scorecardresearch

सहजपणातलं दत्तक नातं..

दत्तक प्रक्रियेतून मूल घरी येणं आणि पालक म्हणून आपण कुटुंब पूर्ण झाल्याचा आनंद घेणं, हा खूप सहज प्रवास वाटला तरी काही जणांच्या बाबतीत मात्र मानसिक त्रासाचा असू शकतो.

सहजपणातलं दत्तक नातं..

संगीता बनगीरवार

दत्तक मूल घरात येणं आता नवीन राहिलेलं नाही. मात्र ‘तू दत्तक मूल आहेस’ हे पालकांनी मुलांना सांगण्याची प्रक्रिया मात्र अजूनही कित्येक पालकांना आणि कुटुंबांना अवघड वाटते आणि मुलांसाठी अनेकदा अस्वस्थ करणारीही. समाजात दत्तक म्हणून वाढलेली अनेक मुलं मोठी होऊन यशस्वी जीवन घडवत असताना आणि आपल्या आई-बाबांना तितकंच प्रेम देत असताना त्यांच्या नात्यांमधला सहजपणा उत्तरोत्तर वाढत जावा, हीच अपेक्षा आहे. ‘दत्तक जागृती महिन्या’च्या निमित्तानं खास लेख.

नोव्हेंबर महिना हा ‘दत्तक जागृती महिना’ म्हणून साजरा केला जातो. ‘दत्तक’ या विषयाबाबत जनजागृती का करावी लागावी? आणि किती दिवस करावी लागेल?  दत्तक प्रक्रियेतून घरी आलेल्या कित्येक मुलांना अजूनही वेगळय़ा नजरेनं, कधी दयेच्या, कधी कौतुकाच्या, तर कधी तिरस्काराच्या, बघितलं जातं, ही मानसिकता कधी बदलणार? सध्या तरी हे प्रश्न अनुत्तरित असले तरीही त्याची सकारात्मक उत्तरं काहींना सापडली आहेत. ही सकारात्मकता संपूर्ण समाजात आणि लोकांच्या मनात निर्माण होईल तो सुदिन. दत्तक प्रक्रियेतून मूल घरी येणं आणि पालक म्हणून आपण कुटुंब पूर्ण झाल्याचा आनंद घेणं, हा खूप सहज प्रवास वाटला तरी काही जणांच्या बाबतीत मात्र मानसिक त्रासाचा असू शकतो. त्यातून पालक-मुलांच्या मोकळय़ा संवादाची जशी आवश्यकता वाटते तितकीच दत्तकविधान समाजात सहज रुजावं याचीही.   

  किरण चिवटे मुंबईमध्ये राहाते. ती ५ महिन्यांची असताना दत्तकविधान होऊन घरी आली. आई-बाबा आणि सगळय़ाच नातेवाईकांची अतिशय लाडकी. तिला हवं ते सगळं मिळालं. अतिशय लाडात आणि प्रेमात ती मोठी झाली. १७ वर्षांची झाल्यावर तिच्या आईनं तिला सांगितलं, ‘‘आम्ही तुला दत्तक घेतलंय.’’ आणि आईचं पुढचं वाक्य होतं, ‘‘हा विषय इथेच संपला आणि यापुढे कधीही या विषयावर आपण बोलणार नाही.’’ किरणच्याच शब्दांत सांगायचं, तर ‘‘माझी पहिली प्रतिक्रिया होती, की ‘मला हे माहिती होतं’. कदाचित वयाच्या त्या टप्प्यावर मला थोडा अंदाज आला असावा. माझी पहिली प्रतिक्रिया अशी असली, तरीसुद्धा मनात हा विचार आला की रडू यायचं. माझ्या आयुष्यातलं एवढं मोठं सत्य पूर्ण पचनी पडायच्या आधी, पुढील काही प्रश्न मनात यायच्या आधीच माझी मम्मा मला म्हणाली, की यावर परत आपण बोलणार नाही. काय करावं काही सुचायचं नाही. मम्मा आणि बाबा आपल्या कुठल्याही प्रश्नांचं उत्तर देणार नाहीत. मनात प्रश्न तर अनेक आहेत. कोण असतील माझे जन्मदाते? कुठे झाला असेल माझा जन्म? का त्यांनी मला सोडलं असेल? पण माझ्या मम्मीच्या न बोलण्याच्या एका हट्टामुळे हे सगळे प्रश्न अनुत्तरित राहिलेत; कायमचे! मी माझ्या काही जवळच्या मित्रमैत्रिणींना हे ज्या वेळेस सांगितलं, त्या वेळेस त्यांनाही धक्का बसला; पण त्यांनी कधी मला वेगळी वागणूक दिली नाही. उलट थोडे जास्तच लाड झालेत. खरं तर मम्मा जायच्या काही वर्ष आधी तिलासुद्धा याचा त्रास होतोय हे मला कळायचं; पण हा संवाद ती असेपर्यंत कधीही झाला नाही.’’

