मेधा कुळकर्णी
वार्धक्य हा आयुष्याचा अंतिम टप्पा, पण तोही ठरवलं तर रुबाबदारपणे जगता येतोच. ‘एजिंग ग्रेसफुली’चं गमक ज्यांना उमगलंय त्यांना आपल्या वार्ध्यक्याची फारशी काळजी नसतेच. अशीच ही काही उदाहरणं, ज्यांनी आपलं वार्धक्य अत्यंत सहजपणे स्वीकारलं. स्वत: तर समाधानी राहिले, राहात आहेतच, पण इतरांनाही त्याचा आनंद देत आहेत… वार्धक्याचा ऐटबाज स्वीकार केलेल्या या वृद्धांविषयी…
खोटं कशाला सांगू? पन्नाशी ओलांडायच्या आधी ‘ग्रेसफुल एजिंग’ अशासारख्या शीर्षकाचा मजकूर वाचताना वाटायचं की, हे ‘एजिंग’ वगैरे आपल्यापासून खूप दूर आहे. आणि म्हातारपणात रुबाब… वगैरे? असं कुठं असतं का? पण पन्नाशी ओलांडताना अध्र्याहून अधिक आयुष्य संपलंच, अशी जाणीव झाली. ‘एजिंग’ खरोखर ‘ग्रेसफुल’ करता येईल का, याचा विचार सुरू झाला. पण जेव्हा साठी ओलांडली, तेव्हा इतकी सगळी वर्षं आपल्याला जगायला मिळाली, याबद्दल कृतज्ञता दाटून आली. उतारवयाच्या अनुभवांविषयी कुतूहल वाटू लागलं.
‘पालकांचं पालकत्व’ हे सदर जानेवारीत सुरू झालं तेव्हापासून एक सूचना पाल्यांकडून येत राहिली. आमच्या म्हातार्या आई-वडिलांनी कसं वागायचं, ते लिहा आणि वृद्ध पालकांकडून विचारणा होत राहिली की, वार्धक्य कसं स्वीकारायचं ते सांगाल का? खरं तर या दोन्ही मुद्द्यांना प्रत्येकच लेखात स्पर्श झालाय. पण गेल्या आठवड्यात एका ज्येष्ठ सद्गृहस्थांशी बोलणं झालं, तेव्हा वाटलं की, ज्या स्थितीपासून पळून जाताच येत नाही, त्या म्हातारपणात लोक कसे वागतात, काय विचार करतात, याबद्दलचं आकलन मांडावं. या आकलनाला अनेक वृद्धांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहवासाचं, जाणिवांचं
अस्तर आहे. ज्यांच्याशी बोलणं झालं, ते नव्वदीजवळचे सद्गृहस्थ. ८२ वर्षांच्या त्यांच्या पत्नी स्मृतिभ्रंशग्रस्त. मुलं परदेशी असली, तरी राहत्या सोसायटीत त्यांनी जोडलेली माणसं वेळेला धावून येणारी. भाचरं, पुतणे, त्यांच्या बायका, मुलं यांच्याशी त्यांचे प्रेमाचे संबंध. आपल्यामागे पत्नीला नीट सांभाळलं जाईल ना, एवढी एकच काळजी. हे सांगताना त्यांना रडू कोसळलं. त्यांनी स्वत:ला सावरत सांगितलं, की भरवशाचा भाचा आणि भाचेसून यांनी मावशींना सांभाळू असा शब्द दिलाय. पत्नी आणि ते स्वत:ही हिंडते-फिरते आहेत. मनुष्यबळाची, पैशांची कमतरता नाही. हीच केवढी जमेची बाजू! वार्धक्याचे हेच दोन खंदे आधार. आमच्या तीस-चाळीस मिनिटांच्या संभाषणातून समजलं की, ते गांधीवादी आहेत, लेखक आहेत, त्यांचं पुस्तक नामवंत संस्थेकडून येऊ घातलंय. त्यांच्या बोलण्यात कुठेही निराशा, तक्रार असं काही नव्हतं. नव्वदीच्या उंबरठ्यावरची ही शहाणी समज…!
