छायाची गोष्ट एकटय़ा छायाची नाही. ती वस्तीत, झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलींची प्रातिनिधिक गोष्ट आहे. इथल्या मुलींची जी कुचंबणा होते, त्याचं खरंच शब्दात वर्णन करता येणार नाही. मुलीच्या एकटेपणाचा फायदा घेऊ बघणारे मुलगे, बहिणींविषयी वेडंवाकडं ऐकल्यास विचार न करता त्यांना मारणारे अविचारी भाऊ, लग्नाची केली जाणारी घाई, शिक्षणाची परवड अशी अनेक कारणं आहेत, या कोवळ्या मुलींची आयुष्य उद्ध्वस्त करणारी.
मुंबई नामक महानगरात लोक किती मोठय़ा प्रमाणात वस्तीपातळीवर राहतात, हे काही वेगळं सांगायला नको. अशाच एका वस्तीत चाललेल्या व्यसनमुक्ती अभियानात माझा सहभाग होता. अभियानाच्या हाती फारसं यश लागलं नाही, पण माझ्या हाती मात्र छाया लागली. हाती लागली म्हणजे माझी तिच्याशी ओळख झाली आणि कायमची टिकली.
अभियानात प्रामुख्यानं वस्तीतील मंडळींचा सहभाग घेतला गेला होता. ते जणू आमचे खबरी बनले होते. नाही तर व्यसनाच्या पाळामुळापर्यंत कसे जाऊन पोचलो असतो आम्ही? छाया हे काम उत्तम रीतीनं करायची. कोण कोणत्या बारमध्ये जातो, कुठला गुत्ता कुठं आहे, तो कोण चालवतो, सगळी खडान् खडा माहिती तिला असायची. छायाचं ते वैशिष्टय़ होतं. तिची दृष्टी सजग होती. कान तिखट होते आणि मन तल्लख होतं. पण कधी कधी ती गप्प असायची. तिच्या काळ्या, सुंदर मुद्रेवरचं चमकणारं हसू मावळून जायचं. कुठे तरी एकटक बघत राहायची. मग एक दिवस अभियानाच्या आयोजकांचा फोन आला मला. छाया घर सोडून निघाली होती. तिनं म्हणे तिचं लग्न ठरवलं होतं. ही बातमी अनपेक्षित नसली तरी काहीशी धक्कादायक होतीच माझ्यासाठी. छाया माझ्या अगदी जवळ होती (निदान मी तसं मानत होते). मग तिला माझ्याशी बोलावं, मन मोकळं करावं, असं का वाटू नये, असा विचार मनात आला खरा. पण लागलीच उठून तिला भेटावं म्हणून गेले.
छायाशी बोलल्यावर सगळा खुलासा झाला. छाया एका परधर्मीय मुलाच्या प्रेमात पडली होती. तो मुलगा हातगाडीवर छोटय़ा मुलांसाठी विकत असे. आपल्या दहावीत शिकणाऱ्या मुलीनं एका परधर्मीय, हातगाडीवर खेळणी विकणाऱ्या मुलाशी लग्न जुळवावं, या कल्पनेनं छायाचे वडील हादरून गेले होते. छायाचे वडील कमालीचे निव्र्यसनी तर होतेच पण महानगरपालिकेत गाडय़ा धुण्याचं काम करणारे कायमस्वरूपी कामगार होते ते. छायाविषयी कळताच त्यांनी तर छायाला दोन दिवस बंदिस्तच करून ठेवलं होतं. छायाचं सगळं गाऱ्हाणं मी मन लावून ऐकलं. ऐकताना निषेधाचा अगर विरोधाचा भाव तोंडावर येऊ दिला नाही. छाया बोलायची थांबल्यावर एवढंच म्हटलं, ‘‘छाया तुझ्या मित्राला मी आधी भेटते. चालेल?’’ छायाची मान होकारार्थी हलली. मी म्हटलं, ‘‘उद्या मी अमक्या स्टॉपजवळ उभी आहे. त्याला तिथं यायला सांग.’’
