भीती जन्मदोषाची

प्रसंग अपत्यजन्माचा. बाळ जन्माला आलं, व्यवस्थित रडलं, आई सुखरूप आहे

|| डॉ. किशोर अतनूरकर

प्रसंग अपत्यजन्माचा. बाळ जन्माला आलं, व्यवस्थित रडलं, आई सुखरूप आहे, आनंदी आनंद आहे. प्रसंग तोच; पण जन्माला आलेल्या बाळात काही जन्मदोष किंवा व्यंग असेल. तर? आनंदी वातावरणाचं रूपांतर गंभीर होऊन जातं. कुटुंबात एक प्रकारची बेचैनी निर्माण होते. जन्मदोष असलेलं बाळ कुणालाही नको असतं. मुलगा की मुलगी? आपल्या काय हातात आहे? ते देवाच्या स्वाधीन. काहीही झालं तरी चालतं, बाळ चांगलं असावं, बाळात काही दोष असू नये अशी अपेक्षा असते. पण निसर्गनियमाप्रमाणे काही अपत्य तरी जन्मदोषासहित जन्माला येणारच. जन्मदोष असलेलं बाळ जन्माला येण्याची नैसर्गिक शक्यता किमान २ ते ३ टक्के असते.

गर्भवती स्त्रीने ग्रहण पाहू नये, इतकंच नव्हे तर, ग्रहणाचे वेध लागल्यापासून ग्रहण सुटेपर्यंत तिने घराच्या बाहेर पडू नये, नाही तर बाळामध्ये जन्मदोष निर्माण होतील, असा गैरसमज आजही लोकांच्या मनातून म्हणावा त्या प्रमाणात नाहीसा झालेला नाही. ग्रहणाच्या दिवशी, गर्भवती महिला डॉक्टरांकडे तपासणीसाठी जात नाहीत किंवा टाळतात हे सत्य आहे. त्या दिवशी प्रसूतिशास्त्र विभागाच्या बा रुग्ण विभागात आणि खासगी रुग्णालयातदेखील बऱ्यापैकी शुकशुकाट असतो. ‘‘तुमच्या तपासणीचा कालचा दिवस होता, काल का आला नाहीत?’’ असं विचारल्यानंतर उत्तर मिळतं- ‘‘काल ग्रहण होतं, मग हिला कसं घेऊन येणार?’’ ‘‘अहो तसं काही नसतं, गर्भवती स्त्रीने ग्रहण पाहिल्याने काही बिघडत नसतं, बाळामध्ये व्यंग वगैरे काही निर्माण होत नसतात’’, असं डॉक्टरने सांगितल्यानंतर त्यांची थंड प्रतिक्रिया असते- ‘‘नसेल ही, पण आपण तो नियम पाळल्याने, नुकसान तर काही नाही ना? उगाच रिस्क कशाला?’’ अशा परिस्थितीत रुग्ण आणि नातेवाईकांना ग्रहण म्हणजे सूर्य, पृथ्वी, चंद्र यांच्या सावल्याचा खेळ असतो, त्याचा आणि जन्मदोषाचा दूरान्वयानेदेखील संबंध नाही, जन्मदोषची कारणं ही वेगळी असतात, असं डॉक्टरने समजावून सांगणं गरजेचं असतं. ग्रहण धोकादायक नसतं. ग्रहणामुळे कोणतेही धोकादायक किरण निर्माण होत नाहीत, अन्न-पाणी दूषित होत नाही, गर्भात व्यंग निर्माण होत नाहीत. जन्मदोष हे जनुकीय किंवा गुणसूत्राच्या दोषामुळे वा अन्य घटकाच्या कमतरतेमुळे वा पहिल्या दोन महिन्यांत घेतलेल्या काही औषधांमुळे होतात. ही महत्त्वपूर्ण माहिती सांगली येथील ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने, पृथ्वी, चंद्र, सूर्याच्या रंगीत आकृतीसह व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकसारख्या माध्यमांतून मागच्या ग्रहणाच्या वेळेस, हजारो लोकांपर्यंत पाठवली. त्या संस्थेने अपत्यजन्माचं समाजभान अशा पद्धतीने राखलं हे आवर्जून नमूद केलं पाहिजे.

