रोहिणी हट्टंगडी hattangadyrohini@gmail.com

‘‘टीव्हीवरील खासगी वाहिन्यांच्या सुरुवातीपासून मला मालिकांत काम करायला मिळालं. त्या काळातली ‘चार दिवस सासूचे’ ही तब्बल १२ वर्ष चाललेली मालिका करताना भूमिके च्या मर्यादित चौकटीत अभिनेत्याला  काय करता येईल, हेही कळत गेलं. वाहिन्या आणि मालिकांच्या आताच्या भाऊगर्दीतही के वळ ‘टाइमपास’ करण्याजोग्या मालिका भरपूर आहेत, पण त्यातल्या त्यात नवीन विषय हाताळणाऱ्या मालिकाही आहेतच. शिवाय हिंदीपेक्षा मराठी मालिकांची स्थिती पुष्कळच उत्तम! ती आणखी चांगली निश्चित होऊ शकेल; प्रेक्षकांनी ‘रीमोट’चा योग्य वापर के ला तर!..’’

98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Virat Kohli's video goes viral
IPL 2024: गौतम गंभीरच्या गळाभेटीवर विराटने सोडले मौन; चाहत्यांना म्हणाला, ‘तुमचा मसाला संपला म्हणून तुम्ही…’, पाहा VIDEO
Accused in gang rape case
सामूहिक बलात्कार प्रकरणातील नऊ वर्ष पसार असलेल्या आरोपीला अटक
girl rescued within twelve hours
अपहरण झालेल्या पाच वर्षीय मुलीची बारा तासांत सुटका

टाळेबंदीच्या काळात सगळं बंद होतं, नाटय़गृहं, चित्रपटगृहं, मॉल्स, हॉटेल्ससुद्धा. एकच गोष्ट चालू होती- टेलिव्हिजन! जुने तर जुने, पण कार्यक्रम दाखवले जात होते. तोच एक विरंगुळा. किंवा आता बदलत्या तंत्रज्ञानामुळे आंतरजाल (इंटरनेट) आणि त्यावर २४ तास उपलब्ध असणारे चित्रपट. मनोरंजनाचा हाही दरवाजा बंद झाला असता तर काय केलं असतं लोकांनी?  नाटय़गृहं अजूनही सुरू झालेली नसताना दुधाची तहान ताकावर भागवल्यासारखं, जिवंत नाटक आवर्जून बघणारे रसिक ऑनलाइन नाटकावर समाधान मानताहेत. पण शेवटी दूध ते दूध आणि ताक ते ताक! असो, त्यात मला शिरायचं नाहीये, पण न राहावून कुठेतरी खुपत राहाणारं बाहेर येतंच. खरं म्हणजे नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी ही भावंडंच, आविष्काराची वेगवेगळी माध्यमं!

माझ्या करिअरच्या सुरुवातीपासूनच या तिन्ही माध्यमांतून काम करण्याची मला संधी मिळाली. जसा १९७७ मध्ये पहिला चित्रपट करायला मिळाला, तसंच  १९८४-८५ मध्ये ‘खानदान’ मालिका करायला मिळाली. सुरुवातीच्या गाजलेल्या मालिकांपैकी ती एक! नवीन नवीन माध्यम होतं. सगळ्यांनाच काही तरी करून बघायचं होतं. ‘स्टारकास्ट’ जबरदस्तच होती ‘खानदान’मध्ये! डॉ. श्रीराम लागू, गिरीश कर्नाड, शेखर कपूर, जलाल आगा, नीना गुप्ता, मोहन भंडारी.. किती तरी! आणि मी! देबू देवधर सिनेमॅटोग्राफर होते. मला आठवतंय, एक अख्खा सीन आम्ही एका शॉटमध्ये करायचो कधी कधी. अगदी पात्रांच्या हालचालींसकट. पण त्यामुळे कॅमेऱ्याच्या आणि आमच्या हालचालींमध्ये ‘कोऑर्डिनेशन’ असावं लागायचं. अमुक वाक्याला अमुकच ठिकाणी पोहोचणं किंवा असणं वगैरे. कॅमेरा कधी दूर ठेवून सगळे दिसायचे, तर कधी जवळून ‘क्लोजअप’मध्ये. नीट तालीम के ल्यानंतर प्रत्यक्ष चित्रीकरण करताना शॉट ‘ओके’ झाला की खूप बरं वाटायचं. (यावरून आठवलं, दिग्दर्शक केतन मेहतानं ‘होली’ हा संपूर्ण चित्रपट असाच चार की पाच शॉट्समध्ये केला होता.) काम करताना लवकर पूर्ण करण्याचं टेन्शन नसायचं.

