आर्थिक पाठबळ, कौटुंबिक आधार, सरकारी आणि संघटनात्मक पातळीवरील योग्य व जलद निर्णय, शैक्षणिक मदत आणि सकारात्मक प्रसिद्धी या गोष्टींचा पाठिंबा मिळाला की सगळ्याच क्षेत्रातला, विशेषत: क्रीडा क्षेत्रातला प्रवास अधिक सुकर होऊ शकतो. मेहनत अर्थातच त्या त्या क्रीडापटूला घ्यायला लागते, मग मात्र तुमचं यश नक्की तुमचं…
खेळाडूंना आपल्या खेळात गगनभरारी घेण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. त्यात मुख्यत्वे येते ते म्हणजे आर्थिक पाठबळ, कौटुंबिक आधार, सरकारी आणि संघटनात्मक पातळीवरील योग्य व जलद निर्णय, शैक्षणिक मदत आणि सकारात्मक प्रसिद्धी. या गोष्टी जर योग्य वेळी मिळाल्या तर उभरत्या खेळाडूंसाठी बर्याच गोष्टी सुकर होतात. बुद्धिबळपटू म्हणून भारतभर आणि जगाच्या पाठीवर हिंडताना साहजिकच माझ्या झोळीत समाजाच्या विविध स्तरांतील माणसांकडून आलेल्या अनेक बर्या-वाईट अनुभवांची शिदोरी साठली.
एक स्त्री खेळाडू म्हणून सर्वात आव्हानात्मक असतो तो स्पर्धेसाठी आणि कधी कधी सरावासाठी सतत करावा लागणारा प्रवास. घरापासून दूर जाणार्या स्त्री खेळाडूंना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वप्रथम सुरक्षिततेची हमी महत्त्वाची असते. प्रवास करताना येणारे सहप्रवाशांचे अप्रिय अनुभव, परक्या ठिकाणी राहण्याची सुरक्षित व्यवस्था, पुरुष सहकारी खेळाडूंचे, आयोजकांचे आणि संघटनेच्या पदाधिकार्यांचे वर्तन असे अनेक गुंते स्त्री खेळाडूंना सोडवावे लागतात. मला दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया या देशापासून ते शेजारील बांगलादेशपर्यंत बुद्धिबळ स्पर्धेनिमित्त घडलेल्या प्रवासात अनेक पेचप्रसंग एकटीने सोडवावे लागले. त्यातील एक दशकाहून जास्त प्रवास इंटरनेट, मोबाइल अशा सुविधांचा अभाव असताना तर एक दशक या सुविधांचा फायदा घेत घडला. यामुळे सतत प्रवास करणार्या ्त्रिरयांना आधुनिक तंत्रज्ञान हे कसे वरदान होऊ शकते याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. बुद्धिबळाच्या क्षेत्रात सर्वसाधारणपणे स्त्री खेळाडूंबरोबर विश्वासपूर्वक मैत्रीचे जे वातावरण होते त्याचा मला घरापासून लांब स्पर्धा खेळताना निश्चित फायदा झाला. विशेषत: पुरुष सहकारी खेळाडूंचे अनेक बाबतीत सहकार्य मिळत असे. भारताची आघाडीची ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्ली हिच्याशी बातचीत करताना ही गोष्ट आम्हाला दोघींनाही प्रकर्षाने जाणवली. हरिका म्हणाली की, ती मॉस्को येथील एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेला एकटीच गेली होती. तेथील हॉटेलच्या खोलीतसुद्धा ती एकटीच राहत होती. पण आजूबाजूच्या खोल्यांमध्ये इतर बुद्धिबळ खेळाडू राहत असल्याने तिला सुरक्षित वाटत असे.
