राधिका गोडबोले
अन्नपूर्णा देवी ऊर्फ रोशनआरा यांचं नाव घेतल्यावर शास्त्रीय संगीत विशेषत: वाद्यसंगीतातील जाणकार सोडल्यास अनेकांच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह उमटू शकतं. मात्र अन्नपूर्णा देवी आणि पं.रविशंकर यांचं वैवाहिक आयुष्य, अन्नपूर्णा देवी यांचा त्याग, कठोर निश्चय आणि सर्वात महत्त्वाचं त्यांचं संगीतप्रेम, त्यांची अफाट गुणवत्ता, त्यांचे शिष्य या गोष्टी कळल्यावर सगळेच आदरानं नतमस्तक होतील.

साधारण १९३० मध्ये मैहर घराण्याचे प्रवर्तक बाबा अल्लाउद्दीन खान यांच्या घरी त्यांचे आठ-नऊ वर्षांचे थोरले चिरंजीव अली अकबर हे सरोदवर बाबांनी शिकवलेल्या तानांचा सराव करत होते, जवळच त्यांच्यापेक्षा थोडी लहान बहीण रोशनआरा खेळत होती. अचानक एक तान ऐकून ती भावाला म्हणाली, ‘‘बाबांनी असं नाही शिकवलं.’’ लगेच तिनं बाबांनी शिकवलेली रचना भावाला गाऊन दाखवली. अली अकबर यांनी कौतुकानं धाकट्या बहिणीचं म्हणणं मान्य केलं. बाहेरून नुकत्याच आलेल्या बाबांनी आपलं हे बोलणं ऐकलं आहे हे कळताच रोशन घाबरली कारण तिला बाबांनी संगीत शिकायला नाही म्हटलेलं होतं, पण झालं उलटंच. बाबांनी तिला जवळ घेऊन कौतुक केलंच. सरस्वतीचा वरदहस्त तुझ्यावर आहे, आजपासूनच तुझं संगीत शिक्षण सुरू करतो, असं सांगितलं. खरं तर बाबांची मोठी मुलगीही उत्तम गायची, पण लग्नानंतर तिच्या कलेला प्रोत्साहन मिळालं नाहीच, उलट तिचा तानपुरा जाळण्यात आला. या धक्क्यानं तिचा मृत्यू झाला तेव्हा बाबांनी धाकट्या मुलीला संगीत शिकवायचं नाही, असं ठरवलं होतं. पण तिची संगीताची जाण आणि प्रेम बघून त्यांनी तिला शिकवायचं ठरवलं.

शिष्य रविशंकर आणि अली अकबर यांच्यासह मुलगा-मुलगी असा अजिबात भेद न करता रोशनआरा हिचं शिक्षण सुरू झालं. बाबा अल्लाउद्दीन मैहर दरबारात वादक होते. स्वत: मैहरच्या महाराजांनी रोशनआराचं नाव ‘अन्नपूर्णा’ ठेवलं होतं असं म्हणतात. बाबा स्वत: सरोद, सतार, सुरबहार अशी वाद्यं वाजवत आणि गातही. रविशंकर आणि अली अकबर यांनी सतार व सरोद वाद्यं निवडलेली होती. सुरुवातीला त्यांनी रोशनना सतार शिकवायला प्रारंभ केला, पण त्यांची प्रगती, उत्तम समज बघून बाबांनी अन्नपूर्णांना म्हटलं, सर्वसामान्यांपेक्षा संगीत जाणकारांना अधिक समजेल, आवडेल असं ‘सुरबहार’ वाद्य तुला मी शिकवतो, माझ्या गुरूकडून मिळालेलं ज्ञान जतन करण्यास तू समर्थ आहेस. कारण तुला संगीताबद्दल खरं, मनस्वी प्रेम आहे, पण कशाची लालसा नाही.