खरं तर सुरुवातीच्या काळात दूरचित्रवाणीवर आताच्यासारख्या वहिन्या वगैरे नव्हत्याच. ‘दूरदर्शन’चे कार्यक्रमही संध्याकाळी सहा-साडेसहानंतर सुरू व्हायचे. ‘चिमणराव गुंडय़ाभाऊ’ त्यावरची पहिली ‘मालिका’. ‘रामायण’, ‘महाभारत’ वगैरे बऱ्याच नंतर आल्या. त्या काळात विविध चॅनल्स सुरू झाल्यानंतरही मालिका आठवडय़ाला एक दिवसच दाखवल्या जायच्या. म्हणजे महिन्यातून चार किंवा कधी पाच एपिसोड्स. त्यामुळं चित्रीकरण नीट ‘शेडय़ुल’ आखून व्हायचं. मालिकांना १३ किं वा २६ एपिसोड्स अशी मंजुरी मिळालेली असायची. मला आठवतंय, रवी राय यांची ‘सैलाब’ मालिका मंगळवारी प्रदर्शित व्हायची. त्यात रेणुका शहाणे, सचिन खेडेकर, महेश ठाकूर ही नटमंडळी होती आणि मीही होते. ‘इम्तिहान’, ‘थोडा हैं थोडे की जरुरत हैं’, ‘महायज्ञ’, ‘कन्यादान’, ‘बुनियाद’, ‘हम लोग’, कितीतरी मालिका आठवडय़ातून एकदा असायच्या, पण त्यामुळे त्यांच्या प्रसिद्धीवर काहीही परिणाम नाही झाला. उलट अजून लक्षात आहेत या मालिका. कारण तेच! व्यवस्थित विचार करून बांधणी केलेली असायची. गोष्ट संपली की मालिका संपली! उगाच चालते आहे म्हणून पाणी घालून चालू ठेवायची असा प्रकारच नव्हता. वेगवेगळ्या लेखकांच्या गोष्टी, कादंबऱ्या घेऊन मालिकांना एक दर्जा देण्याचा प्रयत्न असायचा. पाश्चिमात्य देशातल्या ‘मिनी सीरिज’सारखा प्रकारही हाताळला गेला. पण नंतर मात्र आणखी अनेक वाहिन्या चालू झाल्या. कार्यक्रमांची मागणी वाढली. चॅनल्स दिवसभर कार्यक्रम दाखवायला लागले. मागणी आणखी वाढली. ती पूर्ण करण्यासाठी दर आठवडय़ाऐवजी दररोज कार्यक्रम चालू झाले. ‘डेलीज्’ चालू झाल्या. वाहिन्यांमध्ये चढाओढ चालू झाली. प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी नवनवीन कल्पना लढवल्या जायला लागल्या. काम खूप वाढलं. काम करणाऱ्यांना संधी मिळू लागली. इथपर्यंत सगळं ठीक होतं. ते नेहमीच असतं. गोंधळ चालू होतो तो कोणत्याही गोष्टीच्या अतिरेकानं!

तसं बघायला गेलं तर मालिकांचा जन्मच झाला तो जाहिराती दाखवण्यासाठी. अमेरिकेत टेलिव्हिजन चालू झाला. कोणा एका जाहिरातदाराच्या डोक्यात कल्पना आली, की ‘टीव्ही घराघरात बघितला जातो, तर हे एक माध्यम असू शकतं प्रचाराचं. आपल्या साबणाच्या जाहिरातीसाठी हे बेस्ट आहे! पण नुसती जाहिरात बघणार कोण? म्हणून एखादी गोष्ट सांगू आणि जाहिरात दाखवू. म्हणजे लोक गोष्टीच्या निमित्ताने बघतील!’ या कल्पनेनं मूळ धरलं आणि मालिकांचा जन्म झाला. आपण ज्या जाहिराती बघतो, त्यामधून चॅनलला मिळणाऱ्या पैशांमुळे मालिका चालतात. मालिका बरी चालली, तर जाहिराती जास्त मिळणार. मालिका डुबली तर कोणीही जाहिरातदार येणार नाही. जाहिरातदार मालिकेच्या प्रसिद्धीचा आढावा घेतात तो ‘टीआरपी’द्वारे! त्याचाच अतिरेक झाला. वाहिन्यांचं सोडा, निर्मातेही ठीक, पण आजकाल नट मंडळीही त्याच्यामागे असतात. मला अजूनही हे कोडं उलगडलेलं नाहीये. हां, एक असू शकतं, त्या ‘टीआरपी’वर मालिकेचं भविष्य आणि पर्यायानं त्यातील कलाकारांचंही ठरत असेल, म्हणूनही असेल. पण मी कधीही त्याकडे लक्ष दिलं नाही हे खरं. आपण आपलं काम करावं! हो, अगदी १२ वर्ष चाललेल्या ‘चार दिवस सासूचे’ मालिकेत काम करूनही मी हेच म्हणेन!

