|| अपर्णा देशपांडे
जीभ चाळवणाऱ्या चटपटीत पदार्थांपासून मोबाइल आणि समाजमाध्यमांपर्यंत…  दारू, सिगारेटपासून पॉर्न पाहाण्यापर्यंतच्या गोष्टींमध्ये एक साम्य आहे- ते म्हणजे त्यांचं व्यसन लागण्याची दाट शक्यता. एखादी कृती के ल्यामुळे उत्तेजित होणं आणि पुन:पुन्हा तीच कृती करावीशी वाटणं, प्रसंगी नित्यकामांचीही शुद्ध न राहणं हे व्यसनाचंच लक्षण. त्या कृतीमुळे आपल्या मेंदूत स्रावणाऱ्या संप्रेरकांमुळे हे घडतं. पण व्यसनांवर उपायही आहेत. ‘डोपामिन डीटॉक्स’ हा त्यातलाच बहुचर्चित उपाय!

आपल्यापैकी अनेकांनी फार पूर्वी उंदरांवर केलेल्या या प्रयोगाबद्दल ऐकलं असेल. या प्रयोगात उंदराच्या मेंदूला एक इलेक्ट्रोड लावून त्याला एका बटण असलेल्या डब्यात सोडण्यात आलं. जेव्हा जेव्हा उंदराचा या बटणाला स्पर्श होई, तेव्हा इलेक्ट्रोडमधून विद्युतलहरी जात. ज्यामुळे त्याच्या मेंदूत असे काही बदल होत होते, त्यामुळे त्याला खूप मजा वाटत होती. त्याला करंटचा त्रास होत होता, पण मजाही हवी होती. तो आनंद मिळवण्यासाठी तो दिवसभर बटणाला स्पर्श करत राहिला. त्याला इतर काही खण्यापिण्याचं भानही राहिलं नाही. इलेक्ट्रोड काढून घेतल्यावर उंदीराने बटणाचा नाद सोडला, पण तो खूप सुस्त झाला. अन्न ग्रहण न केल्याने अर्धमेला झाला. इतर अनेक प्रलोभनं असूनही त्याला ते नकोसं होतं. सारी शक्ती गमावल्यानं त्याला दुसरं काहीही करावंसंच वाटलं नाही…

How To Avoid Food Poisoning Does Chai Goes Acidic by Heating Twice
चहा, भातासह ‘हे’ ५ पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये, कारण.. तज्ज्ञांनी सांगितलं, अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळावी?
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
World idli day 2024 how to make healthy oats idli
World idli day : पौष्टिक अन् झटपट नाश्त्यासाठी बनवा ‘ओट्स’ इडली; पाहा रेसिपी, प्रमाण
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

आज माणसाची अवस्थादेखील त्या व्यसन जडलेल्या उंदरासारखी झाली आहे. माणूस देखील मोबाइल, समाजमाध्यमं, त्यावरील व्हिडीओ, ऑनलाइन गेम्स, अल्कोहोल, भरपूर खरेदी, फास्ट फूड, पॉर्नफिल्म्स, अशा असंख्य प्रलोभनांच्या जाळ्यात फसलेला आहे. या सगळ्या गोष्टींतून त्याला प्रचंड सुखाची अनुभूती होऊन त्या पुन्हा पुन्हा करण्याची प्रबळ, अनावर इच्छा निर्माण होते. अशा वेळी मेंदूत ‘डोपामिन’ द्रव्य (हॉर्मोन) स्रावतं. त्याचा स्वत:वर ताबा राहात नाही, तो यात खोल खोल गुरफटत जातो आणि मग आनंद मिळवण्यासाठी तो पुन्हा त्याच गोष्टी करतो. पण तेव्हा मात्र थोडक्यात त्याचं समाधान होत नाही. आपण करतोय ते आपल्या आरोग्यासाठी वाईट आहे हे माहीत असूनही डोपामिनची वाढत गेलेली पातळी ‘ये दिल मांगे मोअर’ म्हणत त्या कृती पुन्हा पुन्हा करण्यास भाग पाडते.