या लाडक्या गुणी मुलीचं लग्न बाबा आणि माँ यांनी शिष्योत्तम रोबिंद्र शंकर अर्थात पं. रविशंकर यांच्याशी १५ मे १९४१ ला करून दिलं. या विवाहासाठी रविशंकर यांचे ज्येष्ठ बंधू उदयशंकर यांनीही पुढाकार घेतला होता. लग्नाच्या वेळी अन्नपूर्णा देवी चौदा वर्षांच्या आणि पंडितजी अठरा वर्षांचे होते. मुलगी आणि जावई यापेक्षाही दोन्ही शिष्य आपल्याजवळ राहावेत ही त्यांची इच्छा होती, पण ते दोघे मुंबईला आले. इथं नवी क्षितिजे, संधी खुणावत होत्या. लग्नानंतर एका वर्षात शुभेन्दूचा जन्म झाला. दोनच वर्षांनी पं. रविशंकर आणि अन्नपूर्णा देवी या दोघांमध्ये संशय, नाराजीचं वादळ घोंघावू लागलं. मैफली, रियाज यानंतर शुभेन्दूच्या आजारपणामुळे होणारी रात्ररात्र जागरणं, सगळ्याचा परिणाम या नवतरुण पालकांना जाणवू लागला होताच. पंडितजींनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटलं आहे की, बाबाजींसारखीच अन्नपूर्णा चटकन चिडत असे आणि मीही चिडचिडा झालो होतो. पंडितजी आणि नृत्य कलाकार कमला शास्त्री यांच्यातील मैत्रीमुळे अन्नपूर्णा दुखावल्या होत्या. काहींच्या मते, लग्नानंतर मैहर दरबारात सुरबहार वादनासाठी अन्नपूर्णा यांना बोलावण्यात आलं होतं, तिथं त्यांचं खूप कौतुक झालं. पंडितजी बरोबर होते, त्यांनीही सूरबहार वाजवण्याची परवानगी मागितली, खरं तर त्यांचं वाद्य सतार होतं,त्यामुळं त्यांचं फारसं कौतुक झालं नाही.

पुढे काही मैफलींमध्येही असाच अनुभव आल्यावर किंचित असूया उत्पन्न झाली असावी. असं म्हटलं जातं की, तुलना टाळण्यासाठी आणि वैवाहिक जीवन सुरळीत ठेवण्यासाठी अन्नपूर्णा देवी यांनी त्यागाची परिसीमा गाठली, त्यांनी सरस्वतीची प्रतिमा आणि बाबांसमोर जाहीर मैफलींमध्ये वादन न करण्याची शपथ घेतली. तरीही १९६२ मध्ये हे दोन असामान्य कलाकार पतिपत्नी विभक्त झाले.

शुभेन्दूला पंडितजींनी सतार शिकवायला सुरुवात केली होती, पण त्यांच्या व्यस्ततेमुळे अन्नपूर्णाही त्याला शिकवत, अधिकतर अन्नपूर्णा देवी यांच्या तालमीत तयार झालेल्या शुभेन्दूला संगीताची उत्तम जाण होती, पण त्याचा ओढा चित्रकलेकडे होता. अनेक चढ-उतार असलेल्या त्याच्या आयुष्याची अखेर मात्र अतिशय दु:खद होती.

पतीपासून विभक्त झालेल्या अन्नपूर्णा देवी यांच्यावर हा आणखी एक आघात झाला. मैफली बंद होत्याच फक्त रियाज, ऐकणं आणि शिकवणं, बाकी पहाटेपासून कर्तव्यदक्ष गृहिणीची अगदी सकाळी दूध घेण्यापासूनची सगळी कामं त्या करीत. स्वत:चे कपडे आजारपणातही स्वत:च धुवत. त्यांचे शिष्य ऋषिकुमार पंड्या यांच्याशी त्यांनी १९८२ मध्ये लग्न केलं. शिष्यांशिवाय त्यांनी जवळजवळ कुणाशीच जनसंपर्क ठेवलाच नव्हता. असं म्हणतात की, अन्नपूर्णा देवी स्वत: रियाज करताना त्यांना फुलांचा आणि बाबाजींना आवडे तसा अत्तराचा सुवास जाणवत असे, इतक्या त्या संगीतात तन्मय होऊन जात.