जगभर पसरलेल्या नातेवाईकांनी आणि परिचितांनी मला खेळाच्या कारकीर्दीत जी मदत केली त्याला तोड नाही. माझ्या आयुष्यातील पहिली परदेशवारी ही ॲडलेड, ऑस्ट्रेलिया येथील आशियाई ज्युनिअर मुलींच्या अजिंक्यपद स्पर्धेसाठी झाली. त्या स्पर्धेदरम्यान माझे वास्तव्य डॉ. अनिल व त्यांच्या पत्नी रेखाताई उत्तुरकर यांच्याकडे होते. त्यांनी माझी एखाद्या लहान बहिणीसारखी काळजी घेतली आणि त्यामुळे मला सर्वस्वी नवीन वातावरणात रुळायला मदत झाली. या भक्कम पाठिंब्यावर मी या स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवू शकले. कौटुंबिक पाठिंब्याइतकाच महत्त्वाचा पण तुलनेत खूपच दुरापास्त असतो तो म्हणजे सरकारी आणि संघटनात्मक पातळीवरील पाठिंबा. अनेक खेळाडूंप्रमाणे सरकारी लालफितीचा अनुभव बर्याचदा आला. संघटनात्मक पातळीवर यशस्वी खेळाडूंचे पाय ओढण्याचा एक वेगळाच खेळ चालू असतो त्याचीसुद्धा प्रचीती आली. अशा परिस्थितीत जेव्हा अपरिचित अधिकार्यांकडून खेळाडूंच्या मदतीसाठी धडाडीची किंवा सहानुभूतीपूर्वक कृती होते तेव्हा ती मदत अनमोल वाटते.
भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकार्यांकडून आलेला सुखद अनुभव लक्षात राहण्याजोगा आहे. नव्वदच्या दशकात विमान सेवेचे जाळे मर्यादित होते. त्यामुळे स्पर्धा संपल्यावर कधी कधी काही दिवस परतीचे विमान पकडण्यासाठी थांबावे लागत असे. जागतिक ज्युनियर मुलींच्या स्पर्धांदरम्यान माझ्यासमोर दोन वेळा असा पेचप्रसंग उभा राहिला होता. कोलंबिया या देशात झालेल्या तसेच फिलिपाईन्स येथे झालेल्या या स्पर्धांनंतर परतीचे विमान हे स्पर्धा संपल्यावर चार दिवसांनी होते. त्यात कोलंबियातील राजकीय परिस्थिती तेव्हा नाजूक असल्याने थोडे अनागोंदीचे वातावरण होते. आम्हा खेळाडूंबरोबर कोणी मॅनेजरही नव्हता. बोगोटा या कोलंबियाच्या राजधानीत असलेल्या भारतीय दूतावासाला आमच्या येण्याची बातमी होती. त्यांना आमच्या अडचणीची कल्पना आल्यावर त्यांनी मोठ्या प्रेमाने आमची सोय दूतावासातील एका अधिकार्यांच्या कुटुंबात केली. त्या सर्व कुटुंबाने चार दिवस आमची काळजी घेतली आणि नियोजित वेळी आमची रवानगी सुखरूप विमानतळावर केली. फिलिपाईन्समधील दूतावासानेसुद्धा आमच्या चमूची अशीच सोय केली आणि एवढेच नव्हे तर मनिला येथे आलेल्या भारतीय नौसेनेची नौका पाहण्याची अविस्मरणीय संधीसुद्धा आम्हाला दिली.
खेळासारख्या चाकोरीबाहेरील क्षेत्रात कारकीर्द घडवू पाहणार्या खेळाडूंना चौकट मोडून विचार करणारे लोक भेटले तर खरोखर चमत्कार घडू शकतो. ग्रीस येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी आमच्या ्त्रिरयांच्या आणि पुरुषांच्या अशा दोन्ही संघांना सर्व परवानग्या मिळून जाण्यासाठी खूपच उशीर झाला. इतका की आमचा संघ दोन फेर्या उशिरानेच पोहोचला. त्यातही आम्हाला एक विमान बदलून दुसरे पकडून अथेन्स येथे पोहोचायचे होते. पहिले विमान उशिराने सुटल्याने पुढचे विमान चुकते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. तसे झाले असते तर आमच्या संघांची तिसरी फेरीसुद्धा हुकली असती. इतकेच नाही तर आम्हाला स्पर्धेच्या नियमानुसार स्पर्धेतून काढून टाकण्यात आले असते आणि मोठी नामुष्की ओढवली असती. विमान कर्मचार्यांना आम्ही आमची कैफियत सांगितली आणि त्यांनी ती वैमानिकापर्यंत पोहोचवली. त्या हरहुन्नरी वैमानिकाने स्वत:हून पुढाकार घेऊन पुढचे विमान रोखून धरण्यासाठी कंट्रोल रूमकडे निरोप दिला. त्याच्या या मदतीमुळे आम्हाला पुढचे विमान मिळाले आणि तिसरी फेरी खेळायला आमचे संघ वेळेत पोहोचू शकले.
