गिरिजा ओक
माझ्या लेकाच्या, कबीरच्या जन्मानंतर मी अर्थातच ब्रेक घेतला होता. त्याआधी आणि या ब्रेकनंतर मी साधारण पाच वर्षं एका ‘कुकिंग शो’चं निवेदन करत होते. हा कार्यक्रम दुपारी एक ते दीड वाजता असायचा, त्यामुळे बर्‍याच गृहिणी सकाळची कामं आटोपून जेवताना माझा कार्यक्रम पाहायला बसायच्या. त्यामुळे अनेक स्त्री प्रेक्षकांनी मला सांगितलं, ‘‘तुम्ही आम्हाला आमच्याच घरच्या सदस्य वाटता. असं वाटतं की, आपण एकत्रच जेवायला बसतोय. याचा एक परिणाम असा होता की, या ्त्रिरया मी त्यांचीच कुणी तरी एखादी मैत्रीण आहे, अशा वागायच्या. मला ते फार आवडायचं.

पण एकदा झालं असं की, मी माझ्या अडीच वर्षांच्या कबीरला बागेत खेळायला घेऊन गेले होते. खेळून झाल्यावर बागेच्या बाहेर आम्ही गाडीची वाट पाहत उभे होतो. तितक्यात खूप गोड दिसणार्‍या एक मावशी माझ्याजवळ आल्या. माझा हात धरून त्यांनी मला पूर्ण न्याहाळलं, जागच्या जागी गोल फिरवलं आणि म्हणाल्या, ‘अगं, बारीकच तर आहेस, मग टीव्हीवर का अशी दिसतेस? मला एक क्षण असं वाटलं त्यांना बोलावं, ‘‘अहो मावशी, काय करताय तुम्ही?’’ पण दुसर्‍याच क्षणी मला वाटलं, हे किती निर्मळ आहे, लहान मुलांसारखा निरागस भाव मला त्या मावशींमध्ये दिसला. मला असं वाटतं, यात कोणत्याही प्रकारचा खोचकपणा नव्हता, त्यांच्या भावना त्यांनी किती मोकळेपणानं मला सांगितल्या. किती सहजपणे त्यांनी मला विचारलं. म्हणजे मी त्यांना किती ‘आपलीशी’ वाटत असेन नाही? मी त्यांना घरातीलच कुणी तरी असल्याचं वाटत होतं, या भावनेचं मला कौतुक वाटलं. मी त्यांना म्हटलं, ‘‘हो, नाहीए मी जाड मावशी, हे तुम्ही तुमच्या मैत्रिणींना जाऊन सांगा.’’आणि त्याही अगदी उत्साहाने म्हणाल्या, ‘‘हो हो, मी आता माझ्या मैत्रिणींना सांगणारच, मी गिरिजाला प्रत्यक्ष पाहिलंय, ती अजिबात ‘जाड’ नाहीये,’’ मला त्या वेळी असं वाटलं, हे उत्तम प्रकारचं ‘मार्केटिंग’ आहे, असं एक-एक करून सगळ्या त्रिरया एकमेकांना सांगतील, संपूर्ण पुणे शहरातच बातमी पसरेल, गिरिजा जाड नाहीये. आणि लोकांना कळेल, पडद्यावर दिसणार्‍या मुली प्रत्यक्षात जाड नसतात…

