प्रत्येक उद्दिष्ट काहीतरी ‘मोजता येणारी गोष्ट’ मिळवण्याचं असतं असं मुळीच नाही. असं फलप्राप्ती देणारं उद्दिष्ट जेवढं आनंद देऊ शकतं, तेवढाच आनंद एखादा प्रसंग साजरा करण्याचं, एखादी गोष्ट शिकण्याचं-अनुभवण्याचं उद्दिष्टही देऊ शकतं.. कधी कधी तर ‘फलप्राप्ती’शिवायसुद्धा काही उद्दिष्टं जास्त समाधान देणारी ठरतात.

खूप लहानपणापासून एक कविता मनावर ठसली आहे. ‘जिथे जायचे ठरले तेथे आम्ही जाऊच जाऊ.. आम्ही जाऊच जाऊ’. दोन ओळी वगळता बाकी कविता त्या वेळी कळायला खरंच अवघड होती. पण या ध्रुवपदानं मात्र मनावर कमालीचं गारूड केलं होतं. विशेषत: दोन वेळा ठसक्यात आलेल्या त्या ‘आम्ही जाऊच जाऊ’ या ओळी. कालांतरानं त्या कवितेचा इतिहास वगरे समजला आणि अर्थही उलगडायला लागला. आणि ‘जाऊच जाऊ’साठी आधी ‘कुठे जायचं?’ ते ठरविण्याची गरज असते, हे पण कळायला लागलं.
योगेश हा एक अत्यंत हुशार मुलगा. हुशारीचं खूप कौतुक झालेला. पण कामात अत्यंत ढिला. आपल्याला नक्की काय करायचंय हे कधीच न ठरवणारा. अत्यंत चंचल- सगळी ऊर्जा उथळपणे उधळून टाकणारा. महाविद्यालयीन आयुष्यात अपयशाच्या अनेक थपडा बसल्यावर त्याला जाग आली. ‘आपण कुठलीच गोष्ट कधी ठरवून करत नाही’ असं मोठय़ा गर्वानं सांगणाऱ्या योगेशला ‘कधीतरी काहीतरी नक्की ठरवायचं असतं, तरच खऱ्या समाधानाचं स्टेशन गाठता येतं’ हे उमगलं. खूप लांबचं ध्येय ठरवणं सगळ्यांना जमतंच असं नाही. कधी कधी व्यवहारात ते शक्यही नसतं. पण जमिनीवर पाय ठेवून, वस्तुस्थितीचं भान ठेवून रोजच्या जगण्यात छोटी छोटी उद्दिष्टं ठेवल्यामुळे आपल्या मनाला एक प्रकारची ताकद मिळत असते हे नक्की. आपल्याकडे जी साधनसामग्री असते तिच्या बळावरच तर आपण काय करायचं ते ठरवत असतो. आपल्या क्षमता आणि जमेच्या अन्य बाजूंना आपल्या कृतीशी जोडण्याचं काम उद्दिष्टं करत असतात. योगेशच्या हुशारीला जोपर्यंत निश्चित उद्दिष्टाचं अधिष्ठान मिळणार नाही तोपर्यंत ती सपाट मदानावर पसरलेल्या पाण्यासारखी निश्चल राहील. उंच कडय़ावरून धो धो पडणाऱ्या किंवा पाटातून खळखळत वाहणाऱ्या प्रवाहाप्रमाणे प्रभावी होणार नाही. कुठलीही गरज जोपर्यंत एखाद्या नेमक्या उद्दिष्टात रूपांतरित होत नाही तोपर्यंत आपल्या हातून परिणामकारक कृती घडत नाही.
तृप्तीची शालान्त परीक्षा नुकतीच संपली. भली मोठी सुट्टी आ वासून समोर उभी होती. चार-पाच दिवस लोळून काढण्यात गेले. मग मात्र तिला कंटाळा यायला लागला. ‘सुट्टीची मजा यायला पाहिजे’ हे मनात पक्कं होतं, पण नुसतेच दिवस जायला लागल्यावर वाटली तेवढी सुट्टी ‘भारी’ जाईना. मग तिनं आई-बाबांशी मनातली अस्वस्थता मांडली. त्यातून असं ठरलं की तृप्तीला कशात आनंद मिळतो हे तिनं लिहून काढायचं आणि त्या महत्त्वाच्या चार किंवा पाच गोष्टींचा निश्चित प्लॅन करायचा. तेवढय़ा गोष्टी पूर्ण होतील ही तिची जबाबदारी. बाकी वेळ तिला त्या त्या वेळी जे वाटेल ते करायचं! एकदा ही स्पष्टता आल्यावर तृप्तीला खूप छान वाटलं. त्या सुट्टीत तिनं मनसोक्त चित्रं काढली, वैज्ञानिक प्रयोगाचं पुस्तक आणून त्यातले प्रयोग करून पाहिले, नवी भाषा शिकायचा प्रयत्न केला आणि मित्र-मत्रिणींसोबत दोन थोडे अवघड ट्रेकही केले. हे सगळं अगदी सहज-निवांतपणे झालं. शिवाय भरपूर वेळ तिनं न ठरवलेल्या पण आवडलेल्या गोष्टी करण्यात घालवला. जर तिनं नेमकं काही डोळ्यांसमोर आणलंच नसतं तर? सुट्टीच्या प्रत्येक दिवशी तिला मिळाला तो आनंद हरवलाच नसता का?