छायाचा मित्र तिथं मला भेटायला येणार नाही, असं मला मनातून वाटत होतं. खात्री नव्हती. पण ते धैर्य तो मुलगा दाखवणार नाही, असं वाटत होतं. छायाला मात्र अगदी वेगळं वाटत होतं. आपल्यावर ‘जीवापाड’ प्रेम करणारा आपला प्रियकर येणार, लग्नाची मागणी घालणार याविषयी तिच्या मनात तिळमात्र शंका नव्हती. मी दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे स्टॉपवर जाऊन उभी रहिले. छाया माझ्यासोबत होती. छायाचा मित्र मात्र आला नाही. तो मला भेटायला तर आला नाहीच पण मग वस्तीतही दिसायचा बंद झाला. तो लापता झाला. छायाला जे कळायचं ते कळलं. ती काही दिवस गप्प झाली. खिन्न झाली. तिच्या घरच्यांशी आमचं बोलणं चालूच होतं. वस्तीपातळीवर राहणाऱ्या, लोकापवादाची प्रचंड भीती असणाऱ्या त्या माणसांनी, तेव्हा खरंच धीर धरला. थोडय़ा दिवसांनी छाया सावरली आणि सरळ अभ्यासाला लागली.
मला छायाचं कौतुक अशासाठी की जे घडलं, त्याचा तिनं निमूटपणे स्वीकार केला. ती रडली नाही, तिनं आदळआपट केली नाही की कोणाला दोष दिला नाही. उलट पुढच्या दिवसांत छायानं अनेकदा आपली चूक झाली असंच म्हटलं. छाया बारावीपर्यंत शिकली. पण खरं सांगू, छायाचा सगळा ओढा समाजकार्याकडे होता. तो लक्षात घेऊन तिथं काम करणाऱ्या सामाजिक संस्थेनं तिला त्या शाखेचा अभ्यास करण्याची संधी दिली.
त्यानंतर जवळपास दोन ते तीन र्वष मी त्या भागात काम केलं. छायाचं योगदान मला आठवतंय. वस्तीतल्या कुठल्याही कामात तिचं योगदान नाही, असं कधीच झालं नाही. पण एका प्रसंगात तिच्या धैर्याची जी कसोटी लागली ती केवळ अविस्मरणीय अशीच होती. झालं असं की वस्तीत राजू नावाचा एक मध्यमवयीन माणूस आपल्या बायको मुलांना दारू पिऊन कमालीचा त्रास देत असे. त्या त्रासातील हिंसा आणि क्रौर्य कुणालाही हतबुद्ध करून टाकेल असाच होता. छाया तो हिंसाचार बघत होती. त्या बाईच्या जखमांना मलमपट्टी करत होती. मग एक दिवस काय झालं कुणास ठाऊक, एका टळटळीत दुपारी छाया राजूच्या झोपडीत गेली. आरडाओरड करून तिनं आजूबाजूच्या चार लोकांना बोलावलं आणि माहीत असलेलीच राजूच्या हिंसाचाराची गोष्ट तिनं त्या माणसांना ऐकवली. छाया जे सांगत होती ते त्या लोकांना माहीत नव्हतं असं थोडंच होतं? पण त्या क्षणी छायाची कळकळ, तिचा आवेश आणि अवतार यांचा फार सकारात्मक परिणाम बघणाऱ्यांवर झाला. त्या भागातल्या नगरसेविकेला झाल्या प्रकाराची कुणकुण लागली आणि तिनं त्या ठिकाणी धाव घेतली. राजूच्या चार कानफटात दिल्या आणि त्याची दारू उतरवली. काही काळ का होईना राजूचा संसार सुखाचा झाला. व्यसनातून राजूची सुटका झाली नाही, पण छाया त्या वस्तीत होती, तोपर्यंत ना त्यानं बायकोवर हात उगारला, ना छायाकडे डोळा वर करून बघितलं.
छायानं आणि आजूबाजूच्या बायांनी मला हे सांगितलं तेव्हा खूप आश्चर्य वाटलं. हे बळ या एवढय़ाशा मुलीमध्ये आलं कसं, हेच मला समजेना. छायाला विचारलं तेव्हा सुरुवातीला नुसतीच हसली ती नेहमीप्रमाणे. पण मग हळूहळू बोलायला लागली आणि छायाचं मन आपल्याला उमगलं नाही, या जाणिवेनं हळहळ वाटली.
