आकांक्षा सर्वसामान्य, तशी नापास व्हायची नाही ती कधी. पण जेमतेम पास. आशाशी तुलना तर आकांक्षाच्या जणू पाचवीला पुजली होती.  ‘आशाची बहीण शोभत नाही’ हे वाक्य काही ना काही निमित्तानं आकांक्षाच्या कानी आदळायचंच.. एका बाजूला आशा यशाच्या पायऱ्या चढत होती आणि आकांक्षा मात्र कुटुंबाचा कोसळता डोलारा सावरण्याचा प्रयत्न करत राहिली..

तिचं खरं नाव आकांक्षा, पण तिला दुर्लक्षा म्हणावं असं मला वाटायचं. म्हणजे ती तिच्या घरच्यांकडून दुर्लक्षितच होती.  शाळेतही मागे मागे असल्यानं शिक्षकांकडून दुर्लक्षितच असायची. फारसं कुठे मिसळणं नाही, खेळ तर पारच दूर राहिला. आकांक्षाचं अस्तित्व एकाच ठिकाणी ठळकपणे जाणवायचं. ते म्हणजे आईच्या पदराला धरून तिच्या मागे, मागे चालणं. आई जिथं म्हणून कामाला जाईल तिथं ही दहा एक वर्षांची मुलगी जायचीच. त्यासाठी मग कधीकधी शाळा बुडायची तर कधी अभ्यासाला बुट्टी मारली जायची. पण एरवी खालमानेनं वावरणारी आकांक्षा आईच्या मदतीला जायची वेळ आली (आणि अशी वेळ सारखी यायचीच) की तुरुतुरु पळत – आईचा पदर धरून चालायला लागायची. त्यावेळी एरवी खाली असणाऱ्या मानेचे उन्नत माथ्यात रूपांतर व्हायचं.

आकांक्षाला मोठी बहीण होती. तिच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी, आशा. एकेकाळी बऱ्यापैकी वाचन असणाऱ्या तिच्या वडिलांनी एकमेकांना अनुरूप अशी ही आशा-आकांक्षा नावं मुलींसाठी निवडली होती. मुलींचे वडील बारावीपर्यंत शिकलेले होते. महानगरपालिकेत नोकरी होती. छोटं घर होतं. त्यात हे चौकोनी कुटुंब आनंदानं राहत होतं. पण नंतर दारूच्या व्यसनानं याही घराला सोडलं नाही. चांगल्या पगाराची नोकरी गेली, जागा गेली. चार इयत्ता देखील पूर्ण न झालेल्या गृहिणीला धुण्याभांडय़ाची कामं करण्याविना गत्यंतर राहिलं नाही.

व्यसनांच्या खाईत घर होरपळत होतं. मुलींच्या आईनं कष्ट करून आणलेला पैसा त्या खाईत गडप होत होता, तेव्हा देखील घराचं उरलं सुरलं बळ आशाच्या पाठीमागे उभं होतं. सावळ्या रंगाची, टपोऱ्या डोळ्यांची, अपऱ्या नाकाची आणि स्वच्छ दातांची ही मोठी मुलगी आशा पहिल्यापासूनच हुशार या सदरात मोडणारी होती. बघावं तेव्हा हातात पुस्तक असायचं. रस्त्यानं जाता येता कविता पाठ करणं, श्लोक म्हणणं चालूच असायचं. सर्वाना आशाचं कौतुक वाटायचं. पठ्ठीनं वर्गातल्या पहिल्या नंबरवरचा हक्क कधीच सोडला नाही. त्यामानानं आकांक्षा आपली सर्वसामान्य, तशी नापास व्हायची नाही ती कधी. पण जेमतेम पास. आशाशी तुलना तर आकांक्षाच्या जणू पाचवीला पुजली होती. जिथं तिथं तुलना, ‘आशाची बहीण शोभत नाही’ हे वाक्य काही ना काही निमित्तानं आकांक्षाच्या कानी आदळायचंच. पण याची ‘ढ’पणाचा शिक्का बसलेल्या मुलांमध्ये जशी तीव्र प्रतिक्रिया उमटते, तशी ती आकांक्षाच्या ठिकाणी कधीच आढळली नाही. शाळेत शिक्षकांच्या तोंडून काय किंवा बरळणाऱ्या वडिलांच्या तोंडून काय, तुलनेचे व पर्यायानं टीकेचे शब्द आकांक्षा नेहमीच शांतपणे घ्यायची. ती कधी रागावली नाही की रडली नाही. निषेधाचे शब्द कधीच तिच्या ओठांवर उमटले नाहीत. पाचवीपासून सहवासात असलेल्या या मुलीची शांत वृत्ती बेचैन करून जायची. तिनं बोलावं म्हणून मी खूप प्रयत्न केले. पण आकांक्षाचं उत्तर ठरलेलं असायचं. ती म्हणायची, ‘‘अहो ताई, दिदी आहेच माझ्यापेक्षा हुशार.’’

