भारत पाटणकर

१८ ऑक्टोबर १९७५. शहर पुणे, काळ आणीबाणीचा. एका सभागृहात बायामाणसांची गर्दी. सभागृहात, भिंतीवर कार्यक्रमाचा फलक – ‘संयुक्त स्त्रीमुक्ती संघर्ष परिषद’. देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी आणि नंतरही भारतात स्त्रियांच्या संघटना होत्याच. स्त्रियांनी केलेली आंदोलनेसुद्धा होती.

पण स्त्रियांची ‘स्त्री म्हणून होणारी’ पिळवणूक आणि दडपणूक संपवण्यासाठी काम करणारी स्त्रियांची संघटना स्थापन करण्याची सुरुवात झाली नव्हती. देशातली अशी चळवळ सुरू करणारी परिषद पहिल्यांदाच भारतात होत होती. संदर्भ होता तो योगायोगाने ‘संयुक्त राष्ट्र संघा’ने १९७५ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ म्हणून घोषित केलं असण्याचा.

गेल ऑम्व्हेट हिचा ही परिषद संघटित करण्यातला सहभाग प्रकर्षाने जाणवण्याएवढा होता. हा सहभाग तिच्या मृत्यूनंतरच संपला. ती आजारी पडून अंथरुणावर पडेपर्यंत हा सहभाग चालू होता. ‘वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड-पश्चिम भारतातली ब्राह्मणेतर चळवळ: १८७३ ते १९३०’ हे पुस्तक ज्या संशोधनातून लिहिलं गेलं, त्या संशोधनासाठी ती भारतात आली. राज्यभर खेड्यापाड्यांत फिरली. भारतीय बनत गेली आणि तिला इथल्या स्त्रियांच्या चळवळीची ओळख झाली.

गेल भारतात येण्यापूर्वी अमेरिकेत चालू असलेल्या आफ्रिकी-अमेरिकी जनतेच्या चळवळीत भाग घेत होती. अमेरिकेत सरकारने व्हिएतनामला अंकित करण्यासाठी चालवलेल्या युद्धाविरोधी तरुण-तरुणींनी चालवलेल्या चळवळीचा भाग होती. त्याचबरोबर अमेरिकेत त्या काळात जोरदारपणे चालू असलेल्या स्त्रीमुक्ती चळवळीत तिचा मोठा सहभाग होता. एकंदर मानव मुक्तीसाठी चालवलेल्या चळवळीमध्ये ती विद्यार्थीदशेपासून सहभागी होती. सत्यशोधक-ब्राह्मणेतर चळवळीचा संशोधनपर अभ्यास करताना तिचा इथल्या पुरोगामी, डाव्या पक्ष- संघटनांशी संपर्क होणं स्वाभाविकच होतं.

१९७१मध्ये ‘लाल निशाण’ पक्षाच्या नेतृत्वाखाली चाललेल्या शेतमजूर चळवळीशी तिचा संबंध आला. ती म्हणते, ‘‘मी (भारतात) माझ्या आयुष्यातील, स्त्रीमुक्ती चळवळीविषयी पहिलं भाषण केलं ते भारतातील तथाकथित अस्पृश्य ठरवल्या गेलेल्या अशिक्षित शेतमजूर स्त्रियांसमोर. १९७१चा तो फेब्रुवारी महिना होता.’’ महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्त्रीमुक्ती या संकल्पनेविषयी स्त्रियांच्या सभांमध्ये बोलण्याची संधी त्या काळात गेलला मिळाली. ‘लाल निशाण पक्ष’, ‘श्रमिक संघटना’ आणि ‘मागोवा ग्रुप’, ‘युवक क्रांती दल’ अशा संघटनांशी निर्माण झालेल्या संपर्कामुळे तिला महाराष्ट्राच्या सर्व विभागांमध्ये बोलण्यासाठी निमंत्रणं मिळाली.