२००१ मध्ये चालू झालेली ही मालिका तसं बघायला गेलं तर माझी पहिली मराठी मालिका. त्या आधी मालिका केल्या, पण हिंदीच. मराठीत एखाद् दुसरा एपिसोड केला असेल. पण मालिका अशी ही पहिलीच. ‘चार दिवस’ तेव्हा ‘ई टीव्ही’ वर असायची. त्या वेळी छोटय़ा पडद्यावर महाराष्ट्रीय कुटुंबाचा ‘भपका’ प्रथमच दिसला. मराठी मालिकाच आहे ना?, अशी शंका येण्यासारखा. पण ‘देशमुख इंडस्ट्री’चं साम्राज्य असणारं कुटुंब म्हणजे एवढं तरी हवंच! त्यामुळेही लोकांनी ती स्वीकारायला सुरुवात केली. त्याचबरोबर मी असंही म्हणेन, की १२ वर्ष ही मालिका चालूनही शेवटपर्यंत देशमुख कुटुंबावरचा ‘फोकस’ हलला नाही. इतर अनेक पात्रांची, गोष्टींची गुंफण त्यात होती; पण त्या एका कुटुंबाभोवती. एकीकडे मोठी इंडस्ट्री सांभाळणारी बाई आशालता देशमुख, एक मोठं कुटुंब एकत्र ठेवणारी गृहिणीही असू शकते. तिच्या सुनेसारखी सून आपल्याला हवी, अशी सासू आपली सासू असायला हवी, असं स्त्रीवर्गाचं म्हणणं होऊ लागलं. कथा फुलत जाऊन लोक ‘चार दिवस’ची वाट पाहू लागले. गंमत म्हणजे प्रत्यक्षात दिवाळी असताना ‘चार दिवस’मध्ये दु:खी वातावरण असलं तरी, त्यात प्रेक्षकांना काही वावगं वाटत नव्हतं! मी मुद्दाम हे सांगत आहे, कारण हल्ली मालिकांमध्ये जरूर नसताना बाहेर होळी तर मालिकांत होळी, बाहेर दिवाळी तर मालिकातही तशीच असावी, असा आग्रह दिसतो. मुद्दाम तसे सीन्स लिहायला सांगतात. ‘चार दिवस’च्या बाबतीत तसा वाहिनीच्या अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप कधीच जाणवला नाही. आमचे निर्माते नरेश बोर्डे किंवा दिग्दर्शक खलील हेरेकर यांच्या सांगण्याप्रमाणे, त्यांना मुभा असायची. फक्त पुढे काय होणार आहे, याविषयी चर्चा व्हायची. (मात्र सनसनाटी किंवा नाटकीय करण्यासाठी देशमुखांच्या कुटुंबात मृत्यू वगैरे घडवून आणू नका, असं त्यांनी खलील यांना सांगितलेलं आमच्या ऐकिवात आलं होतं.) या मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनात एक कोपरा तयार झाला होता एवढं मात्र खरं. ‘तुमच्या मालिकेमुळे आम्ही भाऊ-भाऊ भांडायचे बंद झालो’, ‘तुमची मालिका मला माझे आई-वडील आणि मुलांबरोबर एकत्र बघता येते’ अशा प्रतिक्रिया मिळाल्यावर बरं वाटायचं! पण मला आठवतंय, आमच्या आतल्या वर्तुळात ‘चार दिवस’बद्दल ‘उच्च’ बोललं नव्हतं जात आणि अगदीच ‘टाकाऊ’ असंही नाही!  ‘व्यक्तिरेखेचे कंगोरे’ वगैरे दाखवायला मालिकांमध्ये फार जागासुद्धा नसते म्हणा. लेखिका सरोजिनी वैद्य यांची प्रतिक्रिया ऐकली आणि मला ते प्रकर्षांनं जाणवलं. त्या मला एकदा म्हणाल्या,‘तुला मिळालेल्या चौकटीत तू चांगलं काम करतेस!’ म्हटलं, ‘तुम्ही बघता ‘चार दिवस’..?’ तर म्हणाल्या, ‘हो! बरी आहे!’  पण या ‘मिळालेल्या चौकटी’मुळे चित्रपट आणि टेलिव्हिजनमधला फरक अधोरेखित झाला. मुळात चित्रपटगृहात ज्या एकाग्रतेनं आपण कलाकृती बघत असतो ती एकाग्रता घरात बसून आपल्याला मिळत नाही. त्यातून मालिकांची वेळ अर्धा तास! त्यात काय आणि कसे बारकावे बघणार? गोष्ट पुढे गेली तरी पुरे अशी परिस्थिती! म्हणजे सगळीच तारेवरची कसरत.