किरण आज मुंबईत नालंदा विद्यापीठात कथकचं प्रशिक्षण घेते, तसंच एका शाळेत आणि मुंबई विद्यापीठात जर्मन शिकवते. किरण सांगते, ‘‘माझं असं ठाम मत आहे, की मुलांबरोबर दत्तक याविषयी मोकळेपणानं संवाद होणं हे मुलांसाठीच नाही, तर पालकांसाठीसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. अर्थात या सगळय़ा वातावरणाचा माझ्या कामावर किंवा व्यक्ती म्हणून माझ्या जडणघडणीत खूप परिणाम झाले नसतीलही, पण  मनावरच्या जखमा तशाच राहिल्यात हे आजही जाणवतं. मला दत्तकप्रक्रियेविषयी मम्माकडून कळलं याचं खूप समाधान आहे. बाबा तर कधीच या विषयावर बोलले नाहीत. ते नेहमी त्याबद्दल शांत असायचे. अर्थात दोघांनीही माझी खूप काळजी घेतली, माझं व्यक्तिमत्त्व घडवण्यात त्या दोघांचा खूप वाटा आहे आणि त्याकरिता मी दोघांचीही कायम ऋणी आहे.’’

किरण आवर्जून सांगते, ‘‘मूल दत्तक घेणं हे कधीही एक महान काम आहे म्हणून करू नका. दत्तक पालकत्व ही फार मोठी जबाबदारी आहे. मुलांना सुरक्षित घर, प्रेम, माया देणं, याशिवायही मुलांची मानसिकता समजून घेण्याची तयारी हवी. प्रत्येक मूल हे वेगळं असतं, त्याच्याबरोबर त्याचा भूतकाळ असतो. तो काय असेल, कसा असेल हे त्या बाळालाही माहीत नसतं, तसंच पालकांना तो माहीत नसतो. भूतकाळात कुठले घाव, किती खोलवर असतील हे ज्ञात नसतं. गर्भात वाढणं (कदाचित जन्मदात्रीला नको असताना), जन्माला येणं (कदाचित ज्यानं कुणाला आनंद झाला नसेल) आणि या परिस्थितीत जगणं, हे त्या छोटय़ा जीवानं नक्की अनुभवलेलं असतं. दत्तक म्हणून घरी येताना आनंदाबरोबर ही अपार दु:खाची गाठोडी घेऊन मूल येतं. त्यामुळे भविष्यात त्याच्या कुठल्याही वेगळय़ा वागण्यात तुमची पालक म्हणून साथ असणं अतिशय महत्त्वाचं असतं. जसा हा प्रवास मुलांसाठी कठीण आहे, तसाच तो पालकांसाठीही आहे. म्हणूनच दत्तक प्रक्रियेत येण्याचा निर्णय हा खूप सजगपणे घ्यायला हवा.’’ हे किरण आवर्जून सांगते.

     राहुल (नाव बदललं आहे.) परदेशात नोकरीनिमित्त राहातो. अगदीच १-१.५ महिन्यांचा असताना घरी दत्तकप्रक्रियेद्वारा आला. आई-बाबांचा आणि आजी-आजोबांचा (आईचे आई-बाबा) अतिशय लाडका. बाबांच्या आई-वडिलांना हे मान्य नव्हतं, त्यामुळे त्यांचा सहवास आणि प्रेम मात्र राहुलला मिळालं नाही. तो १८-१९ वर्षांचा होईपर्यंत कुणीही त्याला दत्तकप्रक्रियेविषयी कधी बोलले नाहीत. ज्या वेळेस राहुल इंजिनीयरिंगला होता, त्या वेळेस आई-बाबांना वाटलं, की आपला लेक समजदार झालाय आणि त्याला आता दत्तकबद्दल सांगू या. ते ऐकून राहुलची पहिली प्रतिक्रिया मात्र अशीच होती- ‘‘माझे हे आणि हेच फक्त आई-बाबा आहेत. त्यांनी मला इतकं छान आयुष्य दिलंय की भूतकाळात जाण्याची मला इच्छा झाली नाही.’’

