डॉ. किशोर अतनूरकर atnurkarkishore@gmail.com

आपल्याला एकही मुलगा नसला तरी आपलं काही बिघडत नाही या विचाराचं ‘मार्केटिंग’ समाजात करावं लागेल. गर्भलिंगनिदान आणि स्त्री-भ्रूणहत्या बंद व्हाव्यात यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागतील. त्यातही सातत्य आणावे लागेल.

गर्भलिंगनिदान आणि स्त्री-भ्रूणहत्येमुळे निर्माण होणारी भीषण सामाजिक विषमता आटोक्यात आणण्यासाठी कायदा असणं आणि त्याची अंमलबजावणी करणं निश्चित गरजेचं आहे. पण कायद्याचा धाक आहे म्हणून डॉक्टरांनी गर्भलिंगनिदान आणि स्त्री-भ्रूणहत्या न करणं आणि समाजातील लोकांनी ‘तशी’ मागणी न करणं हे अजिबात चांगलं लक्षण नाही. कायद्याचं बंधन नसताना देखील, आपल्याला किमान एकतरी मुलगा असायला पाहिजे या मानसिकतेतून मुक्त झालेला समाज निर्माण करावयाचा असल्यास, अनेक आघाडय़ांवर सातत्याने नवीन मार्गाचा शोध घेऊन त्यावर मार्गक्रमण करावं लागेल. या निमित्ताने, पूर्वी विचारात न घेतलेल्या, पण परिणामकारक ठरतील अशा उपाय योजना बद्दल चर्चा करणे योग्य राहील.

मुलगा पाहिजे या मानसिकतेच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे, म्हातारपणाच्या आधारासाठी. मुलगा नसलेल्या जोडप्यांची म्हातारपणाच्या आधाराची खात्रीलायक ‘सोय’ केल्यास जननक्षम वयात लोक, मुलगा न झाला तरी, थांबतील आणि मुलासाठी म्हणून पुढचा ‘चान्स’ घेणार नाहीत. ज्यांना फक्त मुलीच आहेत, अशा म्हाताऱ्या जोडप्यांना सरकारने अथवा खासगी संस्थेने त्यांची व्यवस्था लावणाऱ्या केंद्राची उभारणी करण्याची गरज आहे. त्यासाठी लागणाऱ्या बजेटची फारशी काळजी करण्याची गरज नाही. अशा केंद्रासाठी सरकारने फक्त जागा उपलब्ध करून द्यावी. दैनंदिनी चालवण्यासाठी खर्च त्या जोडप्यांकडून म्हातारपणात नव्हे तर ते कमाई करत असतानाच्या वयातच त्यांच्या नावाची नोंदणी करून महिन्यास ठरावीक रक्कम जमा करून घ्यावी जेणेकरून म्हातारपणी एकदाच मोठय़ा रकमेचा ताण त्यांच्यावर पडणार नाही. तुम्हाला मुलीच आहेत ना, म्हातारपणाची आपल्याला कोण सांभाळेल याची काळजी करू नका. हे केंद्र तुम्हाला सर्व तो परी सहाय्य करेल, असा विश्वास समाजात निर्माण करता आला तरच ही योजना यशस्वी होईल. भविष्यात अशा पद्धतीने मुलगा नसताना देखील आपल्या म्हातारपणाची सोय होणार या विश्वासावर ते आज एक किंवा दोन मुलींवर समाधान मानतील अनेक मुलीचे गर्भपात टाळता येतील.

अजून एक करता येण्यासारखी बाब म्हणजे आपल्याकडे कोणत्याही ऑफिसमध्ये, बँकेत, पोस्टात, पेट्रोलपंप वगैरे अनेक ठिकाणी लोकांना तासन्तास रांगेत उभं राहावं लागतं. एक किंवा दोन मुलीवर, आपलं कुटुंब मर्यादित ठेवलेल्या जोडप्यांना एक गुलाबी रंगाचं ‘मुलगी कार्ड’ (नवऱ्याला आणि बायकोला वेगळं) दिलं गेलं पाहिजे. असं कार्ड जवळ असणाऱ्या लोकांसाठी वेगळी रांग असली पाहिजे. समाजातील इतर लोकांना समजलं पाहिजे ही खास रांग फक्त मुली असलेल्या लोकांसाठीच आहे.