मला सगळ्या प्रकारात आश्चर्य वाटत असे ते आशाचं. आपल्या तुलनेत आकांक्षाची होणारी उपेक्षा ती बघत होती. पुढे पुढे तर परिस्थिती पार बिघडल्यावर आकांक्षा आईसोबत कामाला जायला लागली. अधूनमधून तिची शाळा बुडायला लागली. आशाला याची आच अजिबात लागली नाही. पुढे तर एक-दोन वर्षांत आकांक्षा महानगरपालिकेच्या शाळेत जायला लागली. खासगी शाळेचा खर्च तिच्या आईला झेपेना. आशाच्या बाबतीत मात्र एकमुखानं निर्णय घेतला गेला. आशा हुशार असल्यानं खासगी शाळेत शिकणार होती. मला हे कळल्यावर मी तातडीनं आकांक्षाच्या घरी गेले. तिची फी भरण्याची तयारी दाखवली. पण आकांक्षानंच प्रस्ताव फेटाळून लावला. ‘‘ताई या शाळेत मी सुट्टी घेतली तर समजून घेतील. प्रायव्हेट शाळेत नाही तसं होणार. मग आईला कशी मदत करणार?’’ आकांक्षाच्या प्रश्नाचं उत्तर माझ्यापाशी नव्हतं. सहज म्हणून माझं लक्ष आशाकडे गेलं. ती खाली मान घालून बसली होती. हातांची अस्वस्थ चाळवाचाळव चालली होती. पण ती बोलली काहीच नाही. त्यानंतरच्या वर्षांत सर्वाचंच (त्या कुटुंबाच्या हितचिंतकांचं) लक्ष आशाकडे लागून राहिलं. आशाचा पहिला नंबर कधी हुकला नाही. निबंध स्पर्धेत बक्षीस कधी चुकलं नाही. वडिलांचं वाढतं व्यसन, कर्जाची चढती कमान, आई आणि आकांक्षाची अव्याहत धडपड, या कशाचाही आशानं आपल्या अभ्यासावर परिणाम होऊ दिला नाही. यशाच्या एकामागून एक पायऱ्या ती चढत राहिली. सर्वाच्या कौतुकाचा विषय बनली.

दोन-तीन र्वष अशी गेली. आशा यशाच्या पायऱ्या चढत होती आणि आकांक्षा आपल्या आईच्या संसाराचा कोसळता डोलारा सावरण्याचा प्रयत्न करत होती. पण एक मात्र, एवढय़ा सगळ्या गडबडीत आकांक्षानं शाळा सोडली नाही. जेमतेम मार्क मिळवून का होईना, इयत्ताच्या शिडीत एक, एक पायरी मोठय़ा कष्टानं वर चढत होती ती बहाद्दर पोरगी.

पण मग परिस्थिती आणखी चिघळली. कर्जाच्या ओझ्याखाली घर गेलंच होतं. तिथंच जवळपास कसंबसं डोक्यावर छप्पर अन् भोवताली आडोसा निर्माण करून मंडळी राहू लागली. आशानं तिथं राहून अभ्यास करणं गैर आहे, असं जवळच्या मंडळींना वाटलं. मग एका समाजहितैषी व्यक्तीनं पुढाकार घेतला. आशाचं शालांत परीक्षेपर्यंतचं शिक्षण पूर्ण होईतो आशा आपल्याकडे राहू दे असा प्रस्ताव त्यांनी मांडला. आशानं तिच्या आईनं आणि खास करून तिच्या बहिणीनं तो एका झटक्यात मान्य केला. आशा नवीन घरी वास्तव्याला गेली. मागे राहून गेलेल्या मायलेकी तिच्या छोटय़ा मोठय़ा गरजा पुरवू लागल्या.

पुढच्या घटना फार वेगानं घडल्या. आशा उत्तम रीतीनं शालांत परीक्षा उत्तीर्ण झाली. तिला ७५ टक्के गुण मिळाले. (हे टक्के काही वर्षांपूर्वीचे आहेत हे लक्षात घ्यावे. आजच्या दिवसात ७५ टक्क्यांना नापास समजतात.) आशा त्याच घरात बारावीपर्यंत राहिली. नंतर आपल्या घरी परत आली. पण तिनं आपलं महाविद्यालयीन शिक्षण मात्र चालू ठेवलं. इथं आकांक्षा अणि तिची आई घरगुती कामं करत होत्या. आकांक्षाही पहिल्या प्रयत्नांत शालांत परीक्षा उत्तीर्ण झाली. तिला ४८ टक्के गुण मिळाले. मात्र पुढं शिकणं तिनं साफ नाकारलं. यावेळ पावेतो तिच्या विचारात अधिक खंबीरपणा आणि सुस्पष्टता आली होती. ती म्हणाली, ‘‘आई थकत चालली आहे. दिदी खूपच हुशार आहे. तिला तिचं शिक्षण पूर्ण केलंच पाहिजे. बाबांचा प्रश्नच नाही. तेव्हा मी आता पूर्ण वेळ काम करणार. आई घरी कशी बसेल ते बघणार.’’