मेंदूतील ‘डोपामिन’ हे हॉर्मोन आपल्या आनंदास किंवा चटक लागण्यास कारणीभूत असल्यानंच त्याला ‘प्लेजर हॉर्मोन’, ‘फील गुड केमिकल’ किंवा डॅनियल लिबर यांच्या भाषेत ‘मोलिक्युल ऑफ मोअर’ म्हटलं जातं. माणसाच्या शरीरात हे हॉर्मोन काही आज तयार झालेलं नाही. मानवी शरीर बनलं, तेव्हापासून  ते शरीरात आहे. योग्य मात्रेतील डोपामिनची शरीरास अत्यंत गरज आहे. जे शरीराच्या इतर अनेक क्रियांसाठी आवश्यक असतं. डोपामिनची कमतरता असेल तर नैराश्य येऊ शकतं. ते एक प्रोत्साहन देणारं, मनाला खूश ठेवणारं संप्रेरक आहे. पण आज खूश होण्याची, आनंदाची परिमाणं आणि कारणं कमालीची बदलली आहेत. बदललेल्या जगण्यात माणूस सतत मेंदूला ‘स्टेट ऑफ एक्साइटमेंट’मध्ये ठेवणं पसंत करतो, हे मोठमोठ्या कंपन्यांनी चाणाक्षपणे ओळखलं आणि आपल्या मेंदूचा ताबा त्यांच्याकडे राहील याची अभ्यासपूर्ण आखणी केली. अशी गॅजेट्स तयार केली, जी माणसाला तत्काळ समाधान देत नकळत त्यांची कमालीची सवय लावतील, त्यांचा वापर करताना मेंदूला उत्तेजित करतील, ती भावना खूप सुखावह असेल आणि आपल्या आनंदाच्या ‘रिमोट’वर चक्क त्यांचा अधिकार असेल. आपण कधी त्यांच्या हातातील बाहुलं झालो ते आपल्यालाही समजलं नाही. अशी काही उदाहरणं सांगावीशी वाटतात-

आदित्यच्या आई- सरिताताई अस्वस्थ नजरेनं आपल्या संतप्त पतीराजांकडे बघत होत्या. कारण ऑनलाइन वर्गाला दांडी मारून आपल्या खोलीत घोरत पडलेल्या युवराजांवर ते जाम चिडले होते. ‘‘पहाटे चार चार वाजेपर्यंत जागायचं आणि मग कॉलेज बुडवून हे असं मेल्यासारखं गाढ झोपायचं. काय करतो हा रात्रभर ते बघतेस का तू? मी लक्ष घातलं की मग महाभारत होतं घरात! कुठलीतरी वेब सीरिज बघत होता पूर्ण रात्रभर. पूर्ण वेळ अभ्यास शक्य नसतो हे समजतं ना मला, पण कुठे किती वेळ द्यायचा याचं गणित नको का? काही लक्ष्य आहे की नाही आयुष्यात? ज्या ‘यू ट्युबर’चे व्हिडीओ हा सारखे बघतो त्यांच्या घरी गाड्या पुसायचंही काम याला मिळणार नाही अशानं.’’ पतीराजांचं म्हणणं बरोबर होतं, म्हणून लॅपटॉपवर काम करता करता सरिताताई शांतपणे ते ऐकत होत्या. दुपारी साडेबाराला ताटवरलेले डोळे घेऊन आदित्य खोलीबाहेर आला. वडील घरात नाहीत हे बघून कसंबसं तोंड धुऊन टेबलापाशी येऊन बसला. ‘‘मॉम… काय हे? भोपळ्याची भाजी कशी काय खातात लोक हेच मला समजत नाही! आणि भेंडी अशी का केलीस आज? मी चायनीज मागवू का ऑनलाइन? ग्रेट… नुसत्या विचारानंच जीभ खवळली!’’

त्यावर आई अत्यंत ठाम शब्दात म्हणाली, ‘‘जितक्या चवीनं काल वेब सीरिजचे सगळे भाग बघितलेस ना, त्याच चवीनं मुकाट पोटभर जेवायचं.’’