आणखी एक वेगळीच गोष्ट मला जाणवली, ती म्हणजे चित्रपटामध्ये तुम्हाला व्यक्तिरेखेची नावं क्वचितच आठवतात. आपण कोणाला चित्रपटाची गोष्ट सांगायला लागलो, की त्या नटनटय़ांची घेऊन सांगतो. धर्मेद्र, अक्षय कुमार वगैरे.. व्यक्तिरेखेची नावं घेत नाही. बरोबर उलट टीव्हीमध्ये.  नटनटय़ांच्या नावांपेक्षा व्यक्तिरेखेचीच नावं जिभेवर असतात. शितली, राणादादा, शनाया वगैरे.. काळानुसार हाही एक बदल झाला. पूर्वी मालिकेत काम करणाऱ्यांची नावं ‘टायटल’मध्ये असायची. आता नसतात. वाहिन्यांची, मालिकांची एवढी गर्दी झालीय की मालिका संपल्यावर त्या लक्षातही राहात नाहीत. समोर आता दिसतंय ते फक्त साजरं होतं बस्स! खरं तर रिमोट हातात असतो. न बघण्याचा पर्याय असतो. तरी समोर दिसतंय म्हणून प्रेक्षक बघत असतो. टीव्ही हे माध्यम अगदी देशभरातील घराघरात जाऊन पोहोचणारं आहे. त्याचा नीट उपयोग व्हायला हवा होता. पण आज ते मनोरंजनापर्यंतच थांबलेलं वाटतं. नव्हे, मनोरंजन हाही बरा शब्द वापरला मी; खरं तर ‘टाइमपास’ म्हटलं पाहिजे! अहो, बातम्याही ‘जसं घडलं तसं’ असं न राहता त्यातही लोकांना आवडणारा मसाला लावून ‘पेश’ केल्या जातात. ‘टीआरपी’साठी केविलवाणी धडपड वाटते मला ती सगळी! हे सर्व बदलण्याचा प्रयत्न झाला, नक्कीच झाला. पण फार यश नाही आलं. कारणं अनेक!

या ‘टी.आर.पी.’च्या नादात अनेक मालिका बळी पडतात. अगदी चांगला विषय असूनही! आणि काही अचानक बंद केल्या जातात. कालपर्यंत सूडबुद्धीनं वागणारी पात्रं अचानक चांगली वागू लागतात किंवा ‘एक वर्षांनंतर’ असं कॅप्शन देऊन शेवट करतात. काय चार प्रेक्षक बघत असतील त्यांचा हिरमोड होतोच ना! मग का कोणी या मालिकांना ‘सिरियसली’ घ्यावं? मी काम करत असलेल्या एका मालिकेच्या निर्मात्याला वाहिनीनं सांगितलं, की अमुक दिवशी मालिका बंद करणार आहोत. मग काय त्या दृष्टीनं कथा वळवली, योग्य शेवट व्हावा म्हणून. पण काही दिवसांनी अचानक सांगितलं गेलं, की ‘नाही, नाही, इतक्यात नाही बंद करत आहोत. आणखी वीस दिवस आहेत!’ कारण काय, तर त्या जागी येणारी नवी मालिका तयार नाहीये. आता काय करावं निर्मात्यानं? मध्ये मध्ये काय आणि कसे सीन्स घालणार? कधी कधी नीट शेवट करायला आणखी चार दिवससुद्धा दिले जात नाहीत. यालाही कारणं अनेक. दुष्टचक्रासारखं अडकलंय सगळं! काहीतरी बदल घडायला हवा.

पण एक मात्र नक्की, हिंदी मालिकांपेक्षा मराठीची परिस्थिती बरी आहे. मालिकाही चांगल्या आणि वेगळ्या विषयावरच्या, चांगल्या लिहिलेल्या आहेत. त्या ‘रीमेक’ स्वरूपात हिंदीमध्येही केल्या जात आहेत. हा भाग परंपरेचाच असावा. मराठी नाटकांची परंपरा! वेगवेगळे विषय हाताळण्याची आणि चोखंदळ प्रेक्षकांची! म्हणूनच ‘आई कुठे काय करते?’ किंवा ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिका लोकांना इतक्या आवडताहेत! मला तरी! इतकी वर्ष सगळ्या माध्यमांतून काम करताना बरेवाईट बदल जाणवले. दूरचित्रवाणी हे घराघरात पोहोचणारं माध्यम आहे, आपण त्याचा चांगला उपयोग करून घ्यायला हवा. आणि हे प्रेक्षकांच्या हाती आहे. समोर दाखवतायत, दिसतंय म्हणून बघू नये. रिमोट हातात आहे ना? मग त्याचा उपयोग करू या की! होय मीही या माध्यमाचा भाग आहे, तरीही म्हणते आहे!