स्वत:च्या वार्धक्याबद्दल धारणा कशी असावी? या विचारांबरोबर आठवला तो बेगम अख्तर यांचा गाजलेला किस्सा. ‘दूरदर्शन’वर मुलाखतीसाठी गेल्या असताना कॅमेर्यासमोर जाण्यापूर्वी त्यांना ‘मेकअप’ करायचा होता. ‘मेकअपमन’ला आला तेव्हा त्याला त्यांनी सांगितलं, ‘‘इन झिुर्रयों को नही मिटाना. इन्हे बडी मेहनत से कमाया हैं…’’ त्यांचे सूर काळीज चिरत जातात, तसेच त्यांचे हे शब्ददेखील. वार्धक्याचा किती ऐटबाजपणे स्वीकार आहे हा. आणि चेहर्याच्या रंगरंगोटीपेक्षा सुरकुत्या अस्सल, हे सांगण्यातली काय ती शान…! उच्च कोटीच्या गायिकेला साजेसंच हे.
१८९७ मध्ये प्लेगचं थैमान होतं. मदत करायला माणसं कमी पडत होती. वाढत्या वयाचं कारण देत अनेक जण जागीच बसून होते. त्या काळात साठीचं वय म्हणजे म्हातारपणाचा शिक्का. अशावेळी ६६ वर्षांच्या सावित्रीबाई फुले वय आणि साथीचा प्लेग या दोहोंना धुडकावत मदतीला धावून गेल्या. मुंढव्यात महारवाड्यातल्या एका दहा वर्षांच्या मुलाला तातडी होती. सावित्रीबाईंनी त्याला पाठुंगळी घेतलं आणि वानवडीजवळच्या माळरानावरच्या रुग्णालयापर्यंतचं सुमारे आठ किमी अंतर पायी कापलं. संत गाडगेबाबा ८०व्या वर्षी गेले. तोपर्यंत ते कीर्तनाचा गजरातून अस्वच्छता- अंधश्रद्धा- अन्यायाचा जागर करत राहिले. या दोघांच्या लखलखीतपणापुढे वार्धक्य काळवंडलं असेल.
शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक (१८९२-१९७३) या ‘अंगणवाडी’च्या जन्मदात्या. त्यांनी आधी मुंबईत दादरच्या हिंदू कॉलनीत माँटेसरी शाळा सुरू केली. आणि ही बालशिक्षण पद्धती त्या ग्रामीण आणि आदिवासी भागात घेऊन गेल्या. आदिवासी मुलांना पठडीबद्ध शाळेत बसण्याची सवय नव्हती, म्हणून त्यांच्या परिसरात ‘कुरणशाळा’सारखे प्रयोग केले. त्यानंतर अंगणवाडीची कल्पना ताराबाईंना सुचली.
या कामासाठी कोसबाडला जायचं ठरवलं, तेव्हा त्यांनी साठी ओलांडली होती. त्यांना हृदयविकाराने गाठलं होतं. व्यक्तिगत आयुष्यातले मोठे धक्के पचवून त्या थकल्या होत्या. तरीही त्यांचा निग्रह अढळ राहिला. आदिवासींसाठी बालशिक्षण या ध्येयाने त्यांना उभारी दिली आणि वृद्धावस्थेतदेखील खूप मोठं कार्य त्यांनी घडवलं. त्यांची अंगणवाडी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बघितली, सरकारी धोरणाद्वारे अख्ख्या देशभर पोचवली.
एकदा विनोबा भावे यांना विचारलं गेलं की, ‘‘तुम्ही उद्याचा, आजारपणाचा, वार्धक्याचा विचार केला आहे का?’’ त्यावर ते उत्तरले, ज्या जीवनस्रोताने माझी काळजी घेतली आहे, तोच पुढेही घेईल. आणि जर माझी गरज नसेल, तर माझी काळजी करण्याची आवश्यकताही राहणार नाही. माझी जागा दुसरं कुणी घेईल.’’ विवेकी विनोबा आयुष्यभर नवे आणि ताजे राहिले. कारण ते समाजासोबत राहिले. नवनवे प्रयोग करत राहिले. स्वत:मध्येही बदल घडवत राहिले.