जन्मदोषाचा आणि गर्भावस्थेत घेतल्या जाणाऱ्या औषधांचा संबंध कसा असतो, याबद्दलही इथं चर्चा झाली पाहिजे. पाळणा लांबविण्याचं कोणतंही साधन न वापरल्याच्या परिस्थितीत, जेव्हा एखाद्या स्त्रीची ‘पाळी चुकते’ अशा वेळेस डॉक्टरकडे जाऊन पाळी गर्भधारणेमुळे चुकली की अन्य काही कारणांमुळे? याची खात्री करून पुढील निर्णय घ्यायचा असतो. त्याऐवजी काही स्त्रिया, कदाचित ‘दिवस गेले’ नसणार असा स्वत:च समज करून घेऊन, औषधाच्या दुकानावर जाऊन पाळी येण्याच्या गोळ्या घेतात. पाळी येण्याची वाट पाहतात. गोळ्या घेऊनही पाळी आली नाही, या परिस्थितीत डॉक्टरकडे येतात. डॉक्टर सोनोग्राफी करतात आणि सांगतात की आठ आठवडय़ांचा गर्भ आहे, त्यामुळे गोळ्या घेऊनदेखील पाळी आलेली नाही. यावर ती म्हणते- ‘‘तसं तर काही झालं नाही, शक्यच नाही, पण सांगता येत नाही. कदाचित एकदा..’’ ‘‘ठीक आहे, मग आता काय करायचं?’’ हा प्रश्न विचारल्यानंतर                     डॉक्टर सांगतात, ‘‘तुम्ही ठरवा, तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही हा गर्भ वाढवू शकता.’’‘‘पण डॉक्टर मी पाळी येण्यासाठी गोळ्या घेतल्या होत्या. गर्भ वाढवला तर त्याचा गर्भाच्या वाढीवर परिणाम तर होणार नाही ना?’’ या प्रश्नाचं सरळ उत्तर असं आहे की, ‘‘सहसा काही होत नाही, तुमची इच्छा असल्यास गर्भ वाढवू शकता.’’ थोडंसं सविस्तर उत्तर द्यायचं झाल्यास, पाळी येण्यासाठी जर इस्ट्रोजेन-प्रोजेस्टरोनमिश्रित गोळी घेतली असल्यास काही होत नाही, पण टेस्टेस्टेरॉन या हॉर्मोन्सचे काही गुणधर्म असलेली गोळी घेतली असल्यास, तो गर्भ स्त्री जातीचा असल्यास, तिच्या बा लैंगिक अवयवावर परिणाम होण्याची अल्पशी शक्यता असते, असं काही अभ्यासात आढळून आलं आहे. असं काही होईलच असं नाही. गर्भधारणेनंतर ३१ दिवसांपासून ७१ दिवसांपर्यंतचा कालावधी हा बाळाच्या शरीरातील विविध अवयव तयार होण्याचा एक अतिशय महत्त्वाचा काळ असतो. या कालावधीत एखादं ‘न चालणारं’ औषध गर्भवतीस दिलं गेल्यास, त्याचा गर्भधारणेवर विपरीत परिणाम होऊन, बाळामध्ये जन्मदोष निर्माण होऊ शकतो. गर्भधारणेच्या कोणत्या कालावधीत, कोणतं औषध, किती कालावधीसाठी दिलं गेलं आणि त्यापैकी किती त्या गर्भापर्यंत पोहोचलं जाण्याची शक्यता आहे, यावर ते अवलंबून असतं.