विदर्भात त्या काळात कार्य करणाऱ्या ‘फुले-आंबेडकर-मार्क्स’ (फुआमा) या संघटनेशीसुद्धा तिचा संपर्क होता. १९७१-७२चा काळ हा महाराष्ट्रातला तीव्र दुष्काळाचा काळ होता. चळवळींमध्ये पुरुषांपेक्षाही स्त्रियांचा सहभाग जास्त होता. गेल स्त्रीमुक्ती विचारांचं बीज पेरत गेली. महाराष्ट्रात एक वेगळा विचार वाढीस लागला. १९७२ नंतरच्या काळात ‘मागोवा’ ग्रुपच्या पुढाकाराने संघटित झालेली ‘श्रमिक संघटना’ शहादा-तळोदा-नंदुरबार- अक्कलकुवा या तालुक्यांमध्ये वाढत गेली. १९७३-७४ पासून वाळवे तालुक्यात (जि. सांगली) ‘श्रमिक संघटने’ची नवी शाखा तयार झाली.

कासेगाव हे या शाखेचं प्रमुख गाव होतं. या दोन्ही भागांत स्त्रीमुक्ती संघटना स्थापन झाल्या आणि कार्यरत राहिल्या. गेल दोन्ही भागांत कार्य करीत होती. नंतरच्या काळात, विशेषत: १९८३ नंतर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांच्या परिसरात ‘स्त्रीमुक्ती संघर्ष चळवळ’ स्थापन झाली. यात गेल ऑम्व्हेट, इंदुताई पाटणकर, उषाताई निकम, नागमणी राव आणि मुंबईहून येऊन मदत करणाऱ्या कुंदा प्र. नी. सारख्या कार्यकर्त्या यांचा पुढाकार होता. गेल या चळवळीची प्रेरणास्राोत होती.

१९८५ला विटा(जिल्हा सांगली) येथे ‘स्त्री मुक्ती संघर्ष चळवळ’ एका मोठ्या मेळाव्यात स्थापन करण्यात आली. सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांमधून ग्रामीण कष्टकरी स्त्रिया या परिषदेत सहभागी झाल्या होत्या. विशेषत: जुना खानापूर तालुका, तासगाव, वाळवे, शिराळा, कराड, माण या तालुक्यांमधला सहभाग होता. यानंतर लगेचच १ मे १९८८ला स्त्रियांचं आंदोलन, शेती आणि पिण्याच्या पाण्याची खात्री करण्यासाठी उभं राहिलं. ३० आणि ३१ ऑगस्ट १९८६ या दोन दिवसांत तासगाव येथे ‘स्त्रीमुक्ती मेळावा’ आयोजित केला गेला. यात इंदुताई आणि गेल सहभागी झाल्या होत्या.

२५ सप्टेंबर १९८८ रोजी नवा इतिहास रचणारं आंदोलन सुरू करण्याचा पाया घालणारी परित्यक्ता स्त्रियांची मोठी परिषद संघटित झाली. यासाठीसुद्धा सांगली आणि सातारा जिल्ह्यांतल्या स्त्रिया मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या परिषदेत झालेल्या निर्णयाप्रमाणे १८ फेब्रुवारी १९८९ ला परित्यक्ता स्त्रियांचं बेमुदत आंदोलन सांगली जिल्हाधिकारी कचेरीवर सुरू झालं. या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी नवा इतिहास घडवणारे निर्णय शासनाला घ्यावे लागले.

परित्यक्तांना स्वतंत्र रेशनकार्ड मिळणं, त्यांना त्यांचं स्वतंत्र घर बांधण्यासाठी मोफत भूखंड मिळणं आणि त्यात पालेभाज्या, फळभाज्यांची लागवड करण्यासाठीच्या क्षेत्राचा समावेश असणं. त्यांच्या मुलांच्या पालक म्हणून आयांना अधिकार मिळणं. वसतिगृहांमध्ये राहण्यासाठी या मुलांना विशेष सवलत मिळणं. असे हे निर्णय होते. असेच एक आंदोलन संगमनेर-औरंगाबाद भागात अॅड.निशा शिवूरकर यांच्या पुढाकाराने झालं. या आंदोलनांनी महाराष्ट्रात नवा इतिहास घडवायला सुरुवात केली.