आणखी एक घटना आठवतेय, पुण्यातच असताना एक मावशी माझ्याजवळ आल्या आणि माझ्याशी इंग्रजीत बोलू लागल्या, त्या प्रयत्न छान करत होत्या, पण अतिशय मोडक्या-तोडक्या इंग्रजीत मला म्हणाल्या, ‘‘आय सी टीव्ही यू.’’ त्यावर मी त्यांना विचारलं, ‘‘ताई, यू सी टीव्ही मी? व्हॉट आय से ऑन टीव्ही?’’ मग त्या म्हणाल्या, ‘‘यू से अवॉर्ड फंक्शन.’’ त्यावर मी म्हणाले, ‘‘व्हॉट लँग्वेज आय से ऑन टीव्ही?’’ त्या म्हणाल्या, ‘‘मराठी.’’ मी म्हणाले, ‘‘अहो मावशी, मग तुम्ही मराठीत का बोलत नाही माझ्याशी?’’ त्या म्हणाल्या, ‘‘मला वाटलं तुम्ही प्रत्यक्षात मराठी बोलत नसाल.’’ गंमतच वाटली ऐकून हे. एकदा तर माझं एक नाटक संपल्यावर एक मुलगा मला भेटायला आला. गडबडीत त्याला काही सुचेना… मला म्हणाला, ‘‘यू आर माय फॅन.’’ त्यावर मी म्हणाले, ‘‘येस सर, आय एम युअर फॅन’’.

पण काही वेळा मात्र भयानक अनुभव येतात. तुळजापूरला एकदा ८०० ्त्रिरयांचा ‘हळदी-कुंकू’ समारंभ होता. या कार्यक्रमातून परतताना गर्दीतून वाट काढत बाहेर पडायचं होतं. जिथं पुुरुषांची गर्दी असते तिथं मला कधीच वाईट अनुभव आलेला नाही, पण जिथं ्त्रिरया असतात, तिथं ती बंधनं राहत नाहीत. एक बाई दुसरीला पटकन स्पर्श करू शकते. त्या दिवशी गर्दीतून, आठशे ्त्रिरयांच्या मधून मी जात होते, आणि त्यांनी अक्षरश: माझ्यावर झडप घातली. कुणी मला स्पर्श करतंय, कुणी माझं लक्ष वेधून घेण्यासाठी खांद्यावर हात मारतंय, कुणी माझ्याशी बोलायचा प्रयत्न करतंय… या सगळ्यात माझ्या साडीचा पदर फाटला. केस उपटले गेले, चप्पल तुटली, माझ्या अंगठ्यातून रक्त येऊ लागलं. मला एका क्षणी वाटलं, माझ्या आजूबाजूचे जे बाऊंसर आहेत त्यांना कुणी पाडलं किंवा माझ्या रक्षणासाठी असलेल्या माणसांचं कुंपण तुटलं तर माझं काय होईल? इतकी भीती वाटली मला त्या प्रसंगाची की, परतीच्या वाटेवर मला रडूच यायला लागलं. पण त्या दिवशी माझा जीव वाचला, यानेच मी हुश्श झाले…

एकीकडे हे तर कधी काही प्रेक्षक नकळतपणे काही बोलून जातात, त्याचं वाईट वाटतं. नाटकाच्या प्रयोगानंतर भेटायला आलेले प्रेक्षक अनेकदा मला सांगतात, ‘‘तुम्ही पडद्यावर दिसता त्यापेक्षा प्रत्यक्षात खूप सुंदर दिसता’’, त्यांना असं वाटतं की ते माझं कौतुक करताहेत, पण म्हणजे, मी जे काम निवडलंय त्या कामात मी सुंदर दिसत नाही, असा याचा अर्थ होतो का? हे प्रेक्षकांचं भाबडेपणच आहे, हे मी त्यांना कसं समजावू? काही प्रेक्षक तर सल्ला देण्यात पटाईत असतात, अर्थात न मागितलेला. ‘‘मी काही नाटकांत गाणी गाते, प्रेक्षक भेटायला आल्यावर मला विचारतात, ‘‘तुम्ही गाण्यात करिअर का नाही करत?’’ त्यांना मला विचारावंसं वाटतं, ‘‘म्हणजे मी अभिनय चांगला करत नाही का? मी अभिनय करणं सोडू का?’’ ‘तुम्ही जे करताय, ते करत राहा,’ असं कुणी का म्हणत नाही? असाही प्रश्न मला राहून राहून पडतो…

