आयुष्यभर स्मरणशक्ती उत्तम हवी असेल, बुद्धी तल्लख राहावी वाटत असेल तर मेंदूची मशागत वयाच्या विशिष्ट टप्प्यांवर सातत्याने करायला हवी. बदाम, अक्रोडसारखा सुकामेवा खाण्याचा कुशाग्र बुद्धिमत्तेसाठी उपयोग होत असला तरी सोबतच आवश्यक असतं, सर्वसमावेशक आहार, पुरेशी झोप आणि व्यायामाने परिपूर्ण असलेली जीवनशैली. ती कशी हे सांगणारा लेख.

मुलं हुशार असावीत, त्यांनी चांगलं शिकावं, त्यांची स्मरणशक्ती उत्तम असावी आणि त्यांना योग्य निर्णय घेता यावेत, अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते. आणि ही इच्छा फक्त लहान मुलांपुरती मर्यादित नसते. वय वाढत गेल्यावरही आपली स्मरणशक्ती आणि विचारशक्ती तल्लख राहावी, असंच आपल्याला वाटतं. साहजिकच बुद्धी आणि मेंदूच्या आरोग्याचा विचार करताना आपल्या आहाराची नेमकी काय भूमिका असते? काय खाल्ल्याने बुद्धी वाढते? बदाम, अक्रोडसारखा सुकामेवा खाण्याचा खरंच काही उपयोग होतो का? हे जाणून घ्यायला हवं.

बुद्धीची पायाभरणी जन्माआधीच सुरू होते : बुद्धी म्हणजे थोडक्यात, वेगवेगळ्या नवनवीन गोष्टी शिकण्याची, तार्किक पद्धतीने विचार करण्याची आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची मानवाची मानसिक क्षमता, ज्याचा थेट मेंदूशी संबंध असतो. आपण अनेकदा मुलांच्या बुद्धिमत्तेचा विचार शाळेत गेल्यावर, अभ्यास सुरू झाल्यावर किंवा परीक्षेच्या काळात करतो. पण मेंदूच्या विकासाची सुरुवात त्याही आधी, अगदी गर्भावस्थेतच झालेली असते. खरं तर, गर्भधारणेनंतर अवघ्या तीन ते चार आठवड्यांत मेंदू आणि मज्जासंस्थेची प्राथमिक रचना तयार होऊ लागते. त्यामुळे आईचा आहार वाढत्या बाळाच्या मेंदूच्या आरोग्याशी थेट जोडलेला असतो.

या काळात लोह, फॉलिक ॲसिड, आयोडीन, प्रथिनं आणि ओमेगा-३ यासारखे पोषक घटक विशेष महत्त्वाचे असतात. वाढत्या मेंदूची जडणघडण आणि त्याचे ‘वायरिंग’ व्यवस्थित होण्यासाठी त्यांची गरज असते. बाळाच्या मेंदूची वाढ चांगली व्हावी यासाठी : डॉक्टरांनी सुचवलेल्या लोह आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या नियमित घ्या. फॉलिक ॲसिड हे बाळाच्या मेंदू आणि मज्जासंस्थेच्या सुरुवातीच्या विकासासाठी महत्त्वाचं असतं. त्याची कमतरता असल्यास बाळामध्ये ‘न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स’ (गर्भाच्या सुरुवातीच्या वाढीदरम्यान मेंदू आणि मणक्यामध्ये होणारे गंभीर जन्मजात विकार) होण्याचा धोका वाढू शकतो.

आयोडीनयुक्त मीठच वापरा. प्रत्येक जेवणात प्रथिनांचा समावेश करा. उदा. अंडी, डाळी, कडधान्य, दूध-दही, पनीर, सोया, टोफू, चिकन, मासे. ओमेगा-३ साठी जवसाची चटणी, अक्रोड आणि मासे यासारख्या पदार्थांचा समावेश करा. हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये आणि विविध रंगांच्या भाज्यांचा आहारात समावेश करा. यामधील जीवनसत्त्व, खनिजे आणि ‘अँटिऑक्सिडंट्स’ मेंदूच्या पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात.

