अपत्यजन्माचे नियोजन

अपत्यजन्माच्या बाबतीत एवढा सगळा विचार करून निर्णय घेणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, ही समाधानाची बाब आहे.

एकदा निरोध वापरायचं ठरलं, की तो प्रत्येक संबंधाच्या वेळी वापरलाच पाहिजे, असा नियम आहे. त्यासाठी त्या साधनाचा स्टॉक करून ठेवायला पाहिजे. अन्यथा दोघांकडूनही त्यावेळी संयम पाळण्यात आला नाही की ‘चुका’ होणारच. आणि मग शारीरिक आणि मानसिक ताण भोगावा लागणार तो स्त्रियांनाच. – ‘अपत्यजन्माचे नियोजन’ चा – भाग १.

गर्भधारणेस प्रतिबंध घालू शकत नाही म्हणून नाइलाजास्तव गर्भ राहू देऊन वाढू द्यावा, असा आता काळ राहिलेला नाही. हा जमाना ‘प्लॅनिंग’चा म्हणजेच नियोजनाचा आहे. आता आपल्याला पाहिजे तेव्हा गर्भधारणा राहू शकते आणि नको असेल तर आपण त्यावर प्रतिबंध घालू शकतो; किंबहुना संतती आपल्याला हवी असेल तरच, अन्यथा नाही.

गर्भधारणेसाठी आदर्श वेळ कोणती? या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर असं आहे- त्या जोडप्याची शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती योग्य असेल तर हिरवा कंदील, नाही तर पुनर्विचार झालाच पाहिजे. अपत्यजन्माच्या बाबतीत एवढा सगळा विचार करून निर्णय घेणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, ही समाधानाची बाब आहे. कुटुंब मर्यादित ठेवून सुखी जीवन जगण्याची कला शहरात राहणाऱ्या, सुशिक्षित, आर्थिक परिस्थिती समाधानकारक असलेल्या वर्गातील लोकांनी अवगत केलेली आहे; पण हा संदेश अजूनही समाजातल्या सर्व स्तरांवर नीट पोचला आहे, असं वाटत नाही. विशेषत: ग्रामीण भागातील जनता, शहरातील अशिक्षित-कामगार वर्ग, खासगी क्षेत्रात काम करणारे वर्ग ४ दर्जाचे कर्मचारी, भाजी विक्रेते-पाणीपुरी-वडापावची गाडी चालविणारी, रोज छोटा व्यापार करून पोट भरणारी अशी संख्येने भरपूर असलेली जनता अजूनही अपत्यजन्माच्या नियोजनापासून खूप दूर आहे. या बाबतीत एक तर ती अज्ञानी आहे, नाही तर गैरसमजाने ग्रासलेली आहे.