आईनं कितीही म्हटलं, तरी आदित्यला हे जेवण मिळमिळीत वाटणारच  होतं. कारण त्याची समाधान मिळवण्याची पातळी खूप वाढली होती. वेब सीरिज पाहताना सतत ‘आता पुढे काय’ या उत्सुकतेनं डोपामिनची पातळी वाढत जाते. शरीर थकलं, मेंदू थकला, तरीही ती उत्तेजना त्याला जागंच ठेवते. ही झाली ‘हाय डोपामिन अ‍ॅक्टिव्हिटी’. त्यानंतर इतर गोष्टी- ज्या सामान्यत: करायला आवडल्या असत्या, जसं की सायकलिंग, जेवण, मित्रांशी गप्पा, यात रस वाटत नाही. त्या आता अदित्यसाठी ‘निम्न डोपामिन अ‍ॅक्टिव्हिटी’ झाल्या होत्या. आदित्यनं आता चायनीज पदार्थांची मागणी केली होती. ते खाताना त्याची उत्तेजना अधिक असेल, पण जर रोजच तेच तेच पदार्थ खावे लागले, तर त्यातील आनंद कमी होऊन तितकी उत्तेजना मिळण्यास त्यापेक्षाही जास्त डोपामिन मिळेल अशी कृती करावी लागेल… असं हे दुष्टचक्र आहे.

मुलांसाठी हल्ली सर्रास वेफर्सची पाकिटं आणली जातात किंवा आई वर्गाची खरेदी सुरू असली की मुलं गुंतून राहावीत म्हणून त्यांच्या हातात अशी पाकिटं दिली जातात. एक-दोन म्हणता म्हणता तीन चार पाकिटं कधी संपली ते मुलांनाही कळत नाही. वजन वाढवणारी अशी असंख्य उत्पादनं बाजारात आहेत, जी खाताना जास्त डोपामिन प्रवाहित होत असल्यानं ते खाताना मजा वाटते आणि खाण्यावर नियंत्रण राहात नाही. जाहिरातीतलं ‘एक से मेरा क्या होगा’ हे त्याचंच द्योतक!

आपण स्वत:च्या अनुभवावरून नक्की सांगू शकतो, की सकाळी उठल्याबरोबर जर मोबाइल हातात घेतला आणि एखादी चटपटीत व्हिडीओ फीत समोर आली, तर आपल्याही नकळत आपण तीच नाही, तर आणखी चार व्हिडीओ बघतो. वास्तविक पाहता आपली मुळीच इच्छा नसते, कामाची घाई असते, पण ही ‘उच्च डोपा क्रिया’ असल्यानं आपलं नियंत्रण राहात नाही. पुढील सारी दिनचर्या बिघडते. सध्या अनियंत्रित व्यसन फक्त मोबाइलचंच नाही, तर अनेक खर्चिक साधनांचंही आहे. अल्कोहोल घेणाऱ्या अनेकांना त्याचा एक पेग कधीच पुरेसा नसतो. ‘एकच प्याला’ म्हणत कित्येक आयुष्यं बरबाद झाली आहेत. हेच ‘पॉर्न’ बघणाऱ्या अनेकांच्या बाबतीतही घडतं. ‘पॉर्न’मुळे मिळणारी चेतना/ संवेदना ती बघणाऱ्याला अधिकाधिक व्यसनी बनवते. काहींच्या बाबतीत त्याचा इतका अतिरेक होतो की त्यामुळे त्यांचं खासगी लैंगिक आयुष्य बिघडतं. वेब सीरिज, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या नादी लागल्यानं आजच्या तरुणाईची झोप विकत घेऊन अनेक समाजमाध्यमांनी आपल्या तिजोऱ्या भरल्या आहेत. दोष त्यांचा नाही, ते व्यवसायिकच आहेत. आपणच आपली अक्कल गहाण ठेवून त्यांचे गुलाम झालो. आज आपलं डोपामिन हायजॅक झाल्यासारखी गत झाली आहे आपली! रात्र रात्र जगल्यानं वाढलेलं पित्त, सततची डोकेदुखी, मग कशात मन न लागणं, अनारोग्य, अकाली केस पिकणं, पाठीला बाक येणं, कार्यक्षमता कमी होणं, हे सगळं आपण विकत घेतलंय. करोनामुळे मुलांना मोबाइलपासून दूर ठेवण्याच्या संकल्पनेची वाट तर लागलीच आहे. त्यामुळे त्यांचा समाजमाध्यमांवरील सहज वावर हा ‘उच्च डोपामिन क्रियाकलाप’ ही आज पालकांची सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरतेय.