पहिल्या दोन वर्षांचा काळ खूप महत्त्वाचा. जन्मानंतरच्या पहिल्या दोन वर्षांमध्ये मेंदूचा विकास सर्वाधिक वेगाने होत असतो. अनेकांना आश्चर्य वाटेल, पण बाळाचा मेंदू पहिल्या वर्षात जवळपास दुप्पट आकाराचा होतो. या काळात मेंदूचे ‘वायरिंग’ वेगाने तयार होत असते. शिकणे, बोलणे, लक्ष देणे आणि विचार करणे या क्षमतांची पायाभरणी याच काळात होत असते. या विकासासाठी बाळाचे अनुभवही महत्त्वाचे असतात. बाळाशी बोलणे, गोष्टी सांगणे, खेळणे आणि त्याच्या आवाजांना प्रतिसाद देणे यामुळे मेंदूच्या विकासाला चालना मिळते.

या गोष्टी आवर्जून करा : जन्मानंतरचे पहिले सहा महिने केवळ आईचेच दूध द्या. आईच्या दुधामध्ये मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक अनेक पोषक घटक नैसर्गिकरीत्या उपलब्ध असतात. सहा महिन्यांनंतर स्तन्यपानाबरोबरच पूरक आहार सुरू करा. पूरक आहारात डाळी, कडधान्ये, फळे, भाज्या, पालेभाज्या, अंडी आणि इतर पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. बाळ थोडे अन्न सांडवत असेल तरी त्याला स्वत: खाऊ द्या. अन्न हाताने उचलणे, विविध पदार्थांना स्पर्श करणे आणि स्वत: खाण्याचा प्रयत्न करणे यामुळे सूक्ष्म कृतिकौशल्ये विकसित होतात आणि मेंदूमधील महत्त्वाच्या जोडण्या बळकट होण्यास मदत होते. बाळाशी जास्तीत जास्त बोला, गोष्टी सांगा आणि त्याच्यासोबत खेळा. संवाद, खेळ आणि प्रेमळ प्रतिसाद यामधून भाषा, सामाजिक कौशल्ये आणि शिकण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होते. बालपणातील हीच पायाभरणी पुढे शाळा-महाविद्यालयात एकाग्रता, स्मरणशक्ती आणि शिकण्याच्या क्षमतेचा आधार बनते.

वाढत्या वयातील मुलांचा आहार- जीवनशैली कशी असायला हवी?

अभ्यासात लक्ष लागण्यासाठी : शाळा, क्लासेस, प्रोजेक्ट्स आणि टीव्ही, मोबाइल फोन, संगणक आदी स्क्रीनच्या वाढत्या वापरामुळे मुलांचे लक्ष अनेक गोष्टींमध्ये विभागले जाते. त्यामुळे अनेक पालकांचा प्रश्न असतो, ‘काय खाल्ल्याने अभ्यासात लक्ष लागेल?’ खरं तर, वाढत्या मेंदूसाठी गर्भावस्था आणि लहानपणी ज्या पोषक घटकांची गरज असते, तेच शालेय मुलांसाठी आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाचे असतात. गरजांचे प्रमाण बदलू शकते, पण प्रथिनं, लोह, आयोडीन, ओमेगा-३, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांची आवश्यकता कायम राहते.

‘‘बदाम खा, अक्रोड खा म्हणजे बुद्धी वाढते…’’ असं अनेकदा आपण ऐकतो. याचं कारण म्हणजे अक्रोडमध्ये ओमेगा-३ असते, तर बदामामध्ये व्हिटॅमिन ई असते. हे पोषक घटक मेंदूच्या पेशींच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. अनेक पालकांची तक्रार असते की त्यांची मुलं अक्रोड, बदाम खात नाहीत.