प्रत्येक उद्दिष्ट काहीतरी ‘मोजता येणारी गोष्ट’  मिळवण्याचं असतं असं मुळीच नाही. असं फलप्राप्ती देणारं उद्दिष्ट जेवढा आनंद देऊ शकतं, तेवढाच आनंद एखादा प्रसंग साजरा करण्याचं, एखादी गोष्ट शिकण्याचं- अनुभवण्याचं उद्दिष्टही देऊ शकतं. नोकरीत पदोन्नती मिळाल्यानं पगार, स्थान यातला बदल हवाहवासा वाटतो, तसाच ती जबाबदारी पेलत असताना जो अनुभव येणार असतो त्याचाही विचार उद्दिष्ट ठरवताना झालेला असतो. कधी कधी तर ‘फलप्राप्ती’शिवायसुद्धा काही उद्दिष्टं जास्त समाधान देणारी ठरतात. ‘नर्मदा परिक्रमा’ करणाऱ्या एक ज्येष्ठ महिला म्हणाल्या, सुरुवात केली तेव्हा परिक्रमा करायची असं ठरवलं होतं, पण जसजसा प्रवास सुरू झाला तसतसा तो अनुभव इतका वैविध्यपूर्ण  झाला की परिक्रमा पूर्ण होणं माझ्या दृष्टीनं दुय्यम बनलं. निसर्ग, परिक्रमेत भेटणारी माणसं, स्वत:च्या क्षमतांची नव्यानं झालेली ओळख हेच खूप आनंद देणारं ठरलं. असं वाटलं की आपण वेगळीच व्यक्ती बनून जन्माला आलो आहोत. आता कुठल्याही परिस्थितीला आपण सहजपणे तोंड देऊ शकू. पण हे घडलं ते परिक्रमा करायची ठरवलं म्हणूनच. नुसतेच असे अनुभव घेऊ या हे काही कधी ठरवलं गेलं नसतं!’
उद्दिष्ट कधी एकटं नसतं. प्रेरणेच्या दीर्घ/ लांबच्या प्रवासाचा ते एक भाग असतं. कधी ते आपल्या भावनिक गरजांच्या रूपात अवतरतं तर कधी आपण खोलवर जपलेली मूल्यं (चांगल्या-वाईटाच्या कल्पना) प्रतििबबित करतं. कधी आपली ओळख इतरांना करून देतं तर कधी आपल्या स्वप्नांची निगराणी करतं.
‘अग्निपंख’मध्ये आपले माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यांची जीवनकहाणी चित्रित केलेली आहे. एस.एल.व्ही-३ च्या अयशस्वी उड्डाणानंतर ते खूपच निराश झाले होते, पण त्यांच्या प्रमुखांनी प्रा. ब्रह्मदासांनी त्यांच्यावर पुढील जबाबदारी सोपवली. त्याबद्दल लिहिताना
डॉ. कलाम म्हणतात, ‘शिखराकडे जायचं हे खरं असलं तरी लक्षात ठेवलं पाहिजे की, जीवन आजूबाजूलाच फुललेलं असतं- शिखरावर नव्हे! अनुभव येतात, तंत्रकौशल्यं आत्मसात होतात आणि त्या बळावर आपला शिखराकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त होत जातो. त्या प्रवासाची धुंदी जो अनुभवेल तोच शिखरावर समाधानानं पोहोचेल!’
उद्दिष्टं विविध रूपांनी आपल्या मनात दडलेली असतात. रोजच्या रोज करण्याच्या छोटय़ा छोटय़ा कृतींची एक साखळी असते. एकाच वेळी अशी अनंत दैनंदिन उद्दिष्टं आपण डोळ्यांसमोर ठेवत असतो.
काही उद्दिष्टं मात्र आपण स्वत:च्या इच्छेनं निवडलेली असतात. आपल्या स्वभावातूनच ती उमलून आलेली असतात, ‘आपली’ ओळख इतरांना करून देतात. कोणाकडे जाताना वेळेचं काटेकोर पालन करण्याचं उद्दिष्ट, दर रविवारी स्वत:चे कपडे स्वतच धुण्याचं  किंवा एखादी कला आवर्जून अमुक एका टप्प्यापर्यंत शिकण्याचं, अशा ठरवण्यातून आणि कृतीतून आपल्याला एक छान साफल्याची भावना अनुभवता येते. (दर आठवडय़ाला या सदरातला लेखविषय हातावेगळा झाला की मला जे ‘हं! झालंच की!’ वाटतं- ते यातलंच बरं का!)