लग्नानंतर मुलगी सासरी जाण्याची प्रथा आहे. ती सासरी जाण्याने तिच्या शिक्षणावर आपण केलेल्या खर्चाचा, नोकरी करून ती मिळवत असलेल्या पशांचा आपल्या उपयोगाचा नाही. ज्या झाडाची फळं आपल्याला मिळणार नाहीत त्या झाडाला पाणी का द्यायचं अशीही भूमिका अनेकदा पालकांच्या मनात येऊ शकते. ही भावना देखील लोक मुलीच्या जन्मानंतर नाराज होण्यासाठी कारणीभूत ठरते. ही मनोवृत्ती बदलू शकते. यासाठी मुलीच्या नवऱ्याची आणि सासरच्या मंडळींची साथ पाहिजे. आपल्या आई-वडिलांना आपल्या कमाईतून, वेळप्रसंगी आर्थिक साहाय्य देण्यासाठी, सासरच्या लोकांनी मनापासून पािठबा दिला पाहिजे. एकुलती एक मुलगी असेल तर मुलीच्या कमाईतला वाटा ती तिच्या आई-वडिलांना स्वखुशीने देऊ शकेल, अशी मानसिकता मुलींमध्ये आणि  तिच्या पालकांमध्येही वाढायला हवी.

मुलगा नसताना मुलीच्या म्हणजे जावयाच्या घरी जाऊन शेवटपर्यंत रहाणे, हा नियम समाजात रूढ होऊ शकला नाही. मुलीची खूप इच्छा असते, आपल्याला भाऊ नसला म्हणून काय झालं, म्हातारपणी आई-वडिलांनी आपल्याकडे येऊन राहावं. पण बहुतेक वेळेस ते शक्य होताना दिसत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे आई-वडिलांनाच मुलीकडे येऊन राहाणं प्रशस्त वाटत नाही. काही वेळेस फक्त मुलीची इच्छा असून भागत नाही. यासाठी तिचे आई-वडील, जावई (नवरा) आपल्याकडे ठेऊन घेण्यास सहमत असतीलच असं नाही. स्वत:च्या आई-वडिलांसोबत बायकोच्या आई-वडिलांना सांभाळणं प्रत्येक वेळी शक्य होईलच असं नाही. यासाठी आर्थिक कारण असू शकतं, जागेचा प्रश्न असू शकतो, आजारपणात डॉक्टरकडे ने-आण करण्यासाठी मनुष्यबळाचा आभाव असू शकतो, मुलांच्या शिक्षणात कधी कधी मदत होण्याऐवजी आजी-आजोबा लुडबुडच करत आहेत, असंही वाटू शकतं. या सर्व अडचणी कालांतराने दूर होऊन मुलगा असो व नसो म्हातारपणी आई-वडील मुलाकडे अथवा मुलीकडे, परिस्थितीनुसार, तितक्याच आनंदाने आणि समाधानाने राहतील तेव्हा मुलगा पाहिजेच हा अट्टहास बऱ्याच अंशी कमी झालेला असेल.

या परिस्थितीत अपेक्षित बदल होण्यासाठी जो काही अनेक वर्षांचा कालावधी लागेल तो लागेलही, पण निदान डॉक्टर मुलीच्या बाबतीत एवढा वेळ लागायला नको असं वाटतं. डॉक्टर झालेल्या अथवा होत असलेल्या मुली आणि वैवाहिक जीवनाचा अनुभव घेत असलेल्या महिला डॉक्टर, या बाबतीत पुढाकार घेऊन फारसा विलंब न लावता, म्हातारपणी आई-वडिलांनी मुलाकडेच राहावं या परंपरेला छेद देऊ शकतात. डॉक्टर मुलींनी हा बदल घडवून आणला तर समाजातील इतर मुलीदेखील आई-वडिलांचा सांभाळ करू शकतील.

