प्रथा, रूढी, परंपरा जपताना..

अपत्यजन्माच्या संदर्भात काही अनाकलनीय प्रथांच्या बाबतीतदेखील असंच झालेलं आहे.

डॉ. किशोर अतनूरकर

आपल्या बाळाची कांती गोरी व्हावी, डोक्यावर भरपूर केस असावेत, यासाठी तिला दूध-भाकरी खाण्यासाठी देणे किंवा केशरयुक्त दूध देणे योग्य का अयोग्य हे तपासून पाहिलं पाहिजे. खरं तर गर्भधारणा होत असताना जी जनुकीय परिस्थिती असते त्यानुसार त्या बाळाचे शारीरिक आणि बौद्धिक गुणधर्म निश्चित होत असतात. दूध-भाकरी खाल्ल्याने किंवा केशरयुक्त दुधाने कांती गोरी होत नसते. त्यामुळे ऐकीव माहितीपेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य.

अपत्यजन्मासंदर्भात असलेल्या प्रथा, रूढी, परंपरा आजही समाजात जपल्या जातात. त्या जपायलाही हरकत नाही, पण त्यामागचं शास्त्र अगोदर समजून घेतलं पाहिजे, परिस्थितीनुसार त्यात बदल करून त्याचा अवलंब करणं यात शहाणपण आहे.

आमचे पुण्याचे मित्र वैद्य धनंजय कुलकर्णी म्हणतात, ‘‘कोणत्याही रूढी-परंपरेच्या मागे एक युक्तिवाद असतो. पूर्वी जेव्हा, ज्ञानाचं भांडार लिहून ठेवण्याची पद्धत नव्हती, तेव्हा ते मुखोद्गत करून, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण केलं जात असे. तोंडी प्रक्रियेमुळे, त्या ज्ञानाच्या तत्त्वांमध्ये मर्यादित बदल किंवा परिवर्तन होण्याची शक्यता ही असतेच. रूढी-परंपरेच्या बाबतीत नेमकं असं घडलं असणार आहे. शास्त्र किंवा युक्तिवाद मागे पडून केवळ रूढीचं पालन आंधळेपणाने करण्याची सवय लोकांना लागली. त्या रूढीमागचं तत्त्व उलगडून बघायचं असतं हे सगळ्यांना समजतच असं नाही. अशा परिस्थितीत तर्क नसणाऱ्या प्रथा नाही पडल्या तरच नवल. अपत्यजन्माच्या संदर्भात काही अनाकलनीय प्रथांच्या बाबतीतदेखील असंच झालेलं आहे.

या संदर्भात प्रत्यक्ष अनुभवास आलेली काही उदाहरणं नमूद करावीशी वाटतात. एक पदव्युत्तर शिक्षण झालेली, शहरात राहणारी वैष्णवी, गर्भावस्थेत तपासणीसाठी आलेली असताना तक्रार करते की, डॉक्टर मला आंबा खूप आवडतो पण माझी आई मला आंबा देत नाही; मी कारण विचारल्यानंतर तिच्या सोबत आलेली पदव्युत्तर शिक्षण झालेली आई म्हणते, ‘‘आंबा उष्ण असतो तर मग कशाला द्यायचा?’’ एक खेडय़ात राहणारी अशिक्षित, मुस्लीम स्त्री, आयेशाबेगम म्हणते- ‘‘मेरी ननंद बोलती, खरबूज और ककडी नको खाओ, नारियल पानी नको पीओ, थंडा रहता, सर्दी होकर बच्चे को झटके आ सकते. इतनाही नही, अंडा मत खाओ गरम रहता. ऐसा बोलेतो मेरेको डर लगा. फिर मै क्या खाऊ-क्या नक्को खाऊ  आपीच बोलो.’’ आंध्र प्रदेशात राहणाऱ्या माझी बहिणीने आपल्या सुनेला सिझेरियन झाल्यानंतर एक महिनाभर टाके दुखतील म्हणून भात खायला दिला नाही. या तिन्ही उदाहरणांची जरा मीमांसा केली तर असं लक्षात येतं की, वैष्णवीच्या आईने काय किंवा आमच्या बहिणीने फारसा विचार न करता आंबा खाण्यास किंवा भात खाण्यास विनाकारण मनाई केली. वास्तविक पाहता, आयुर्वेदशास्त्रानुसार आंबा हा उष्ण नसून शीत असतो, उष्ण म्हणजे वाईट आणि शीत म्हणजे चांगलं असं नसतं; भात खाण्याचा आणि टाके दुखण्याचा काही सबंध नाही. वैष्णवीची आई आणि आमची बहीण दोघीही सुशिक्षित, शहरात राहणाऱ्या, पण अशी बंधनं घालण्यापूर्वी त्यांना आपला ज्या डॉक्टरांवर विश्वास आहे त्यांना विचारून निर्णय घ्यावा, असं वाटलं नाही. उलट, ती खेडय़ात राहणारी, अशिक्षित मुस्लीम स्त्री बरी. लोक असं म्हणताहेत, पण मला तुम्ही सांगा डॉक्टरसाहेब मी काय खाऊ अन् काय नको, असं विचारण्याची समज तिने दाखवली. शहरी, सुशिक्षित आणि खेडय़ापाडय़ातील अशिक्षित वर्गात, थोडय़ाफार फरकाने असे प्रकार घरोघरी घडतात. एखाद्याला कोणताही एखादा अन्नपदार्थ ‘चालतो’ अथवा ‘चालत नाही’ हे व्यक्तिरूप बदलत असतं. कोणत्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे हे तपासून डॉक्टर ठरवत असतात, त्यामुळे स्वत:च्या मनाने, केवळ रूढी म्हणून असे सल्ले देऊ नयेत.

