शोध मुलीचा, सुटका हजारोंची!

तिच्या मुलीचं, मरिटाचं अर्जेटिनातून अपहरण होऊन आता सुमारे बारा वर्षे लोटली आहेत. तिच्या शोधार्थ तिच्या आईने जंग जंग पछाडलं, वेश्येसारखी वेषभूषा करून कुंटनखान्यांना भेटी दिल्या

तिच्या मुलीचं, मरिटाचं अर्जेटिनातून अपहरण होऊन आता सुमारे बारा वर्षे लोटली आहेत. तिच्या शोधार्थ तिच्या आईने जंग जंग पछाडलं, वेश्येसारखी वेषभूषा करून कुंटनखान्यांना भेटी दिल्या, पण अजूनही ती सापडली नाही, मात्र यादरम्यान तिने मानवी व्यापारातील भ्रष्टाचार उघड केला. ‘फाऊंडेशन ऑफ मरिया-ऑफ द एंजल्स’ या संस्थेची स्थापना करून हजारो मुलींची सुटका केली.  तिच्या कामाची दखल घेऊन ‘अ‍ॅन्टि ट्रॅफिकिंग’ कायदा संमत करण्यात आला. आजही आपल्या मुलीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुसाना त्रिमार्कोविषयी.
सु साना त्रिमाकरे ही मरिटा व्हरनॉनची आई. २ एप्रिल २००२ ला टुकुमान या अर्जेटिनाच्या नॉर्थवेस्ट भागातून मरिटा नाहीशी झाली, असं मानण्यात आलं की मानवी व्यापार करणाऱ्या एका शक्तिशाली नेटवर्कनं तिचं अपहरण केलं, आणि मग तिला जबरदस्तीनं  शरीरविक्रय करायला भाग पाडणाऱ्या तस्करांना विकण्यात आलं. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या मते, पूर्वनियोजित वेळ ठरवून डॉक्टरांना भेटायला निघालेली असताना, एका लाल गाडीत मरिटाला जबरदस्तीने बसवण्यात आलं. नंतर ती रिओजा, टुकुमान आणि कॉडरेबा येथे दिसली होती. सुसाना त्रिमाकरेने तिच्या मुलीला शोधण्यासाठी सुमारे १२ वर्षे घालवली, पण ती अद्याप सापडलेली नाही.
तिचं अपहरण झालं तेव्हा मरिटा २२ वर्षांची होती आणि तिला अडीच वर्षांची मुलगी होती. डिसेंबर २०१२ मध्ये सात पुरुष आणि सहा स्त्रियांवर मरिटाच्या अपहरणाचा आरोप ठेवण्यात आला, पण टुकुमान गुन्हे सत्र न्यायालयात त्यांची सुटका करण्यात आली. एका आठवडय़ानंतर, त्रिमाकरे अर्जेटिनाच्या अध्यक्षांना भेटली. आणि ज्या तिघांनी तो निवाडा दिला होता, त्यांच्याविरुद्ध त्यांना पदच्युत करण्याचा दावा दाखल करण्यात आला. डिसेंबर २०१३ मध्ये मुळ तेरा आरोपींना मरिटा व्हरनॉनचं लैंगिक शोषण आणि अपहरण या आरोपांखाली शिक्षा ठोठावण्यात आली.
आरोपींना शिक्षा झाली, पण मरिटाचा शोध कुठे लागला होता? मुलीच्या शोधासाठी सुसानाने मग एक जगा वेगळा मार्ग अवलंबला. वेश्येसारखी वेषभूषा करून सुसाना कुंटनखान्यांना भेटी देऊ लागली, ‘धंद्यासाठी मुली विकत घ्यायच्या आहेत’ असं कारण ती देत असे. तिला तिची मुलगी सापडली नाही, तरी तिच्या अशा शोध घेण्यामुळे आपले स्वातंत्र्य गमावून बसलेल्या इतर स्त्रियांची मात्र सुटका होऊ शकली. पण त्या दरम्यान तिला अनेक धमक्या देण्यात आल्या, तिच्या शोधाला चुकीची दिशा देण्याच्या उद्देशाने तिला खोटे धागेदोरे देण्यात आले. पण त्यातूनही ती तिचे कार्य करत राहिली.
