scorecardresearch

Premium

..आणि आम्ही शिकलो : मी आनंदयात्री!

आमच्या पिढीत आणि आधीच्या पिढीत आजच्यासारखा दररोज बदल घडत नव्हता. समाजात गोगलगाईच्या गतीनं परिवर्तन होत होतं.

and we learned technology

मीना रामकृष्ण जोशी

आमच्या पिढीत आणि आधीच्या पिढीत आजच्यासारखा दररोज बदल घडत नव्हता. समाजात गोगलगाईच्या गतीनं परिवर्तन होत होतं. औद्योगिक क्रांती इतिहासाच्या उत्तरपत्रिकेत लिहून गुण मिळवण्यापुरतीच होती! सामान्य माणसाच्या जीवनात तिनं प्रवेश केला नव्हता. आता मात्र डोळय़ांची पापणी लवते न लवते तोच समोर तंत्रज्ञानाचा नवीन चमत्कार तयार असतो. पण आमची पिढी भाग्याची.. घरचं सकस अन्न खाऊन, निसर्गाच्या सान्निध्यात मोकळा श्वास घेऊन, अजूनही नवीन युगातल्या नवीन गोष्टी हाताळायला शक्ती टिकवून आहे.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…

आता माझंच पाहा ना! मला पत्र लिहिण्याचा छंद. लेक १९८६ मध्ये लंडनला गेली तेव्हा तिला माझ्याकडून महिन्यात एक पत्र लिहिलं जायचं. तेव्हा घरी फोनही नव्हता. एक दिवस मात्र घरात संगणक आला आणि चमत्कार झाला. पाहता पाहता संगणकाचं इतकं पीक आलं, की केव्हाही, कुठेही (अगदी मांडीवरही) तो विराजमान होऊ लागला. भ्रमणध्वनी (मोबाइल) आला. हे सगळं इतकं झटकन, की एकाची ओळख होत नाही, तो नवीन अवतार हजर. संगणक आल्यावर माझी मुलं, नातवंडं सतत आपली त्याच्याच संगतीत. मी रागानं त्याच्याकडे पाहावं, तर तो दात विचकून मला चिडवतोय असं वाटायचं! माझं शिक्षण झालं असलं, तरी टंकलेखन वगैरे काही मला माहीत नव्हतं. तेव्हा या पाहुण्यापासून मी चार हात दूरच राहायचे. मुलं मात्र दोन्ही दोन्ही हातांनी त्याच्याशी इतकं छान खेळायची, की कुतूहल वाटायचं आणि कधी काळजीही! कुठे तरी वाचलेलं आठवत राहायचं, की मुलं दिवसेंदिवस एकलकोंडी होताहेत. संगणकामुळे डोळे, मान, पाठ, बोटं यांवर परिणाम होऊन नवीन नवीन आजार उद्भवत आहेत.. काळजी.. काळजी. 

 एकदा मुलं आपापल्या कामाला गेल्यावर संगणक घरी नुसताच बेवारशासारखा कोपऱ्यात रुसून बसलेला दिसला. मला त्याची कीवच आली. बिचारा एकटाच होता. मी त्याच्याजवळ गेले आणि पियानोवर दोन्ही हात ठेवतात त्याप्रमाणे की-बोर्डवर ठेवले. नुसतं विजेचं बटण दाबून थोडाच तो सुरू होणार होता? पण प्रयत्न केला. संगणकाच्या पडद्यावर काहीबाही हालचाली सुरू झाल्या. तेव्हा मी पेपरमध्ये वाचलं होतं, की बिल गेट्स म्हणे संगणकावर रोज नवनवीन खिडक्या उघडतो! पण त्या खिडक्या आपल्याला कुठे आणि कशा दिसतात? संगणकाचा उंदीर बाजूला वळवळ करतच होता, त्याला कसा चालता- बोलता करायचा, काही माहिती नव्हतं. शेवटी उठले आणि मुलाला फोन लावला. त्यानंही शांतपणे काय काय करायचं ते सांगितलं. मी लिहून घेतलं आणि त्याप्रमाणे करायचा प्रयत्न केला; पण काही केल्या त्या उंदरावर डाव्या बाजूला टपल्या मारणं जमेना. पडद्यावरचा बाण ‘याहू मेसेंजर’वर (तोपर्यंत हा शब्द मी शम्मी कपूरच्या गाण्यातच ऐकला होता!) यायला तयारच नव्हता.

