सामाजिक इतिहासात उतरंडीच्या तळागाळाशी असलेली दलित स्त्री अज्ञान, दारिद्रय़, अत्याचार, अंधश्रद्धा यांनी पिचलेली होती तरीही ती दुबळी, हातपाय गाळून बसणारी कधीच नव्हती. सतत कष्ट करणारी, अन्याय-अत्याचाराला खंबीरपणे तोंड देणारी आणि प्रतिकूल परिस्थितीत तगून राहणारी अशी जात्याच होती.
जमिनीखाली दडलेला लाव्हा जसा जमीन फोडून वर उसळी मारतो, तशा पिढय़ान्पिढय़ा दडपल्या गेलेल्या व्यक्तीही कधी ना कधी आपल्या अस्मितेचा आविष्कार दाखवतातच. ही दडपणूक जितकी जास्त तितका हा आविष्कार अधिक प्रभावशाली असतो. दलित स्त्रियांच्या लढय़ाचा मागोवा घेताना ही वास्तवता प्रकर्षांने लक्षात येते.
सामाजिक इतिहासात उतरंडीच्या तळागाळाशी असलेली स्त्री अज्ञान, दारिद्रय़, अत्याचार, अंधश्रद्धा यांनीच केवळ पिचलेली नव्हती तर दुहेरी दडपणाची ती बळी होती. अस्पृश्य म्हणून पुरुषांबरोबरच समाजाकडून अवहेलना, हेटळणी, तुच्छता सहन करणारी आणि दुसऱ्या बाजूला स्त्री म्हणून कुटुंबात पुरुषप्रधानतेकडून सतत अत्याचार सोसणारी. तरीही ही स्त्री दुबळी, रडवी, हातपाय गाळून बसणारी कधीच नव्हती. सतत कष्ट करणारी, अन्याय अत्याचाराला खंबीरपणे आणि कणखरपणे तोंड देणारी आणि प्रतिकूल परिस्थितीत तगून राहणारी अशी जात्याच होती.
१८६८ च्या ‘ज्ञानोदय’मधला मुक्ता मांग या मुलीचा निबंध त्यांच्या परिस्थितीची आणि एका मुलीच्या मनातील या जाणिवेची साक्ष देईल. ती लिहिते,‘‘ज्या वेळेस आमच्यातल्या स्त्रिया बाळंत होतात, त्या वेळेस त्यांच्या घरावर छप्परसुद्धा नसते, म्हणून हिव, पाऊस व वारा यांच्या उपद्रवामुळे त्यांस किती दु:ख होत असेल बरे? याचा विचार स्वत:च्या अनुभवांवरून करा. जर एखादे वेळेस त्यास बाळंतरोग झाला, तर त्यास औषधास व वैद्यास पैसा कोठून मिळणार? असा कोणता तुम्हामध्ये संभावित वैद्य होता की त्याने लोकांस फुकट औषधे दिली?’’ आज दीडशे वर्षे होऊन गेली तरी शहरांमध्ये फुटपाथवर राहणाऱ्या स्त्रियांची अवस्था वेगळी आहे का?
दलित अस्मितेचे असे तेजस्वी आविष्कार स्वातंत्र्यपूर्व काळातील काही नोंदीत दिसतात. १९३० मध्ये मंदिर प्रवेशाच्या चळवळीत एका दलित महिलेला पुजाऱ्याने मागे लोटताच तिने त्याच्या तोंडात फाडकन् भडकावली. या प्रकारच्या प्रतिकाराच्या कहाण्या क्वचितच समाजासमोर आल्या. दुसरी घटना आहे १९३८ मधील. अखिल भारतीय महिला परिषदेच्या अधिवेशनात सवर्ण स्त्रियांनी दोन अस्पृश्य स्त्रियांना जेवणाच्या वेळी पंगतीत दूर बसवून त्यांचा अपमान केला. त्याचा तीव्र निषेध अस्पृश्य स्त्रियांच्या परिषदेने केला. स्वाभिमान व स्वावलंबनाचा स्वीकार दलित स्त्रियांनी करावा, असे आवाहनही त्यावेळी करण्यात आले.