कामाचं स्वरूप जेव्हा वाढलं तेव्हा, म्हणजे २००७ मध्ये तिने ‘फाऊंडेशन ऑफ मरिटा ऑफ द एंजल्स’ या संस्थेची स्थापना केली. संस्थेचं उद्दिष्ट होतं, अर्जेटिनातील अपहृत मुलींची सुटका करणं. आत्तापर्यंत शेकडो मुलींची या फाऊंडेशनच्या मदतीने सुटका करण्यात आली आहे. २००८ मध्ये तिला ‘क्रिस्टो रे’ हा पुरस्कार अर्जेटिनाच्या कॅथॉलिक अ‍ॅक्शनतर्फे देण्यात आला. मानवी व्यापार आणि वेश्या व्यवसाय यांच्या विरोधात तिचा लढा आणि बहुमोल कार्य यासाठी ते होतं.
तिच्या प्रयत्नांमुळे २००८ मध्ये वूमन ट्रॅफिकिंगवर बंदी आणणारा कायदा अर्जेटिनात अस्तित्वात  आला आणि ३००० लोकांची मानवी तस्करी करणाऱ्या दलालांपासून मुक्तता झाली. फेब्रुवारी आणि मार्च २०१२ मध्ये सुसाना त्रिमाकरेने १३ लोकांविरुद्ध चाललेल्या खटल्यात साक्ष दिली, ज्यांच्यात पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. त्यांच्यावर मरिटा व्हेरनॉनला अपहृत करून तिची वूमन ट्रॅफिकर्सना विक्री केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
८ मार्च २००७ रोजी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सुसाना त्रिमाकरेला ‘इंटरनॅशनल विमेन ऑफ करेज’ या पुरस्काराने गौरवलं. हा पुरस्कार देताना परराष्ट्रमंत्री कॉन्डोलिझा राइस म्हणाल्या होत्या की, ह्मूमन ट्रॅफिकिंगशी लढा देताना सुसाना त्रिमाकरेने धोका आणि धमक्या यांचा सामना केला. ट्रॅफिकर्सनी पळवून नेलेल्या तिच्या मुलीचा शोध घेताना सैरभैर झालेल्या सुसानाने स्वत:ला भयानक प्रसंगांत लोटलं. वेश्येसारखं रूप पालटून, दारूचे गुत्ते आणि अंधाऱ्या गल्लीबोळांतून फिरताना एखादी तरी व्यक्ती तिच्या मुलीचा ठावठिकाणा सांगू शकेल, या आशेने खोटी दिशा दाखवण्यात येऊन आणि ठार करण्याच्या धमक्या मिळूनदेखील तिने ला रिओजा, टुकुमान, ब्युनोस आयर्स, कोंडोबा आणि सॅन्ता क्रुझ या भागात ट्रॅफिकिंगचं नेटवर्क सक्रिय असल्याचं उघडकीला आणलं. त्यासाठी त्रिमाकरेला धन्यवाद द्यावे लागतील. अर्जेटिनात वूमन ट्रॅफिकिंगच्या प्रश्नाकडे आता जनतेचं आणि सरकारचं लक्ष वेधलं गेलं आणि पीडितांना गुन्ह्य़ाची खबर द्यायला प्रोत्साहन मिळालं.’’
अर्जेटिनाच्या सिनेटनेदेखील सुसाना त्रिमाकरेचा मानवी हक्कांची पुरस्कर्ती म्हणून गौरव केला. १४ मार्च २०१२ रोजी कॅनॅडियन सरकारने त्रिमाकरेचा ‘जॉन डिएफेन बेसर डिफेंडर ऑफ ह्मुमन राईटस अ‍ॅन्ड फ्रीडम’ हा पुरस्कार
देऊन गौरवलं.