उद्दिष्टांचा प्रत्येक टप्पा आपल्याला मानसिक आरोग्याकडे नेणारा असतो. रोजची छोटी कामं नेटकेपणानं पूर्ण झाली की किती हायसं वाटतं! आपलाच वेळ सत्कारणी लागल्याचं समाधान असतं. स्वत: ठरवलेली आवडीची उद्दिष्टं गाठल्यानं तर मनाला चतन्याची झळाळीच मिळते. एखादं नावडतं काम, त्रासदायक अनुभव त्या चतन्याच्या, आनंदाच्या बळावर सहज हाताळला जाऊ शकतो.
त्याहीपुढची उद्दिष्टं म्हणजे जणू आपला भविष्यातला आरसाच. ‘मला एक चांगला-यशस्वी उद्योजक बनायचंय!’ ‘निवृत्त झाल्यावरही मला कामात गुंतवून घ्यायचंय.’ ‘या मुलांचे संसार सुरू झाले म्हणजे मी सुटले’,  ‘अजून वीस वर्षांनी माझं स्वत:चं असं घर/ शेत/ कारखाना इ. असेल’ अशी मनातली वाक्यं म्हणजे आपली जीवनोद्दिष्टं असतात.
व्यावसायिक आणि मानसिक आरोग्य बळकट होऊ लागतं. कधी कधी यातल्या काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेरही असू शकतात आणि पेचात पडल्यासारखं होतं.
नीलाची इच्छा होती की इंजिनीअिरगच्या शिक्षणाचं चीज करावं. तिनं सुरुवातीला एक छोटा व्यवसाय चालवला, पण पहिल्या मुलाची नाजूक तब्येत पाहता तिला उद्योगाला रामराम करणं भाग पडलं. १०-१२ वष्रे आईची भूमिका समरसून निभावली, पण मग मात्र मूळ इच्छेनं डोकं वर काढलं. उद्योगात लगेच पडणं शक्य नव्हतं म्हणून तिनं एका सामाजिक संस्थेसाठी तांत्रिक सल्लागार म्हणून काम सुरू केलं. त्यात ती पाहता पाहता रमली. उद्योग चालवणं या दृश्य गोष्टीपेक्षा ‘स्वत:च्या क्षमतांना, कौशल्यांना न्याय्य वाव मिळणं’ हे खरं जीवनोद्दिष्ट होतं, हे तिचं तिलाच उमगलं आणि तिची खंत कुठल्या कुठे पळून गेली.
कधी कधी परिस्थिती इतकी विपरीत रूप धारण करते की जीवनोद्दिष्टाच्या दिशेनं जाणारं प्रत्येक पाऊल तलवारीच्या धारेवर पडल्यासारखं असू शकतं. विभासला पर्यावरणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याची खूप इच्छा होती. त्यासाठी पालकांच्या विरोधात जाऊन त्यानं शिक्षणं घेतलं आणि एका संशोधन प्रयोगशाळेत उमेदवारी चालू केली. तिथे त्याची हुशारी चमकू लागली, पण आतल्या राजकारणानं त्याला प्रचंड मनस्ताप व्हायला लागला. पण ते जीवनोद्दिष्ट इतकं जबरदस्त खेचणारं होतं की सगळं पचवत तो कामाला चिकटून राहिला. आपलं ज्ञान, कौशल्य इतर मार्गानी वाढवत राहिला. एक वेळ अशी आली की त्याचं स्थान तिथे वादातीत झालं आणि त्याचं योगदान पुरस्कारानं सन्मानित झालं. जीवनोद्दिष्टांच्या बाबतीत माणूस ध्येयनिष्ठ बनू शकतो आणि सर्व प्रतिकूलांशी झगडत राहू शकतो, शेवटी त्या प्रक्रियेतून मिळणारं समाधानच ही ताकद पुरवत असतं नं!
आपापल्या स्वभावाला अनुकूल उद्दिष्टं असतील तेव्हा त्यातून आपल्याला जास्त समाधान मिळतं. मग ती व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात असो. यात बरोबर/ चूक कुणीच नाही. मात्र एक खरं की माणसाचा प्रवास बहिरंग उद्दिष्टांकडून अंतरंग उद्दिष्टांकडे जेवढा होईल तेवढा तो आनंद किंवा त्यातून मिळणारं मन:स्वास्थ्य जास्त टिकाऊ होणार हे नक्की. तेव्हा मनापासून म्हणू या,
जिथे जायचे ठरले तेथे आम्ही जाऊच जाऊ
आम्ही जाऊच जाऊ..!    
डॉ. अनघा लवळेकर -anagha.lavalekar@jnanaprabodhini.org