१९४२ च्या दलित महिला फेडरेशनच्या अधिवेशनातून फेडरेशनच्या सरसचिव इंदिरा पाटील यांनी आपल्या भगिनींनी हिंदूधर्माच्या गुलामगिरीचे म्हणजेच नवऱ्यापुढे मान तुकवणे व चूल-मूल हेच आपले काम समजणे- हे विचार डोक्यातून काढा अशी मांडणी केली. त्याच फेडरेशनच्या अध्यक्ष सुलोचना डोंगरे यांनी सर्व जिल्हा, तालुका लोकल बोर्डात आमच्या स्त्रियांना प्रतिनिधित्व हवे, विशिष्ट परिस्थितीत घटस्फोटाचा अधिकार हवा, बहुपत्नीत्वाला कायद्याने प्रतिबंध करावा, अस्पृश्य स्त्री शिक्षणासाठी सर्वत्र महिला वसतिगृहे असावीत अशा मागण्या करून स्त्रियांना आपल्या हक्काची जाणीव करून दिली.
दलित स्त्रियांना खऱ्या अर्थाने जे आत्मभान आले त्यामागची मुख्य प्रेरणा होती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणुकीची. अन्याय सहन करू नका, त्या विरोधात लढा, पुरुषांच्या गुलाम होऊन जगू नका, त्यांच्या सहचारिणी व्हा. गुलामीच्या आयुष्याला नकार देण्याचं धैर्य दाखवा, आपल्या व्यक्तित्वाला बाधा आणतील असे कपडे, दागिने वापरू नका, ही जाणीव करून देण्याबरोबरच शिक्षण, स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक सुधारणांमधील त्यांचा सहभाग याची आवश्यकता त्यांच्या मनात बिंबवली.
काळाराम मंदिर प्रवेशात १९३० साली रमाबाईंबरोबर ५०० स्त्रियांचा सहभाग होता आणि महाड सत्याग्रहात ३०० स्त्रिया सहभागी होत्या ही त्याचीच सुरुवात होती. पुढे कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या ‘भूमी बळकाव’ आंदोलनात हजारो स्त्रियांनी सत्याग्रह करून तुरुंगवास पत्कारला. अलीकडच्या विद्यापीठाच्या नामांतर चळवळीत दलित स्त्रियांचा लक्षणीय सहभाग होता. नर्मदा आंदोलनातही हजारोंच्या संख्येने स्त्रिया सामील होत्या. नीलम गोऱ्हे यांनी भारतीय रिपब्लिकन पक्षाची महिला आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेतला होता. भुसावळ येथे दुष्काळी महिला परिषद भरवण्यात आली, त्याला ३० हजार महिला उपस्थित होत्या.
एका सर्वेक्षणानुसार भारतातील स्त्रियांच्या १६ टक्के दलित स्त्रिया आहेत आणि एकूण लोकसंख्येच्या ८ टक्के आहेत. एवढय़ा मोठय़ा संख्येने दलित स्त्रिया असूनही स्त्रियांच्या मध्यवर्ती चळवळींच्या कार्यक्रमात कधी दलित स्त्रियांच्या प्रश्नाला प्राधान्य मिळाले नाही, की कोणत्या दलित स्त्रीला या चळवळींचे नेतृत्व मिळाले नाही. आम्ही आणि त्या अशी एक अदृश्य भिंत यामध्ये कळत नकळत उभी राहिली. सबंध समाज बदलण्याची भाषा करणाऱ्या स्त्री चळवळींना परिघावर उभ्या असणाऱ्या अनेक जाती-जमातींच्या प्रश्नांना कधी थेटपणे हात घातल्याचे दिसत नाही.
‘फेमिनिझम अँड दलित विमेन इन इंडिया’ या २००९ साली प्रसिद्ध झालेल्या दीर्घ निबंधात सिंथिया स्टिफन्स यांनी झाली ही गोष्ट एका दृष्टीने चांगलीच झाली असे नमूद केले आहे, कारण त्यामुळे दलित स्त्रियांचे क्रियाशील गट तयार झाले आणि दलित स्त्रियांचे नेतृत्वगुण उदयाला आले. त्यांच्या मते या स्त्रियांचे अनुभव, यातना, एकाकीपणा, वगळले गेल्याची भावना सर्वामध्ये सारखी असल्याने आपल्या भाषेत, आपल्या समाजाशी त्या अधिक उत्कट संवाद साधू शकतात व तो अधिक प्रभावीही होतो. भारतातील दलित स्त्रियांबद्दल तिचे आणखी एक निरीक्षण आहे, ती म्हणते की सुशिक्षित शहरी स्त्रियांवर समाजात वा कामाच्या ठिकाणी जे लैंगिक अत्याचार होतात त्याच्या निराकरणासाठी भरपूर फंडिंग आणि वैद्यकीय मदत, कायदेशीर मदत मिळते, पण शेतावर ज्या दलित मजूर स्त्रियांवर लैंगिक अत्याचार होतात त्याची जाणीवसुद्धा समाजाला नसते आणि ते शहरातल्यापेक्षा कितीतरी पट अधिक असतात. म्हणूनच या स्त्रियांचे आवाज शासन आणि समाजापर्यंत पोचवण्याची अधिक गरज आहे.
