कितीही कठीण वेळ असो, ती वेळ बदलण्याचं विलक्षण सामर्थ्य बाईमध्ये असतंच. संसाराची साथ सुटलेल्या अशा अनेक स्त्रिया जिद्दीने उभ्या राहतायत, त्यातल्याच एक अनिता गोसावी. राज्यातल्या पहिल्या रुग्णवाहिका चालक… या काळात त्यांनी अनेक बरे-वाईट अनुभव घेतले, इतकंच नाही तर गेल्या सात वर्षांत त्यांनी हजारा च्यावर बेवारस मृतदेहांना उचलून अग्नी दिलाय…त्यांच्या या धाडसाची, सेवेची दखल…
रुग्णवाहिका म्हटलं की त्या शब्दासह अनेक भावना येतात. त्यात भय आहे, खिन्नता आहे, पण उमेदही आहे, विश्वासही आहे, सारं काही आहे. खरं तर रुग्णवाहिकेत बसायची वेळ येऊ नये, असं प्रत्येकालाच वाटत असतं; परंतु आयुष्य म्हटलं की सगळं आपल्या मनासारखं होतंच असं नाही… काही वेळा रुग्ण म्हणून, तर काही वेळा रुग्णाचे नातेवाईक म्हणूनसुद्धा अनेकदा रुग्णवाहिकेची मदत घ्यावीच लागते. आणि मग सुरू होतो आशा-निराशेचा खेळ.
अर्थात हे झालं त्यात बसणार्या माणसांचं, पण रुग्णवाहिका चालवणार्या व्यक्तीचं काय? कितीही तटस्थ राहायचं ठरवलं तरी ते शक्य होईल? आणि विशेषत: रुग्णवाहिका चालवणारी ‘ती’ असेल तर? आणि तीही राज्यातली पहिली रुग्णवाहिका चालक असेल तर? त्या आहेत, अनिता गोसावी. गेली अनेक वर्षे त्या रुग्णवाहिका चालवत जगण्याचे, माणसांचे सारे बरे-वाईट अनुभव घेत आहेत.
या क्षेत्राशी संबंधित रुग्णवाहिका चालवणार्या या स्त्रीचा प्रवास नक्कीच वाचण्यासारखा. गेल्या सात वर्षांत अनिता यांनी रेल्वे रुळांवर अपघाती मरण आलेल्या हजाराच्या वर बेवारस मृतदेहांना उचलून त्यांना अग्नी दिलाय. तसेच या जिगरबाज स्त्रीने करोनाकाळात रुग्णांची तर ने-आण केलीच, परंतु अनेक मृतदेहांचीही ने-आण केली, तीही एकटीने! ४६ वर्षीय अनिताची कहाणी एखाद्या चित्रपटात शोभावी अशीच. शिक्षण चौथी पास. १४ व्या वर्षी लग्न झालं. सासर अकलूजचं. नवरा सहा बहिणींचा एकुलता एक भाऊ, त्यामुळे लाडावलेला. घरचं बरं होतं, पण हा नोकरी-व्यवसाय काही करत नसे. अशात वाईट संगतीमुळे व्यसनांनी घेरलं. तोवर अनिता दोन मुलांची आई झाली होती. तिच्यातल्या आईला मुलांच्या भवितव्याची चिंता वाटू लागली. ही परिस्थिती तिचे आई-वडील व भाऊ यांना समजताच त्यांनी अनिताला तिच्या कुटुंबासह, आपल्या घरी चिंचवडला आणलं. लग्नानंतर १५-१६ वर्षांनी म्हणजे २००८ मध्ये अनिता माहेरी आली ती तिच्याशिवाय तिघांच्या जबाबदारीचं ओझं घेऊन!