याला समांतर, शेतीचा शोध स्त्रियांनीच मुळात लावला या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर रोपवाटिका शिबीर, कासेगाव येथे आयोजित केलं गेलं. ९ डिसेंबर १९९१च्या या शिबिरापूर्वी कराड तालुक्यातील इंदोली गावात उषाताई निकम यांच्या पुढाकाराने ७ आणि ८ ऑगस्ट १९९१ला ‘स्त्रिया आणि शेती’ या संदर्भात प्रशिक्षण शिबीर झालं होतं. ‘पर्यायी विकास नीती’च्या आधारावर यातूनही नवी वाट सुरू झाली. ही सर्व प्रक्रिया घडत राहण्यामागची मुख्य प्रेरणा गेल ऑम्व्हेटची होती. तिचा अभ्यास, तिचा उत्साह, नव्या संकल्पना पुढे आणण्याची निर्मितीक्षमता, ध्यास या गोष्टी सर्व संचाला दिशा देत होत्या. नागमणी राव, गौरी डे, उषाताई निकम असा नेतृत्त्व करणारा संच संघटनेला लाभला होता.

या पार्श्वभूमीवर आर.पी.आय. महिला आघाडीबरोबर एकत्र येऊन कराड आणि वाळवे तालुक्यांत दौरे झाले. काप्री इत्यादी गावांचा परिसर, शेणोळीच्या पंचक्रोशीतल्या गावांचा परिसर असे मेळावे १२ ते १५ मे १९९१ या काळात झाले. हे सर्व चालू असतानाच ६ जून १९९० रोजी, ‘अखिल भारतीय महिला फेडरेशन’बरोबर आघाडी करून मंत्रालयावर भव्य मोर्चा झाला. ‘दलित पँथर’च्या आंदोलनाचे नेते त्यावेळचे समाज कल्याणमंत्री रामदास आठवले होते. चांगली चर्चा होऊन परित्यक्ता स्त्रियांना जादा सवलती देण्याचे निर्णय झाले. राज्य पातळीवर शक्ती लावण्याची ताकद निर्माण झाली होती.

काळानुरूप पद्धतीने लढे पुढे गेले. स्त्रीमुक्ती संघर्ष चळवळीने ‘शंभर टक्के’ स्त्री उमेदवार उभे करून जिंकण्याची चळवळसुद्धा केली. ‘शेतकरी संघटना महिला आघाडी’बरोबर ‘लक्ष्मी मुक्ती’ आंदोलनात भाग घेतला. गावोगावच्या दारूबंदीबरोबरच साखर कारखान्यांची दारूनिर्मिती बंद करण्यासाठीही आंदोलनं केली. या आंदोलनांनी राज्यभरातल्या चळवळीला नव्या संकल्पना, दिशा मिळाल्या. बळ मिळालं. या चळवळी चालू असताना संघटनेच्या वतीने ‘वीरांगना’ हे हस्तलिखित अंक काढायला सुरुवात केली.

सर्व लेख हाताने लिहिलेले असायचे. गेल ऑम्व्हेट, इंदुताई, कुंदा कदम अशा कार्यकर्त्या हे लिखाण करीत. याच्या झेरॉक्स प्रती प्रत्येक गावाला दिल्या जात असत. यात स्त्रियांवरच्या अत्याचारांच्या घटना आणि त्याविरुद्ध झालेल्या लढ्यांची माहिती, स्वावलंबी शेती, सेंद्रीय शेती कशी करायची याविषयी माहिती, जातीयवादी-धर्मांध शक्तींच्या कारवाया आणि त्याविरुद्ध वैचारिक आणि आंदोलन करण्याच्या प्रकारचा संघर्ष करण्याविषयी लेख असे सर्व असायचे. हा अंक अनेक वर्षं चालला. त्या काळात एक वैचारिक प्रशिक्षण देणारं, संघर्षाचा संदेश देणारं सोपं आणि कमी खर्चातलं साधन म्हणून खूपच चांगली भूमिका या अंकाने बजावली.