या आवाजाला वजन आणि धार येण्यासाठी अनेक दलित स्त्रियांच्या गटांनी प्रयत्न केले. अखिल भारतीय दलित महिला अधिकार मंच हा असाच एक तरुण स्त्रियांचा गट, महिलांवरच्या अन्याय, अत्याचाराविरोधात लढणारा आणि दलित स्त्रियांमध्ये स्वाभिमान आणि आत्मभान निर्माण करण्यासाठी संघर्ष करणारा आहे. ‘‘आमची लढाई ही सत्ता किंवा संपत्तीसाठी नाही. हा स्वातंत्र्य लढा आहे. माणसांसारखं जगण्यासाठी हा लढा आहे.’ स्थानिक पातळीवरचे परिवर्तन आणि दलित स्त्रियांचे नेतृत्व निर्माण करण्यासाठी भारतभर दलित महिला स्वाभिमान यात्रा काढण्यात आली. बिहार, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओरिसा आणि महाराष्ट्रातून ही पहिल्या टप्प्यातील यात्रा १२ मार्च २०१४ ला दिल्लीत पोचली. तिथल्या जाहीर सभेत स्त्रियांनी आपले अनुभव सांगितले आणि आपल्या हक्कांचा जाहीरनामा मांडला. दुसऱ्या टप्प्यातील यात्रा सप्टेंबर २०१४ ला बिहारमधून निघाली, मध्य प्रदेशातून प्रवास करताना शेकडो स्त्रिया वाटेत सामील होत गेल्या. या टप्प्यात स्त्रियांवरील अत्याचाराबरोबर जोडले गेलेल्या जमीन, पाणी, राजकीय सत्ता, इतर उत्पादनांची साधने या संबंधीच्या प्रश्नांवर विशेष भर दिला गेला. ज्या राज्यातून ही यात्रा गेली, त्या राज्यांमध्ये नजीकच्या काळात दलित कुटुंबांवर व विशेषत: स्त्रियांवर अनन्वित अत्याचार झालेले होते, यात्रेच्या निमित्ताने त्याबद्दलची जाणीव जागरूक करण्यात आली. पीडितांना कायद्याची माहिती व मदत देण्याचा प्रयत्न झाला. अन्यायाचा तीव्र निषेध झाला. तरुण अभ्यासकांना या मनोवृत्तीबद्दल विशेष सामाजिक संशोधन करण्यास उद्युक्त करण्यात आले. सेक्रेटरी आशा कोतवाल यांनी मुलाखतींद्वारा दलितांचे प्रश्न सर्वदूर पोचवले.
‘दलित स्त्री चळवळ : नेतृत्व आणि त्यापलीकडे’ या शीर्षकांतर्गत बेंगळुरूमध्ये २००६ साली कार्यकर्त्यां, विद्यार्थी, प्राध्यापक इत्यादी अभ्यासकांचे एक दोन दिवसाचे शिबीर भरवण्यात आले होते. दलित स्त्रियांची एक प्रबळ, प्रभावशाली चळवळ उभी करण्याची गरज त्यावेळी सर्वानाच जाणवली. दलित स्त्रियांच्या एकजुटीचे एक राष्ट्रव्यापी जाळे (नेटवर्क) तयार करण्याचा निर्णय त्यात घेण्यात आला. सुप्रसिद्ध कृष्णवर्णीय अमेरिकन लेखिका अ‍ॅलिस वॉकर यांनी काळ्या स्त्रियांच्या लढय़ासाठी फेमिनिझमऐवजी ‘वुमनिझम’ हा शब्द वापरला आहे. प्रचलित स्त्रीवादापेक्षा काळ्या स्त्रियांचे वेगळेपण दाखवण्यासाठी तिने हा शब्द प्रचलित केला. स्त्रीवादात पुरुषांनंी केलेली दडपणूक अनुस्यूत आहे, पण काळा पुरुष जसा दडपणूक करणारा तसाच समाजाच्या दडपणुकीचा तो स्वत:च बळी आहे, म्हणून काळ्या स्त्रीवादासाठी ती ‘वुमनिझम’ शब्द वापरते. हा शब्द या अधिवेशनात दलित स्त्रियांच्या लढय़ासाठीही वापरायचे ठरवण्यात आले. हा ‘बाईवाद’ दलित स्त्रियांच्या आवाजाला, ज्ञान, मूल्यांची जोपासना, दूरदृष्टी यातून वजन प्राप्त करून देईल असा आशावाद व्यक्त करण्यात आला. बाईवादामध्ये फक्त दलित स्त्री नव्हे, तर अल्पसंख्य, आदिवासी, अन्य शोषक स्त्रियांचाही समावेश अभिप्रेत आहे. आपली एकजूट ही आपली शक्ती आहे आणि एकजुटीतून अन्याय, अत्याचाराशी लढा देता येईल असा विश्वास त्यामागे आहे. स्त्रीवादी चळवळींशी फटकून न वागता एकमेकांच्या सहकार्याने दलित स्त्रियांच्या चळवळी अधिक प्रभावशाली करण्याचेही त्यांचे धोरण आहे.
