गेस्टापो मागावर असलेल्या ब्रिटिश सैनिकांना आपल्या देशावरच्या असीम प्रेमाखातर त्यांनी आपल्या घरात आश्रय दिला. किती तरी वर्षं आपल्या घरच्या छुप्या जागेत त्यांनी शेकडो सैनिकांना लपवलं. त्यांची शुश्रूषा, त्यांच्यासाठी नवीन ओळखपत्र, त्यांनी सुरक्षित ठिकाणी पोचण्यापर्यंत अनेक जबाबदार्‍या त्या निडर स्त्रीने जिवावर उदार होऊन पार पडल्या. ‘आश्रयदाती’ ठरलेल्या या ॲना ब्रुसेलमान या वादळी व्यक्तिमत्त्वाचा सन्माननीय अंत झाला तो अमेरिकेत!

तो दिवस होता, १० सप्टेंबर १९४०. बेल्जियममधील ब्रुसेल्स इथल्या एका इमारतीपाशी रात्रीच्या काळोखात काही हालचाली सुरू होत्या. युद्धाचे दिवस असल्याने सर्वत्र ‘ब्लॅक आउट’ होतं. नीरव शांततेत कुणाच्याही लक्षात न येऊ देता लपत छपत तीन जण इमारतीतून बाहेर पडले. अचानक बाजूने एक ट्राम जाताना दिसली आणि तिघांपैकी एकीनं उरलेल्या दोघांना त्या ट्राममध्ये जवळपास ढकललं खरं, पण काही क्षणात तिच्या लक्षात आलं, की पूर्ण ट्राममध्ये जर्मन सैनिक होते! तीच लोकं, ज्यांच्यापासून ती दोघांना लपवून स्वत:च्या घरी नेत होती. इथं तिचं कसब, तिची संकटात शांत राहण्याची वृत्ती कामी आली आणि अगदी साधारण नागरिक असल्यासारखी सहजता दाखवत तिघं त्यांच्या ठरावीक थांब्यावर सुखरूप उतरले, कोणालाही संशय न येता!

तिनं त्यांना सांभाळत आपल्या घरी नेलं. सोबतचे दोघं म्हणजे हँक आणि मार्टिन हे अमेरिकी पायलट होते. त्यांच्या विमानावर बॉम्ब हल्ला होऊन विमानानं पेट घेतला होता. दोघांचेही कपडे पेटले होते. पॅराशूटद्वारे दोघांनी नदीत उड्या टाकल्या, पण तोवर दोघं खूप भाजले होते. त्यांच्या मागावर असलेल्या जर्मन सैनिकांनी विमानाच्या अवतीभवती शोध घेतला, पण दोघं सापडले नाहीत. काही तास दलदलीत लपल्यानंतर ‘बेल्जियन भूमिगत प्रतिकार चळवळी’च्या लोकांनी त्यांना मदत केली. तात्पुरतं एका गुप्त ठिकाणी त्यांची सुश्रूषा करून आणि मग एक निरोप पाठवला गेला. ‘‘तुमची गरज आहे…’’ इतकाच! हा निरोप पोहोचल्याबरोबर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ‘तिनं’ त्या दोघांना आपल्या घरी आणलं होतं. ( हँक आणि मार्टिन यांना एक एक करून घरी नेलं असण्याचीही शक्यता आहे.) त्यांना मदत केली अत्यंत धाडसी आणि निस्पृह अशा ॲनी ब्रुसेलमान यांनी.

ब्रिटिश किंवा अमेरिकी विमानं जर्मन सैन्यानं पाडल्यानंतर वैमानिक जर त्यांच्या ताब्यात सापडले, तर त्यांची रवानगी सरळ छळछावणीत होत असे. त्यांच्याकडून माहिती काढण्यासाठी कसून चौकशी करताना त्यांच्यावर प्रचंड अत्याचार होत असत. तसं होऊ नये म्हणून प्रतिकार चळवळीतील कार्यकर्ते अत्यंत जागरूक असत. घायाळ सैनिकांना किंवा वैमानिकांना छुप्या मार्गानं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येई. अशा सुरक्षित घरांची माहिती जर जर्मन गेस्टापोंना मिळाली तर त्या घरातील संपूर्ण कुटुंबास मृत्युदंड निश्चित! तिथं लपवून ठेवलेल्या सर्व सैनिकांचे आणि त्या कुटुंबाचे अतोनात हाल होत असत. अशा पार्श्वभूमीवरही ॲनी यांनी स्वत:च्या घरात कायम घायाळ सैनिकांना आश्रय दिला होता. त्यांच्या घरात त्यांनी खास अशा जागा निर्माण केल्या होत्या. बाहेरून भिंत वाटावी, पण आत छुपा दरवाजा आणि मागे छोटीशी खोली अशी सोय केली होती.