या सर्व माणसांना वास्तविक खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. केवळ आपल्या देशासाठी पदके मिळविणार्या खेळाडूंना प्रोत्साहन देणे हे आपले कर्तव्य समजून त्यांनी ही मदत आम्हाला केली. असाच एक सहानुभूतीने केलेल्या मदतीचा अनुभव आम्हाला एका बिकट प्रसंगी आला. लंडनला स्पर्धेच्या आदल्या दिवशी आमच्या सदनिकेत चोरी झाली. यामुळे आम्हाला तिथे राहणे सुरक्षित वाटत नव्हते. दुसर्या दिवशी सकाळी स्पर्धा असल्यामुळे सर्व चंबूगवाळे घेऊन आम्ही स्पर्धेच्या फेरीसाठी गेलो. कोपर्यात सामान ठेवून आम्ही सामना खेळलो. आता कुठे जायचे हा मोठे प्रश्न होता. तेवढ्यात तेथे राहत असलेल्या एका बंगाली प्राध्यापकांना आमची समस्या समजली. त्यांनी आपुलकीने आमची व्यवस्था एका विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात केली. वसतिगृह खिशाला परवडेल असे होते आणि मुख्य म्हणजे सुरक्षित होते. त्यांनी केलेल्या या सोयीमुळे नंतरची स्पर्धा आम्ही निर्धास्तपणे खेळू शकलो.
क्रीडा क्षेत्रात वेळ आणि पैसे भरपूर खर्ची करावे लागतात, पण कमाई अनिश्चित असते. यामुळे निकटवर्तीयांकडून खेळाडूंच्या पालकांना आणि मुलामुलींना या क्षेत्रात कारकीर्द करण्याविरुद्ध सल्ले दिले जातात. टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या पालकांना त्यांच्या निकटवर्तीयांनी सानियाला टेनिसपटू बनवायचा ध्यास तुम्ही घेऊ नये असा सल्ला दिला होता. भारताची दिग्विजयी बुद्धिबळ खेळाडू कोनेरू हंपी तिच्या लहानपणाचा एक मोठा उद्बोधक किस्सा सांगते. सर्वसामान्य परिस्थितीतील तिच्या कुटुंबाने पैसे जमा करून तिच्या बुद्धिबळातील कारकीर्दीसाठी कॉम्प्युटर विकत घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्याकडे टीव्हीदेखील नव्हता. तिच्या निकटवर्तीयांनी त्यांच्या या निर्णयाबद्दल तिच्या वडिलांवर टीका केली आणि टीव्ही घेणे कसे योग्य आहे हे त्यांना पटवून द्यायचा प्रयत्न केला. हंपीचे वडील स्वत: उत्कृष्ट बुद्धिबळ खेळाडू आहेत आणि हंपीला त्यांनीच प्रशिक्षण दिले आहे. ते कॉम्प्युटर घ्यायच्या निर्णयावर ठाम राहिले. त्यांचा हा निर्णय किती योग्य होता हे आज हंपीच्या यशावरून आणि त्यांना स्वत:ला मिळालेल्या ‘द्रोणाचार्य’ पुरस्कारावरून दिसून येते.