सुरुवातीचे दोन-तीन महिने गेल्यानंतर मात्र अनिता यांच्या स्वाभिमानी मनाला भावावर भारभूत होणं पटेना. नवरा काही काम करेल याची आशा नव्हतीच आणि चौथी पास बाईला नोकरी तरी कोण देणार? शेवटी एका शाळेत साफसफाई करण्याचं काम मिळालं. दोन वर्षांनंतर एका नामवंत शाळेच्या बसवर मदतनीस म्हणून वर्णी लागली. तेव्हा आवड म्हणून त्या एका मोटर प्रशिक्षण शाळेत जाऊन गाडी चालवायला शिकल्या. नंतर त्या स्कूल बसच्या चालक काकांचे मन आपल्या वागणुकीने जिंकून त्यांनी गाडी चालवण्यातली बारीकसारीक कौशल्यंही आत्मसात केली. ते काका हळूहळू मोकळ्या रस्त्यावर त्यांना गाडी चालवायलाही देऊ लागले. गाडीवर चांगली पकड बसल्यावर मात्र त्यांच्यातल्या जिद्दी बाईने भावाच्या मदतीने एक छोटा ‘सेकंड हॅन्ड’ टेम्पो घेतला. त्या वेळी म्हणजे २०१७-१८ मध्ये त्यांचा दिवस पहाटे तीनला सुरू होई. नवरा व मुलांसाठी जेवणखाण, घरातलं इतर काम आदी आटपून, त्या सकाळी सहा वाजता टेम्पो घेऊन पुण्यातल्या मार्केट यार्डला भाजी आणण्यासाठी जात असत. त्यांच्या आईचं भाजीचं छोटंसं दुकान होतं. भाजी घेऊन त्या नऊ वाजता परतत. नंतर नऊ ते एक वाजेपर्यंत आईबरोबर भाजी विक्री आणि मग शाळेच्या बसची नोकरी हा त्यांचा दिनक्रम होता. सगळं व्यवस्थित सुरू झालं… संसाराची घडी बसू लागली होती… त्याला करोनाने खीळ घातली.
सर्वत्र टाळेबंदी लागल्याने शाळा बंद होऊन ऑनलाइन सुरू झाल्या अन् साहजिकच शाळेच्या बस बंद पडल्या. त्यांनी खासगी गाड्यांवरील वाहनचालकाच्या नोकरीसाठी प्रयत्न केला, पण व्यर्थ! शेवटी करोनानेच त्यांच्यासाठी एक दार उघडं केलं.
झालं ते असं… त्यांच्या भावाच्या तीन खासगी रुग्णवाहिका (ॲम्बुलन्स) होत्या. त्यातील दोन गाड्या इतर चालक चालवत होते आणि एक तो स्वत:! मात्र २०१९ मध्ये भाऊच करोनाग्रस्त झाल्यावर त्याच्या गाडीसाठी कोणी चालक मिळेना. तेव्हा अनिता पुढे झाल्या. वडिलांच्या प्रश्नार्थक नजरेला त्यांचं उत्तर होतं, ‘‘जर तो (भाऊ) हे करू शकतो तर मी का नाही?’’ आणि वडिलांनी दिलेल्या एका होकारात त्यांचं आयुष्य अगदी आमूलाग्र बदलून गेलं. मात्र त्यानंतर सुरू झाला एक अथक प्रवास…
जीवन-मृत्यूच्या सीमेवरील अत्यवस्थ रुग्णाचा जीव वाचवायचा तर प्रत्येक क्षण महत्त्वाचा. यासाठी भर रहदारीच्या रस्त्यावरून मोबाइलवर ‘जीपीएस’ लावून वेगानं गाडी चालवण्याची कला त्यांनी आत्मसात केली. तसेच रुग्णाला ‘ऑक्सिजन लावणं’, हृदय चालू राहावं म्हणून ‘पंपिंग करणं’ हेदेखील तिने हळूहळू डॉक्टरांकडून शिकून घेतलं… आणि पुढे पुढे तर काय तीच अनेकांचा आधार बनली… दु:खाचा डोंगर कोसळलेल्या, रुग्णांच्या नातलगांना दिलासा देण्यासाठी…
भावाच्या या रुग्णवाहिका बनवलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये स्ट्रेचर आणि ऑक्सिजन या दोन सोयी करून घेतल्या होत्या… अर्थात ज्यांना रुग्णालयाच्या सुसज्ज ॲम्बुलन्सचे दर परवडत नाहीत त्यांच्यासाठी ही सेवा होती. अनेक मृत्यू जवळून पाहिलेल्या अनिता यांना त्यांच्या रुग्णवाहिकेत झालेला पहिला मृत्यू आजही स्पष्ट आठवतो. त्या एक करोनाग्रस्त आजी होत्या. गाडीत पाठीमागे स्ट्रेचरजवळ त्यांची डॉक्टर मुलगी बसली होती. रुग्णवाहिका रुग्णालयाच्या आवारात पोहोचतेय तोच त्या मुलीचा हंबरडा ऐकू आला आणि काय झालं ते अनिता समजून गेल्या. तसंच सुरुवातीच्या काळात एकदा सहा फुटांपेक्षा जास्त उंची असलेल्या तगड्या पुरुषाचा मृतदेह स्ट्रेचरवरून नेताना, अचानक ब्रेक दाबावा लागल्याने स्ट्रेचर सरकून त्या मृतदेहाचा झालेला स्पर्श… त्या वेळी अंगभर उठलेला शहारा त्या विसरू शकत नाही. नंतर या सगळ्याची सवय होत गेली. त्या काळात त्यांनी २८५ करोनाग्रस्त मृतदेहांना उचलून आपल्या गाडीतून नेले आहे.