हळूहळू त्यांच्याकडे येणार्‍या सैनिकांची संख्या इतकी वाढत गेली, की त्यांना त्यासाठी आणखी छुप्या जागा निर्माण कराव्या लागल्या. त्यांचं असं मदत करणं किती दिवस लपून राहणार होतं? शेवटी एक दिवस तिथल्या एका नागरिकाच्या लक्षात आलं की ॲनी रात्रीच्या वेळी कुठेतरी जातात आणि सोबत कुण्या व्यक्तीला घेऊन येतात. शंका आल्यानं त्यांनी गेस्टापोंना खबर दिली. तातडीनं गेस्टापो तिथं हजर झाले. पोटमाळ्याच्या मागील बाजूस खाली उतरून एक चोर जागा होती, तिथं मित्र राष्ट्रांचे काही जखमी सैनिक लपून बसले होते. खाड खाड बुटांचे आवाज करत गेस्टापो आले. ॲनी यांनी प्रसन्न चेहर्‍यानं दार उघडलं. एका गुप्तहेराचं कौशल्य हेच की स्वत:च्या कामाची ओळख होईल असे कुठलेही संकेत उघड होऊ द्यायचेच नाहीत.

ॲनी यांनी हसत गेस्टापोंना पेय देऊ केलं. त्यांच्याकडं पूर्ण दुर्लक्ष करत गेस्टापो आत घुसले. आधी संपूर्ण दृश्य भागाची तपासणी केली. पलंग, गाद्या, कपाटं, स्वयंपाकघर सगळी उलथापालथ केली. मग भिंतीवर दंडुका आपटून आतून पोकळ आहे का किंवा नवीन बांधकाम आहे का हे तपासलं. भिंती पलीकडे असलेल्या एका आजारी सैनिकास खोकल्याची उबळ येत होती. आत जोरात घेतलेला श्वासदेखील बाहेर गेस्टापोंना ओळखता येत असे. ते क्रूर लोक होते. आतून खोकण्याचा आवाज येणार इतक्यात ॲनी यांनी जोर जोरात घरातल्या भांड्यांचा आवाज केला.

आत लपलेल्या त्या सैनिकानं बिचार्‍यानं तोंडात कापडी बोळा कोंबून ठेवला होता, तरीही तितका अस्पष्ट आवाजही गेस्टापोंना संशय येण्यास पुरेसा ठरला असता. आपण घरातील नित्य व्यवहार चालू ठेवतोय असा आव आणत ॲनी दणादण कामं करत गेस्टापोंना बोलण्यात गुंगवत राहिल्या. त्या आवाजात भिंती पल्याडची बारीक खुसखूस दाबली गेली आणि गेस्टापोंच्या हाती काही लागलं नाही. अशा प्रकारचा कठीण प्रसंग ॲनी यांच्यावर दोन तीनदा आला, पण प्रत्येक वेळी त्या संयमानं आणि आत्मविश्वासानं सामोर्‍या गेल्या. आपल्या दोन छोट्या मुलांनाही त्यांनी तसंच प्रशिक्षण दिलं होतं. ती छोटी मुलंदेखील जर्मन तपास पथकासमोर अगदी सामान्य स्थिती असल्यासारखं वागत. या सगळ्यात त्यांचे पती ज्युलियन यांची पूर्ण साथ होती.