महाराष्ट्रातील दलित चळवळीतील कार्यकर्त्यां स्त्रियांचे एक वैशिष्टय़ आहे. ते म्हणजे त्या केवळ कार्यकर्त्यां नाहीत तर सर्जनशील लेखकही आहेत. ‘आलोचना’ आणि ‘नारी समता मंच’ने १९९६ मध्ये आयोजित केलेल्या ‘दलित स्त्री अस्मितेचा आविष्कार’ या दोन दिवसाच्या चर्चासत्राचे उद्घाटन प्रा. कुमुद पावडे यांच्या हस्ते झाले होते. तेव्हा दलित स्त्रियांनी वेगळ्या स्वायत्त संघटना स्थापन कराव्यात. आमच्या दु:खाचे सामाजिकीकरण व्हावे, समाजातील शोषणाचा सार्वत्रिक उच्चार व्हावा, दलित स्त्रियांना शोषणाची जाणीव करून द्यावी असे मत त्यांनी मांडले होते. त्यांच्या ‘अंत:स्फोट’ या पुस्तकात पारंपरिक रीतीरिवाज पाळणाऱ्या स्त्रियांना आत्मभान आल्यावर त्या कशा बदलत गेल्या याचे प्रभावी चित्रण आहे. सामाजिक कार्याबरोबरच उत्तम लघुकथा लिहिणाऱ्या ऊर्मिला पवार यांच्या ‘आयदान’ या पुस्तकात वैयक्तिक अनुभवातून त्यांच्यामध्ये कसे प्रगल्भ परिवर्तन झाले याबरोबर दोन पिढय़ांमधील बदलाचाही सुंदर मागोवा घेतला आहे. मुक्ता सर्वगोड (मिटलेली कवाडे), शांताबाई कांबळे (माझ्या जन्माची चित्तरकथा), शांताबाई दाणी (रात्रंदिन आम्हा..), जनाबाई गिऱ्हे (मरणकळा), बेबी कांबळे (जिणं आमचं), विमल मोरे (पालातील माणसं) इत्यादी आत्मचरित्रे म्हणजे केवळ त्यांनी आयुष्यात भोगलेल्या दु:खाच्या करुण कहाण्या नाहीत. राखेतून उठलेल्या फिनिक्स पक्ष्याच्या भरारीचे ते सामाजिक दस्तऐवज आहेत. दलित स्त्रियांच्या संघर्षांचे अत्यंत सखोल आणि मर्मग्राही संशोधन डॉ. शर्मिला रेगे यांच्या पुस्तकात पाहायला मिळेल.
सर्व क्षेत्रातील राखीव जागांच्या संधीचा दलित स्त्रियांनी मध्यप्रवाहात येण्यासाठी उत्तम उपयोग करून घेतला आहे. आज अनेक क्षेत्रात, विशेषत: शिक्षण क्षेत्रात दलित स्त्रियांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. सरपंचांचे कार्य करणाऱ्या अनेक दलित महिला विरोधाच्या वादळ वाऱ्यांना तोंड देत काम करत आहेत. जातीय तणावांच्या संघर्षांत दलित स्त्रिया बळी पडल्याच्या बातम्या अधूनमधून मन सुन्न करतात, पण दलित स्त्रीकडेसुद्धा सन्मानाने पाहण्याची मनोवृत्ती
वाढीला लागणं, हीच भविष्यातील उज्ज्वल समाजाची पायाभरणी ठरेल.
डॉ. अश्विनी धोंगडे – ashwinid2012@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अजून चालतेचि वाट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Struggle of indian women
First published on: 26-09-2015 at 01:01 IST