आपल्याला एक गोरंपान, सुंदर गुटगुटीत बाळ व्हावं असं सगळ्यांना वाटत असतं. बाळाची कांती गोरी व्हावी, डोक्यावर भरपूर केस असावेत, यासाठी तिला दूध-भाकरी खाण्यासाठी देणे किंवा केशरयुक्त दूध देणं योग्य का अयोग्य हे तपासून पाहिलं पाहिजे. आपल्याला हवी असेल त्या ‘गुणांनी’ युक्त अशी संतती आपण निर्माण करू शकतो असा दावा काही निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ करतात, पण त्यासाठी गर्भ राहण्याअगोदर विशेष तयारी करावी लागते. आज तरी हे संशोधनात्मक स्तरावर आहे, त्याचा सर्रास वापर कधी होईल माहिती नाही. हे सगळं विस्ताराने सांगण्यामागचा उद्देश असा की, गर्भधारणा होत असताना जी जनुकीय परिस्थिती असते त्यानुसार त्या बाळाचे शारीरिक आणि बौद्धिक गुणधर्म निश्चित होत असतात. दूध-भाकरी खाल्याने किंवा केशरयुक्त दुधाने कांती गोरी होत नसते.

बाळंतपणापूर्वी साधारणत: दीड महिना अगोदर एका विशिष्ट पद्धतीने शारीरिक व्यायाम केल्यास नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता अधिक असते, असे काही अभ्यासाचे निष्कर्ष आहेत. गर्भवती स्त्रियांनी, फार पूर्वी दळणं, कांडणं, वगैरेसारखे व्यायाम केले पाहिजेत अशी प्रथा होती. काही वर्षांनंतर, घर झाडून काढणं, फरशी पुसणं असे व्यायाम सासू/आई आपल्या गर्भवती सुनेकडून अथवा मुलीकडून, नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी मुद्दाम करून घेत असत. एखाद्या सुनेने नाही केले असे व्यायाम आणि नेमकं तिच्यावरच काही कारणांमुळे सिझेरियन करण्याची वेळ आली तर, ‘किती वेळा सांगितलं, घरकाम कर म्हणून, आता आणली ना वेळ सिझेरियनची!’ असा टोमणा सासू मारू शकते. आजकाल, शहरातल्या सुशिक्षित वर्गातील गर्भवती स्त्री आपली प्रसूती ‘नॉर्मल’ व्हावी म्हणून योगासनांच्या वर्गाला जाताना दिसतात. पाश्चिमात्य देशात आणि भारतातील काही मोठय़ा शहरांतून गर्भवती स्त्रीवर्ग आपली ‘नॉर्मल’ प्रसूतीची शक्यता वाढावी म्हणून आजकाल व्यायामासाठी ‘बर्थ बॉल’चा उपयोग करतात. गर्भावस्थेत ठरावीक पद्धतीने केल्या जाणाऱ्या व्यायामामुळे किंवा योगासनांमुळे ‘नॉर्मल’ प्रसूतीची शक्यता वाढते असं काही प्रकाशित झालेल्या अभ्यासातून आढळून आलं आहे; म्हणून ते करायला हरकत नाही. पण त्यामुळे काही कारणांमुळे सिझेरियनची वेळ येणारच नाही असं नसतं हे लक्षात ठेवलं पाहिजे.