शेवटी डाव्या हातात उंदीर घट्ट पकडून, डोळे पडद्यावरच्या बाणावर ठेवून, उजव्या हाताच्या बोटानं उंदरावर टिचक्या मारण्याची कसरत करू लागले. अखेर त्या बाणाला आणलं बाई याहू मेसेंजरवर! ‘साइन इन’वर पुन्हा टिक केल्यावर अनेकांचे हसरे चेहरे- रडके चेहरे दिसले! लेकीच्या नावासमोर हसरा चेहरा दिसत होता, म्हणून त्यावर बाण नेऊन टिक केलं. तिचं लगेच आलेलं ‘हाय आई’ वाचलं आणि ती प्रत्यक्ष न दिसताही तिनं मला ‘ऑनलाइन’ बघून कसा ‘आ’ वासला असेल याची कल्पना केली! हळूहळू की-बोर्डवरची इंग्रजी अक्षरं आणि मजकूर मात्र मराठी असं चॅटिंग सुरू केलं. लहानपणी मुलांचा हात धरून ‘ग म भ न’ शिकवलं, आता मुलांनी माझं हळूहळू चॅटिंग सहन केलं. तो आनंद अवर्णनीयच होता. एकदा का हे सुरू झाल्यावर मग व्यसनच जडलं. थोडा जरी वेळ मिळाला, की लागलीच संगणकाकडे जाऊ लागले. कॉम्प्युटर, माऊस, इंटरनेट एक्सप्लोरर वगैरे शब्द तोंडात बसले. सराव सुरू राहिला. आता ई-मेल पत्त्यांची माझी यादी खूप मोठी झाली आहे. चॅटिंगसुद्धा करायला शिकले आहे. खूप गप्पा मारते. नातीही सांभाळली जातात आणि राहण्या-खाण्याची सोय करण्याचा, पाहुणचाराचा त्रास वाचतो! क्षितिज किती जवळ आलंय!

  माझ्या एका मैत्रिणीची तक्रार- ‘‘तुमचा फोन नेहमी एन्गेज कसा हो?’’ मी हसून म्हणते, ‘‘अहो, मुलं चॅटिंगला आली, की इकडे मी गॅस बंद करते आणि कॉम्प्युटर सुरू करते! त्यांना जेव्हा वेळ असतो तेव्हा आपण नको का बोलायला?’’ जेव्हा आपली सकाळ, तेव्हा अमेरिकेत रात्र. मग रात्री जागून जर लेक बोलतेय, तर तिच्याशी बोलायला नको? परदेशात मुलं खूप बिझी असतात. आपल्याला काय काम आहे या वयात, असं वाटतं. आता तर गूगलवर जाऊन काही माहिती मिळवण्याचाही प्रयत्न करते. काही चुकलं, की ‘अमुक असं करा,’ अशा सूचना येतात, तर कधी ‘असं करू नका’ अशी तंबीही मिळते. आता आपल्या भाषेतही लिखाण करता येईल; पण मला इंग्रजी लिखाण आणि मराठी भाषा हेच लिहायला सोपं वाटतं.

आज मी ८४ वर्षांची आहे. आता डोळय़ाला नीट दिसत नाही, गुडघे दुखतात. नाही तर अवकाशयानात जाण्याचाही मी प्रयत्न केला असता! मला या वयात पैशांचे व्यवहार वगैरे विशेष करावे लागत नाहीत. बाहेर जाणंही कमी झालं आहे; पण सकाळी ७ वाजल्यापासून ओंकार साधना, प्रवचनं मोबाइलवर ऐकण्यात कसा वेळ जातो तेच कळत नाही. आमच्या काही ग्रुप्सनी नेहमीच मला उद्युक्त केलं. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, आपले सण याबद्दल मला असलेली माहिती सांगण्यास प्रोत्साहन दिल्यामुळे तेही करत असते. त्यामुळे आत्मविश्वास खूप वाढलाय. आता  बघू या अजून काय काय नवीन निघतंय ते! पण आज तरी मी खूश आहे. काही अडलं तर सगळे आनंदानं मला मदत करतात. घरच्यांना माझा याबाबतीत अभिमान वाटतो. या तंत्रज्ञानात खूप मज्जा आहे.

केशवसुतांनी म्हटल्याप्रमाणे ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ हे मला पटतं. जुन्या गोष्टींत रमण्यापेक्षा नवीन गोष्टी शिकून त्याचा आस्वाद आणि आनंद घ्यावा, म्हणून मी आधी साधा मोबाइल, मग स्मार्टफोन, व्हॉट्सअ‍ॅप यांत रमले. करोनाच्या काळात ऑनलाइन वर्गामुळे मी खूपच ‘बिझी’ झाले आणि अजूनही आहे. फोनवरच्या शाब्दिक कोडय़ांच्या खेळात कोडी सोडवायला मला आवडतं. आधी झोपताना पुस्तक वाचायची सवय होती. आता हातात पुस्तक धरवत नाही; पण छोटा मोबाइल धरून खूप वाचता येतं. बोलून लिहिता येतं. घरात बसून जगाशी संबंध राहतो, त्यामुळे खूप आनंदी आहे. मी एक आनंदयात्री..

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: And we learned technology miracle computer cell phone uses chaturang article ysh

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×