गर्भलिंगनिदान, मुलीच्या गर्भाचा गर्भपात आणि मुलीच्या लग्नाच्या वेळेस दिला जाणारा हुंडा याचा जवळचा संबंध आहे. मुलीच्या जन्माचं स्वागत फारसं आनंदाने न होण्यामागचं एक कारण म्हणजे हुंडा किंवा तिचं थाटामाटात लग्न करून देण्याचा सामाजिक दबाव. मागच्या वर्षी माझे एक डॉक्टर मित्र त्यांच्या डेंटल सर्जन झालेल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी घरी आले होते, तेव्हा त्यांच्याशी बोलताना सहज विचारलं, ‘‘काय डॉक्टरसाहेब, काय करतात जावई, हुंडा-िबडा तर दिला नाही ना?’’ त्यावर त्याने इंजिनीयर असलेल्या जावयाला वीस लाख रुपये हुंडा दिल्याचे सांगताच मी उडालो. माझ्या त्या मित्रासोबत त्यांचा पदव्युत्तर शिक्षण घेऊन पुण्यात नोकरी करणारा तरुण मुलगा आला होता. त्याला मी म्हटलं, ‘‘तुझ्या लग्नाच्या वेळेस तू मात्र हुंडा घेऊ नको बरं का!’’ यावर त्याने नकार दिला नाही. तो म्हणाला, ‘‘बहिणीच्या लग्नात बाबांना हुंडय़ासाठी इतके पैसे खर्च करावे लागत असतील तर ते मला माझ्या लग्नात वसूल करावे लागतील.’’ मी निरुत्तर. हुंडय़ाच्या बाबतीतील हे विदारक सत्य शहरात राहाणाऱ्या सुशिक्षित घरात आजही अस्तित्वात असेल तर, मुलीच्या जन्माचं मनापासून स्वागत करणारा समाज निर्माण कधी होणार असं वाटून गेलं.

अनेक वर्षांपासून कायदा अस्तित्वात असून देखील, हुंडा दिल्या-घेतल्यावरून कुठे कार्यवाही झाली, कुणाला शिक्षा झाली असं ऐकिवात नाही. शहरातल्या सुशिक्षित, आर्थिकदृष्टीने स्वावलंबी असलेल्या मुलींनी हुंडा घेणाऱ्या मुलाशी मला लग्न करावयाचं नाही या भूमिकेवर ठाम राहण्याशिवाय आणि मुलांनी देखील हुंडा घेणार नाही असं ठरवून, वडील जर हुंडा घेण्याच्या बाजूने असतील तर त्यांचं मतपरिवर्तन करण्याची क्षमता ठेवण्याशिवाय सध्यातरी या समस्येवर दुसरा उपाय दिसत नाही. हळूहळू याचं अनुकरण खेडय़ातील, अशिक्षित मुलं-मुली आणि त्यांचे आई-वडील करतील अशी अपेक्षा. याला वेळ लागेल. हे जर लवकरात लवकर व्हायचं असेल तर प्रत्येक महाविद्यालयातून विवाहपूर्व समुपदेशनाचे वर्ग घेतले गेले पाहिजेत.

आपल्याला एकही मुलगा नसला तरी आपलं काही बिघडत नाही या विचाराचं ‘मार्केटिंग’ करावं लागेल. गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्या बंद व्हाव्यात म्हणून फक्त बैठका घेण्याचे ‘सोपस्कार’ करून, भाषणं देऊन किंवा असे लेख लिहून काम संपणार नाही. अशा पद्धतीने परिस्थिती हाताळल्यास मर्यादित यश मिळेल. या कामासाठी समाजाप्रति बांधिलकीची जाणीव असावी लागते, अन्यथा थोडंफार यश मिळेल पण सामाजिक परिवर्तन वगैरे होण्याची शक्यता कमी.

chaturang@expressindia.com