१०१ व्या वर्षी, नुकत्याच निधन पावलेल्या मराठी व्याकरणतज्ज्ञ यास्मिन शेख जवळजवळ शेवटपर्यंत कार्यरत होत्या. पु.ल. देशपांडे आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई. साधी राहाणी असणार्या या जोडप्याने सगळी कमाई उत्तम सामाजिक कामं घडवण्यासाठी दान दिली. त्यांच्या औदार्यासाठीदेखील हे प्रतिभावंत जोडपं आदराला पात्र आहे. लेखिका वीणा गवाणकर यांच्या ८० च्या पुढे सरकणार्या वयाचा त्यांच्या लेखनझपाट्यावर फारसा परिणाम झालेला नाही. अलीकडेच त्यांचं नवं पुस्तक प्रसिद्ध झालंय. संशोधन, वाचन करण्यात त्या मस्त रमतात. त्यांचं घर त्यांच्या तरुण मित्रमंडळींसाठी स्वागतशील असतं.
वार्धक्याला उमदेपणाने स्वीकारणारी साधीसुधी माणसं आपल्या अवती भोवती असतातच. मृत्यूपश्चात देहदानाची इच्छा व्यक्त करणार्या हृदयस्पर्शी पत्रात माझ्या वडिलांनी लिहिलं होतं. ‘‘मी भरपूर आणि समाधानाचं आयुष्य जगलोय. माझ्या मृत्यूचा कुणी शोक करत बसू नये.’’ अलीकडेच, नव्वदीजवळ आलेल्या प्रसन्नचित्त दोघींशी भेट झाली. एक माझ्या शाळेतल्या इंग्रजी-गणिताच्या मोकाशी बाई. स्मृतिभ्रंश टाळण्यासाठी बरेचसे व्हॉट्सॲप ‘मेमरी क्लब’ सुरू आहेत.
आमच्या मोकाशी बाई या उपक्रमासाठी इंग्रजी-गणिताची कोडी तयार करून पाठवतात. घरात फळा ठेवलाय. सुचलं की त्यावर नोंदवून ठेवतात. जवळच्या माणसाच्या मृत्यूचं दु:ख त्यांनी पचवलंय. पण त्याचा फारसा उच्चार न करता आधीइतक्याच जिव्हाळ्याने भेटतात. खाऊ-पिऊ घालतात. दुसरी माझी ‘आकाशवाणी’तली सहकारी मैत्रीण संध्या. फिरतं वाचनालय तिच्या दारात येतं. महिन्याला तीन-चार पुस्तकं ती वाचते. मराठीत प्रसिद्ध झालेली नवी पुस्तकं तिला माहीत असतात, वाचलेलीही असतात. सुंदर भरतकाम करून लेकीबाळींना ती कुर्ते शिवायला ते कापड देते.
मुळात, म्हातारपणाची भीती का वाटते? कारण तिथून पुढे मृत्यूकडे वाटचाल असते, म्हणून. शिवाय, शारीरिक मर्यादांसह जगावं लागतं, जगणं परावलंबी होतं, म्हणूनही. आजच्या लेखात बर्याच स्त्रियांचे उल्लेख केलेत, म्हणून हा एक गमतीशीर संदर्भ. वलयांकित ब्लॉगर ट्विंकल खन्ना हिने पन्नाशी ओलांडताना, वाढत्या वयामुळे स्त्री शरीर कसं बदलत जातं, यावर मिश्कीलपणे लिहिलं होतं, ‘‘हिवाळ्यात अलास्काहून राजस्थानला स्थलांतर करणार्या पक्ष्यांप्रमाणे, एका विशिष्ट वयानंतर सगळं खाली जाऊ लागतं. केस डोक्यावरून उतरत जिवणीवर, हनुवटीवर येतात. जबडे गालांवरची चरबी झुलवू लागतात. स्तन गुडघ्यांना आलिंगन देण्यासाठी वाकू लागतात.’’