ही परिस्थिती जर बदलायची असेल तर क्रीडा क्षेत्रात प्रतिभावान खेळाडूंना योग्य वयात घसघशीत प्रायोजकत्व मिळण्याची नितांत गरज आहे. या संदर्भात सर्व जबाबदारी केवळ सरकार आणि मोठ्या कंपन्यांवर न सोडता, समाजातील मध्यमवर्गीयसुद्धा बरेच काही करू शकतात. चेन्नईचे सत्य प्रभाकर यांनी बुद्धिबळ क्षेत्रात ‘ग्रुप ई ४’ हा उपक्रम २०२२ मध्ये सुरु केला. या उपक्रमात आतापर्यंत दोन कोटी रुपयांहून जास्त रक्कम जवळपास २० गरजू आणि होतकरू बुद्धिबळ खेळाडूंना देण्यात आली आहे. २०० हून अधिक कुटुंबांनी आणि १५ पेक्षा जास्त छोट्या उद्योगांनी मिळून ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे ही रक्कम उभी केली आहे. यासाठी दाते कितीही छोटी रक्कमसुद्धा देऊ शकतात. माजी टेबलटेनिस खेळाडू सुजाता व सुनील बाब्रस आणि अनिकेत कोपरकर यांनी ‘स्पोर्ट्सविस्टा’ या संस्थेद्वारे टेबलटेनिसपटूंना आर्थिक मदत करण्यासाठी अशाच प्रकारचा उपक्रम नुकताच सुरू केला आहे. जरी हे उपक्रम बाल्यावस्थेत असले, तरी अतिशय स्तुत्य आहेत. ‘चेसबेस इंडिया’ या भारतातील लोकप्रिय बुद्धिबळ चॅनल वरसुद्धा कितीही छोटी रक्कम स्वीकारली जाते, जी गरजू बुद्धिबळ खेळाडूंना लॅपटॉप देण्यासाठी वापरतात.
खेळाडूंसाठी लवचीक शैक्षणिक सुविधेची पद्धतीसुद्धा खूप फायद्याची ठरू शकेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून इंटरनेटवर अभ्यासाची सोय आणि स्पर्धांचे वेळापत्रक सांभाळून घेतलेल्या परीक्षा खेळाडूंसाठी वरदान ठरेल. यामुळे ठरावीक वयाची झाल्यावर मुलेमुली खेळणे पूर्णपणे सोडून अभ्यासाकडे वळतात ते प्रमाण थोडे कमी होऊ शकते.
याइतकीच गरजेची आहे ती क्रिकेटेतर खेळांतील खेळाडूंना क्रिकेट खेळाडूंच्या तोलामोलाची प्रसिद्धी मिळण्याची. सकारात्मक प्रसिद्धी खेळाडूंची कारकीर्द घडवू शकते. जेव्हा विकसित देशांतील खेळाडूंशी स्पर्धा करून पदक जिंकून आलेल्या क्रिकेटेतर खेळाडूची बातमी क्रिकेटच्या बातमीने भरलेल्या पानात कुठे तरी कोपर्यात छापली जाते तेव्हा त्या खेळाडूचे मन साहजिकच निराशेने भरून जाते. क्रिकेट हा मुख्यत्वे पूर्वी साहेबांच्या गुलाम असलेल्या देशात खेळला जाणारा खेळ आहे हे आपण विसरता कामा नये. जेव्हा लहान मुलेमुली सर्व खेळांतील आघाडीच्या भारतीय खेळाडूंकडे क्रिकेट खेळाडूंप्रमाणे प्रेमादराने बघतील, त्यांचा आदर्श ठेवतील, तेव्हा भारताची क्रीडासंस्कृती निश्चित बहराला येईल.
या पार्श्वभूमीवर क्रीडा क्षेत्रात तुलनेत दुर्लक्षिलेल्या स्त्री खेळाडूंना केंद्रस्थानी ठेवून हे सदर लिहिण्याचा ‘लोकसत्ता’ सारख्या अग्रगण्य दैनिकाचा आग्रह मनाला स्पर्श करून गेला. वास्तविक वर्षभर हे सदर चालविण्याची त्यांची विनंती होती, पण वेळेअभावी आजच्या ‘क्रीडासंस्कृ‘ती’ सदरातील हा शेवटचा लेख तुमच्यासमोर ठेवीत आहे. वाचकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला, असेच आशीर्वाद कायम ठेवावेत ही विनंती!
u gokhale.anupama@gmail.com