अक्रोडाची पूड ही चटणी, सॅलड किंवा पराठ्यामध्ये घालू शकता. ‘नट बटर’च्या स्वरूपातही त्याचा वापर करता येऊ शकतो. मुलांना भाजी निवडणं किंवा बनवण्यात सहभागी केल्यास ती खाण्याची तयारीही वाढू शकते. तसंच जवसांचंही करता येईल. जवसाची चटणी आवडत नसेल तर ती पिठात मिसळून पराठे, थालीपीठ किंवा लाडूंमध्ये वापरून बघा.

सकाळचा नाश्ता चुकवू नका : नाश्ता हा मेंदूचा पहिला ‘इंधनपुरवठा’ असतो. त्यामुळे दिवसाच्या सुरुवातीला एकाग्रता आणि लक्ष टिकवून ठेवण्यास मदत होते. मुलांच्या दिवसाची सुरुवात प्रथिनं आणि लोहयुक्त नाश्त्याने होणं महत्त्वाचं असतं. प्रथिने मेंदूमधील संदेशवाहक रसायनांच्या निर्मितीसाठी, तर लोह मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी आवश्यक असतं. अंडी, सोयाबीन, दूध-दही, पनीर, डाळी, कडधान्ये हे प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत, तर कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या, शेंगदाणे, अंडी आणि मांसाहारातून लोह मिळू शकतं. उदाहरणार्थ, टोफू किंवा पनीर, मेथी पराठा, पोहे आणि अंडी, मुगाचं धिरडं आणि दही, पालक आणि इतर भाज्या घालून केलेलं ऑम्लेट असे पर्याय निवडता येऊ शकतात.

खेळही महत्त्वाचा : नियमित शारीरिक हालचाल आणि मैदानी खेळामुळे मेंदूपर्यंत रक्तपुरवठा सुधारण्यास मदत होते. त्यामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते. विशी-पंचविशीनंतर आयुष्याची गती वाढू लागते. नोकरी, लग्न, कुटुंब आणि नोकरी- करिअरच्या जबाबदार्‍या यामध्ये स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणे अनेकदा मागे पडते. या काळात आपण अनेक गोष्टींना ‘हे तर चालायचंच’ म्हणून स्वीकारून टाकतो.

झोपेची सततची तडजोड

झोपेत मेंदू स्वत:ची देखभाल आणि पुनर्बांधणी करत असतो. विशेषत: चाळिशीनंतर पुरेशी झोप अधिक महत्त्वाची ठरते. संशोधनांनुसार दीर्घकाळ झोपेच्या कमतरतेमुळे अल्झायमरसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. फक्त काम, पण हालचाल नाही : दुपारच्या जेवणानंतरची १० मिनिटांची फेरी, जवळच्या दुकानापर्यंत चालत जाणं किंवा लिफ्टऐवजी जिने वापरणं, सुरुवात इतकी साधी असू शकते. जिम, झुंबा, डान्स, सायकलिंग किंवा आवडीची कोणतीही हालचाल निवडा आणि हळूहळू ती वाढवत जा.

पोषण अर्थात महत्त्वाचं : अनेकदा कामाच्या धावपळीत जेवणाच्या वेळा चुकतात, दिवसभर चहा-कॉफी किंवा इतर चटर-फटर गोष्टी खाऊन काम भागवले जाते. अशा वेळी थोडं आधीच नियोजन करून ठेवणं उपयोगी ठरू शकते. चिकन, पनीर, टोफू मॅरिनेट करून ठेवणं, सूप किंवा भाजीसाठी लागणार्‍या भाज्या चिरून तयार ठेवणं अशा छोट्या सवयी उपयोगी ठरू शकतात. ओमेगा-३ साठी दह्यामध्ये चिया बिया घालून खाणं किंवा भाजलेले जवस आणि थोडे सैंधव मीठ यांचा मुखवास करून घेणं हेही सोपे पर्याय ठरू शकतात.

वाईट सवयी टाळाव्यात : तंबाखू, धूम्रपान आणि मद्यपान यांच्यातील ‘न्यूरोटॉक्सिन्स’ मेंदूला हानी पोहोचवतात. हे आपण ऐकत आलो आहोतच. दीर्घकाळ या सवयी सुरू राहिल्यास वाढत्या वयात स्मरणशक्तीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. थोडक्यात काय, तर वृद्धापकाळात मेंदू आणि बुद्धी कशी साथ देतील, याची पायाभरणी आपण आज करत असतो.

