकिनी आमटे (बाबांची सून) म्हणाल्या, ‘‘बाबा फार कुणाला जुमानत नसत. त्यातल्या त्यात पत्नी साधनाताई आणि नातवंडं यांचं ते जरा तरी ऐकून घेत. आम्हीही फार ताणून धरत नसू. कारण काम हा त्यांचा श्वास होता. मात्र त्यांच्यासोबत कुणी तरी सहकारी असायलाच हवा, याची आम्ही काळजी आम्ही घेत असू.’’

एका ग्रीक माणसाची एक कहाणी. शहरात राहणारा. फुप्फुसाच्या कर्करोगाने गाठलं तेव्हा तो ६६ वर्षांचा होता. आयुष्याचे काही महिनेच शिल्लक आहेत,अशी स्थिती. त्याला वाटलं, आपल्या मूळ गावी जाऊन मरू. शहरातला पसारा आवरून गावी गेला. त्याचा भोवताल बदलला. त्याने जीवनशैली बदलली. पुढे त्याने वयाची शंभरी ओलांडली. गमतीने म्हणू लागला, ‘‘मी मरायचंच विसरलो जणू…’’. ‘लाईव्ह टू हंड्रेड – सिक्रेट ऑफ द ब्लू झोन्स’ या २०२३ मध्ये ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेल्या माहितीपट मालिकेत अशांच्या मुलाखती, कहाण्या आहेत. मृत्यूला रोखणं शक्यच नाही. पण चांगलं जगायचा प्रयत्न करणं नक्की शक्य आहे. ते कसं, ते डॅन बटनर यांनी निर्मिलेली ही मालिका सांगते.

डॅन हे अमेरिकी ‘नॅशनल जिओग्राफिक’ फेलो, ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे ‘बेस्ट सेलिंग’ लेखक. संशोधक, शिक्षक, निर्माता, कथाकार, वक्ता आणि उत्तम व्यायामपटू. त्यांना सुचलं, जगात दीर्घायुष्यी माणसं जिथं आहेत, त्या ठिकाणांचा आणि दीर्घायुष्याच्या कारणांचा शोध घ्यायचा. मिनेसोटा विद्यापीठाच्या ‘सेंटर ऑन एजिंग’चे संचालक असलेले लोकसंख्याशास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट केन यांच्यासह ‘नॅशनल इ्स्टिटट्यूट ऑन एजिंग’ (ठकअ) वॉशिंग्टन, डीसी इथल्या शास्त्रज्ञांनी दीर्घायुष्याचे काही ‘हॉटस्पॉट’ शोधले होते. २००३ पासून डॅन बटनरने विविध तज्ज्ञांसह दीर्घ आयुर्मानाच्या हॉटस्पॉट्सना भेटी देणं सुरू केलं. सिंगापूर, इटलीतलं सार्डिनिया, जपानमधलं ओकिनावा, मेक्सिकोमध्ये मॉन्टेरी, नुएवो लिऑन, कॅलिफोर्नियातलं लोमा लिंडा ही ठिकाणं, म्हणजेच ‘ब्ल्यू झोन्स’. इथं निरोगी म्हातारपण भेटतं. या सहा ठिकाणांच्या भटकंतीत लोकांशी गप्पा करताना, स्थानिक जीवनशैली समजून घेताना निरोगी म्हातारपणाचं कारण ठरणारी पंचसूत्रं त्यांना हाती लागली.
(-) भरपूर नैसर्गिक हालचाली, शारीरिक कामं, चालणं, हातकाम, बागकाम, दिवसभर सक्रिय राहणं. त्याचबरोबर आराम आणि विरंगुळादेखील.
योग्य आहाराची निवड, मोजकं खाणं-पिणं, वनस्पती-आधारित आहारावर भर.

जीवनविषयक उमदी दृष्टी, जगण्याला मूल्यांचं अधिष्ठान, निश्चित हेतू, त्याबाबतची स्पष्टता असणं, ताणतणाव नियंत्रित, आपण कुणाला तरी हवेसे आहोत ही भावना. कुटुंब, घरातली तरुण पिढी, नातवंडं, अन्य नातलग, जिवाभावाचे मित्र-मैत्रिणी या सगळ्यांचा सहवास, या समुदायांशी विश्वासाचं, प्रेमाचं नातं असणं. स्वत:पुरताच विचार न करता समाजाचा भाग म्हणून जगणं, समाजाशी देवाण-घेवाण, समाजकल्याणासाठी योगदान.