मात्र आयुष्यात माणसं जे ठरवतात तसं होतंच असं नाही. पदवीधर होण्याच्या प्रयत्नात असतानाच आशा वस्तीतल्याच एका मुलाच्या प्रेमात पडली. मुलगा फारसा शिकलेला नव्हता. थोडा व्यसनी होता असंही दिसत होतं. पण आशाला त्यातलं काही दिसत नव्हतं. दिसलं तरी उमगत नव्हतं. तिला त्या मुलाशी लग्न करायचं होतं. बस्स!

आशाचं लग्न झालं. आकांक्षा आणि तिची आई पत्रिका द्यायला माझ्या घरी आल्या. त्यांनी पैशांची थोडीफार जुळवाजुळव केली होती. आशानं एवढय़ा लवकर आणि तेही अशा मुलाशी लग्न करावं याची खंत आईच्या शब्दाशब्दांत व्यक्त होत होती. आकांक्षा मात्र काहीच बोलली नाही. थोडीशी काळजीत दिसली. ती काळजी लग्नासाठी घेतलेल्या कर्जाची होती की आशानं घेतलेल्या निर्णयाची होती हे नीटसं कळलं नाही.

आशाचं लग्न झालं. तिला एक मुलगी झाली. लग्नाच्या वर्षांगणिक नवऱ्याचा नाकर्तेपणा वाढत गेला आणि त्यासोबत त्याच्या शरीरात रुजलेले रोगदेखील. जेमतेम पाच सहा वर्षांत आशा विभक्त झाली. मुलीला घेऊन परत आली. घेतलेल्या शिक्षणाचा फायदा एवढाच झाला की बऱ्यापैकी नोकरी मिळाली तिला. आईच्या शेजारीच एक छोटी खोली घेऊन आशानं त्यात आपलं बस्तान मांडलंय.

आकांक्षाही आता धुण्याभांडय़ाची कामं नाही करत. एका कारखान्यात नोकरी करते. मोठी झाली, लग्नाचं वय उलटून जातंय म्हणून तिची आई सारखी हळहळत असते. आपल्या या गोऱ्यापान, नाकीडोळी सुंदर असलेल्या मुलीला चांगला नवरा मिळाला असता अशी खंत व्यक्त करते. एकेकाळी खरंच छान गोरीपान असणारी पण आता फिकुटल्या रंगाची दिसणारी आकांक्षा आईचं बोलणं ऐकताना म्लानपणे हसते. आताशा तिच्या विरळ होत चाललेल्या केसात एखादा अगदी एखादाच चुकार पांढरा केस दिसतो, तो झाकायचा व्यर्थ प्रयत्न करताना म्हणते ‘आताच दोन संसार माझ्या डोक्यावर आहेत. तिसरा आणि कशाला पाठी लावून घेऊ.’ हे सगळे बोलत असताना कधीतरी आशाची मुलगी तिच्यासोबत असते. तिचं बोट धरून तिला जवळ ओढत आकांक्षा म्हणते. अगदी आपल्या आईसारखीच हुशार आहे किंवा थोडी जास्तच. आता तिला शिकवायचंय. डॉक्टर करायचंय.

आकांक्षाची आणि माझी ओळख खरं म्हणजे आशाच्याच माध्यमातून झाली. आशाच्या शाळेत माझी अधून मधून फेरी असायची. त्यावेळी आशाच्या वर्गशिक्षिका नेहमी आशाविषयी सांगायच्या. तिला मदत मिळायला हवी असा आग्रह धरायच्या. मग आशा हळूहळू माझ्या घरी यायला लागली. एकदा तिच्यासोबत तिची आई आली. नंतर आईचं बोट धरून आकांक्षा आली. पण माझं लक्ष मात्र नेहमी आकांक्षाकडेच जायचं. तिची शांत मूर्ती मनात घर करून बसायची. आणखी एक लक्षात यायचं. आकांक्षा आणि तिच्या आईचं अद्वैत. आकांक्षानं आईसाठी खूप काही केलं यात शंकाच नाही पण आईच्या डोळ्यातून देखील आपल्या या लेकीसाठी जे प्रेमाचं चांदणं सांडत राही ते बघण्याचा शीतल योग मला या मायलेकींनी दिला खरा.

आकांक्षानं अबोलपणे इतक्या लहान वयात आशासाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी कळत नकळत इतका मोठा त्याग का केला, याचा विचार नेहमी मनात येतो. प्रत्येक व्यक्तीला स्वत:ची म्हणून एक ओळख लागते. त्यासाठी आपापल्या परीनं तो/ती मार्ग शोधतात. आकांक्षानंही तो मार्ग शोधला होता का? उत्तर सापडत नाही एवढं खरं.

eklavyatrust@yahoo.co.in