   राहुलला बोलतं करायचं म्हणून त्याच्याशी भरपूर गप्पा मारल्या, बरेच प्रश्न विचारले. त्या ओघात राहुल म्हणाला, ‘‘आई चित्रकार आणि बाबा बांधकाम व्यावसायिक. त्यांनी मला कधीही काहीही कमी पडू दिलं नाही. स्वत:चा आनंद कशात आहे याचा फारसा विचार न करता फक्त मी आणि माझा आनंद यातच ते समाधान शोधत राहिले. माझ्यासाठी माझे आई-बाबा देवस्वरूपी आहेत. माझ्या आई-बाबांनीच नाही, तर सगळय़ाच नातेवाईकांनी कधीही माझ्याशी वागताना कुठलाही भेदभाव केला नाही आणि कधीही मला जाणवू दिलं नाही, की मी दत्तक प्रक्रियेतून घरी आलोय. मी कॉलेजमध्ये असताना प्रियाला भेटलो. दोन वर्ष आम्ही चांगले मित्र बनून राहिलो. ज्या वेळेस मला असा विश्वास वाटला, की हिला माझ्या दत्तक असण्यानं काही फरक पडणार नाही, त्या वेळेस मी तिला हे सांगितलं. खरंच तिला काही फरक पडला नाही. पुढे आम्ही लग्न करायचं ठरवलं. आज आठ वर्ष आम्ही मजेत संसार करतोय. परदेशात आल्यावर तिनं नोकरी न करता घरी राहायचं ठरवलं आणि पाच वर्षांपूर्वी आम्हाला एक मुलगी झाली. मागच्या वर्षी आम्ही विचार केला, की आपलं दुसरं अपत्य हे दत्तक प्रक्रियेतून घरी येऊ द्यावं. मुलीला हे सांगितल्यावर ती म्हणाली, की तिला एक छोटी बहीण हवीय! मी म्हटलं बहीण नाही, भाऊ मिळेल तुला! माझी पत्नी प्रियाचा या निर्णयात पूर्ण सहभाग असल्यामुळे आम्ही लवकरच त्याची प्रक्रिया सुरू करू.’’  मी राहुलला विचारलं, की मुलगाच का हवा? तो म्हणाला, ‘‘मला एक मुलगी आहे म्हणून. खरं तर असंही वाटतं, ज्या आईबाबांनी कधीही विचार केला नाही, की मी कुठला, कुणाचा आणि फक्त आपलं मूल म्हणून माझं आयुष्य फुलवलं, तसंच मलाही वाटतं, की कुणाचं तरी आयुष्य असंच फुलायला मदत करावी. मला हेही माहीत नाही, की मी कुठल्या संस्थेत होतो. मी विचार करतो, की काही तरी कारण असेल म्हणून तर जन्मदात्यांनी मला तिथे आणून सोडलं. मग त्या भूतकाळात जाऊन मला काय मिळणार? कदाचित फक्त मनस्ताप. म्हणून मी भूतकाळात अजिबात जात नाही आणि विचारही करत नाही. जे माझं चालू आहे ते छान आहे आणि मी त्यासाठी देवाचा आभारी आहे.’’