अपत्यजन्माच्या काही दिवसांनंतरच्या काही प्रथांबद्दल काही बोलू या. घरोघरी छोटय़ा बाळाला स्नान घालणाऱ्या तथाकथित अनुभवी बायका स्वत:ला सिद्ध करण्याच्या नादात अनेक चुका करतात. बाळाला स्नान घालण्यापूर्वी बाळाच्या नाका-कानात तेलाचे थेंब टाकतात, स्नान घालत असताना बाळाचे हात-पाय ओढतात. बाळाच्या नाकात तेल टाकल्याने श्वसनमार्गात तेल जाऊन बाळाचा जीव गुदमरू शकतो, कानात तेल टाकल्याने जंतुसंसर्ग होऊ  शकतो. स्नान घालत असताना नाक ओढल्याने नकटं नाक सरळ होत नसतं. बाळाचे हात-पाय ओढल्याने बाळाची उंची वाढत नसते उलट हाता-पायाला इजा पोचू शकते याची कल्पना त्या बायकांना नसते. असे प्रसंग टाळता येऊ  शकतात.

या निमित्ताने स्तनपानाविषयी एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. बऱ्याचदा बाळाला आईचं दूध कमी पडतंय, म्हणून वरचं दूध दिलं जातं. यासाठी बाटलीचा वापर अजिबात करू नये. बाटलीच्या दुधामुळे बाळाच्या पचनसंस्थेमध्ये जंतुसंसर्ग होऊ  शकतो, बाटलीचं निप्पल कोणतं आणि आईचं कोणतं या बद्दल बाळाच्या मनात गोंधळ निर्माण होऊन स्तनपानातील अडचणी वाढू शकतात.

बाळाला गुटी घालणं, स्तनपानाची सुरुवात होण्यापूर्वी बाळाला मधाचं बोट चाखायला देणं, रडणाऱ्या बाळाला शांत करण्यासाठी एक ठरावीक ‘वॉटर’ पिढय़ान्पिढय़ा देत राहण्याच्या प्रथा आता पूर्वीपेक्षा कमी होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. दिवसातून तीन वेळेस, खूप जोर लावून टाळू माखण्याची गरज नसते हे सांगत असताना, तेल लावून बाळाला मसाज करायला हरकत नाही हेदेखील सांगितलं पाहिजे.

आपली मुलगी किंवा सून गर्भवती आहे हे समजल्यापासून, तिच्यावर आई किंवा सासूच्या (बऱ्याचदा दोघींच्या) सूचनांचा भडिमार सुरू होतो. तुम्हाला आलेल्या अनुभवाचा उपयोग त्यांना झाला पाहिजे हे नक्की, पण सूचनांचा अतिरेक टाळला पाहिजे. तुमच्या सूचनांना तर्काचा आधार हवा जेणेकरून सूचना म्हणजे ‘किरकिर’ असं वाटायला नको. आई, सासू, आजी, काकू, मावशी, आत्या या तमाम मंडळींची माफी मागून त्यांना एक गोष्ट सांगावीशी वाटते की, गर्भावस्थेत आणि बाळंतपणाच्या नंतर, ‘तिच्यावर’ सूचनांचा भडिमार करू नका. तिने काय खावं, काय खाऊ  नये या बाबतीत, आपला ज्या डॉक्टरवर विश्वास आहे, त्यांचा सल्ला जास्त महत्त्वाचा असतो हे मान्य करून त्यात लुडबुड करू नये. अर्धवट ज्ञान आणि गप्पा मारत बसण्याची सवय, यामुळे गैरसमज लवकर पसरतात. अपत्यजन्माच्या संदर्भात ही बाब विशेष लागू पडते.

atnurkarkishore@gmail.com

chaturang@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अपत्यजन्माचे समाजभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dr kishore atnurkar article on pregnancy and tradition

ताज्या बातम्या