मलेरिया आणि क्षयरोग या दोन्ही आजारांचं प्रमाण आपल्या देशात मोठय़ा प्रमाणात आहे. मलेरियासाठी दिल्या जाणाऱ्या क्लोरोक्वीनच्या गोळ्या गर्भावस्थेत घेऊ नयेत, कारण त्यामुळे गर्भपात होऊ  शकतो, असे पूर्वीच्या अभ्यासाचे निष्कर्ष होते. गर्भावस्थेत त्या गोळ्या घेतल्याने गर्भावर काहीही दुष्परिणाम होत नाहीत असं अलीकडच्या काळातील अभ्यासात आढळून आलं आहे. गर्भावस्थेत क्षयरोग झाल्यास पूर्वी उपलब्ध असलेली इंजेक्शने आणि गोळ्या जन्मदोष निर्माण होण्यासाठी कारणीभूत आहेत असं निरीक्षण होतं. ते काही प्रमाणात आजही खरं आहे, पण पूर्वीच्या तुलनेत आता गर्भावस्थेत ‘चालणाऱ्या’ औषधांची निर्मिती झालेली असल्यामुळे, गर्भावस्थेतील क्षयरोगावर उपचार करणं आता सोपं आणि सुरक्षित झालं आहे.

मागील काही दशकांत, सोनोग्राफीचं तंत्रज्ञान भरपूर विकसित झालं आहे. ४डी सोनोग्राफीच्या माध्यमातून, गर्भजल चिकित्सातून गुणसूत्रांची रचना तपासून, जन्मदोषाची जवळपास पक्की खात्री करून घेता येते. तंत्रज्ञान एवढं विकसित होऊनदेखील, अजूनही प्रत्येक जन्मदोष २० आठवडय़ांपर्यंत लक्षात येईलच असं नाही. वैद्यकीय गर्भपाताचा कायदा २० आठवडय़ांपर्यंतच लागू आहे. अगदी अपवादात्मक परिस्थितीतच २४ आठवडय़ांपर्यंत कायद्याने गर्भपात करता येतो. या बाबतीत अजून एक अडचण अशी आहे की, गर्भावस्थेत सोनोग्राफी करण्याचं महत्त्व जवळपास सगळ्यांना माहिती आहे; तरीही काही ग्रामीण भागातील लोकांना जन्मदोष लक्षात येण्यासाठी १६ ते २० आठवडय़ांपर्यंत सविस्तर सोनोग्राफी करून घ्यायची असते हे समजत नाही. समजलं तरी खेडय़ातून शहरात अगदी त्याच कालावधीत ते पोहोचू शकतीलच असं नाही. नेमक्या अशा काही गर्भवतींच्या सोनोग्राफीत २० आठवडय़ांनंतर जर जगण्यास अशक्य असलेला जन्मदोष आढळून आल्यास, कायद्याने गर्भपात करून देता येत नाही. एकदा असा जन्मदोष आहे हे उशिरा लक्षात आल्यानंतर तो गर्भ वाढवतापण येत नाही आणि कायद्याने गर्भपातही करता येत नाही अशी पंचाईत होते.

शेवटी ते तंत्रज्ञानच. कितीही अचूकता आणावी म्हटलं तरी काही उणिवा राहून जातात आणि जन्मदोष असलेली बाळं अल्प प्रमाणात का होईना जन्माला येतातच. अशा बाळांचं संगोपन करणं सोपं नसतं हे माहिती असूनदेखील जड अंत:करणाने त्याचा स्वीकार करावा लागतो. शारीरिक जन्मदोष घेऊन जन्माला येणाऱ्या अपत्यासंबंधी आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधन कौतुक करावं इतकं विकसित झालेलं असताना, मानसिक जन्मदोष अथवा स्वभावाच्या जन्मत:च असलेल्या दोषांचं आणि उपचारांचं तंत्र म्हणावं तसं अजून विकसित झालेलं नाही. भविष्यात मानवी बुद्धी काही ना काही तोडगा काढेल यात शंका नाही.

atnurkarkishore@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Articles in marathi on child birth planning