प्रत्येक मुलाचे असे विचार असले आणि असे पालक प्रत्येक मुलाला भेटले, तर समाजात केवढा बदल झालेला दिसेल! प्रत्येक मुलाचा असंच आयुष्य जगण्याचा अधिकार आहे आणि तो त्यांना मिळो, हीच प्रार्थना! पुण्याची रूपल (नाव बदललं आहे.) अतिशय ध्येयवेडी. कामाला वाहून घेतलेली, अबोल, फारशी कुणाशी मैत्री न करणारी.. पण माझ्याशी नेहमीच मस्त गप्पा मारणारी! रूपल अडीच महिन्यांची असताना घरी आली. आई-बाबांची अतिशय लाडकी. बाबा, सगळे नातेवाईक आणि आजी-आजोबा लाड पुरवणारे. तिला थोडी शिस्त लागावी म्हणून आई आपली प्रयत्न करायची, जो बहुतेक कधीच सफल झाला नाही! रूपल आपल्या आठवणी सांगते, ‘‘शाळेत असताना, म्हणजे ९-१० वर्षांची होते, तेव्हा घरात दुसऱ्या नातेवाईकांच्या घरीही बाळ दत्तक प्रक्रियेतून आलं. त्या वेळेस आईनं मला सांगितलं, की तूपण याच संस्थेतून घरी आली आहेस; पण बहुतेक मला त्यातलं फारसं काही कळलं नाही. १२-१३ वर्षांची असताना शेजारचा मुलगा एकदा म्हणाला, की ‘मी दत्तक आहे आणि तूही.’ तेव्हा मी घरी येऊन आईला विचारलं. त्या वेळेस मला पहिल्यांदा दत्तक असण्याची जाणीव झाली. पुढे काही दिवस मनात खूप विचार यायचे. मुळात शांत असल्यानं मनातलं मी कुणाजवळ फारसं कधी बोलायचे नाही. त्यामुळे मला थोडा त्रास व्हायचा. त्याच काळात आईनं मला समुपदेशनासाठी नेलं. काही सेशन्समध्ये थोडा फरक जाणवला. नातेवाईकांकडे दोन दत्तक मुली, आजूबाजूलाही २-३ दत्तक मुलं होती. त्यामुळे खरं तर मला दत्तक असणं यात फार काही वेगळं वाटलं नाही; पण कशाचा तरी त्रास व्हायचा! आईबाबांनी माझी खूप काळजी घेतली, मला हवं ते करू दिलं. शिक्षणसुद्धा मला हव्या त्या क्षेत्रात करण्याची मुभा होती. माझे काही खर्चीक कोर्सेसही त्यांनी आनंदानं मला करू दिले. आज मी मला आवडत्या क्षेत्रात- ‘सायबर सिक्युरिटी’मध्ये काम करतेय. आईबाबांना याचा खूप अभिमान आहे. सायबर फोरेन्सिक आणि पोलीस यांच्यासाठी बरेचदा मी प्रशिक्षण घेतलं आहे. माझ्यासाठी तो एक माझ्या कामाचा मोठा टप्पा होता, तर आई-बाबांसाठी भूषणाची गोष्ट! ज्या वेळेस मी लग्न करायचं ठरवलं, त्या वेळेस हे नक्कीच मनात आलं, की ज्या व्यक्तीला मी दत्तक असण्याचा काहीही फरक पडणार नाही आणि जो मला समजून घेईल अशीच व्यक्ती आपला जोडीदार असावी. बरीच वर्ष माझ्याशी चांगली मैत्री असलेला माझा मित्र आणि मी लग्न करायचा निर्णय घेतला आणि २ वर्षांपूर्वी संसार थाटला. तो अत्यंत प्रेमळ, समजूतदार आहे. माझा कामाचा ताण, होणारी चिडचिड, कमी बोलणं हे सगळं तो सहजी मान्य करून मला सांभाळून घेतो. सासरीही माझं खूप कौतुक होतं. माझं शिक्षण आणि काम याची सगळय़ांना खूप कदर आहे. सगळे मला खूप सांभाळून घेतात. मी खरंच खूप भाग्यवान आहे, की मला प्रेमळ आई-बाबा आणि समजूतदार नवरा आणि तेवढंच प्रेम करणारे सासरचे लोक लाभलेत. त्यामुळे मला माझा भूतकाळ किंवा माझे जन्मदाते, याबद्दल कधी जाणून घेण्याचं फारसं मनात येत नाही. आहे ते खूप छान आहे आणि मी खूप समाधानी आहे.’’

 रूपल, राहुल आणि किरण हे सर्व जण आपापलं काम करत, नाती जपत, आनंद शोधत आणि तो वाटत आहेत. त्यांना आशा आहे, की काळ बदलतो आहे. आता समाजात जी दत्तकविधान झालेली मुलं मोठी होत आहेत, जे या मुलांचे पालक आहेत आणि समाजातले सगळेच घटक, हे दत्तक या विषयाबाबत सजगपणे वागतील, अशी आशा करायला काहीच हरकत नाही.

sangeetapb@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 00:09 IST

संबंधित बातम्या