गौतम नावाचा तरुण, वय वर्षे २३, शिक्षण दहावीपर्यंत झालेलं, तरीही नीट लिहिता-वाचतादेखील येत नाही, शहरात राहणारा, ना नोकरी ना व्यवसाय, वडील सेवानिवृत्त सेवक, त्यांना मिळणारं पेन्शन हेच काय ते त्या कुटुंबाचं आर्थिक स्रोत. असा हा गौतम लग्न करतो. लग्नानंतर सहा महिन्यांतच पत्नीची पाळी चुकते, गर्भ आहे किंवा नाही यासाठी लघवीची तपासणी केली जाते, रिपोर्ट निगेटिव्ह. पाळी का चुकली असेल यासाठी गौतमच्या बायकोला माझ्याकडे आणल्यानंतर मी विचारलं, ‘‘गर्भ नाही हे ठीक आहे, पण गर्भ असावा असं तुला वाटतं का?’’ यावर ती अक्षरओळखदेखील नसलेली नवविवाहित तरुण मुलगी काहीच बोलेना. मी पुन:पुन्हा विचारल्यानंतर एक वाक्य अतिशय दबक्या आवाजात म्हणाली- ‘‘आपल्या मनावर काय असते?’’ ‘‘तुला आता लगेच गर्भधारणा पाहिजे का?’’ या मी विचारलेल्या प्रश्नाला तिने- ‘नको’ असं उत्तर दिल्यावर मात्र मी बाहेर थांबलेल्या गौतमला आत बोलावून विचारलं- ‘‘तुझी काय इच्छा आहे, गर्भ राहिला तर तुला चालेल का?’’ या प्रश्नाचं उत्तर त्याने चक्क‘हो’ असं दिल्यानंतर मी चमकलोच. ‘‘बायकोला इतक्या दिवसांत या बाबतीत कधी बोललास का? गर्भधारणा लगेच पाहिजे का नको याबद्दल तिच्यासोबत काही चर्चा?’’ यावर त्याने ‘नाही’ असं उत्तर दिलं. अशा परिस्थितीत गौतमच्या बायकोची पाळी चुकली तरी ती गर्भवती नव्हती हे एका दृष्टीने चांगलंच झालं असं वाटून गेलं. सगळंच अजब! न समजण्याच्या पलीकडचं. कोणत्याच नवऱ्याने आपल्या बायकोचं मत विचारात घेतल्याशिवाय तिच्यावर गर्भधारणा लादू नये, असं यानिमित्ताने सुचवावंसं वाटतं. (या सदराच्या वाचकांसाठी या सूचनेची गरज नसावी, असं मी समजतो.) आपल्या संपर्कात येणाऱ्या अनेक ‘गौतमांना’ त्यांच्या अशा बेफिकीरपणे वागण्याने स्त्रियांवर जन्मभराचा अन्याय होतो, असं मनापासून समजावून सांगणारे लोक समाजात तयार झाले पाहिजेत असं वाटतं.

एक साधारण २० वर्षांची स्त्री, (स्त्री तरी कसं म्हणावं, २० वर्षांची मुलगीच ती) आपलं दीड वर्षांचं बाळ कडेवर घेऊन आपल्या आईसोबत आली. काही विचारण्याच्या आतच- ‘सातवा महिना है, सोनोग्राफी करना है,’ असं म्हणाली. तिची विचारपूस केल्यानंतर लक्षात आलं की, तिचा नवरा हैदराबाद येथे मिस्त्री काम करतो, तिचं आणि नवऱ्याचं शिक्षण दहावीच्या आत, सोबत फक्त गर्भधारणेच्या तिसऱ्या महिन्यात एकदा सोनोग्राफी केल्याचा रिपोर्ट. पहिल्या बाळंतपणाच्या वेळेस सिझेरियन केलं होतं. एकदा सिझेरियन झाल्यानंतर किमान ३ र्वष पुढील गर्भधारणा होऊ देऊ नका, काही तरी ‘वापरा’, असं आम्ही सांगत असतो. ‘‘आपने या आप के शोहरने कुछ ‘इस्तेमाल’ नही किया क्या?’’ या प्रश्नाचं उत्तर तिने- ‘‘हमको उत्ता समझता नही, हम सातवे महिने की सोनोग्राफी करने को आये,’’ असं दिलं. एक तर तिने पहिलं सिझर झाल्यानंतर लगेच दुसरी गर्भधारणा राहू द्यायला नको होती. दुसरं म्हणजे तिसरा महिना संपत येत असताना, साधारणत: ११ ते १३ आठवडय़ांच्या दरम्यान आणि साडेचार ते पाच महिन्यांच्या दरम्यान, साधारणत: १८ व्या आठवडय़ात (बाळात काही जन्मदोष आहेत किंवा नाही हे माहिती करून घेण्यासाठी) सोनोग्राफी करावी लागते; रक्त-लघवीच्या काही तपासण्या कराव्या लागतात, बाळाच्या निकोप वाढीसाठी लोह आणि कॅल्शियमच्या गोळ्या घ्याव्या लागतात, दर महिन्याला डॉक्टरकडे जाऊन तपासणी करावी लागते. हे काहीही न करता ती थेट सातव्या महिन्यात पोचली. आता सोनोग्राफी केल्यानंतर समजा पोटात वाढणाऱ्या बाळामध्ये जिवाला धोका असलेला जन्मदोष आहे असं लक्षात आलं तर? कायद्याने गर्भपात करता येत नाही, गर्भ जन्मदोषांसहित वाढवण्याचं संकट! हे सगळं म्हाताऱ्या आईला समजावून सांगण्यापेक्षा तिच्या नवऱ्यालाच बोलण्याची मी इच्छा प्रदर्शित केली असता तिची आई म्हणाली- ‘‘उनो हैदराबादसे अभी नही आ सकते, दो महिने पहिलेच लाकर छोड के गये, अब जो कुछ भी करना है अपनेकुच करना है.’’ तिला स्वत:ला कळत नाही आणि नवऱ्याची साथ अजिबातच नाही. अशी परिस्थिती न ओढवली तरच नवल.