आपले पूर्ण कुटुंब कुठल्याही क्षणी गेस्टापोंच्या तावडीत सापडू शकतं याची पूर्ण कल्पना असताना ॲनी इतका भयंकर धोका का पत्करत होत्या? याचं उत्तर, देशप्रेम! त्या बेल्जियन नागरिक होत्या. ३ एप्रिल १९०५ रोजी बेल्जियममधील आयनक्स इथं त्यांचा जन्म झाला. आई ब्रिटिश तर वडील बेल्जियन होते. त्यांना इंग्रजी आणि फ्रेंच भाषा अगदी उत्तम अवगत होत्या. लग्नापूर्वीचं त्यांचं नाव होतं, ॲनी जोसेफाइन मॅग्नी. दुसर्‍या महायुद्धात मे १९४० मध्ये जर्मनीनं नेदरलँड, फ्रान्स आणि बेल्जियमवर जोरदार हल्ला चढवला. खूप मोठ्या प्रमाणात हे हल्ले असल्यानं बेल्जियमच्या स्थानिक प्रतिकार चळवळीनं जोर पकडला. ॲनी त्यांना सामील झाल्या होत्या.

नंतर विश्वास संपादन केल्यावर त्या ‘कॉमेट लाइन’च्या सदस्या झाल्या. ‘कॉमेट लाइन’ हे घायाळ वैमानिक आणि सैनिकांची गुप्तपणे सुटका करवून देणारे सशक्त जाळे होते. तिथं अत्यंत विश्वासू लोकांनाच प्रवेश दिला जाई. दोस्त राष्ट्रांचे विमान पडल्यानंतर वैमानिकांना लपवून ठेवणं, त्यांच्या नावाची खोटी कागदपत्रं तयार करवून घेणं, नवीन ओळख दाखवत काही दिवस सुरक्षित ठिकाणी ठेवणं, नंतर गुप्त रस्त्यानं फ्रान्समध्ये नेणं, तिथून पायरानीज पर्वतावरून स्पेनमध्ये प्रवेश मिळवून देणं. त्यानंतर जिब्राल्टर खाडी मार्गे युनायटेड किंग्डमपर्यंत सुरक्षित नेणं, इतकी प्रचंड मोठी जोखीम भरलेली कामगिरी हे लोक करत असत. ‘कॉमेट लाइन’नं थोड्या थोडक्या नाही तर सातशे ते आठशे क्षतिग्रस्त मित्र राष्ट्र वैमानिकांना पुन्हा सुरक्षित देशात पोचवण्याची प्रचंड मोठी कामगिरी केली. यशस्वी सुटका करवून देणारं ते जगातील सर्वात मोठं जाळं होतं.

ॲनी यांनी १९४० ते १९४४ ही चार वर्षं ‘कॉमेट लाइन’साठी काम केलं. त्यांनी दीडशेहून अधिक वैमानिक आणि सैनिकांना त्यांच्या स्वत:च्या घरात ( ब्रुसेल्स इथं ) आश्रय दिला. त्यांची शुश्रुषा, त्यांच्यासाठी नवीन ओळखपत्र, त्यांनी सुरक्षित ठिकाणी पोचण्यापर्यंत अनेक जबाबदार्‍या त्या निडर स्त्रीने जिवावर उदार होऊन पार पडल्या. त्यांच्यासमोर आणखी एक आव्हान होतं, ते म्हणजे घायाळ सैनिकांसाठी आयोडिन, बँडेज, कापूस आणि औषधं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करवून घेणं. त्यासाठी बेल्जियन डॉक्टर मंडळींना देखील जीव धोक्यात घालून चिठ्ठी लिहून द्यावी लागे. हे सगळं करताना जागोजागी धोके होते. ब्रुसेल्समधील त्यांच्या घराला ‘Rendez- vous rsx’ असं म्हटलं जाई. पुढे ॲनी यांनी त्यांच्या आत्मचरित्राला हेच नाव दिलं.