आम्ही सर्वानीच क्षणिक मोह म्हणून छायाच्या ज्या प्रेमाची संभावना केली होती, ते तसं नव्हतं. छाया किती तरी वर्षांपासून त्या मुलावर जीव लावून होती. परधर्मीय असला, कमी शिकलेला असला तरी चालेल, संसार सुखाचा करीन अशी आशा मनाशी बाळगून होती. पण त्या मुलानं छायाची निराशा केली. पार निराशा केली. तो अगदीच घाबरट निघाला. नुसतं भेटायला बोलावल्यावरच पोबारा केला त्यानं. छाया म्हणाली, ‘‘ताई, तो वस्तीतून गेला आणि हळूहळू माझ्या मनातून देखील गेला.’’ छायानं असं म्हटलं खरं, पण तिच्या डोळ्यातंल पाणी काही वेगळंच सांगत होतं.
छायानं सांगितलं की त्यातून बाहेर यायला वेळ लागला तिला, पण त्या अवधीत तिनं पुन्हा अशी चूक न करण्याचा आणि दुसऱ्याला मदत करण्याचा जणू चंगच बांधला. त्या बाईला मदत करताना जणू आतल्या वैफल्याला वाट करून दिली तिनं.
मी मात्र छायाला सावधगिरीचा इशारा दिला. छायाच्या धाडसामुळे एका स्त्रीचे प्राण वाचले असंच म्हणायला हवं. पण ते धाडस छायाला महागात पडू शकलं असतं. त्या झोपडपट्टीत एकटय़ा मुलीनं एखाद्या पुरुषासमोर उभं राहून त्याला आव्हान देणं ही अत्यंत अवघड गोष्ट होती. छायालाही ते सगळं पटलं असावं, कारण त्यानंतर ती तुलनेनं खूपच शांत झाली.
ज्या सामाजिक संस्थेचा मी वर उल्लेख केला, त्या संस्थेनंच छायाला सामावून घेतलं. छाया तिथं नोकरीला लागली. पण नुसती पोटार्थी नोकरी करणं, हे छायाच्या रक्तातच नव्हतं. छायानं त्या वस्तीत अंगणवाडी चालवली, बचत गट निर्माण केले, व्यसनमुक्तीचा तर तिनं ध्यासच घेतला आणि त्यासाठी सोबतीणही अगदी योग्य तीच शोधून काढली. राजूची बायकोच या कामात तिची साथीदार झाली. सामाजिक संस्थेतील एक तरुण सहकारी तिचा सहचर बनला. छाया दोन मुलांची आई झाली.
छाया मला नेहमी भेटते. मुलांना कुठल्या ना कुठल्या स्पर्धेसाठी घेऊन निघालेली असते. मुलांना इतक्या स्पर्धात उतरवू नकोस, असं सांगितलं की म्हणते, ‘‘अहो ताई, झोपडपट्टीतल्या माणसांच्या मागे जन्मापासून मरणापर्यंत जगण्याची स्पर्धाच असते लागलेली. या स्पर्धेसाठी पोरांना लहानपणापासून तयार करावं लागतं.’’ एवढं बोलते आणि हसून पसार होते. मी मात्र तशीच थबकून उभी राहते. मनात येतं, त्या वेळी ती कोवळ्या वयातली छाया त्या मुलाबरोबर पळून गेली असती तर? काय झालं असतं तिचं? कुठे असती ती आज?
छायाची गोष्ट एकटय़ा छायाची नाही. ती वस्तीत, झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलींची प्रातिनिधिक गोष्ट आहे. इथल्या मुलींची जी कुचंबणा होते, त्याचं खरंच शब्दात वर्णन करता येणार नाही. कामावर जाणारे आईवडील, या मुलींच्या एकटेपणाचा फायदा घेऊ बघणारे मुलगे, बहिणींविषयी वेडंवाकडं ऐकू आल्यास मागचा पुढचा विचार न करता त्यांना मारणारे अविचारी भाऊ, त्यातून लग्नाची केली जाणारी अवेळी घाई, शिक्षणाची परवड व नुसतीच भाषणबाजी करणारे निष्क्रिय राजकीय नेते. एक का कारण आहे, या कोवळ्या मुलींची आयुष्य उद्ध्वस्त करणारं?
पण छायानं आपलं आयुष्य वाचवलं. प्रेमभंगाच्या दु:खातूनही ती सावरली. तिच्या उदाहरणानं वस्तीतल्या किती तरी मुलींनीही आपली आयुष्य सावरली. छायाचं केवढं मोठं श्रेय हे!
eklavyatrust@yahoo.co.in