हे सगळं टाळता येणार नाही का? तर हो, नक्कीच येईल. त्यासाठी आपल्याला गरज आहे, ती ‘डोपामिन डीटॉक्स’ची. अगदी साध्या सरळ भाषेत सांगायचं, तर मेंदूला शांतता लाभेल आणि सतत उच्च चेतना जागृत होणार नाहीत अशी विश्रांती देणं म्हणजे डोपामिन डीटॉक्स.  प्रत्येकासाठी डोपामिन उत्तेजना देणारी कामं वेगवेगळी असू शकतात. अशी कामं आठवड्यातून एक दिवस पूर्णत: टाळता येतील.  दुसरं म्हणजे स्वत:लाच ‘बक्षीस’ कबूल करायचं, उदा. जर मी तीन तास अभ्यास केला, तर मी अर्धा तास मस्त व्हिडीओ गेम खेळीन.  किंवा मी तासभर व्यायाम केला, फिरून आलो, तर एक व्हिडीओ बघीन इत्यादी. मला ९५ टक्के गुण मिळाले तरच मी खूश होईन, असं न म्हणता त्याच्या प्रयत्नात ज्ञान मिळतंय, असं म्हटल्यास लगेच आनंद मिळेल. ज्या ज्या क्रियेमुळे अति उत्तेजना निर्माण होते अशांची यादी करून  त्यातील किती अनावश्यक आहेत, कुठे कात्री लावावी लागेल, याची सकारात्मक जाणीव ठेवून त्यासाठी देण्यात येणारा वेळ हळूहळू कमी करावा लागेल. एकदम सगळं बंद करणं शक्य नाही आणि तसं करण्याची गरजही नाही. अगदी हळूहळू आपल्या आवडीच्या बाबतीतील संदर्भ चौकट बदलत ते करावं लागेल.

हे जमतं. नक्कीच जमतं! उपवासाची परंपरा असणाऱ्या आपल्या समाजाला हा उपवास नक्कीच अवघड नाही. कामाच्या वेळात खासगी मोबाइल पूर्णपणे बंद ठेवणं. मधल्या सुट्टीत थोड्या वेळासाठी बदल म्हणून समाजमाध्यमांची सफर करण्यास हरकत नाही. सुट्टीच्या दिवशी थोडा वेळ का होईना, एकांतात शांत बसणं आणि आदल्या दिवशी आपण केलेल्या कामांची उजळणी करणं. हे करताना कुठल्या गोष्टींमुळे आपण आनंदी झालो, कुठल्या गोष्टींमुळे दुखावले गेलो, कुठे विनाकारण वेळेचा अपव्यय केला, याचं चिंतन केल्यास अनावश्यक बाबींना फाटा देणं सोपं होतं. एकच काम करत राहताना आव्हानात्मक वाटेल असा आपल्या कौशल्याचा स्तर वाढवणं, उदा. मी आज ही फाइल एका तासात पूर्ण केली, उद्या ती पंचावन्न मिनिटांत पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन इत्यादी. म्हणजे रोजच्या कामात रंजकता येईल. अशा ‘डीटॉक्स’नंतर अवघड वाटणारी कामंदेखील सोपी वाटू लागतील.

आपल्या उन्नतीसाठी आपलं आयुष्य, आपलं शरीर कसं असावं, आपला वेळ कुठे वापरायचा, हे आपण ठरवायचं आहे.

एक सुदृढ, आनंदी आणि यशस्वी आयुष्य जगायचं असेल तर आपली कार्यक्षमता वाढवणं, माणूस म्हणून आपण निरोगी मनाचे असणं, आपली आणि पर्यायानं समाजाची उन्नती जाणून वागणं, हे जास्त महत्त्वाचं नाही का? कारण हे आयुष्य आपलं आहे!

adaparnadeshpande@gmail.com