वर्षभराच्या या अनुभवानंतर २०२० मध्ये त्यांनी स्वत:ची त्याच पद्धतीची ‘सेकंड हॅण्ड’ रुग्णवाहिका घेतली. त्यासाठी आपले दागिने गहाण टाकून पैसे उभे केले. भाऊ पाठीशी होताच. २०२३ मध्ये पतीचं निधन झालं. त्याआधी चार-पाच वर्षं ते अंथरुणालाच खिळलेले होते. त्यांच्या जाण्याने आयुष्यातला एक अध्याय संपला आणि त्यांनी आपलं संपूर्ण लक्ष आपला व्यवसाय आणि मुलं यांच्यावर केंद्रित केलं.
संघर्ष माणसाला रडवतो आणि घडवतोही! पुरुषांचं वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात स्वत:ची नाममुद्रा उमटवताना, त्यांना अनेकदा पुरुषी अहंकाराला सामोरं जावं लागलं. ‘रेल्वे रुळावर पडलेला रक्तबंबाळ मृतदेह उचलून दाखव, मग बोल’ या आव्हानाला त्यांनी अपघातात रुळांवर छिन्नविच्छिन्न झालेल्या देहांचे तुकडे गोळा करून निरुत्तर केलं. तेही एकदा नव्हे तर अनेकदा.
खासगी रुग्णवाहिका चालवणारे पुरुष चालक बर्याचदा झोपण्यासाठी आपला मोबाइल फोन रात्री बंद करून ठेवतात. मात्र अनिता यांचा फोन कायम चालू आणि त्यांच्या उशाशी असतो आणि पहिल्या रिंगला उचलला जातो. साहजिकच पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मनात त्यांच्याबद्दल आदरभावना आहे. त्यांच्या मदतीने त्यांनी अनेक बेवारस मृतदेहांना अग्नीही दिलाय.
खासगी रुग्णवाहिकाचालकांना गाडी चालवण्याबरोबर इतरही अनेक कर्तव्यं पार पाडावी लागतात. अशा वेळी मन कितीही शांत ठेवायचा प्रयत्न केला तरी काही प्रसंगी ते डगमगतंच. विशेषत: आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा, तरुण मुलांचा मृतदेह दोरीच्या फासातून सोडवताना पोटात गलबलतं, घशात आवंढा येतो. पण अशा प्रसंगी बरीच कामं करायची असतात. उदा. त्या टांगलेल्या देहाचं छतापासूनचं तसंच पायांपासून जमिनीपर्यंतचं अंतर मोजायचं असतं. आजूबाजूच्या वस्तूंचे फोटो काढायचे असतात. त्यामुळे भावनाविवश होऊन चालत नाही. ती मदत करावीच लागते.