या सदराच्या निमित्ताने अनेक ज्येष्ठ स्त्री-पुरुषांशी भेटी, गप्पा झाल्या. त्यात क्रियाशील नाही, असं क्वचितच कुणी दिसलं. ज्येष्ठ सन्मित्र रवींद्र केसकर म्हणतात की, ‘‘आता आपण संसार चालवण्याच्या जबाबदारीतून मुक्त आहोत. आणि कुठला मोठा आजार नसेल, तर राहून गेलेल्या गोष्टी करण्यासाठी वार्धक्याचा काळ ही सुवर्णसंधी.’’ ते एक मधुर आठवण करून देतात, ‘‘पत्नीवर प्रेम करायचं राहून गेलं असेल, तर हा काळ गमावू नका.’’ रवींद्र आणि त्यांची पत्नी भारती दिवाण यांच्याप्रमाणे कार्यरत राहणार्यांच्या डोक्यात वावगे विचार येतीलच कशाला?
निवृत्त झालेल्या एका जोडप्याने गमतीने जाहीरच करून टाकलं होतं की, आता त्यांचं वेळापत्रक म्हणजे दुपारचं जेवण, दुपारची झोप आणि रात्रीचं जेवण, रात्रीची झोप. आता काम न करण्याची मुभा मिळालीये. ती पुरेपूर उपभोगायची आहे. त्यांना गमतीतच कुणी विचारलं, स्मृतिभ्रंशासारखं दुखणं वाट्याला आलं तर? त्यावर उत्तर होतं, ‘‘वय वाढल्यावर तीन गोष्टी घडू शकतात. पहिली म्हणजे, स्मरणशक्ती जाऊ शकेल… आणि नंतर बाकीच्या दोन आठवणारच नाहीत.’’ म्हातारपणाकडे असं हलके फुलकेपणेही अधनंमधनं बघावं.
पुढे आजारपण आलं तर सोसावं लागणारच आहे. मात्र अनेक वृद्ध स्त्री-पुरुषांनी जुनाट आठवणींचा लेप फासून घेतलेला असतो. तो खरवडण्याचा प्रयत्न कुणी केल्यास ते फणा काढतात. कटू आठवणींच्या आवरणापायी बदललेल्या जगाचा स्पर्शही झालेला नसतो त्यांना. याचा त्रास सगळ्या कुटुंबालाच होतो. प्रौढ पाल्यांना दमात घ्यायला, त्यांच्यावर दबाव आणायला, भावनिक वसुली करायला म्हातारपण वापरणारेही आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरींनी सांगितल्यानुसार ‘मीपनाले मसनात सिंहासन’ हे अशा पालकांना लागू.
या सगळ्या चर्चेतून रुबाबदार, ऐटबाज वार्धक्य कोणाला लाभतं, याची संगती लावता येते. जीवनातली विविधता अनुभवली आहे, आव्हानं हिमतीने पेलली आहेत, त्यातून सोशीकपणा कमावलाय, अशा व्यक्ती. सुखं लाभली त्याबद्दल समाधान पावलेल्या, जे मिळायचं राहून गेलं त्याचा लोभ राहिलेला नाही अशा व्यक्ती. स्वत:ची आणि इतरांचीही प्रतिष्ठा जपणार्या, होता होईतो सक्रिय राहणार्या. कुटुंबाविषयी, जगाविषयी संवेदनशील, कृतज्ञ असणार्या. मुलांच्या, नातवंडांच्या पिढीसोबत मैत्री करू शकणार्या. अडचणीत त्यांच्या पाठीशी राहाणार्या.
काळ-परिस्थितीशी जुळवून घेण्याची वेळ आली तर लवचीकता ठेवणार्या. जगण्याला मूल्यांचं अधिष्ठान असणार्या. स्वसुखापलीकडे विचारांची पोच असणार्या. आणि आयुष्यातला कडवटपणा बाजूला सारून टाकणार्या व्यक्तींचं म्हातारपण रुबाबदार असेल. आतून समाधान असलं की माणसं तक्रारी, कुरबुरी करत नाहीत. इतरांच्या नावे कुंथत नाहीत. अशा म्हातार्या आई-बापाला सांभाळणं मग पाल्यांना कधीच जड जात नाही. अशा पालकांकडून जगण्याचे धडेही शिकायला मिळतात. थोडक्यात, शरीराचा तरुणपणीचा डौल म्हातारपणात बिघडणारच. पण तरीही तुम्ही मनाने कसे आहात, विचार काय करता, कसं वागता यावर तुम्ही इतरांना किती हवेसे असणार हे ठरतं.
ukulmedha@gmail.com