ॲनी ब्रुसेलमान अनेकदा गेस्टापोंना गुंगारा देण्यात यशस्वी झाल्या, पण त्यांचे एक एक करत अनेक साथीदार मात्र पकडले गेले. नोव्हेंबर १९४२ मध्ये एक मोठी घटना घडली. ‘कॉमेट लाइन’चे सदस्य एका ठिकाणी गुप्तपणे भेटायला जमले होते. त्यावेळी दोन अमेरिकी वैमानिक तिथं आले. त्यांनी ताबडतोब आश्रय हवा असल्याचं सांगताच त्या दोघांना आत घेण्यात आलं. पण ते अमेरिकी नसून जर्मन अधिकारी होते. ताबडतोब त्या ठिकाणी आणि नंतर अनेक ठिकाणी धरपकड सुरू झाली. छापे पडले आणि काही तासात शंभरहून अधिक कार्यकर्ते पकडले गेले. ताबडतोब त्यांची रवानगी छळ छावणीत केली गेली. याची कुणकुण लागताच ॲनी ब्रुसेलमान यांनी आधी त्यांच्या कुटुंबीयांना दुसरीकडे स्थलांतरित केलं.

तो अत्यंत कठीण आणि परीक्षा बघणारा काळ होता. कुणावर विश्वास ठेवायचा, कोण कुठून माहिती सांगेल अशी सतत टांगती तलवार होती. घरात आलेल्या वैमानिकांची खरी ओळख पटवून देणारे मित्र सदस्य उरले नव्हते. कुणी फासावर चढवले गेले, कुणाला गोळ्या घातल्या गेल्या, तर कुणाला गॅस चेंबरमध्ये… (त्या काही महिन्यांत जवळपास सातशे ‘कॉमेट लाइन’ सदस्य पकडले गेले, त्यापैकी तीनशे जणांना मृत्युदंड दिला गेला होता) सगळी साखळी तुटून एकटं पडल्यानंतरही ॲनी ब्रुसेलमान या कोलमडून पडल्या नाहीत. अहोरात्र जंगल तुडवत, गाळातून लपलेल्या वैमानिकांना बाहेर काढून लपत छपत कुठेतरी आसरा देण्याचं काम त्यांनी अव्याहत सुरूच ठेवलं होतं.

अखेर १९४५ मध्ये जर्मनीनं शरणागती पत्करली. तत्पूर्वीच जर्मन सैन्य बेल्जियममधून बाहेर पडलं होतं. एका स्त्रीनं इतकी वर्षं निकरानं इतक्या मोठ्या प्रमाणात वैमानिक आणि सैनिकांना आपल्या घरी लपवून सुरक्षित ठेवलं ही खचितच साधी बाब नाही. युद्ध काळातील शौर्य आणि सेवेसाठी बेल्जियम सरकारकडून त्यांना अत्यंत मानाचा असा ‘Croix The Guerrel’ हा सन्मान मिळाला. मित्र राष्ट्रांना केलेल्या अमूल्य मदतीसाठी त्यांना ‘मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर’ हा युनायटेड किंग्डमकडून सन्मान मिळाला. अमेरिकी वैमानिकांना सुखरूप ठेवल्याबद्दल त्यांच्याकडून ‘मेडल ऑफ फ्रीडम’ मिळाले, असे अनेक सन्माननीय पुरस्कार त्यांना मिळाले .

युद्धानंतर काही काळ त्या बेल्जियममध्ये राहिल्या. पतीच्या निधनानंतर त्यांना मुलीकडे अमेरिकेत राहायचे होते मात्र तेथे जास्त काळ राहण्यासाठी परवाना मिळत नव्हता. तेव्हा त्या कॅनडात स्थायिक झाल्या. त्यांनी तिथल्या सैनिकांना केलेल्या मदतीची जाणीव म्हणून त्यांना कॅनडाचं नागरिकत्व मिळालं. १९८६मध्ये त्यांना मुलीच्या भेटीसाठी कॅनडा-अमेरिका असा प्रवास झेपेनासा झाला. तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या कानावर ती बातमी आली तेव्हा त्यांनी स्वत: ॲनी यांना फोन केला. ‘‘अमेरिका आणि त्यांचे वैमानिक कायम आपल्या ऋणात आहेत, आपण इथं जरूर या. इथं कायम राहण्याचा आपणास अधिकार आहे,’’ असं त्यांनी सांगितलं. तिथून पुढे त्या अमेरिकेत राहिल्या. १९९३ मध्ये वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. जिथल्या सैनिकांना सुखरूप ठेवण्यासाठी त्यांनी जिवाचं रान केलं होतं. तिथंच या वादळी व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला.

adaparnadeshpande@gmail.com