२००८ मध्ये एक अ‍ॅन्टि- ट्रॅफिकिंग कायदा संमत करण्यात आला तसेच मिनिस्ट्री ऑफ जस्टिस अ‍ॅन्ड ह्मूमन राइटस येथे एक रेस्क्यू ऑफिस स्थापन करण्यात आलं. त्या ऑफिसची उद्दिष्टे होती, मानवी व्यापाराचा प्रतिबंध आणि गुन्हे यांच्यावर लक्ष ठेवणं आणि पीडितांना कायद्याच्या बाबतीत साहाय्य करणं. २०११च्या जुलैत अर्जेटिना सरकारने वेश्या व्यवसायाची जाहिरात वर्तमानपत्रं आणि मास मीडियातून करण्यावर बंधनं घातली.
दूरचित्रवाणीवरील ‘स्टोलन लाइव्हज’ या मालिकेची प्रेरणा त्रिमाकरेच्या घटनेवरून स्फुरली आहे. २००९ मध्ये बनवण्यात आलेल्या – फ्रॅगमेंटस ऑफ ए सर्च- फ्रॅगमेन्टोज डि उना- बुसकेदा- या वृत्तपटांची ही प्रेरणा त्रिमाकरेच्या कहाणीवरूनच घेण्यात आली होती. त्याचं दिग्दर्शन पाब्लो मिस्टेन आणि नॉरबेटरे ल्युरिन यांनी केलं होतं.
त्रिमाकरेला कित्येक आंतराष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाले आहेत. २०१३ च्या नोबेल शांती पुरस्कारासाठी तिचं नामांकन झालं होतं. ‘मरिटा डि लॉस एंजोलिस फाऊंडेशन’ या संस्थेमार्फत शरीरविक्रय व्यापाराला बळी पडलेल्यांची सुटका करण्यात येते आणि त्यांना कायदेशीर, मानसिक आणि सामाजिक मदत देण्यात येते.
त्रिमाकरेच्या या हाय प्रोफाइल मोहिमेमुळे सेक्स ट्रॅफिकिंगचा व्यवसाय उघडा पाडला आणि उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराचा प्रश्न ऐरणीवर आणला. तिच्या अथक प्रयत्नांमुळे, २००७ मध्ये अर्जेटिनाने अपहरण आणि लैंगिक शोषण हा ‘फेडरल ऑफेन्स’ ठरवला. पीडितांना कायद्याची मदत मिळावी, म्हणून या कायद्यानुसार एका रेस्क्यू ऑफिसची स्थापनादेखील करण्यात आली. २००७ ते २०१२ या कालावधीत २७७४ पीडितांना सोडवण्यात आलं. २०११ मध्ये प्रथमच मिनिस्ट्री ऑफ सिक्युरिटीला ट्रॅफिकिंगमध्ये गुंतलेल्या भ्रष्ट पोलीस दलाला पकडता आलं.
पोटच्या मुलीच्या अपहरणाचं दु:ख उरात असताना आणि तिचा शोध लागत नाही म्हणून जवळजवळ वेडंपिसं होण्याची अवस्था झालेली असतानादेखील सुसाना त्रिमाकरेने त्यासह पतीनिधनाचं दु:खही पचवलं आणि एकीकडे मरिटाच्या अडीच वर्षांच्या मुलीचं संगोपन करत असताना शरीर विक्रयाच्या माफियाशी मोठय़ा धैर्याने टक्कर दिली. तिच्या अतुलनीय कामगिरीमुळे ह्मूमन ट्रॅफिकिंगच्या जाळय़ात अडकलेल्या, सुटकेचे मार्ग बंद झालेल्या, अपहरण करून सक्तीने वेश्या व्यवसायात ढकलल्या गेलेल्या हजारो मुली आणि स्त्रिया यांची मुक्तता होऊ शकली.
भारावून टाकणारी- तेवढीच अचंबितही करणारी सुसाना त्रिमाकरेची ही कहाणी. वैयक्तिक दु:खातच गुरफटून न राहाता, समदु:खी स्त्रियांच्या हितासाठी समाजविघातक शक्तींना केवळ अतूट इच्छाशक्ती आणि अथक प्रयत्नांच्या बळावर धाडसाने टक्कर देणाऱ्या सुसानाला तिची प्रिय मरिटा कधीतरी भेटावी, अशी आशा व्यक्त करणं
उचित ठरेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Anti trafficking the foundation of maria of the angels