वय वाढलं तरी : वय वाढलं की शरीराप्रमाणेच मेंदूमध्येही काही बदल होणं स्वाभाविक आहे. विशेषत: चाळिशीनंतर अनेक ्त्रिरयांना रजोनिवृत्ती जवळ येत असताना (पेरिमेनोपॉज) एकाग्रता कमी होणं, एखादा शब्द आठवायला वेळ लागणं (‘ब्रेन फॉग’जाणवणं) असे अनुभव येऊ शकतात. योग्य आहार, नियमित हालचाल आणि पुरेशी झोप यामुळे वाढत्या वयातही मेंदू सक्रिय आणि बुद्धी तल्लख ठेवता येऊ शकते. मग नेमकं कशाकडे लक्ष द्यायचं?

भूक कमी झाली म्हणून पोषण कमी करू नका : वय वाढल्यावर अनेक जण म्हणतात, ‘‘आता पूर्वीसारखी भूक लागत नाही.’’ आणि म्हणूनच कमी खाल्लं तरी प्रत्येक घास पोषक असणं महत्त्वाचं ठरतं. जेवणात चटणी घेतो तशी भाजी घेऊ नका. भाजीचे प्रमाण योग्यच ठेवा. प्रत्येक जेवणात एखादा प्रथिनयुक्त पदार्थ, भाजी आणि कोशिंबीर यांना स्थान द्या. मूग, मसूर, दही यांसारखे तुलनेने सहज पचणारे पर्याय उपयोगी ठरू शकतात. मांसाहार घेत असाल, तर अंडी आणि मासे चांगले पर्याय ठरू शकतात. आहारात मासे नसतील तर ओमेगा-३ साठी जवस, तीळ यासारख्या पदार्थांचा नियमित समावेश करा.

नियमित आरोग्य तपासण्यांकडे दुर्लक्ष करू नका : व्हिटॅमिन बी१२, लोह, व्हिटॅमिन डी किंवा थायरॉइडमधील बदल यासारख्या काही समस्या वाढत्या वयात तुलनेने सामान्य असू शकतात आणि त्यांचा परिणाम ऊर्जा, एकाग्रता व स्मरणशक्तीवर होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक तपासण्या वेळोवेळी करून घेणं उपयुक्त ठरू शकतं.स्नायू आणि मेंदू दोघांचीही काळजी घ्या : वय वाढत असताना स्नायूंचं प्रमाण कमी होऊ लागतं. त्यामुळे पुरेशी प्रथिने आणि नियमित हालचाल यांना विशेष महत्त्व असतं. मजबूत स्नायू दैनंदिन कामं सोपी करतातच, पण सक्रिय राहण्यासही मदत करतात आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा मेंदूलाही होतो.

हालचाल सुरू ठेवा : निवृत्तीनंतर अनेकांची रोजची हालचाल कमी होते. नियमित व्यायामामुळे केवळ स्नायू आणि हृदयाचंच नाही, तर मेंदूचं आरोग्य जपण्यासही मदत होते. संशोधनानुसार नियमित शारीरिक हालचालीमुळे स्मरणशक्ती टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. आणि अल्झायमरसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. मित्रमंडळी, छंद वर्ग आणि सामाजिक उपक्रमांमुळे मेंदूला नवं शिकण्याची संधी मिळत राहते, ज्यामुळे मेंदूमधील जोडण्या टिकून राहण्यास मदत होते.एकंदरीतच मेंदूची जडणघडण गर्भावस्थेत सुरू होते, लहान वयात ती सर्वाधिक वेगाने होते आणि त्यानंतरही आयुष्यभर आकार घेत राहते. शारीरिक शक्ती आणि बुद्धीची काळजी ही एका टप्प्यापुरती नसून आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे.

amita@amitagadre.com