अनिता यांनी हा पेशा पोटापाण्यासाठी स्वीकारला खरा, पण त्यांच्यातल्या सेवाधर्माने त्यावर मात केली. कधी कधी तर रुग्णवाहिकेचं भाडं मिळणं बाजूला राहिलं, उलट स्वत:चेच पैसे खर्च करावे लागले… गेल्याच वर्षाची गोष्ट. निगडीजवळील वृद्धाश्रमात राहणार्या एका वृद्ध जोडप्यातील अत्यवस्थ आजींना शासकीय रुग्णालयात नेण्यासाठी, आश्रमचालकांनी विनंती केल्यानुसार पोलिसांचा त्यांना फोन आला. पण त्या आजींचा इस्पितळात नेण्यापूर्वी रुग्णवाहिकेतच मृत्यू झाल्यामुळे शवविच्छेदन करणं भाग पडलं. आजोबांकडे मुलाचा दूरध्वनी क्रमांक होता. त्यावर पोलिसांनी फोन केला, पण आपण बाहेरगावी आहोत असं सांगून त्याने चक्क कानावर हात ठेवले. नंतर पोलिसांनी अनिता यांनाच पुढील क्रियाकर्म करण्याची विनंती केली आणि त्या या आजोबांसह ते शवविच्छेदन केलेला मृतदेह घेऊन निघाल्या. तोवर संध्याकाळ झाली होती. दिवसभर उपाशी असलेल्या आजोबांना प्रथम त्यांनी दोन वडापाव खाऊ घातले. पाणी पाजलं. नंतर स्मशानात क्रियाकर्मासाठी लागणारे पैसेही भरले. सगळं आटपून आजोबांना रेल्वे स्टेशनवर सोडताना त्यांच्या पोटात कालवाकालव झाली. त्या आजोबांचा तो केविलवाणा चेहरा आजही अनिता यांच्या नजरेसमोर आहे.
बेवारस मृतदेह उचलतानाही रुग्णवाहिकेचं भाडं मिळण्याची शक्यता कमीच! मृतदेहाच्या खिशात मोबाइल फोन मिळाल्यास (बर्याचदा कोणी येईपर्यंत तो चोरीला गेलेला असतो) अथवा अन्य काही पुरावा सापडल्यास वारस भेटण्याची शक्यता, अन्यथा परमेश्वराचं काम समजून सगळं पार पाडायचं. पोलिसांचा फोन आला की त्या ठिकाणचा बेवारस मृतदेह उचलून, त्यांनी सांगितलेल्या शासकीय रुग्णालयातील शवागारात नेऊन ठेवावा लागतो. नंतर तीन दिवस वाट पाहून कोणी नातेवाईक न आल्यास, त्याचा पोलिसांच्या मदतीने अंतिमसंस्कारही करावा लागतो. या जानेवारीतच त्यांनी अशा दहा बेवारस मृतदेहांना अग्नी दिलाय.
आपला जम बसल्यावर अनिता यांनी २०२३ मध्ये चिंचवडमध्येच राहणार्या आपल्या बहिणीला वनिताला या क्षेत्रात आणलं. ती अत्यवस्थ रुग्णांची ने-आण करते. तिचेही अनुभव सुन्न करणारे! बाहेरगावाहून आपल्या लहानग्यांना उपचारासाठी पुण्याला आणणार्या जोडप्यांची परवड तिने बघितली आहे. ती म्हणाली, शासकीय रुग्णालयात जागा न मिळाल्यास खासगी रुग्णालयातील अनामत रक्कम भरण्यासाठी गळ्यातील मंगळसूत्र विकण्याचीही त्या आईची तयारी होती. पण अनेकदा हाती काहीही लागत नाही. अशा वेळीयेणारी हतबलता आम्हालाही अस्वस्थ करते. वनिताचं शिक्षणही जेमतेम… सातवी पास. मात्र जगणं-जगवणं यांच्या सीमेवरील अनंत क्षणांच्या अनुभवांनी समृद्ध झालेल्या यांच्या ज्ञानाला तुलना नाही. या पुण्याईचं फळ म्हणजे त्यांची मुलं गुणी निघाली. अनिता यांच्या मुलाने यांत्रिक अभियांत्रिकी (पदविका) पूर्ण केली असून मुलगी वनस्पतिशास्त्रात पीएच.डी. करते आहे. तर वनिताच्या लेकीचा कायद्याचा अभ्यास सुरू आहे.
अनिता आणि या भावा-बहिणींनी आपल्या व्यवसायाला ‘सावित्री ॲम्बुलन्स’ हे स्वत:च्या आईचं नाव दिलंय. त्यांचा हा सावित्री ॲम्ब्युलन्स नामक रथ केवळ महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातच नव्हे तर बाहेरच्या राज्यांतही पोहोचला आहे.
निधड्या छातीच्या मदांर्नींही स्तंभित व्हावं अशी विलक्षण कामगिरी करणार्या अनिता गोसावी या समर्थ स्त्रीला महाराष्ट्र उद्योग भूषण, हिरकणी, नवदुर्गा अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं आहे.
waglesampada@gmail.com