मला अनेक तरुण मुलीही येऊन मुद्दाम भेटतात. त्या म्हणतात, ‘‘मूल जन्माला घालणं, संसार करणं हे आम्हाला भीतीदायक वाटायचं, कारण संसार आणि करिअर एकत्र कसं करणार, असा प्रश्न पडायचा? पण तुम्हाला पाहून छान वाटतं, तुम्ही करिअर आणि संसार दोन्ही करताय, तुम्हाला ते करता येतंय, तर आम्हालाही ते करता येईल.’’ हे ऐकून मला भारी वाटतं. कारण अशी निवड बहुतांश ्त्रिरयांनाच करावी लागते, ‘करिअर की संसार?’ हा पर्याय पुरुषांना कधीच नसतो. मला नेहमी हा प्रश्न पडतो, केवळ त्रिरयांनाच यातून निवड का करावी लागते? ्त्रिरयांना हे दोन्ही पर्याय निवडता यायला हवेत.

नाटकाच्या प्रयोगानंतर भेटायला आलेल्या अनेक प्रेक्षकांनी मला सांगितलंय, त्यांच्याबरोबर आलेलं कुणी तरी पहिल्यांदाच नाटक पाहायला आलेलं असतं. त्यापूर्वी या प्रेक्षकांनी माझे पॉडकास्ट ऐकलेले असतात. काहींनी लेख वाचलेले असतात, हे वाचून त्यांना नाटक पाहावंसं वाटतं. हे ऐकून मला छान वाटतं, कारण माझ्यामुळे नाटकासाठी नवा प्रेक्षक तयार झाला, यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते? पण आपण करत असलेलं काम काही प्रेक्षकांच्या कठीण काळात त्यांच्या दु:खावर फुंकर घालायचंही काम करतं, तेव्हाचं समाधान फार वेगळं असतं. एकदा नाटक संपल्यावर एक मुलगा मला भेटायला आला. तो कुठल्याही क्षणी रडेल अशीच त्याची भावावस्था होती.

मला म्हणाला, ‘‘दोन-तीन वर्षांपूर्वी माझी नोकरी गेली, ज्या मुलीवर माझं प्रेम होतं, तिच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न लावलं. सगळंच संपलं असं वाटून आत्महत्येचा विचार मनात येत होता. अखेर ज्या दिवशी मी हे पाऊल उचलणार होतो, त्याच दिवशी घरी टीव्हीवर तुमचा ‘मानिनी’ चित्रपट लागला होता. मी त्यात इतका गुंतून गेलो की चित्रपट संपला तेव्हा कसा कुणास ठाऊक, पण मी आत्महत्येचा विचार सोडून दिला होता.’’ चित्रपट पाहिल्याने वा कथानकात गुंतल्याने त्याने आत्महत्येचा विचार सोडला, असं म्हणता येणार नाही, पण तो चित्रपट पाहत राहिला आणि ती वेळ सरली… यात माझं काहीच कर्तृत्व नाही, पण माझा चित्रपट ‘निमित्त’ ठरला. त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की, मी काम करत असलेलं माध्यम किती प्रभावी आहे. आपल्या कलाकृतीमुळे एखाद्याचा जीव वाचणं ही माझ्यासाठी खूप मोठी पावती आहे. माझ्यासाठी हा सर्वात विलक्षण अनुभव होता…

प्रेक्षकांचे गमतीदार किस्सेही असतातच, पण असे काही अनुभव आल्यावर उमगतं, आपण जे काम करतोय, ज्या माध्यमात काम करतोय, ते किती महत्त्वाचं आहे. माझ्या नाटकातच माझं एक वाक्य आहे, ‘‘हे सर्व कलाकार जगातील युद्ध संपवू शकतील का?’’ त्यावर माझा सहकलाकार म्हणतो,‘‘युद्ध संपवू शकणार नाहीत, पण त्यांना सहन करायची ताकद नक्की देऊ शकतात.’’