ही पंचसूत्रं त्याने भेट दिलेल्या ठिकाणच्या स्त्री-पुरुषांच्या रोजच्या जगण्यात आहेत. दीर्घायुष्य लाभण्यात या पाच घटकांचं योगदान आहे. यात कुणी ‘व्हॉट्सॲप अंकल्स आणि आंटी’ नाहीत. ही सर्व शंभरीच्या अल्याड-पल्याडची माणसं सक्रिय आहेत, आनंदाने जगतायत, हे त्याने अनुभवलं. हे दीर्घायु स्त्री-पुरुष, काही कुटुंबासोबत, काही एकएकटे राहणारे. त्यांची काळजी शेजारीपाजारी घेतात. या ‘ब्लू झोन’ गावा-शहरांत वृद्धाश्रम नाही. त्याची गरजच नाही. सरकार आणि समाज मिळून वृद्धांना सांभाळतात. डॅन बटनर आणि त्यांच्या चमूने ‘ब्लू झोन’चं वातावरण कृत्रिमरीत्या तयार करण्यासाठी अमेरिकेतल्या काही शहरांत काम सुरू केलं आहे. वृद्धकेंद्री सार्वजनिक धोरण आखलं जावं यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. डॅनच्या मालिकेवर अमेरिकेची बदनामी करणारी, शाकाहाराची भलामण करणारी म्हणून टीका झाली आहे. तरीही, ही मालिका सुखासमाधानाने जगण्याची एक दिशा देते. तसं जगणार्यांना आपल्याला भेटवते. आपली जीवनशैली सुधारण्यासाठी युक्तीच्या चार गोष्टी सांगते.

आता, या युक्तीच्या गोष्टी म्हणजे मालिकेच्या शीर्षकात म्हटलंय तसं खरोखर ‘सिक्रेट्स’ आहेत का? या आपल्याला माहीत नाहीयेत का? नक्की माहीत आहेत. भारतीय परंपरेत त्या होत्याच. खुद्द गांधीजींचा श्रमावर आधारित जीवनशैलीचा आग्रह असायचा. त्यांचे आहारप्रयोगदेखील जगणं निरोगी व्हायला मदतकारक असत. पण आपण ते सारं विसरतो आणि चंगळवादी म्हणून वर्णन केलं जातं, तशी शैली पटकन अंगीकारतो. या जीवनशैलीचे दुष्परिणाम आपल्याला दररोज जाणवतात. यंत्रांमुळे आपले शरीरश्रम कमी झाले. आपण पुन्हा मागे जाऊन यंत्र नव्हती त्या काळातलं आयुष्य जगू शकणार नाहीच. पण आजच्या जगण्यात या पंचसूत्रांचा कसा समावेश करू शकतो, ते बघता येईल. आपल्याला अगदी शतायुषी होण्याचा वर वगैरे नको, पण आपल्या वाट्याला येणार्या वार्धक्यप्रवासात जास्तीत जास्त निरोगी, आनंदी राहण्याचे प्रयत्न तर करू शकतो. ही माहितीपट मालिका तेच सांगते.

डॉ. स्नेहल मल्लकमिर, वैद्यकीय जनुकशास्त्रज्ञ यांच्या सांगण्यानुसार वय वाढणं ही गुंतागुंतीची प्रक्रिया मानली जाते आणि ती अनेक बाजूंनी अभ्यासली जातेय. कालक्रमानुसार वय म्हणजे एक वाढणारी संख्या. ती वाढतच जाणार. जीवशास्त्रीय वय म्हणजे जनुकीय पेशींमध्ये होणारा बदल. तो होणारच. विशिष्ट जनुकबदल हे आयुर्मान आणि निरोगी वृद्धत्वाशी संबंधित असल्याचं दिसून आलंय. मानसिक वय म्हणजे ताण-तणाव वाढणं असतं. मात्र, आधुनिक उपचारांच्या मदतीने ताण-तणाव हाताळून, बदल स्वीकारून मानसिक वय कमी राखता येऊ शकतं. आणखी एक सामाजिक वयदेखील असतं. परिसर आरोग्यदायी, समाज सामावून घेणारा, भोवतालची माणसं सहिष्णू, सामूहिकपणाचं भान बाळगणारी, असं असलं की सामाजिक वयदेखील दीर्घकाळ स्थिर राखता येतं.

आत्ताच्या तरुणांचा, आपल्या पाल्यांचा प्रवास वृद्धत्वाकडे होईल तेव्हाच्या व्यवस्थेची तजवीज आजपासूनच सुरू करायला हवी. या तरुणांनी शरीर-मनाचं आरोग्य टिकवण्याचा, जीवनध्येय शोधण्याचा प्रयत्न केला आणि तसा भोवताल उपलब्ध करून दिला, तर त्यांचं वार्धक्य निरोगी होईल. तसंच घडो.
तर, अशी ही निरोगी, आनंदी ‘वृद्धशाही’ झिंदाबाद!
ukulmedha@gmail.com