जाहीर मैफली न करण्याची शपथ मात्र त्यांनी आयुष्यभर पाळली. पण बाबांकडून मिळालेला, स्वत: फुलवलेला सांगीतिक ठेवा त्यांनी शिष्यांना भरभरून दिला. दक्षिण मुंबईच्या ‘आकाशगंगा अपार्टमेंट’मधील त्यांच्या घरात दाखिनमोहन टागोर,निखिल बॅनर्जी, हरिप्रसाद चौरासिया, बसंत काबरा, आशीष खान असे जगप्रसिद्ध शिष्य बैठकीतील सतरंजीवर बसून शिकलेले आहेत. अन्नपूर्णा देवी त्यांच्यासाठी गुरू माँ होत्या. बांबूच्या एका छोट्याशा मोढ्यावर बसून त्या गाऊन शिकवायच्या. स्वयंपाक, स्वयंपाकघराची सफाई, स्वत:चे कपडे धुणं हे त्या अखेरपर्यंत करत होत्या. अन्नपूर्णा नाव सार्थ करणारी स्वयंपाककलाही होतीच, घरी आलेला अतिथी, शिष्य काही खाल्ल्याशिवाय जात नसे. खिडकीत येणार्‍या पाखरांनाही त्यांच्या आवडीचा खाऊ मिळत असे. स्वयंपाकघरात असल्या तरी त्यांचे कान शिष्यांच्या वाजवण्याकडे असत. एखादी तार
जरी किंचित उतरली तरी त्या तिथून सूचना देत.

उस्ताद अली अकबर खान आपल्या या संगीतज्ञ बहिणीबद्दल म्हणाले होते, ‘‘मी, रविशंकर आणि पन्नालाल घोष यांना एका बाजूला आणि अन्नपूर्णाला दुसर्‍या बाजूला ठेवलं तर सांगीतिक ज्ञान, गुणवत्तेच्या बाबत तिचं पारडं आमच्यापेक्षा जड असेल.’’
अन्नपूर्णा देवींनी जशा जाहीर मैफली बंद केल्या तशा त्या लोकांना विशेषत: माध्यमांच्या प्रतिनिधींनाही भेटत नसत. संगीत ही ईश्वराची साधना, सेवा आहे असंच त्या मानत. एकदा सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक यहुदी मेन्युहिन त्यांच्या भारत दौर्‍यात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी (भारतात आलेले अतिथी कलाकार म्हणून) तुमच्यासाठी काय करू? असं विचारलं असता, अन्नपूर्णा देवी यांचं सुरबहार वादन ऐकण्याची इच्छा मेन्युहिन त्यांनी व्यक्त केली होती. अनेक प्रयत्न केल्यावर अन्नपूर्णा देवी यांनी त्यांना सुरबहार ऐकवायचं मान्य केलं, पण ते जाहीर मैफलीत नाही, तर त्यांच्या घरी रियाजाच्या वेळी येऊन ते ऐकू शकतील असं सांगितलं. प्रत्यक्षात मेन्युहिन यांना कौटुंबिक कारणामुळे तातडीने घरी परतावं लागलं होतं, त्यामुळे अन्नपूर्णा देवी यांचं वादन ऐकण्याचं भाग्य फक्त ब्रिटिश संगीतकार, गिटारवादक, गायक-गीतकार जॉर्ज हॅरिसन यांना तेव्हा लाभलं. अद्वितीय गुणवत्ता, संगीत वारसा असूनही कायम प्रसिद्धिपराङ्मुख राहिलेल्या अन्नपूर्णा देवी म्हणजे निरपेक्ष संगीतसेवेचं मूर्तिमंत उदाहरण होत्या.
त्यांची जन्मशताब्दी कालपासून (१७ एप्रिलला) सुरू झाली आहे. (त्यांच्या जन्मतारखेबद्दलही वेगवेगळ्या नोंदी आढळतात) अखंड निरपेक्ष संगीतसेवा करून त्या १३ ऑक्टोबर २०१८ रोजी अनंतात विलीन झाल्या. त्यांच्या ध्वनिमुद्रित ध्वनिफितींपेक्षाही कैक पटींनी जास्त त्यांचा संगीत वारसा शिष्यांच्या माध्यमातून मागे ठेवून त्या गेल्या. त्यांची ‘अनहर्ड मेलडी’ वा ‘अनसुनी धून’ जगभरातील शिष्यांची वेगवेगळी वाद्यं आणि गायनातून गुंजत राहीलच.