समाजात अजूनही संख्येने भरपूर अशी जनता आहे जी गर्भधारणा आणि अपत्यजन्म याकडे फारसं गांभीर्याने बघत नाही. नांदेडला लोकसहभागातून निर्माण झालेलं, रुग्णांना रास्त दरात आरोग्यसेवा देणारं ‘रयत रुग्णालय’ आहे. तिथे काम करीत असताना आलेला हा अनुभव या मुद्दय़ाशी सुसंगत आहे. या उदाहरणातील, नवरा-बायको दोघेही गरीब, अशिक्षित, पाळणा लांबविण्याच्या साधनांच्या माहितीपासून दूर. अपत्यजन्माच्या बाबतीत नियोजनाचा अभाव समजू शकतो; पण आशा आणि वसंत जाधव या सुशिक्षित, शहरात रहाणाऱ्या जोडप्यांच्या बाबतीत थोडय़ाफार फरकाने असंच घडावं हे पटत नाही. वसंत जाधवला विचारलं- ‘‘तुम्ही पदव्युत्तर आहात, तुम्ही कशी काय ‘काळजी’ घेतली नाही?’’ यावर तो म्हणाला की, ‘‘मी निरोध वापरत होतो, पण कधीकधी वापरायचोही नाही.’’ ‘‘असं का?’’ यावर तो गप्प बसला. त्याच्या गप्प राहण्यामागचं कारण मी ओळखू शकलो. कारण उघडपणे सांगण्यासारखं नव्हतं. एकदा निरोध वापरायचं ठरलं की तो प्रत्येक शारीरिक संबंधाच्या वेळी वापरलाच पाहिजे, असा नियम आहे. त्यासाठी त्या साधनाचा स्टॉक करून ठेवायला पाहिजे. आपल्या रूममध्ये ते साधन उपलब्ध आहे किंवा नाही याची खात्री केली नाही आणि भावना उत्तेजित झाल्यानंतर साधन शिल्लक नाही हे लक्षात आल्यानंतर दोघांकडूनही संयम पाळण्यात आला नाही की अशा ‘चुका’ होणारच. या चुकांमुळे निर्माण झालेला शारीरिक आणि मानसिक ताण भोगावा लागतो तो स्त्रियांनाच.

पुरुषांनी योग्य ती काळजी तर घेतलीच पाहिजे, पण स्त्रियांनी जास्त सतर्क राहिलं पाहिजे. स्त्रियांना ‘नको’ म्हणता आलं पाहिजे. ग्रामीण स्त्रियांच्या जीवनात या ‘नको’ला काही अस्तित्व नाही ही आजची परिस्थिती आहे.

atnurkarkishore@gmail.com

chaturang@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अपत्यजन्माचे समाजभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dr kishore atnurkar article on child birth planning part