धुळे जिल्ह्यातल्या, ‘श्रमिक संघटने’च्या बरोबर संलग्न असणाऱ्या ‘स्त्रीमुक्ती संघटने’च्या कार्यकर्त्यांचेही प्रेरणास्थान म्हणून गेलने शेवटपर्यंत भूमिका बजावली. १९७५ पूर्वीपासूनच गेलचं कार्य त्या चळवळीशी संपर्क ठेवून चालू होतं. भुरीबाई, ठगीबाई, इंदुबाई अशा अनेक कार्यकर्त्या तिच्या जिवलग मैत्रिणी होत्या. ती पश्चिम महाराष्ट्राप्रमाणेच त्यांच्या ग्रामीण, आदिवासी धाटणीच्या घरांमध्ये मुक्काम करायची. दौरे करायची. चालत फिरायची. ठगीबाई अनेक वेळा पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रात येऊन इथल्या चळवळीत राहून गेलेली आहे. स्त्रीमुक्ती संघटनेबरोबर (शहादा, तळोदा, नंदुरबार, अक्कलकुवा) १९७३ पासून गेल काम करीत होती. त्यामुळे या उभारणीमध्ये तिचा सहभाग राहिला.

गेल, छाया दातार आदी कार्यकर्त्या त्या काळात स्त्रियांची शिबिरं घेण्यासाठी जात असत. यामुळेच गावोगावी स्त्री कार्यकर्त्या तयार झाल्या. गेल तिच्या, ‘ह्यो तुरुंग फोडायचा हाय गं’ या पुस्तकात लिहिते, ‘‘एप्रिल १९७३ मध्ये स्त्रियांचं पहिलं शिबीर होतं. आमची अपेक्षा होती साधारणपणे २०-२५ स्त्रिया येतील, प्रत्यक्षात या शिबिरात प्रत्येक गावातून सव्वाशे आदिवासी स्त्रिया शिबिरासाठी हजर झाल्या. या स्त्रियांच्या हातातच शिबिराची सर्व सूत्रे दिली. त्यांनीच प्रामुख्याने समस्या मांडून चर्चेला सुरुवात केली.

दारूबंदी, घरातल्या पुरुषांची दडपशाही, मालदार जमीनदारांकडून होणारे अत्याचार असे विषय चर्चेला आणले आणि त्याविरुद्ध संघर्षाची तयारी दाखवली.’’ या पार्श्वभूमीवर सप्टेंबर १९७३मध्ये, ‘मागोवा’ ग्रुपचे मासिक स्त्रियांच्या मुद्द्यांवर, स्त्रीमुक्ती संघर्षावर विशेषांक घेऊन पुढे झाले. स्त्रीमुक्तीची सैद्धांतिक बाजू मांडण्यात गेलने पुढाकाराने सहभाग केला. तो सहभाग संपूर्ण राज्यातल्या चळवळीला चेतना देऊन गेला.

बिहारमध्ये पटण्याला देशपातळीवरची स्त्रीमुक्ती परिषद संघटित करण्यात इतरांबरोबर सर्वात जास्त पुढाकार गेलचा होता. यानंतरच्या काळात गेलने देशभर दौरे केले. तिला शेवटपर्यंत स्त्रीमुक्तीविषयक चर्चासत्रे, परिषदा आणि व्याख्यानांसाठी निमंत्रणे येत राहिली. मूळ इंग्रजीत प्रकाशित झालेलं ‘We will smash this prison’ (आम्ही हा तुरुंग फोडू) हे पुस्तक वाचून अनेक कार्यकर्त्या देशभर घडल्या.

‘असंघटित क्षेत्र आणि स्त्री कामगार’, ‘स्त्रियांवरील अत्याचार-नवीन चळवळी नवीन सिद्धांत’, ‘शेतकरी आणि स्त्रिया: लोकशाही आणि नवीन सामाजिक चळवळी’, ‘१९४७ पासूनची विकासाची लिंगभावी परिमाणे’ असे सैद्धांतिक लिखाण कार्यकर्त्यांना प्रेरणा देत गेले.

गेल ऑम्व्हेट आज नाही, मात्र तिचा सहभाग असलेल्या स्त्री चळवळींमुळे स्त्रियांमध्ये मुक्तीची पेटलेली ज्योत आजही तेवते आहे आणि ती कायम राहील.